सत्संगाचे - महत्व व लाभ - satsangache mahatva - महानुभाव पंथ ज्ञान सरिता - Mahanubhav panth dnyansarita

सत्संगाचे - महत्व व लाभ - satsangache mahatva - महानुभाव पंथ ज्ञान सरिता - Mahanubhav panth dnyansarita

 सत्संगाचे - महत्व व लाभ - satsangache mahatva - महानुभाव पंथ ज्ञान सरिता - Mahanubhav panth dnyansarita 



महान संताचा संग त्यांचा संग केल्याने जीवनामध्ये अमूलाग्र बदल होऊन आत्मोन्नती होते. अज्ञान नाहीसे होते. अन्य धर्माची अवकळा दूर होते. ईश्वर सुखाची उत्कंठा वाढते. म्हणून परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू सांगतात आपल्यापेक्षा जो ज्ञानी आहे अशा व्यक्तीचा संग करावा कारण जीवाचा स्वभाव असा आहे की, जसा संग लाभला तसा त्याच्या मध्ये बदल होतो. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये जो रंग कालवला त्यासारखा रंग पाणी धारण करते. तसे जीवाने संग संताचा करवा म्हणजे स्वतःही संत होईल.

एक हिंदी कवि म्हणतो-

संगत करे बडे की, तो बढते बढते जाय। 

संगत करे गधे की, तो दो दो लाता खाय।। 

म्हणून नेहमी चांगली संगत असावी. 

सत्संगाचे अनेक फायदे असतात सत्संगामुळे माणसाला समाजात प्रतिष्ठा प्राप्त होते. सत्संगामुळे मनुष्याचे मन भक्तीत दृढ होते. संसारात अनेक प्रकारची संकटे येत असतात, जर आपण नित्य सत्संग करत असलो तर येणाऱ्या संकटांवर आपण सहज मात करू शकतो.

बैसता संताचे संगती । कळो आले मज कैवल्यपती आपुलो कोणीच नव्हती । निश्चय चित्ती, दृढ झाला ।। 

 या जगामध्ये देवाशिवाय आणि संताशिवाय आपले कोणीच नाहीत. याचा अनुभव यामुळे आला. कुटुंबातील आप्तगोत्र हितक्ष हे सर्व धन असेल, तर ते सहवासात राहतात नाहीतर दूर जातात. म्हणजे आजकाल माणसापेक्षा माणुसकीपेक्षा धनसंपत्तीवरच नातेसंबंध या जगतामध्ये आधारीत आहेत. संत एकनाथ म्हणतात, “स्वतःची पत्नी जरी असेल तर ती पैसा असेल तरच ती पतीच्या पुढे पुढे करते." 

त्या धनाची झालीया तृटी । स्त्री वसवसोनी लागे पाठी । आता नावडती तुमच्या मज गोष्टी ।। म्हणजे पगार झाला आणि तो खर्च झाला की, पत्नीच्या स्वभावामध्ये, वागण्यामध्ये बदल होतो. ती वसवस करून पाठी लागते. कुटुंबातील सर्व नातेवाईक म्हणजे माता, पिता, बंधू, भगिनी, पत्नी, मुले, सगे, सोयरे हे दूर केव्हा जातात असा आणखी एक महत्त्वपूर्ण प्रसंग संत सांगतात आणि तो म्हणजे अंत समय प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारा हा प्रसंग आणि याच प्रसंगामध्ये आपले अत्यंत जवळचे कोण याची परीक्षा होते. 

अशाच संदर्भातील एक प्रसंग स्मृतीस्थळ या ग्रंथामध्ये आला आहे.

महानुभाव पंथाचे आद्य आचार्य श्रीनागदेवाचार्य यांच्या सहवासामध्ये एक लहान १२-१५ वर्षांचा अनंत नावाचा मुलगा आला. त्याने महानुभाव पंथाचा उपदेश घेतला. आचार्यांच्या सान्निध्यात सहवासात तो रमून गेला. घर प्रपंच्याच्या सहवासापेक्षा हा सहवास त्याला वेगळा सुखावह आणि आनंददायी वाटू लागला. व त्याने संन्यास घेतला. त्यांचे “अनंतमुनी” असे नामकरण करण्यात आले. 

आचार्यांच्या सान्निध्यात ते असतिपरी योग आचरू लागले. अनंतमुनींनी संन्यास घेतला असे त्यांच्या आईला समजले. एक दिवस त्यांची आई आचार्यांजवळ आली, आणि अनंतदेवाला म्हणाली, “अनंता मी तुला घेऊन जाण्यासाठी आले आहे. अनंतमुनी म्हणाले, “मी येणार नाही. मी सर्वसंग परित्याग करून देवाला अनुसरलो आहे.”  

