संस्कृत सुभाषित रसग्रहण
महाभारतातील सुभाषित वेचे
mahabharat subhashit
छंद :- इंद्रवज्रा
जानामि धर्मं न च मे प्रवॄत्ति:
जानाम्यधर्मं न च मे निवॄत्ति: ॥
केनापि देवेन हृदि स्थितेन
यथा नियुक्तोऽस्मि तथा करोमि॥
- १४.५०.३६, महाभारत.
अर्थ :-
(दुर्योधन म्हणतो) "मी धर्म जाणतो परंतु त्यात माझी प्रवृत्ती नाही. (तो माझा स्वभाव नाही.) अधर्म काय आहे हे सुद्धा मी जाणतो परंतु त्यापासून मला निवृत्ती नाही. माझ्या हृदयात कोणी देवता आहे जी माझ्याकडून जे काही करवून घेते तेच मी करतो.
टिप :- महाभारतातील अश्वमेधादिक पर्वामधील गर्ग संहितेमध्ये वरील श्लोक समाविष्ट आहे.
दुर्योधन म्हणतो, 'धर्म काय अधर्म काय हे दोन्ही मला माहिती आहे पण असे असूनही धर्माच्या मार्गाचे अवलंबन करणे ही माझी प्रवॄत्ती (स्वभाव) नाही आणि अधर्ममार्गापासून (अधर्माचरणापासून) मला निवॄत्ती नाही.(मी माझा अधर्मी स्वभाव बदलू शकत नाही.)' पुढे दुर्योधन म्हणतो की, 'माझ्या हृदयात अशी कोणी देवता असावी की जी मला हे सगळं दुष्कर्म करण्यास प्रयुक्त करते.' वाईट माणसं दुर्योधनासारखीच कारणं देऊन आपल्या वागण्याचं समर्थन करत असतात.
असे नाही की पापाचरण करणाऱ्याला पाप किंवा पुण्य आणि त्याचे परिणाम माहिती नसतात. पण स्वार्थाने तो इतका अंधळा (पतित) झालेला असतो की स्वतःशिवाय त्याला काहीच दिसत नाही.
दुष्टांच्या ह्या खलस्वभावाशी संदर्भ असणारा एक श्लोक रावण व त्याचा आजोबा माल्यवान यांच्या संवादामध्ये वाल्मीकिरामायणात आहे. रावण माल्यवानास म्हणतो,
द्विधा भज्येयमप्येवं न नमेयं तु कस्यचित्।
एष मे सहजो दोषः स्वभावो दुरतिक्रमः॥
युद्धकांड, वाल्मीकी रामायण ३६.११
माझे दोन तुकडे झाले तरी चालतील पण मी कोणासमोर झुकणार (नमणार) नाही. हा माझा सहज स्वाभाविक दोष आहे आणि स्वभाव अपरिवर्तनीय (कधीही न बदलणारा) असतो. मूळ स्वभाव बदलणे अशक्य आहे.
यातून रावण मी मोडेन पण वाकणार नाही हा जरी स्वतःचा स्वभाव आहे असे सांगत असला तरी त्याच्या वाईट स्वभावाचा कैवार घेऊन व त्याबद्दल कोणताही पश्चात्तापाची भावना न ठेवता बोलतो आहे. दुर्योधनाच्या वरील श्लोकातील म्हणण्याप्रमाणेच रावणही त्याबद्दल स्वतःला दोषी धरत नाही. दुष्टांचा स्वअवच असा असतो स्वतःच्या दुष्कृत्याबद्दल ते स्वतःला कधीच दोष देत नाहीत. उलट कुठल्यातरी दुसर्याच गोष्टीचा आधार घेत तेआपले दुष्कृत्य झाकत असतात.
श्रीमद्भगवद्गीतेच्या कर्मयोग या तिसर्या अध्यायात मनुष्याच्या या स्वभावाविषयी अर्जुन श्रीकृष्ण स्वारींना विचारतो की,
अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरित पुरुषः।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः॥३.३६॥
हे वार्ष्णेया, हे वृष्णिकुलश्रेष्ठा श्रीकृष्णा! मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने पापाचरण करण्यास (वाईट वागण्यास) कसा काय प्रेरित होतो?
अश्रद्धा, असूया, दुष्टपणा, मूर्खपणा (अज्ञान), स्वभाव, राग, द्वेष, सद्धर्माची आवड नसणे तसेच वाईट व्यसनांची आवड असणे अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे माणूस पापमार्गास प्रवृत्त होतो. याशिवाय ईश्वर, प्रारब्ध, युग, परिस्थिती, कर्म समाजनियम, रीतीरिवाज, सरकारी कायदे इत्यादी बंधने असूनही माणूस पाप करण्याकडे प्रवृत्त होतो.
श्रीकृष्ण म्हणतात काम व क्रोध हे दोन रजोगुणी राक्षसच या सगळ्यास कारणीभूत आहेत. जे फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ पहातात त्यांच्यावर दोन्ही राक्षसांचा मोठा प्रभाव असतो. यांपासून सुटायचे असेल तर, सतत व निरंतर अभ्यासाची स्वाध्यायाची, प्रत्यक्षांत सदाचरणाच्या सरावाची आवश्यकता आहे. जीवनात प्रयत्नपूर्वकपणे सदाचरणाचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे.
संकलन व टिप - श्रीमान अभिजीत काळे सर