नीतिशतकम् सुभाषित
neeti shatak subhashits
कार्याचा आरंभ करणाऱ्या तीन पुरूषांपैकी आपण कुठे बसतो?
प्रारभ्यते न खलु विभयेन नीचः ।
प्रारभ्य विघ्ननिहता विरमन्ति मध्याः ।
विभैर्मुहुर्मुहुरपि प्रतिहम्यमानाः ।
प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति ।।
वामनपंडित मराठी अनुवाद
छंद :- वसंततिलका
प्रारंभितात खल विघ्नभयें न येती
विघ्नें, स्वकार्य तरि मध्यम सोडिताती ॥
केलें जरी बहुत जर्जर विघ्नघातें।
प्रारब्ध उत्तमजनीं न विसंबिजेतें ॥
ल. गो. विंझे मराठी अनुवाद
छंद :- वसंततिलका
घे कार्य नीच कधिं विघ्नभयें न हातीं
विघ्नांत मध्यमहि स्वीकृत टाकिताती ॥
विघ्नें पुनः पुनरपी जरि त्यां छळीती ।
प्रारब्धकार्य न च उत्तम हे त्यजीती ॥
सामान्य गद्यार्थ :– आरंभिलेल्या कार्यात येणाऱ्या विघ्नांचा सामना तीन माणसें तीन तऱ्हेनें करितात. १) अगदीं नीच जे आहेत, ते, भविष्यात विघ्न येतील या भीतीनेच कोणत्याहि कार्याला प्रारंभ करीत नाहींत. २) मध्यम जे आहेत ते अशा तऱ्हेनें प्रारंभच करीत नाहीत असें नाहीं, प्रारंभ तर करतात पण प्रत्यक्ष विघ्ने येऊं लागली कीं त्यांपुढें टिकाव न धरतां आरंभ केलेले कार्य सोडून जातात. ३) परंतु जे उत्तम आहेत, ते मात्र, विघ्नांनी पुन्हांपुन्हां अडथळे आणले तरी, एकदां हाती घेतलेले कार्य कधींच टाकीत नाहींत.
मराठी विस्तारीत अर्थ
संकट येईल या भीतीने नीच बुद्धी हिन लोक कार्यास आरंभच करीत नाही. दुसरा प्रकार ते मध्यम लोक कार्यारंभ करून विघ्न आले की थांबून जातात. हाती घेतलेले कार्य सोडून देतात. मात्र विघ्नांनी वारंवार आघात केले, तरी उत्तम संस्काराचे पुरुषार्थी लोक सुरू केलेले कार्य कधीही अर्धवट सोडून देत नाहीत.
कवि भर्तृहरी म्हणतात, जगतात तीन प्रकारे लोक संकटांना प्रतिक्रिया देत असतात. आपल्या वर येणाऱ्या महा संकटांचा प्रतिकार करीत असतात. या त्यांच्या प्रतिक्रियांवरूनच त्यांची विभागणीदेखील त्यांनी केलेली आहे. जगात कोणतेही कार्य विनासायास कधीच पार पडत नसते. संकटे ही सर्वच मार्गावर सर्वदा असतातच. पण, या संकटांकडे कसे पाहायचे, त्यांना कसे हाताळायचे, त्या संकटांचा सामना कशाप्रकारे करायचा ते ठरविता आले पाहिजे. आणि संकटांसमोर निश्चयाने उभे राहून आपले कार्य पार पाडण्याचे कौशल्य आपल्या ठिकाणी आत्मसात केले पाहिजे
संकटे येणारच हे गृहीत धरून काही लोक कार्यासच आरंभच करीत नाहीत. उलट आरंभापूर्वीच असे झाले तर, तसे झाले तर, अशा शंकाच उपस्थित करीत, कदाचित न येणाऱ्या संकटांची मांडणी करतात. कवी अशांना नीच म्हणत आहेत. कारण, ना हे स्वतः काही करतात, ना इतरांना करू देतात. जसे एखादा नवीन पोहायला शिकायला आलेला मनुष्य तलावाच्या बाहेर उभा राहून जर असा विचार करीत असेल, “पाणी जास्त थंड असेल का? खोल असेल का? मी बुडणार तर नाही? मला पोहणे जमेल का? असा विचार करत जर तो तलावा बाहेरच बसून राहील तर त्याला कधीच पोहणे जमणार नाही. पोहणे शिकण्यासाठी त्याला पाण्यात उतरावेच लागेल.
दुसरा गट असतो मध्यम लोकांचा. ते कार्य सुरू तर करतात, पण संकट आले की अर्धवट सोडून पळ काढतात. व्यवहारात यांना 'आरंभशूर' म्हटले जाते. अर्थात, सुरुवात करण्यात पटाईत. शेवटास काहीच जाणे नाही.
तिसरा गट आहे उत्तम लोकांचा. एकदा का कार्यास हात घातला की, मग कितीही वेळा कितीही संकटे येवोत, यशोमाला धारण केल्याशिवाय ते शांत बसतच नाहीत. 'कार्यत्याग' हा शब्दच यांच्या शब्दकोशात नसतो.
उत्तम पुरुष कितीही संकटे आली तरी हाती घेतलेले कार्य टाकत नाहीत याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजीराजे. राजांनी कुठल्याही संकटाची पर्वा न करता पूर्ण भारतात पसरलेल्या मुघल शासनाला आवाहन दिले. व मोगलांचे पारिपत्य केले. स्वराज्य स्थापन करताना अनेक संकटे आली पण छत्रपती शिवाजीराजांनी कधीच माघार घेतली नाही. उत्तम पुरुषांचा कार्यारंभ असा श्रेष्ठ प्रकारचा असतो.
मग ठरवा आपण या श्लोकात कुठे बसत आहोत? आणि आपल्याला वर कसे जाता येईल? हे आपल्या आपणच ठरवायचे आहे.