महानुभाव पंथीय ज्ञानसरिता
Mahanubhav panth dnyansarita
मराठी बोधकथा
मोह-मायेने ग्रासलेल्या माणसाची दुर्गति
ओवी :-
विषयकृमीत्वे जीवजात । संसारदुःखी आसक्त ।
कृपाळू ईश्वर सांडवित । परि न संडे ।।
संसारी दुःख बहुत । ऐसे सर्वही ज्ञाते म्हणत ।
परि नाइके जीव मोहग्रसित । अमेध्यकृमी ।।
धर्म बंधुनो!! आपणा सर्वांना या संसारांमध्ये भटकणारा सर्वात मोठा दोष म्हणजे आसक्ति, मोह, ममता. एकाच दोषाची ही तीन पर्यायी नावे आहेत. नातेवाईकांच्या घरा-दाराच्या, जमीनजुमला, बायकोच्या, मुलांच्या, नातवंडांच्या, मोहात ममतेत गुरफटलेला मनुष्य कधीही या संसारापासून मुक्त होऊ शकत नाही असे आपण अनेक वेळा शास्त्रात ऐकलेले आहे. त्याचा प्रत्ययही आपल्याला अनेकदा येतो. तरीही 'कळते पण वळत नाही' अशी आपली अवस्था असते. संसार हा दुःखाने भरलेला आहे असे आतापर्यंत सगळे संत महंत म्हणत आले ते आपल्याला पटते पण करावेसे वाटत नाही.
मोह मायेने ग्रासलेल्या माणसाची दुर्गति कशी होते ते आपण खालील कथेत पाहणार आहोत. एका गावात एक दुकानदार राहत होता. त्याच्याकडे एक गिरणी होती. गावातल्या लोकांचे दळण गहू ज्वारी इत्यादी तो दळून द्यायचा. पण दळण दळताना तो असं म्हणायचा, “हे काय जीवन आहे!! या बदल्यात मला मृत्यू आला असता तर बरे झाले असते असल्या जीवनापेक्षा मृत्यू बरा!! ” हे वाक्य तो रोज म्हणत असे.
एक दिवस त्याचे हे वाक्य जवळून जाणाऱ्या एका योगी संताने ऐकले. ते वाक्य ऐकून त्या महात्म्याला त्याची किव आली. व तो योगी त्याच्या दुकानात आला. दुकानदाराने त्या संन्याशाला नमस्कार केला. मग संन्याशी त्या दुकानदाराला म्हणाला, “शेटजी! चला मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता या संसार दुःखातून सोडवून स्वर्गात पाठवतो. मी तुमचे वाक्य ऐकले त्यावरून मला असे वाटत आहे की, तुम्ही खूप दुःखी आहात. तुम्हाला दुःखी असलेले पाहून तुमचे दुःख दूर करावे असे मला वाटत आहे”
यावर तो दुकानदार म्हणाला, “ गुरुवर !! मलाही फार दिवसापासून स्वर्गात जाण्याची इच्छा आहे परंतु माझ्याकडे खूप सारे धन आहे आणि त्या धनाचा उपभोग घेणारा कोणीही नाही. मी निपुत्रिक आहे. मला पुत्र झाला असता तर त्या पुत्राच्या स्वाधिन माझी सगळी संपत्ती करून मी स्वखुशीने आपले म्हणणे मान्य केले असते, व स्वर्गात जाण्यासाठी तयार झालो असतो परंतु आता मी हे जमवलेले धन असेच सोडून जाऊ शकत नाही. मला पुत्र झाला असता तर बरे झाले असते, तरीही मी पुढे कधीतरी आपण पुन्हा माझ्याकडे चक्कर मारा, तेव्हा शक्य असले तर मा आपल्या म्हणण्याप्रमाणे स्वर्गात जाण्याची तयारी करेन”
साधूने त्या दुकानदाराचे म्हणणे ऐकले व मुकाट्याने तिथून निघून गेला. काही वर्षांनंतर इकडे त्या दुकानदाराला दोन मुले झाली. पण तोपर्यंत दुकानदार म्हातारा झाला होता. कर्म गतीप्रमाणे तो म्हातारा मरण पावला. काही दिवसांनी त्या साधुला त्या दुकानदाराची आठवण झाली व त्याप्रमाणे तो साधू पुन्हा त्या गावात आला व त्याने त्या दुकानदाराची त्याच्या मुलांकडे चौकशी करत विचारले, “या दुकानावर एक देहयष्टीने जाड असलेला शेठ माणूस बसलेला असायचा आणि गावातील लोकांचे दळण दळून द्यायचा तो कुठे गेला?” यावर त्याच्या मुलांनी सांगितले की, “काही दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला आहे.” ते ऐकून संन्याशाला वाईट वाटले.
