नीतिशतकम् - neeti-shatak subhashits
संस्कृत सुभाषित रसग्रहण
भर्तृहरी नीतिशतकम्
छंद :- वसंततिलका
जाड्यं धियो हरति सिञ्चति वाचि सत्यम् ।
मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति ।
चेतः प्रसादयति दिक्षु तनोति कीर्ति ।
सत्संगतिः कथय किं न करोति पुंसाम् ।
वामनपंडित - मराठी अनुवाद
छंद :- पृथ्वी
खरें वचन बोलवी, जडपणास की मालवी
महोन्नतिस ढोलवी, दुरित मारूनी चालवी ॥
मन सुख अमोलवी; यश जगत्त्रयीं कालवी
अनेक गुण पालवी, सुजनसंगती झुलवी ॥
ल. गो. विंझे मराठी अनुवाद
छंद :- वसंततिलका
धीमांद्य नष्ट करिते, मुखिं सत्य आणी ।
मानांत वाढ करिते, अघ तें हरोनी ॥
चित्ता करी मुदित, कीर्ति दिगान्त नेते ।
सत्संगती वद न काय करी नरातें ? ॥
गद्यार्थ- बुद्धीचें जडत्व नष्ट करिते; सत्य बोलण्यास शिकवते; मान वाढविते, पाप-हरण करिते; मन प्रसन्न करिते, दशदिशांत कीर्ति पसरविते सत्संगति माणसाला काय करीत नाहीं ? सांगा बरे!
विस्तारीत अर्थ :-
बुद्धीची मंदता घालविते, वाणीमध्ये सत्याचे सिंचन करते, मान (सन्मान) वाढविते, पापाचे निराकरण करते, मन प्रसन्न करते, दशदिशात कीर्ती पसरवते, (मग आता सांगा) सत्संगती माणसाचे काय (काय) भले करत नाही?
कवि भर्तृहरींनी प्रस्तुत सुभाषितात संतसंगतीची लाभ सूची गुंफली आहे. जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रांना कसा कसा उजाळा मिळतो ते सांगताना महाकवी म्हणतात संतसंगतीने बुद्धीची मंदता दूर होते. मग अशी बुद्धी कोणत्याही क्षेत्रात सुगमरीत्या, सहजरीत्या प्रवेशही करू शकते आणि मुक्त संचारही करते. वाणीमध्ये सत्याची पेरणी होते. संतसंगती नंतर आत सत्य प्रतिष्ठित होते आणि म्हणूनच मुखातून बाहेरही सत्यच येते.
संतसंगतीत राहणार्यांचाही मान वाढतो. संतांनी जवळ केले आहे, याचाच अर्थ सुयोग्य असणारच या विचारांनी लोक त्यालाही मान देतात. ध्वजासोबतच ध्वजदंडालाही अभिवादन होतेच ना? पालखीत संत असले की जनता पालखीच्या भोयालाही नमस्कार करतात. त्यांनाही मान मिळतो.
संतसंगतीने पाप दूर होते. पापाचरणाची वृत्तीच शिथिल होत लय पावणे हाच तर सत्संगतीचा सगळ्यात मोठा लाभ होय. मनातून पापबुद्धी जाते, पण ते रिकामे होत नाही. कारण, त्याच वेळी तेथे शुद्धत्वाची स्थापना होते. त्याचा परिणाम असतो प्रसन्नता. आत्मिक आनंद, शुद्ध आनंद. पुढचा लाभ म्हणजे दशदिशांत कीर्ती पसरते. संत तर विश्ववंदनीय असतातच, पण संतसाहित्याचे अभ्यासक, विवेचक कीर्तनकारही, प्रवचनकारही जगप्रसिद्ध होतात. त्यांचीही कीर्ती सर्वत्र पसरते.
इतके सगळे लाभ सांगितल्यावर कवि भर्तृहरी म्हणतात- सांगा! सत्संगती माणसाचे काय काय कल्याण करीत नाही? सगळ्याच बाबतीत कल्याण साधते!