त्यांची आई अज्ञान होती, अन्य होती. तिला शास्त्राचे परधर्माचे काहीच ज्ञान नव्हते. अनंत मुनी येत नाहीत म्हणून त्यांच्या आईने विषाची पुडी हाती घेतली श्रीनागदेव आचार्यांना म्हणाली, "भटो तुम्ही याला पाठवा नाहीतर मी या ठिकाणी विष घेऊन आत्महत्या करीन." आचार्यांना चिंता पडली त्यांनी अनंतदेवाकडे पाहून म्हटले, “अनंता आता मी म्हणतो म्हणून जा, नाहीतर ही अज्ञान बाई भलतेच काहीतरी करून टाकेल.” 

असा बिकट प्रसंग निर्माण झाल्यामुळे अनंतदेवांना घरी जावं लागलं. अनंत मुनींचे देह जरी घरी असले तरी अंतःकरण मात्र आचार्यांच्या आठवणीत आणि देवाच्या स्मरणातच होते. सतत देवाचा विरह, स्वदेशात स्वग्रामात असल्याचे अत्यंत दुःख त्यामुळे काही दिवसांनी ते आजारी पडले. त्यांना भयंकर ताप आला. आई घाबरून गेली व म्हणाली, “बा अनंता मी तुझ्यासाठी काय करू? तु वाचशील की नाही?”

 अनंत देव म्हणाले, “आई जसे तू श्रीनागदेव आचार्यांना म्हणाली होतीस की, याला पाठवा नाहीतर मी विष घेऊन आत्महत्या करीन असेच तू यमराजाला, मृत्युला सांग की, माझ्या बाळाला जर तुम्ही घेऊन जात असाल, तर मी आत्महत्या करीन.” शेवटी आई काहीही करू शकली नाही. अनंत मुनींचे देहावसान झाले. तात्पर्य :- शेवटच्या प्रसंगी कोणीही कामी येऊ शकत नाही. आपले सत्कर्म दुष्कर्म आपल्या सोबत असतात.

म्हणून संत म्हणतात, काळाचिये उडी पडेनबा जेव्हा। सोडविणा तेव्हा माय बाप । म्हणून संत - ईश्वराचे ज्ञान - अनुसरण या तिन्हीचा योग यावा । आणि अनंत जन्मापासून लागलेले संसार बंधन तुटावे आणि ईश्वराचा मोक्ष प्राप्त व्हावा.

आपल्या महानुभाव पंथात अशा बऱ्याच घटना पाहायला ऐकायला मिळतात, कि कुणी देवाला अनुसरण करायला, संन्यास घ्यायला निघाला की त्याचे नातेवाईक त्याला अनुसरण्याविषयी प्रतिबंध करतात. असे करणे फार चुकीचे आहे. त्यामुळे परमेश्वराला फार खंती येते. कारण पुढे कधीतरी आपल्यालाही अनुसरण करावेच लागणार आहे. परमेश्वराला अनुसरल्याशिवाय मुक्ती होणारच नाहीये. आणि आपण जर आता असे कुणाच्या अनुसरणाला आडवा आलो तर आपल्यालाही कुणी आड येईलच.

बरेच लोक “घरी राहिल्यानेही देव होतो” अशा अन्यथाज्ञानाचे प्रतिपादन करतात आणि वासनीकाचा बुद्धिभेद करतात. पण या गोष्टीकडे सगुण नामधारकाने लक्ष देऊ नये. कारण अशा लोकांना संसाराची बायको मुलांची खूप ममता असते त्यांना कधीही संन्यास घ्यायचा नसतोच म्हणून ते अशा अन्यथाज्ञानाचे प्रतिपादन करतात व स्वतःचीच प्रतारणा करतात. 

धर्म बंधूंनो !! एक गोष्ट लक्षात ठेवा जीवांचे उदाहरण करणाऱ्या परमेश्वरानेच आपले घरदार सांडले आहे, तर तो तुम्हाला घरबसल्या मोक्ष कसा बरे देईल? देव भरवस सोडून जीवांचे उदाहरण करण्यासाठी महाराष्ट्रात आले. श्रीदत्तात्रयप्रभू महाराज बद्रिकाश्रम सोडून सह्याद्री पर्वतावर आले. प्रत्येक युगात, प्रत्येक परमेश्वर अवतार संन्यास घेतल्याशिवाय मोक्ष देत नाहीत. 

अर्जुन, युधिष्ठिर, भीम, द्रौपदी, नकुल, सहदेव या पाचही पांडवांनाही श्रीकृष्ण भगवंताने शेवटी संन्यास घ्यायला लावला व हिमालय पर्वतावर असतिपरी योग आचरण्यासाठी, क्षेपण्यासाठी पाठवले. श्रीउद्धवदेवांनाही बद्रिकाश्रमाकडे पाठवले, मुचकुंद राजाला संन्यास देऊन हिमालयात पाठवले, तात्पर्य परमेश्वर मार्गाला अनुसरल्याशिवाय कोणीही जीव या जन्म-मरणाच्या चक्रातून सुटणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे.


 


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post