संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya
आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 28
किं दुर्लभं? सद्गुरुरस्ति
लोके ।
सत्संगतिब्रह्मविचारणा च ।।
त्यागो हि सर्वस्य शिवात्मबोधः ।
को दुर्जयः सर्वजनैः? मनोजः ।।
आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी..२८
अर्थ..
प्रश्न :- ज्याचा लाभ, प्राप्ति अत्यंत कठीण आहे असं काय आहे?
उत्तर :- सद्गुरु, सत्संगति, ब्रह्मविचार, सर्वस्वाचा त्याग व कल्याणरूप आत्मबोध!
प्रश्न :- सर्वांनाच अजेय.. न जिंकण्यासारखं काय आहे?
उत्तर :- कामदेव!
चिंतन..
जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा.. अवनि / भुमी हे या भुतलावर किमान आवश्यक तितक्या प्रमाणात तर नक्कीच सर्वांना मिळेल.. सहज नाही मिळालं तरी आवश्यक त्या कष्टांनी का होईना निश्चित मिळेल.. सर्वांना सारख्या प्रमाणात नाही मिळालं तरी अजिबात मिळणार नाही असं होणारच नाही! पंच पक्वान्नं रोज सर्वांना सर्वकाळ नाही मिळाली तरी मीठभाकरी अवश्य मिळेल. रेशमी भरजरी झुळझुळीत सुखद मनपसंत वस्त्रं सर्वांना सर्वकाळ नाही मिळाली तरी लज्जारक्षणापुरतं जाडंभरडं मलिन का होईना वस्त्र नक्की मिळेल.
सर्व सुखसोयींनी युक्त, आरामदायी, दीर्घकाळ टिकणारं, टुमदार, हवेशीर, चांगल्या वस्तीत, मोक्याच्या जागेवर, जीवनावश्यक सर्व गोष्टी सहज.. जवळच्या जवळ.. उपलब्ध होतील
अशा ठिकाणी बहुमजली घर सर्वांना हवं तेव्हा नाही मिळणार कदाचित,
पण झोपडी पर्णकुटी किंवा चार आधाराच्या ठिकाणी
दोरी.. वेलींनी बांधून चारसहा पानांचं छप्पर असलेला आसरा आडोसा नक्की मिळवता येईल.
चार लोकात प्रतिष्ठा मिळावी अशा साठी काही उच्च श्रेणीचं
शिक्षण, सोन्याचांदीचे दागदागिने इत्यादीही जरा अधिक कष्टांनी..
पैसे खर्च करून मिळवता येतील!
पण सर्वात महत्त्वाच्या व अत्यावश्यक अशा शांति,
समाधान, आनंद या गोष्टी मिळणं..
मिळवणं जवळजवळ
अशक्य.. कारण त्या गोष्टी मिळवण्यासाठी नितांत आवश्यक असलेले सद्गुरु, सत्संगति, परमेश्वरविषयक विचार, सर्वस्वाचा त्याग आणि
या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणता येईल असा कल्याणरूप आत्मबोध हे पंचक मात्र
अतिशय दुर्लभच म्हणावं लागेल!
मुळात असं आहे की सद्गुरु करायचा नसून आपल्या सुदीर्घ व नैष्ठिक उपासनेचा.. नामसाधनेचा.. ईश्वरदर्शनार्थ असलेल्या तळमळीचा फलस्वरूप असा सद्गुरु आपल्याला शोधत येईल. फक्त ते सद्गुरु आहेत हे ओळखता यायला हवं.
बहवः सन्ति गुरवः शिष्यवित्तापहारकाः ।
विरलाः सन्ति गुरवः शिष्यचित्तापहारकाः ।।
ज्यांची स्वतःचीच देहबुद्धि नष्ट झाली नाही,
ज्यांना परब्रह्मातला प
ही मिळाला वा कळला नाही असे अनेक स्वयंघोषित सद्गुरु शिष्याचं..
गुरुदक्षिणेच्या मिषानं वा गुरुसेवेच्या मिषानं... सर्वार्थानं शोषण करणारे
मिळतील. पण शिष्याकडून
योग्य साधन करवून घेऊन, त्याला निश्चिंत, निःसंदेह, निःसंशय
करणारे,
इतरत्र भरकटणारं त्याचं चित्त एकाग्र व्हायला योग्य
मार्गदर्शन करणारे व एकदा हात धरला की परमात्मप्राप्तीच्या मार्गावर त्याला चालवून
शेवटच्या मुक्कामावर नेणारे व त्यासाठी लागतील तेवढे जन्म स्वतः घेणारे सद्गुरु हे
दुर्लभच होत!
सच्छिष्याला सद्गुरुलाभ व सद्गुरुला सच्छिष्यलाभ हे दोघांच्या प्राक्तनात एकाच वेळी असायला हवं! शिष्याला छिन्नसंशय करणारे, त्याच्या अंतःकरणातला अज्ञानतिमिर नष्ट करून त्याचे नेत्र ज्ञानांजनशलाकेनं उघडणारे, संसारविषयक भ्रांतीचा विच्छेद करणारे मी परमेश्वराचा दास आहे हा दासोऽहं अनुभूतिजन्य बोध घडविणारे सद्गुरु अत्यंत दुर्मिळ.. दुर्लभ असतात!