पण तरीही आपण त्याला स्वर्गात नेण्याचे कबुल केले होते, दिलेला शब्द पाळला पाहिजे असा विचार करून त्या संन्याशाने आपल्या योगबळाने ध्यानस्थ होऊन 'तो दुकानदार सध्या कोण्या नरक योनीत आहे' याचा तपास केला त्यावर त्याला कळले की, तो दुकानदार आपल्या स्वतःच्या घरातल्याच एका गाईचे वासरू होऊन जन्मलेला आहे. संन्यासी त्या गाईच्या वासराजवळ गेला आणि आपल्या सामर्थ्याने त्या वासराशी बोलणे सुरू केले, “अहो शेठजी आतातर आपण पशु जन्मात आहात, चला मग, तुमची इच्छा असेल तर तुम्हाला या नरकयोनीतून सोडवून स्वर्गात घेऊन चलतो”
त्यावर तो मोह ग्रसित जीव म्हणजेच ते वासरु म्हणते महाराज, “माझी तर खूप इच्छा आहे स्वर्गात येण्याची परंतु एक अडचण आहे, ही माझी दोन्ही मुले रोज बाजारपेठेत जातात. आणि विकायला नेण्याचे जिन्नस माझ्या पाठीवर ठेवून घेऊन जातात, जर मी स्वर्गात आलो तर यांचे हे ओझे कोण वाहील? त्यांना अडचण येईल. म्हणून सध्या मी येऊ शकत नाही” साधूला त्या अज्ञान मोहग्रस्त जीवाची किव आली व तो मौन धारण करून तेथून निघून गेला.
काही दिवसांनी ते वासरु मरण पावले. त्याच घरी कुत्रा होऊन जन्मले. त्यानंतर काही दिवसांनी त्या साधूला त्या शेठची पुन्हा आठवण आली आणि तो पुन्हा त्या गावी आला, पाहतो तर वासरू तिथे नव्हते. विचारल्यावर त्याला कळले की "ते वासरू मरण पावले.” साधूला पुन्हा हा योगसाधनेत लीन झाल्यावर कळले की, तो आपल्याच घरी कुत्रा होऊन जन्मलेला आहे. साधू त्याच्याजवळ गेला व अत्यंत नम्रतेने म्हणाला, “शेठजी आता यापेक्षा तुम्हाला स्वतःची कोणती दुर्गती पाहायची आहे? आता तरी चला माझ्यासोबत स्वर्गात”
यावर तो कुत्रा म्हणाला, “महाराज! आपण म्हणतात ते शंभर टक्के खरे आहे. आपण माझी विचारपूस केली, आपले माझ्यावर फार उपकार झाले, म्हणून आपण पुन्हा आलात, पण आपणच मला सांगा की, या अवस्थेत मला कसे बरे आपल्यासोबत येता येईल? कारण माझे मुलं बाजारपेठेत जातात त्यावेळी घरी कोणीच नसते, आताही ते बाजारात गेले आहेत मी एकटाच दरवाज्यात बसून आहे, घरात माझी सून, मुली लाखो रुपयांचे दागिने घालून घरात असतात. आणि मी जर आपल्यासोबत स्वर्गात आलो तर मुलांच्या पाठीमागे यांचे रक्षण कोण करील? एखाद्या चोराने त्यांना लुटून नेले तर किती वाईट होईल! आपण पुन्हा कधीतरी या मग मी आपल्या सोबत येईन.”
साधू पुन्हा स्मित हास्य करून तिथून निघून गेले. एक वर्षानंतर तो कुत्रा मरण पावला. साधूला ही पुन्हा आठवण झाली पुन्हा साधू त्या गावी आला कुत्र्याबद्दल चौकशी केली. कुत्रा मरण पावल्याचे कळले. साधूने पुन्हा आपल्या योगबाळाने पुन्हा जाणले की, तो जीव आता कुठे आहे? तो जीव त्याच्या घराच्या मोरीतच एक किडा, जंतू होऊन जन्मलेला होता. साधू त्या मोरीत गेले आणि त्या किड्याला म्हणाले “ओ शेठ आता काय विचार आहे? तुमची तर दिवसेंदिवस अधोगतीच होत चाललेली आहे, आतातरी या घाणीतले जीवन सोडून माझ्याबरोबर स्वर्गात या.”
यावर तो शेठ जी म्हणजेच किडा रागाने लाल पिवळा झाला व साधूवर भडकला, “माझ्या व्यतिरिक्त तुम्हाला स्वर्गात जाण्यासाठी आणखीन दुसरे कोणी सापडत नाहीये का? तुम्ही माझ्याच मागे काबरं लागलेले आहात? जा इथून आणि पुन्हा येथे येऊ नका, मला नाही जायचे स्वर्गात. इथे मी आनंदात आहे, इथे माझ्या नातवंडांचे मुख मला रोज पाहायला मिळते, तुमच्या सोबत स्वर्गात येऊन मी काय करू? तिथे येऊन काय तुमचे तोंड पाहू काय?” साधू त्याचे ते बोलणे ऐकून मनात म्हणाला, 'मोहाने ग्रासलेले तुच्छ जीव असेच असतात. हा घाणीतला जीव स्वर्गसुख सोडून इथेच सुख मानून बसलेला आहे.' आणि साधू तिथून निघाला तो पुन्हा न येण्यासाठीच.
या गोष्टीचे तात्पर्य असे की, मोहाने, आसक्तीने, ममतेने ग्रासलेल्या जीवाची किती जरी दुर्गति झाली तरी त्याला संसार टाकवत नाही हे या कथेतून आपल्याला लक्षात येते. मोहाने ग्रासलेला जीव दुःखालाच सुख मानून बसतो. या संसार सुखापेक्षा आणखीन काही अलौकिक अनुपम्य पारलौकिक सुख आहे असे त्याच्या मनातही येत नाही. आणि म्हणूनच तो अनंत जन्माच्या या चक्रात सापडलेला आहे. मोहाचा पूर्णपणे त्याग करून परमेश्वराला अनन्य भावे शरण आल्याशिवाय या संसारसागरातून सुटणे शक्य नाही.