महानुभाव पंथिय आचार धर्म
Mahanubhav panth dnyansarita
मरी गाय बामण को दान, असे दान करणे योग्य आहे का?
दानाचे महत्व व त्या मागिल हेतू आपण या लेखात पाहणार आहोत. दान करताना कसा हेतू असावा?
धर्म बंधुनो !! हिंदी भाषेत एक म्हण आहे “मरी गाय बामण को दान” या म्हणीचा अर्थ असा की, एका माणसाकडे एक गाय होती. ती म्हातारी होत आली होती. आधीसारखे दुधही देत नव्हती. आणि तिचा निरर्थक खर्च त्या स्वार्थी माणसाला परवडेना.
या गाईचे करावे तरी काय? म्हणून त्याने विचार केला की एखाद्या ब्राम्हणाला ही गाय दान देऊन द्यावी. त्यामुळे दोन फायदे होतील. एक तर गाईला सांभाळण्याच्या कटकटीपासून आपण सुटू आणि दुसरे दानाचे पुण्यही लागेल. मनुष्य असा स्वार्थी प्राणी आहे. आपल्याला उपयोगी नसलेल्या वस्तू किंवा खराब असलेल्या वस्तु तो इतरांना देतो.
या दुनियादारीत असे बरेच लोक आपल्याला आढळतात. ते आपल्याकडे आपल्या उपयोगी न जाणारा एखादा पदार्थ, भाजीपाला, किंवा फेकून देण्याचा शेतमाल दान करतात. मार्गामध्ये आणून देतात. किंवा भाजीपाल्याला भाव नाही तर द्या मार्गाला. मार्गाच्या उपयोगी जाईल. केव्हा द्या एखाद्या वृद्धाश्रमाला अनाथाश्रमाला. कसंही असलं तर ते लोक खातातच. अशी हीन भावना त्या दान करण्याची असते.
अशा हेतूच्या दानाला काही अर्थ नाही, त्यामुळे गोमटे नगण्य होते. त्यामुळे बंधुनो दानच करायचे तर चांगले उत्तम पदार्थांचे दान करा. कारण या जन्मात केलेला दानधर्मच आपल्यासोबत येणार आहे. जमिन-जुमला प्रॉपर्टी, गाडी, बंगला हे सर्व इथेच राहणार आहे. हे आपल्या पुर्विल चांगल्या कर्मामुळे आपल्याला मिळाले आहे. म्हणून आताही आपल्या चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळेल आणि वाईट कर्माचे फळ वाईटच मिळेल. हे लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून शक्यतो इतरांना दान करताना चांगलेच दान केले पाहिजे.
एका श्रीमंत सेठने अन्नछत्र उघडले होते. “कुणीही भूकेल्याने यावे आणि जेवण करून जावे” अशी दवंडी आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये पसरवली होती. पण त्याची निर्हेतूक दातृत्वाची भावना कमी होती, आणि समाजाने दानधर्म करणारा दानवीर म्हणून माझे गुणगान केले पाहिजे आणि ही भावना मुख्य होती. अर्थात आपली सर्वत्र किर्ती व्हावी असा त्याचा हेतू होता. आणि त्याची स्तुती करणारेही कमी नव्हते. कारण कीर्ती प्रक्रिया करणाऱ्याला कीर्तीचे थोर होते. हे सत्यच आहे. त्याप्रमाणे त्याची कीर्ती झाली होती.
शेठचा खूप मोठा व्यवसाय होता. दरवर्षी वर्षाच्या अखेरीस, धान्य कोठारांमधली गहू, ज्वारी विकल्यानंतर खालिल शिल्लक राहिलेले कुजलेले धान्य दानासाठी पाठवले जायचे. अनेकदा शेठच्या अन्नछत्रात भुकेल्या गरिबांना सडलेल्या कुजलेल्या ज्वारीची भाकरी मिळत असे. काही दिवसांनी शेठच्या मुलाचे लग्न झाले. नवीन सून घरी आली. ती अतिशय विनम्र स्वभावाची, धर्मनिष्ठ आणि विचारशील होती. काही दिवसातच तिने घरातील सर्वांचे मने जिंकली. सासऱ्याने उघडलेल्या अन्नसत्रात कुजलेल्या ज्वारीची भाकरी बनते व तेच सर्व गरिब लोक खातात हे कळल्यावर तिला खूप वाईट वाटलं.
यावर काहीतरी तोडगा काढावा आणि सासऱ्यांच्या लक्षात चुक आणून द्यावी म्हणून तिने घरातले जेवण बनवण्याची सर्व जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. आणि पहिल्याच दिवशी त्यांनी अन्नसत्रातून कुजलेले ज्वारीचे पीठ मागवून त्याची भाकरी बनवली. दुपारी शेठ जेवायला बसले तेव्हा सुनेने भाकरी वाढलेले ताट आणले. काळी आणि जाड भाकरी पाहून कुतूहलाने सेठने भाकरीचा पहिला घास तोंडात टाकला. आणि घास तोंडात जाताच थुं थुं म्हणून थुंकायला लागला. आणि सुनेला म्हणाला,
"सुनबाई! घरात भरपूर चांगल्या उत्तम ज्वारीचे पीठ आहे. मग तू भाकरी बनविण्यासाठी अन्नसत्रातील कुजलेल्या ज्वारीचे पीठ काबरं आणले?”
सून म्हणाली: "बाबा! हे पीठ मा मुद्दाम तिथूनच आणले आहे."