दुसरी दुर्लभ गोष्ट म्हणजे सत्संग! आचार्यांनीच सांगितल्याप्रमाणे मनुष्यत्व मुमुक्षुत्व व
महापुरुषांचा.. संतसत्पुरुषांचा.. आत्मसिद्धपुरुषांचा सत्संग या तीनही दुर्लभ
गोष्टी दैवाच्या अनुग्रहानंच मिळणाऱ्या आहेत!
संतसत्पुरुष व सद्गुरु हे भिन्न नव्हेतच. व्यक्तीच्या आत्मोत्कर्षासाठी,
आध्यात्मिक उन्नयनासाठी, आत्मज्ञान.. मोक्षमुक्तीसाठी आवश्यक असणारा सद्गुरु संतसत्पुरुषच असतो..
पण तो अनेकांसाठी.. समूहासाठी सर्वसाधारण मार्गदर्शक असतो!
सद्गुरु, संत,
सत्पुरुष कपाळावर पाटी.. चिट्ठीचपाटी चिकटवून..
गाजावाजा करीत.. प्रसिद्धीची साधनं वापरीत कधीही कुणासमोर येत नाहीत..
विशिष्ट पोषाखात वावरत नाहीत..
चटकन ओळखू येतील असा सर्वसामान्यांपेक्षा त्यांचा अवतार
नसतो.. त्यांचं
दर्शन नसतं! पण त्यांची साधना.. तप, निर्लोभी, देहबुद्धिविरहित
आचरण व त्यांनी तोंड उघडताच कानी पडणारे ज्ञानदायी शब्द यावरून त्यांच्या खर्या
स्वरूपाबद्दल अटकळ बांधणं, अंदाज करणं, कल्पना
येणं शक्य होतं!
अशा व्यक्ति पुष्कळदा सर्व लोकांपासून लांब.. फटकून राहतात! स्वस्वरूप लपवण्यासाठी लोकात भ्रम निर्माण होईल असं वागतात, बोलतात! त्यामुळं खरा सत्संगही अतिशय दुर्लभच असतो! सद्गुरूंची प्रसन्नता व सत्संगति यांच्यावाचून ईश्वरविषयक विचार करण्यासाठी प्रवृत्त होणं अशक्य! यदाकदाचित ब्रह्मविचार करण्यासाठी प्रवृत्ति झाली तरी तो विचार योग्य प्रकारे.. योग्य वेळी चित्तात रुजणं, वाढणं, दृढमूल होणं व सदासर्वदा, सर्वथा त्याच ब्रह्मविचारात राहणं हे अत्यंत कठीण... नव्हे नव्हे अशक्यच! असं आहे, की, परब्रह्म हे मुळातच विचारांच्या पलिकडे..विचार करणाऱ्या बुद्धीच्या पलिकडे.. ती बुद्धि ज्यात राहते त्या मनाला अगम्य! कारण मन इंद्रियांवर अवलंबून.. त्यांच्यामार्फत मिळणाऱ्या अनुभवापुरतंच बघणारं!
इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः।
मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धेः परतस्तु सः।।
असं गीता त्या परब्रह्माबद्दल म्हणते.. न सोऽस्ति प्रत्ययो लोके यः शब्दगमात् ऋते । असं जरी शब्दमाहात्म्य असलं तरी परब्रह्माचं ज्ञान.. त्यातून होणारा आत्मबोध.. शब्दांच्या पलिकडचाच असतो! ब्रह्माकडे.. तिथपर्यंत नेणारा, त्याव्यतिरिक्त असणाऱ्या सर्वांचा निरास करणारा विचार अशी ब्रह्मविचार या शब्दाची फोड करता येईल!
पण ब्रह्म हे सर्व विचारांच्या पार आहे.. कोणत्याही
प्रकारच्या चिमटीत सापडणारं नाही! म्हणून ब्रह्मविचारही दुर्लभच!
ब्रह्मापर्यंत नेणाऱ्या विचाराची कास धरायची तर सर्व संसाराकडे पाठ फिरवायला हवी!
परमार्थ व प्रपंच या दोन्ही तलवारी एका म्यानात राहू शकत
नाहीत व त्या एकत्र ठेवायच्या तर त्या वस्तूला म्यान म्हणता येत नाही.. येणार
नाही!
प्रपंच म्हटला की विविध विषयांचं ध्यान,
विषयांचा संग व संगज कामक्रोधादि अनर्थपरंपरा.. जी
विनाशापर्यंत मनुष्यजीवाला नेते.. हे सर्व आलंच!
असंगशस्त्र दृढ धरून संग आमूलाग्र कापल्या शिवाय परमार्थ
साधणार नाही.. त्यासाठी सर्वसंगपरित्यागच हवा.. सर्वस्वाचा त्याग हवा!
आत्मार्थे पृथिवीं
त्यजेत् ।.. प्राण तोही वेचावा.. ही परमावधि गाठायची तयारी हवी..
