संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit
सुभाषित क्रमांक ०१
अनेकसंशयोच्छेदि परोक्षार्थस्य दर्शकम्!
सर्वस्य लोचनं शास्त्रं यस्य नास्त्यन्ध एव स:!!
( हितोपदेश)
अर्थ- अनेकसंशयोच्छेदि ( पुष्कळ शंकांचा निरास करणारं) परोक्षार्थस्य ( परोक्ष - दृष्टिआड असलेलं अर्थ = वस्तु) दर्शकम् आपल्या दृष्टिआड असलेली वस्तू दाखवणारं सर्व जगताच्या जणू डोळाच असलेलं शास्त्र ज्याच्याजवळ नाही तो आंधळाच असतो.
शास्त्र हा शब्द शास् या धातूला ‘ त्र’ हा प्रत्यय लागून तयार झाला आहे. ‘ त्र’ हा प्रत्यय स्थानदर्शक आणि साधनदर्शक आहे. उदा. सर्वत्र या शब्दात त्र या प्रत्ययामुळे कुठे या प्रश्नाचं उत्तर मिळतं. तर ,पात्र’ या शब्दात त्र हा प्रत्यय ‘ साधन सांगतो. पात्र म्हणजे पिण्याचे साधन. शास् धातूचा अर्थ आहे ‘ शिस्त लावणे, व्यवस्था लावणे.
माणसाच्या विचारांना शिस्त लावण्याचं साधन म्हणजे शास्त्र. उदा. नाटक कसं असावं या विषयीच्या आणि तदनुषंगिक विचारांची चौकट म्हणजे नाट्यशास्त्र. राजानं पृथ्वी ( राज्य) संपादन करण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी काय करावं हे सांगणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र ( politics). या शास्त्राचा अभ्यास केल्यावर त्याविषयाबद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात. म्हणून त्याला अनेकसंशयोच्छेदिन् हे विशेषण लावलं.
शास्त्रामध्ये चर्चा केलेल्या विषयांचा स्वत: अनुभव घ्यावा लागत नाही. त्यामुळे समोर नसलेली गोष्टही शास्त्रामुळे सिद्ध होते. नेहमीचं उदा. घेऊ या. दूर कुठंतरी धूर दिसतो आहे, पण अग्नी दिसत नाही. पण, धुरावरून तिथं अग्नी आहे असा अनुमान आपण करू शकतो. इथं अग्नी परोक्ष आहे. संस्कृत भाषेत परोक्ष म्हणजे डोळ्यांना न दिसणारी, डोळ्याआड असलेली वस्तू ( परागत: अक्ष्णो:).
डोळ्यांना न दिसणार्या या अग्नीचं अस्तित्व विचारांच्या शिस्तीमुळे, जिथं धूर तिथं अग्नी या नियमामुळे सिद्ध करू शकतो. म्हणून शास्त्राचं परोक्षार्थस्य दर्शकं असं वर्णन केलं आहे. प्राचीन आणि अर्वाचीन सर्व शास्त्रं अनुमानाच्या सहाय्यानं अदृश्य वस्तू दृश्य बनवतात. शास्त्राला संपूर्ण जगताचा लोचन ‘ डोळा’ म्हटलं आहे. डोळ्यांना ज्ञानसंपादनाचं साधन म्हणून खूप महत्त्व आहे. शास्त्रदेखिल ज्ञानसंपादनाचं महत्त्वाचं साधन आहे.
जाताजाता परोक्ष शब्दांची चर्चा करू.’ परोक्ष’ हाच शब्द मराठीत आपण ‘ अपरोक्ष’ करून टाकला. माझ्या अपरोक्ष घडलं म्हणजे माझ्या डोळ्याआड घडलं. भाषेत बदल होत असतात. त्याला चूक म्हणत नाहीत. कारण हा बदल नकळत झालेला असतो आणि सर्व समूहानं स्वीकारलेला असतो. त्यामुळे संस्कृतमध्ये ‘ परोक्ष’ बरोबर आणि अपरोक्ष.
प्रा. डॉ. निर्मला कुलकर्णी (पुणे)
सुभाषित क्रमांक ०२
कवींच्या शाब्दिक करामती
चंद्रायते शुक्लरुचापि हंसो ।
हंसायते चारुगतेन कान्ता
कान्तायते स्पर्शसुखेन वारि ।
वारीयते स्वच्छतया विहायः!
शुक्ल ( शुभ्र)
रुचा ( वर्णामुळे)
हंस चंद्रायते (चंद्रसारखा होतो),
कान्ता ( सुंदर स्त्री, पत्नी) चारुगतेन ( सुंदर चालीमुळे) हंसायते (हंसासारखी होते).
वारि ( पाणी)
स्पर्शसुखेन(सुखद स्पर्शामुळे)
कान्तायते ( कांतेसारखा होतो).
विहायः ( आकाश) स्वच्छतया ( नितळतेमुळे) वारीयते ( पाण्यासारखे होते).