शेठ प्रश्नार्थक मुद्रेने म्हणाला : "मला समजले नाही? "
"बाबा ! मागील जन्मात आपण जे काही दान केले होते त्या दान पुण्याचीच कमाई आता आपण खात आहोत आणि या जन्मात जे काही दान करू ते परलोकात किंवा पुढच्या जन्मी खायला मिळेल. आपल्या अन्नसत्रामध्ये या कुजलेल्या पिठाची भाकरी गरिबांना दिली जाते. त्यामुळे आपल्यालाही परलोकात याच पिठाच्या भाकरीवरच जगायचे आहे. आणि म्हणूनच मला वाटले की, आतापासून या भाकरी खाण्याची सवय लावली तर पुढे त्रास कमी होईल.”
सेठला आपली चूक कळली होकी. त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्याने आपल्या सुनेची माफी मागितली आणि त्याच दिवशी अन्नछत्र चालकाला त्या सडलेल्या धान्याचे कुजलेले पीठ सर्व फेकायला लावले. व त्या दिवसापासून गरीब आणि भुकेल्या लोकांना चांगल्या धान्यातून चांगल्या पिठाची भाकरी मिळू लागली.
मित्रांनो!! या कथेचे तात्पर्य असे आहे की, तुम्ही पाहिजे तेवढे दान करू शकता, पण ते दान असे असले पाहिजे की ते इतरांसाठी शुभच होईल. इतरांसाठी हितकारक होईल. म्हणून शक्यतो जे आपण खातो तेच दान करावे. निर्हेतूक “श्रीकृष्णार्पण” भावनेने आपण जितके दान कराल तितके दान घेणाऱ्या व्यक्तीलाही लाभप्रद होते. अशा दानामुळे आपला संसार तर सुधारतोच पण परलोकही सुखावह होतो.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दान देताना लोकांनी माझी स्तुती करावी, माझी कीर्ती व्हावी हा हेतू बाजूला ठेवावा 'श्रीकृष्णार्पण' म्हणून निर्हेतुकपणे दान करावे. दान इतकं गुप्त असावं की, एका हाताचे दुसऱ्या हाताला सुद्धा कळणार नाही. असे निर्हेतुक भावनेने केलेले दान अस परमेश्वर स्वीकारतात. पुण्यहेतूने सहेतुक भावनेने केलेले दान परमेश्वर स्वीकारत नाहीत.
सुफी संत रहीम हा पुर्वी नवाब होता. तो रोज काहीना काही दान करत असे. परंतु त्याची दान देण्याची पद्धत अनोखी, जगावेगळी होती. दान देताना तो पैशांचा ढीग करायचा आणि डोळे मिटून त्या ढिगाऱ्यातून मूठ मूठभर पैसे दानपात्रांना द्यायचा. एके दिवशी संत तुलसीदासही तेथे उपस्थित होते. त्याने पाहिले की, एका मनुष्याने आतापर्यंत दोन-तीन वेळा दान घेतले आहे, आणि तो परत येऊन पुन्हा पुन्हा घेत आहे आणि रहिमही त्याला देतच आहे.
हे दृश्य पाहून संत तुलसीदासने विचारले,
“सीखे कहाँ नवाबजू देनी ऐसी देन?
ज्यों ज्यों कर ऊँचे चढ़े त्यों त्यों नीचे नैन ।।”
हे नवाब रहिमखान तुम्ही दान देताना डोळे मिटून दान करत आहात हे इतकं सुंदर दातृत्व कुठे शिकलात?
तेव्हा रहीमने नम्रपणे उत्तर दिले:
देनहार और है, जो देता दिन रैन।
लोग भरम हम पै करें, या विधि नीचे नैन ।।
संत हो! वास्तविक देणारा दुसराच आहे, जो सर्वांना रात्रंदिवस देतच आहे परंतु लोकांना निरर्थक गैरसमज होतो, व्यर्थ भ्रम होतो की, आम्ही दानवीर आहोत शरमेने माझे डोळे आपोआप मिटले जातात. किती सुंदर आणि पवित्र दान आहे हे अशा प्रकारच्या दानात आदर, प्रेम, सहानुभूती आणि नम्रता, अहंकाररहितता हे सर्वच उदात्त गुण असतात. आणि ज्या दानात सही दुखता असते त्या दानात चिडचिड क्रोध तरीपण उपकाराची भावना असे सगळेच अवगुण असतात.
दान द्रव्याचे असो, वस्त्राचे असो का अन्नाचे असो, ते घेताना बऱ्याच वेळा असे लक्षात येते की दान करणारा बोलून जातो, “या बिचाऱ्यांना आपण नाही देणार, तर कोण देणार!!” हा ही फार मोठा अहंकार आहे. हे ही दान सहेतुकच मानले गेलेले आहे. साधुसंतांना ही “बिचारे” मानणारे दानवीर समाजात आढळतात. एवढा मोठा देवाचा भक्त त्याला “बिचारा” शब्दाने संबोधने म्हणजे एखाद्या दरिद्री माणसाने चक्रवर्ती राजाच्या राजकुमाराला 'बिचारा' म्हणण्यासारखे आहे. म्हणून बिचारे तर आपणच आहोत. जे सर्व असूनही नाना प्रकारच्या हेतूने दान करीत आहोत आणि अज्ञानपणात निर्हेतुक दानाने मिळणारे श्रेष्ठ फळ नाकारत आहोत.