आनंदाची गुढी (गुढीपाडवा) मराठी नववर्ष

आनंदाची गुढी (गुढीपाडवा) मराठी नववर्ष

 आनंदाची गुढी (गुढीपाडवा) 



ववर्ष नवचैतन्यं ददातु । 

नववर्षस्य हार्दिक्यः शुभकामनाः ।

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा.. आणि हिंदू नववर्षाची सुरुवात.या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. गुढी हे आपल्या आनंदाचे, यशाचे, आरोग्याचे, संपन्नतेचे आणि समाधानाचे प्रतिक असते.त्यामुळे पूर्वी गावी मोठमोठ्या गुढ्या उभारल्या जायच्या.अजूनही गावी उंचच उंच गुढ्या उभारण्याची प्रथा आहे.


गुढीपाडवा हा सण मराठी नववर्ष साजरे करण्याचे प्रतिक आहे. आजपासुन सुमारे आठशे वर्षांपासून गुढी उभारण्याची व  आनंदोत्सव साजरा करण्याची परंपरा महाराष्ट्रात चालत आल्याची अनेक उदाहरणे लीळाचरित्र या ग्रंथात आपणास पाहावयास मिळतात. 


जसे अचलपूर येथील रामदरणा राजाला सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींची भेट झाल्यावर नगर सजवून गुढी उभारून सर्वज्ञाचे स्वागत केले. डोढ्राला राघवभट, बहळेग्रामला महाजन तसेच ज्या ज्या ठिकाणी सर्वज्ञांचे आगमन होताच तेथील प्रतिष्ठित नागरिक स्वामींचे गुढी उभारून स्वागत करीत होते ह्या लीळांचे स्मरण करून आपणही मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करूया.


-------------------------------------------------------


सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॥

अर्थ :- ह्या संपूर्ण विश्वामध्ये सर्वजण सुखी राहोत. सर्वजण निरोगी असोत. सर्वांचे कल्याणमंगल असो. कोणाच्याही वाट्याला दुःख येवू नये.

टीप-

प्राचीन भारतीय संस्कृतीने अखिल विश्वाच्या कल्याणार्थ केलेली ही प्रार्थना आहे. फक्त आपल्यापुरतं, स्वतःपुरतं मागायचं ही इथली शिकवण नाही. वेद-उपनिषदांपासून अगदी आजपावेतो संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांपर्यंत सर्वांनी सर्व विश्वाचेच कल्याण चिंतिले आहे.

        आज चैत्र शुक्ल प्रतिपदा, 'गुढीपाडवा' म्हणजेच नववर्षप्रतिपदा. नवीन हिंदू वर्षाचा पहिला दिवस. आजपासून शालिवाहन शके १९४४ शुभकृतनाम संवत्सराला प्रारंभ होत आहे.

     गेली दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना नावाच्या भयाच्या सावटाखाली होतं. या सावटाचं मळभ आता दूर होते आहे. नवीन 'शुभकृत' नाम संवत्सर मांगल्य घेऊन आले आहे. कालच मास्क वापरणे व इतर निर्बंधातून सर्व जनता मुक्त झाली आहे. आजपासून सर्व सुकर होत जावो हीच प्रार्थना. माणसाने संकटं आली म्हणून डगमगायचं नसतं कारण संपत्ती आणि आपत्ती, भरभराट आणि संकटकाळ हे केवळ मोठ्या माणसांच्याच जीवनात येत असतात.

सम्पदो महतामेव महतामेव चापदः ।

वर्धते क्षीयते चन्द्रो न तु तारागणः क्वचित ॥

      संपदा आणि विपदा महान माणसांच्याच आयुष्यात येतात. हेच पहा ना वाढणे व कमी होणे हे केवळ चंद्राच्या बाबतीतच होते. रात्रीच्या आकाशातील इतर तारकागण वाढतही नाहीत आणि कमीदेखील होत नाहीत.

     आता संकटकाळ संपला आहे त्यामुळे भरभराट निश्चित आहे.

सुवर्णपुष्पां पृथिवीं चिन्वन्ति पुरुषास्त्रयः।

शूरश्च कृतविद्यश्च यश्च जानाति सेवितुम्॥

               ~ ५.३५.७४, महाभारत.

         शूरवीर, विद्यावन्त आणि एक ती जी सेवा करणे जाणतात अशी तीन प्रकारची माणसेच पृथ्वीवरील सुवर्णपुष्पे वेचू शकतात. म्हणजेच सदैव संपन्नता उपभोगतात.

सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्॥


सर्वस्तरतु दुर्गाणि सर्वो भद्राणि पश्यतु । 

सर्वः कामानवाप्नोतु सर्वः सर्वत्र नन्दतु ॥

सर्व जीव या संसारातून तरून जाऊन कैवल्यदुर्गावर आरूढ होओत. सर्वांना सर्वत्र कल्याणच दृष्टीस पडो. सर्वांच्या सर्व कामना पुर्ण होवोत. सर्वत्र आनंदी आनंद वातावरण निर्माण होवो. 

आपणा सर्वांना नववर्ष प्रतिपदेच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या मांगल्यपूर्ण आणि निरामय शुभेच्छा!

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post