संस्कृत साहित्यशास्त्रात साहित्यशास्त्रकार अलंकारांची उदाहरणं अगदी निवडून देतात. विश्वनाथ कविराज या उत्कल साहित्यशास्त्रज्ञानं रशनोपमा या अलंकारांची उदाहरणं देण्यासाठी हा श्लोक निवडला. रशना म्हणजे दोरी. दोरीचे पेड जसे जागा बदलतात, उजवा पेड डावीकडे जातो, त्याप्रमाणे उपमेय आपली जागा बदलतं, उपमान होतं. हे प्रत्येक ओळीत होतं आणि उपमांची रशना विणली जाते. ज्याला उपमा द्यायची ते उपमेय आणि ज्याची उपमा द्यायची ते उपमान.
वरील उदाहरणात पहिल्या ओळीत हंसाला चंद्राची उपमा दिली आहे. हंस हे उपमेय आणि चंद्र हे उपमान. पुढच्या ओळीत उपमेय हंस उपमान झाला. हंसाची उपमा सुंदर स्त्रीला दिली आहे. हंस हे उपमान आणि कान्ता उपमेय. त्याच्या पुढच्या ओळीत कांता हे उपमान आणि वारि हे उपमेय, त्या पुढच्या ओळीत वारि हे उपमान आणि विहायस् म्हणजे आकाश हे उपमेय अशी उपमेयांना उपमान बनवून उपमांची दोरी वळली. म्हणून ही ‘ रशनोपमा’.
ही रशनोपमा अधिक सुंदर करण्यासाठी कवीनं व्याकरणातल्या विशिष्ट प्रकारच्या रूपांचा उपयोग करून घेतला आहे. चंद्रायते, हंसायते, कान्तायते आणि वारीयते ही क्रियापदं नामधातूंपासून तयार झाली आहेत. संस्कृत मधील नामं साधारणतः: धातूपासून तयार झालेली आहेत. उदा. देव हे नाम दिव् तळपणे, चमकणे या धातूपासून तयार झाले आहे.
या नामांपासून पुन्हा क्रियापद तयार केलं की त्याला नामधातू म्हणतात. 'इव आचरति’ ..सारखा वागतो किंवा 'तोच होतो’ असा अर्थ या नामधातूंमधून व्यक्त होतो. देवयति म्हणजे देवासारखा वागतो किंवा देवच होतो. हंस चंद्रासारखा दिसतो, चंद्रच होतो.
हा श्लोक कोणी रचला माहित नाही. पण संस्कृत साहित्यशास्त्रकार मात्र अशा शाब्दिक करामतींना दुय्यम दर्जा देतात.
डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी (पुणे)
सुभाषित क्रमांक ०३
अपूर्व: कोsपि कोशोsयं विद्यते तव भारति!
व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात्!!
हे भारति ( अगं विद्यादेवी)
तव ( तुझा)
अयं ( हा)
क: अपि (कोणतातरी)
कोश: ( खजिना)
अपूर्व: ( आश्चर्यकारक)
विद्यते ( आहे).
( स:) ( तो)
व्ययत: (खर्च केल्याने)
वृद्धिम् आयाति (वाढतो)
( अपि च) ( आणि)
सञ्चयात् ( साठवून ठेवल्याने)
क्षयम् आयाति (नष्ट होतो, कमी होतो).
मराठी श्लोकानुवाद :- अगं विद्यादेवी, तुझ्याजवळ हा जो काही कोश ( खजिना) आहे ना, तो फारच आश्चर्यकारक,कधीही न पाहिलेला असा आहे. तो (व्ययत:) खर्च केल्यावर वाढतो आणि साठवला की कमी होतो.
धन साठवले की वाढते, खर्च केले की कमी होते. पण विद्यारूपी खजिना मात्र नेमका यांच्या उलट, म्हणूनच ती अचंबा वाटण्याजोगी गोष्ट आहे. शिकलेली विद्या दुसऱ्याला देण्यानं वाढते. ती आपल्याजवळच ठेवली तर नष्ट होते. ऋषिऋण किंवा गुरुऋण फेडण्यासाठी फक्त स्वाध्याय करून उपयोग नाही, अध्यापन करायला हवं. उत्तम शिष्य तयार करणं महत्त्वाचं. शिष्य गुरूहून श्रेष्ठ ठरला तर त्यात गुरूनं मत्सर वाटून घेण्याचं कारण नाही. 'शिष्यप्रकर्षो यशसे गुरूणाम्' शिष्याच्या उत्कर्षामुळे गुरूचीच कीर्ती वाढते. विंदांच्या भाषेत सांगायचं तर
दुप्पटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले!
तो गुरूंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा!!
भारती हा शब्द मुळात भाषा या अर्थी आहे. सुरभारती म्हणजे देववाणी संस्कृत भाषा. वेद काळात आर्य लोकांचे वेगवेगळे समूह होते, भरत, यदु, तुर्वश इ. त्यातल्या भरतकुलाची जी भाषा ती भारती. यथावकाश हा शब्द सर्वसाधारण 'भाषा' या अर्थी रूढ झाला.
डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी (पुणे)
सुभाषित क्रमांक ०४
भोजनं देहि राजेंद्र घृतसूपसमन्वितम् !
