दिनांक :- 19-4-2022
दुर्जनांचे ४ स्वभावधर्म
नीतिशतकम् सुभाषित रसग्रहण neeti-shatak subhashits
अकरुणत्वमकारणविग्रह परधने परयोषिति च स्पृहाः ।
सुजनबन्धुजनेष्वसहिष्णुता प्रकृतिसिद्धमिदं हि दुरात्मनाम् ॥
मराठी श्लोकानुवाद :- वामनपंडित
छंद :- भुजंगप्रयात
फुका कोरडें वैर की निर्दयत्व ।
परस्त्री परद्रव्य हे मुख्य तत्व ॥
अनिष्टत्व चिंती सुहृद्द्बांधवांचे।
स्वतः सिद्ध हैं रूप पै दुर्जनांचें ॥
मराठी श्लोकानुवाद :- ल. गो. विंझे -
छंद :- उपजाति
क्रूरत्व अन् कारणहीन वैर
इच्छी परांचें धन आणि नार ॥
दुरस्वास हो आप्त नि सज्जनांचा
स्वभाव हा नित्यचि दुर्जनांचा ॥
गद्यार्थ- १) निर्दयपणा, २) कारणांशिवाय भांडण उकरून काढणें, ३) परधन आाणि ४) परस्त्री यांचा लोभ; सज्जन व आत यांचा दुस्वास हे दुर्जनांचे स्वभावधर्मच होत.
विस्तृत अर्थ :-
कारुण्यरहितत्व, विनाकारण भांडणाची (हौस), परधन तथा परस्त्रीची लालसा, सज्जन व आप्तांशी सहिष्णुतेचा अभाव, हे दुष्टांच्या ठिकाणी उपजतच असतात.
येथून पुढील सुभाषितांच्या एका गटास दुर्जनपद्धती म्हणण्याची पद्धती आहे. या पहिल्याच सुभाषितात महाकवि भर्तृहरींनी दुष्टांच्या उजपत गुणांची (?) सूची सादर केली आहे. वेगळ्या शब्दांत, दुष्ट म्हणावे कुणाला, याचे निकषच सादर केले आहेत.
यात प्रथम लक्षण आहे अकारुण्य. करुणा हा संतांचा स्थायीभाव असतो. उलट अकरुण हे दुष्टत्वाचे लक्षणच आहे त्याला क्रूरता ही म्हणावे. कारुण्याचा अभाव. कुणाच्याही बाबत त्यांच्या मनात दया, कणव वगैरेंची शक्यताच नसते. स्वतःच्या स्वार्थापायी तो अनेकांना दुखवत असतो. व आपला स्वार्थ साधून घेत असतो.
दुसऱ्यांबाबत दयार्द्रता नसल्यानेच त्यांच्याशी भांडण करण्यास त्यांना कोणतीच अडचण नसते. विनाकारण भांडत राहणे, हे दुष्टत्वाचे आणखी एक लक्षण असते. जुण्या गोष्टी आठवून भांडण उकरून काढणे.
दुष्टत्वाची सगळ्यात महत्त्वाची ओळख काय? तर परधन आणि परस्त्रीची लालसा. येथे एक गोष्ट समजून घ्यायला हवी की, येथे 'लालसा, 'स्पृहा' म्हटले आहे. कृती कदाचित नसेलही, पण, मनोमन आकांक्षादेखील व्यक्तीला दुष्टत्वाच्या सूचीत समाविष्ट करते, हे लक्षात घ्यायला हवे. परधन तथा परस्त्रीची आकांक्षाच दुष्टाची सगळ्यात मोठी कमजोरी असते. नेहमी परस्त्रीवर दृष्टी ठेवून ती कशी प्राप्त होईल याविषयी प्रयत्न करत राहणे, आणि ती प्राप्त करण्यासाठी क्रुरतेचाही अवलंब करणे. हे दृष्ट माणसाचे लक्षण होय.
दुष्टाचे आणखी एक लक्षण म्हणजे सज्जनद्रोह. सज्जनांशी, आपल्या सग्यासोयऱ्यांशीदेखील मत्सराने, आकसाने वागणे हा दुष्टांचा भाव असतो.
हे सगळे त्यांना परिस्थितिवशात वगैरे करावे लागत नाही, तर हा त्यांचा जन्मजात स्वभावच असतो. सहजवृत्ती असते. प्राकृतिक अवस्था असते. हेच सगळ्यात महत्त्वाचे.
सज्जनांबद्दल निष्कारण वैर चाळणे, सज्जनांच्या गुणांचे दोष करणे, जनलोकात सज्जनांची निंदा करणे, एखादा सज्जन मनुष्य जनप्रीय असतो. सर्व लोक त्याला मानतात त्याचा आदर करतात ते या दुर्जनाला सहन होत नाही. मीही त्याच्या पेक्षा श्रेष्ठ आहे असं दाखवण्याची धडपड तो नेहमी करीत असतो पण मान, आदर, या गोष्टी मागितल्याने मिळत नाही. त्याला कोणीही मान देत नाही म्हणून तो त्या सज्जन माणसाचा द्वेष करू लागतो मत्सर करू लागतो.
ही चार दुर्जन माणसाची लक्षणे महाकवी भर्तृहरीने सांगितलेली आहे. आजच्या काळात अशा प्रकारची अनेक माणसे आपल्या समोर, आपल्या अवतीभवती दिसतात. अशा माणसापासून लांब राहणेच हितकर असते.