वासना हा सर्वात मोठा रोग - संस्कृत सुभाषित रसग्रहण
Sunskrit Subhashit Sahitya
संस्कृत सुवचनानि -
आजची लोकोक्ती - नास्ति ज्ञानात्परं सुखम् ।
सुभाषित
नास्ति कामसमो व्याधिर्नास्ति कोपसमो वह्निः।
नास्ति मोहसमो रिपुर्नास्ति ज्ञानात्परं सुखम् ॥
~ चाणक्यनीती.
अर्थ :- कामासमान दुसरा कुठलाच महारोग/व्याधी नाही, मोहासारखा दुसरा कोणताही शत्रू नाही, क्रोधासमान दुसरा अग्नी
नाही आणि ज्ञानासमान समाधन देणारं जगात दुसरं कुठलंच सुख नाही.
टीप- नास्ति ज्ञानात्परं सुखम् । इहलोकामध्ये ज्ञानाहून श्रेष्ठ सुख नाही. कारण ज्ञान म्हणजे फक्त
भौतिक विश्वाची तसेच अधुनिक विज्ञानाची माहिती देणारी वस्तू नसून, परमेश्वराची ओळख करून
देणारी आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सद्गुरुंनी दिलेली मार्गदर्शक सद्वस्तू
हय. म्हणूनच नास्ति ज्ञानात्परं सुखम् । ही उक्ती सार्थ आहे. कारण
परमेश्वर प्राप्तीहून श्रेष्ठ सुख नाही, त्याहून मोठा आनंद नाही आणि त्यापरते समाधान नाही.
माणसाच्या मनाला आणि
बुद्धीला ग्रासून त्याला मायाभ्रमाच्या आणि अज्ञानाच्या अंधारामध्ये बुडविणार्या राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर, षड्रिपुंपैकी पहिले तीन
वैरी म्हणजे काम, क्रोध आणि मोह. यांची नमुन्यादाखल ओळखच चाणक्यांनी वरील सुभाषिताच्या
माध्यमातून सर्वांना करुन दिली आहे आणि त्यांच्यापासून सुटकेचा एकमेव मार्ग ज्ञान
आहे हे देखील सुचवले आहे.
वरील सुभाषितामध्ये
सांगितल्यानुसार माणसाचा पहिला शत्रू म्हणजे 'काम'. बुद्धीला अंधळा करणार्या, वासना, कामना, भोगेच्छा आणि यौनाकर्षण
यांना कारणीभूत असणार्या, क्षणात होत्याचं नव्हतं करणार्या कामाने उत्पन्न झालेली मनाची
तृष्णा कधीच भागत नाही. खरे पाहिले तर काम या जगातील सृजनाला, प्रजोत्पादनाला अत्यावश्यक
आहे आणि म्हणूनच चार पुरुषार्थांपैकी एक गणला जाणारा, मात्र मनुष्य 'काम' या शब्दाला मनोविकारी
यौनक्रीयेशी जोडतो आणि त्या आसक्तीत गुंतत जातो. मग सुरू होते फक्त कामतृषेची
मागणी जी कधीच तृप्त होत नाही. म्हणूनच म्हटलं जातं ‘कामातुरानां न भयं न लज्जा।’. कामाच्या विकाराने, व्याधीने ग्रस्त झालेला
मनुष्य सदैव भोगरत राहाण्याची अपेक्षा करतो म्हणूनच तो शारिरीक व मानसिकरित्या
स्वस्थ नसतो, सदैव अस्वस्थ असतो, त्यामुळेच अस्वास्थ्याला
जवळ करतो. यासाठीच वरील सुभाषित सांगते नास्ति कामसमो व्याधिः।
आता अशा या कामाने
ग्रासलेल्या माणसाला हवं ते सहज मिळालं नाही की आपोआपच तो अतृप्तीने तापतो, कोपतो, रागावतो आणि षड्रिपुंमधा
दुसरा विकार जो 'क्रोध' तो त्याला आपल्या पाशात
अडकवतो. क्रोधाने तापलेला माणूस स्वतःसह सर्वांना जाळून नष्ट करण्याइतकी क्रूरता
बाळगून असतो. म्हणूनच सुभाषितात पुढील चरण आले आहे, नास्ति कोपसमो वह्निः।
असा क्रोधाच्या अग्नीत
जळणारा मनुष्या मग मोह नावाच्या शत्रूच्या तडाख्यात सापडतो आणि पूर्णपणे अंध होतो.
