पराक्रमाला साह्याची गरज भासत नाही neeti-shatak subhashits

पराक्रमाला साह्याची गरज भासत नाही neeti-shatak subhashits

 नीतिशतकम् सुभाषित 

neeti shatak subhashits

  

पराक्रमाला साह्याची गरज भासत नाही 


एकेनापि हि शूरेण पदाक्रातं महीतलम् । 

क्रियते भास्करेणेव स्फारस्फुरिततेजसा ॥

अनुष्टुभ्

वामनपंडित मराठी अनुवाद 

सूर्येच अथवा शूरें हें भूमंडळ सर्वथा । 

पादाक्रांत करावें; का इतराची असो कथा ? ॥ 


ल. गो. विंझे मराठी अनुवाद 

छंद :- अनुष्टुभ 

एकही शूर पृथ्वीला पादाक्रांत करी तसा । 

अत्यंत थोर तेजस्वी किरणांनीं रखी जसा ॥ 

अर्थ :- शुर पराक्रमी पुरुष एकटा असला तरी तो संपूर्ण पृथ्वीला पदाक्रांत करतो. त्याला कुणाच्या सहाय्याची गरज वाटत नाही. जसा सूर्य, भास्कर हा एकटा असला तरी आपल्या तेजाने, प्रकाशाने संपूर्ण विश्वाला प्रकाशित करीत असतो. 

या सुभाषितात हे सांगितले आहे की, श्रेष्ठ पुरुषाच्या श्रेष्ठतेला कशाचेही बंधन नसते. हे सांगतांना यापूर्वीच्या मागिल “पराक्रम हा स्वभावजात गुण आहे” या पोस्ट मधील श्लोकात आपण वयाचा विचार केला होता. वय कमी असले तरी तो सिंहाचा छावा हत्तीवर तुटून पडण्याचा विचार करतो. त्यामध्ये जसे वयाचे बंधन नाही हे सांगितले त्याचप्रमाणे या सुभाषितात संख्येचा ही विचार यशामध्ये महत्त्वाचा नसतो असे वर्णन केले आहे.

अनेकांना असे वाटते की, आपली संख्या खूप आहे की, आपल्याला विजय प्राप्त होईल का? या विचारानेच बरेचशे युद्ध हरले गेले असे इतिहासात डोकावून पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल. संख्येचे काही फायदे निश्चित असतात. पण केवळ संख्येच्या आधारावर अंतिम विजय मिळत नाही. विजय हा पराक्रमाच्या जोरावर मिळवला जातो. तसा संख्येच्या आधारावर विजय मिळवायचा असता तर महाभारत युद्धात कौरवांचा विजय झाला असता. कौरवांची संख्या सर्वच बाबतीत अधिक होती. पांडव संख्येने पाच होते कौरव स्वतःच शंभर होते. पांडवांचे सैन्य केवळ सात अक्षौहिणी होते तर कौरवांचे सैन्य अकरा अक्षौहिणी होते. पण पांडव अति पराक्रमी होते म्हणून विजय पांडवांचा झाला. तात्पर्य असे की, श्रेष्ठता केवळ संख्येवर अवलंबून नसते.


रामायणामध्ये पहा. रामाचे सैन्य वानरांचे होते. सोबत कोणीही अन्य राजे नव्हते. त्याउलट रावणाचे सैन्य मायावी होते आणि रावणाच्या सैन्यात अन्य सुविधा कितीतरी पट श्रेष्ठ होत्या. पण विजय रामाच्या सैन्याचाच झाला. मग रामाच्याही आधीन इतिहासात पाहिलेत आपल्या लक्षात येईल की, जमदग्नीपुत्र परशुराम. तो तर एकटाच होता. तरीही त्याने श्रीदत्तात्रेय प्रभू महाराजांच्या वराने उन्मत्त झालेल्या सहस्रार्जुनाला आणि त्याच्या सगळ्या सैन्याला यमसदनी धाडले. 

अशा पराक्रमाचा सिद्धांत सांगताना महाकवी भर्तृहरी म्हणतात, शूर एकटाच असला तरी तो संपूर्ण पृथ्वीला पदाक्रांत करतो. अर्थात आपल्या सामर्थ्याच्या भरवशावर पाहिजे येथे विचारण करू शकतो. आपल्या तेजाने पराक्रमाने सगळ्यांनाच प्रदीप्त करू शकतो.

आपल्या या सिद्धांताला दृष्टांत देताना ते म्हणतात जसा एकटाच सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करीत असतो. जगाला आपल्या तेजाने देदीप्यमान करण्यासाठी त्याला इतर कोणाच्या सोबतीची आवश्यकता नसते.

आपले यश, आपल्या कार्यातील सफलता ही आपल्या योग्यतेवर क्षमतेवर आणि सातत्यपूर्ण प्रयासावर अवलंबून असते हा सिद्धांत अधोरेखित करणारे हे सुभाषित.

साधारण याच अर्थाला आपल्यासमोर ठेवणारी विविध सुभाषिते संस्कृत साहित्यात उपलब्ध आहेत. त्यापैकी खालील काही सहज अर्थ समजणारी सुभाषिते.


एकेनापि सुवृक्षेण पुष्पितेन सुगन्धिना। 

वासितं तद्वन सर्व सुपुत्रेण कुलं यथा ॥

अर्थ :- रक्तचंदनाचा एकच वृक्ष आपल्या सुगंधाने सगळ्या करण्याला सुगंधित करून टाकतो त्याप्रमाणे एकच गुणवान पुत्र सगळ्या कुळाचा उद्धार करतो.


एकेनापि सुपुत्रेण सिंही स्वपिति निर्भयम् ।। 

सहैव दशभिः पुत्रैः भारं वहति रासभी ।।

अर्थ :- सिंहाचा एकच छावा जन्माला घालून सिंहीण संपूर्ण अरण्यावर राज्य करते. आणि अरण्यात निर्भयपणे विचारण करते. आणि शंभर पुत्र जन्माला घालणारी गाढवीण मात्र जन्मभर भार वाहत असते. 


एकेनापि सुपुत्रेण विद्यायुक्तेन साधुना । 

आह्लादितं कुलं सर्वं यथा चन्द्रेण शर्वरी ॥

कुळातील एकच पुत्र विद्यावान आणि सज्जन असावा. त्याच्यामुळे सगळे कुळच प्रसिद्धीस पावते आणि आनंदित होते. ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी आकाशात लाखो तारे असले तरी एकटा चंद्राचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर स्फारतो. 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post