सर्व प्रकारच्या वासनांचा, एषणांचा स्वरूपतः त्याग व्हायला हवा! तरच ब्रह्मविचार
दृढमूल व चिरस्थायी होईल! त्यातूनच चिरशांति, नित्य समाधान व अमर्याद, अनंत आनंद यांचा लाभ होईल!
हेच आत्मबोधाचं.. परमकल्याणप्राप्तीचं अनन्यसाधारण असं फलित
आहे! अलिकडे
सांगितलेल्या चार गोष्टी.. सद्गुरु, सत्संगति, ब्रह्मविचार व सर्वस्वाचा त्याग हे कल्याणरूप मंदिराचे
आधारभूत स्तंभ असून आत्मबोध हा त्या मंदिराचा कळस आहे!
खांबच इतके दुर्लभ.. तर त्यावर चढवायचा कळस किति दुर्लभ
असेल नाही?
या पाचही गोष्टी प्राप्त करायच्या तर माणसाला प्राथमिक
तयारी म्हणून ज्याच्यावर विजय मिळवणं अत्यावश्यक आहे.. तो
म्हणजे कामदेव! हाच सर्वात अजेय, अजिंक्य आहे! त्याच्यावर विजय ही अत्यंत दुःसाध्य गोष्ट आहे!
शत्रू उघड रूपानं आला तर त्याच्या बरोबर दोन हात करणं..
लढणं शक्य आहे! कारण त्याची शस्त्रास्त्रं,
बलाबल, इत्यादि समोर दिसत असतं!
पण तो गनिमी काव्यानं लढत असेल तर लढणं व जिंकणं अतिशय
कठीण.. अशक्यच!
फसव्या रूपात समोर येणाऱ्या कामदेवाला ओळखणार कसं व ओळखता आला नाही तर त्याची बलस्थानं जाणणार कशी?
ती जर जाणता आली नाही तर लढाई साठी मोर्चेबंदी..
नियोजन.. युद्धसामग्रीची संपादणी.. इत्यादि
तरी कसं शक्य आहे? या सर्वांवाचून लढणार तरी कसं?
सागरमंथनातून मिळालेल्या अमृताचं वाटप करण्यासाठी मोहिनीचं
रूप घेतलेल्या विष्णूंसमोर ऋषिमुनि, तपस्वी, योगी इ.
अध्यात्ममार्गी.. परमार्थमार्गी बरेच जण आले होते... सामान्य जन व असुर यांना
तिच्याकडे बघितल्यावर कामदेवाची बाधा होईल हे समजण्यातलं आहे!
पण ऋषिमुनि तपस्वी योगी यांच्या मनातही तिच्या प्राप्तीसाठी
इच्छा,
अभिलाषा निर्माण झाली म्हणजे कामदेव निश्चितच अजिंक्य
आहेत.. इतकंच
कशाला शंकरांलाही तिच्याबद्दलचा
मोह बाधला! रंभा,
मेनका, ऊर्वशी इत्यादि अप्सरांची योजना इंद्रदेव वा अन्य देवता
आपापलं आसन डळमळित करणाऱ्यांकडे
पाठवित असत. ते अशांची ही नाजूक, दुखरी, दुबळी नस ओळखूनच!
शत्रुराष्ट्रांकडील रहस्य.. संरक्षणविषयक गुपितं चोरण्यासाठी प्रत्येक राष्ट्रातील हेरखातं हा त्या दृष्टीनं महत्त्वाच्या अधिकारी, मंत्री यांना अजेय असा कामदेव लक्षात ठेवूनच पृथ्वीवरील अप्सरांची योजना करीत असतं! आजकाल क्षुद्र स्वार्थासाठीसुद्धा कामदेवाबरोबरील युद्धातल्या या दुर्बलतेचाच साधन म्हणून सर्वच क्षेत्रात वापर केलेला आढळतो! कामदेव हा केवळ स्त्रीपुरुषांमधील देहसुखाकर्षण इतक्याच मर्यादित अर्थानं घेण्याची आवश्यकता नाही.
ज्या ज्या गोष्टींबद्दल, वस्तुपदार्थ, व्यक्ति, घटना, प्रसंग इ. इ. बद्दल मनात इच्छा अभिलाषा ज्याच्या प्रभावाने निर्माण होते त्यालाही कामदेवच म्हणायला हवं.. हा कामदेव समोर आला की रतिही प्रकट होते. त्या सर्वांबद्दल रुचि निर्माण होते व स्वीकृत.. अंगीकृत कर्तव्य, ध्येय इ कडे दुर्लक्ष होऊन भ्रष्टता येते! अशा वेळी कामदेवाला भस्मसात करून अनंगरूप देणार्या शंकरांचा तिसरा वैराग्यरूप. अग्निरूप नेत्र आपल्यालाही उघडता आला पाहिजे.. तर पूर्वोक्त पंचकप्राप्ति होईल असं शंकराचार्यांना सांगायचं आहे!
श्री.
श्रीपादजी केळकर (कल्याण)