माहिषं च शरच्चन्द्रचन्द्रिकाधवलं दधि !!
मराठी श्लोकानुवाद :- राजेन्द्र, (अरे श्रेष्ठ राजा), ( मला) ( घृत ) तूप आणि ( सूप) आमटी इ. सहित जेवण दे. तसेच म्हशीचे शरद् ऋतूतल्या चंद्राच्या चांदण्या प्रमाणे शुभ्र दही दे.
कालिदास भोजराजाच्या दरबारात होता असं म्हणतात. भोजराजा रसिक होता. स्वत: साहित्यिक होता. सरस्वतीकण्ठाभरण ( सरस्वतीच्या कंठातील दागिना ) नावाचा ग्रंथ ही त्याने लिहिला होता. प्रतिभाशाली कालिदासाला त्यांच्याकडून खूप बिदागी मिळत असे. उत्तम काव्याच्या प्रत्येक ओळीला तो १०० पण (प्राचीन काळचे एक नाणे) बक्षिस देत असे.
एकदा त्याच्या राज्यातल्या एका गरीब ब्राह्मणाला वाटले आपणही एखादा श्लोक रचावा, २०० पण मिळाले तर जन्माची ददाद तरी मिटेल असा विचार करून तो श्लोक लिहायला बसला. बिचाऱ्याला दोन वेळचे जेवणही मिळत नसे. म्हणून त्यानं पहिली ओळ लिहिली_ भोजनं देहि राजेंद्र. हे राजा, मला जेवण दे. विशेषणाशिवाय संस्कृत काव्याची सफलता नाही. म्हणून त्या ब्राह्मणाने भोजनाचे एक विशेषण योजले. घृतसूपसमन्वितम्! घृत म्हणजे घट्ट तूप.
सूप हा शब्द संस्कृतमध्येही 'आहे. आमटी, भाजी सारखा पातळ पदार्थ म्हणजे सूप ( curry). स्वयंपाक्याला संस्कृतमध्ये सूपकार म्हणतात. हा शब्द इंग्रजीनं संस्कृतमधून किंवा संस्कृतने इंग्रजीमधून उसना घेतलेला नाही. भाषाशास्त्रामधील यादृच्छिक साधर्म्याचे ( accidental similarity) हे उत्तम उदाहरण आहे. ब्राह्मणाच्या प्रतिभेची झेप घृत आणि सूपाच्या पलीकडे गेली नाही. त्यानं पहिली ओळ कशीबशी लिहिली. दुसरी ओळ त्याला काही केल्या सुचेना. पण बक्षिसांचा मोहही सुटत नव्हता. शेवटी तो कालिदासाकडे गेला. म्हणाला, कविराज, मला दुसरी ओळ कृपया लिहून द्या.
कालिदासानं ताबडतोब दुसरी ओळ लिहून दिली. ती पहिल्या ओळीतील अर्थाला निश्चितच पूरक होती. पण कालिदासाच्या प्रतिभेची झलक या एका ओळीतही दिसली. त्यानं त्या दह्यासाठी दोन विशेषणं वापरली. माहिष ( महिषी म्हणजे म्हैस) म्हशीचं दूध विरजून तयार केलेलं दही. गाईच्या दुधाचं दही थोडंसं पातळ असतं तर म्हशीचं दही घट्ट असतं. दुसरं विशेषण खूप सुंदर आहे. 'मला शुभ्र दही दे'हा आशय व्यक्त करण्यासाठी सुरेख शब्द वापरले आहेत. दह्याचा शुभ्रपणा हा चांदण्यांसारखा असावा.
पण हे चांदणं ( चंद्रिका) कोणत्याही ऋतूतलं नव्हे; तर शरद् ऋतूतले. शरद् ऋतूमध्ये आकाश ढगाळ नसतं. त्यामुळे चांदणं अधिक शुभ्र असतं. इथंच आपल्याला पहिल्या ओळीतला आणि दुसऱ्या ओळीतला काव्यदृष्टया फरक लक्षात येतो. 'रमणीयार्थप्रतिपादक: शब्द: काव्यम्' अशी काव्याची व्याख्या जगन्नाथ पंडिताने केली आहे. 'सुंदर अर्थ सांगणारे शब्द म्हणजे काव्य'. शब्दानं व्यक्त होणारी वस्तू सुंदर हवी. घृत आणि सूप केवळ वस्तुस्थितीचे वर्णन करतात. दधि हा शब्द वस्तुस्थितीचे वर्णन करत असला तरी त्याचं विशेषण असलेला शरच्चंद्र...हा शब्द सुंदर वस्तू व्यक्त करतो. म्हणून दुसरी ओळ ही चांगली कविता आहे.
हा श्लोक त्या ब्राह्मणाने भोजराजाला म्हणून दाखवला. भोजराजानं त्याला दुसऱ्या ओळीसाठी १०० पण दिले आणि सांगितले पहिली ओळ लिहिणाऱ्यानं पुन्हा कविता करण्याच्या भानगडीत पडू नये.
डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी
(पुणे)