मग त्याला सुटण्याचा मार्गच उरत नाही. यातून सुटून मनुष्यजन्माचं कल्याण करून घ्यायचं
असेल तर एकच मार्ग तो म्हणजे योग्य सद्गुरुंकडून या षड्रिपूंना भेदून जाऊन
परमावस्था, परमसुख प्राप्त करून देणारे
ज्ञान मिळविणे आणि जन्माचे सार्थक करणे.
नास्ति ज्ञानात्परं
सुखम्।
श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसर्या
अध्यायात सांख्ययोगात म्हणजेच ज्ञानयोगात श्रीकृष्ण भगवंत सर्व जीवांना उद्देशून आपल्या परमसखा अर्जूनाला हेच
सांगतात,
ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते ।
सङ्गात् संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥
क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥
~ २.६२-६३, श्रीमद्भगवद्गीता.
माणूस विषयांच्या नादी
लागला की त्याच्याठाई विषयांचा संग उत्पन्न होतो. जो त्याला कामप्रेरीत करतो.
कामातुराला पुढे मनाजोगे काही न मिळाल्यास त्यातून क्रोध निर्माण होतो
जो मनुष्याला संमोहित करून संभ्रमावस्थेत नेतो. अशा मोहाने ग्रस्त संभ्रमित
माणसाची स्मृती नष्ट होते जी नष्ट झाल्याने बुद्धीचे प्रयोजनच उरत नाही आणि असा
बुद्धीनाश झालेला मनुष्य अंततः स्वतःच संपतो, नाश पावतो.
ह्या सगळ्या कुटिल चक्रातून
मानुष्याची सुटका कशी होते हे जाणून घ्यायचं असेल तर श्रीभगवद्गीतेच्या
सांख्य(ज्ञान)योगातील श्लोक क्रमांक ६४ते ७२ समजून घेणे आवश्यक आहे. हे ज्ञान
प्राप्त झाले की षड्रिपुंच्या कचाट्यात न अडकता मनुष्य प्रशांत अशी मुक्ती प्राप्त
करु शकतो.
नास्ति ज्ञानात्परं सुखम्।
संकलन - अभिजीत काळे सर
----------------
जैसा संग वैसा ढंग, ही एक जुनी म्हण आहे, परंतु ती शंभर टक्के खरी
आहे. सुसंगतीचा परिणाम खुप चांगला होतो. आणि जर तुम्ही अशा वाईट संगतीच्या, सप्त व्यसने असलेल्या लोकांसोबत राहत असाल, जे लोक बहुतेक वेळा अश्लील लैंगिक
गोष्टी बोलत राहतात, तर त्याचा तुमच्यावर मनावर नक्कीच परिणाम होईल, व मनात काम बळावेल, भक्ती नष्ट होईल, त्यामुळे अशा कामी लोकांपासून नेहमी दूर राहावे. अनेक लायक, हुशार आणि हुशार तरुण अशा
प्रकारे आपले आयुष्य गमावलेले आपण
पाहिले आहेत.
‘रिकामं डोकं सैतानाचं घर’ अशी आपल्या मराठी भाषेत म्हण आहे. सैतान म्हणजेच विकार, काम. अनेकदा असे दिसून येते की
एकटेपणा असणारे लोक खूप लवकर वाईट
सवयींना बळी पडतात, त्यामुळे आपले मन सैतानाचे घर बनू देऊ नये, स्वतःला नेहमी कोणत्या ना कोणत्या चांगल्या कामात व्यस्त
ठेवावे. मोकळा वेळ मिळाल्यास अध्यात्मिक पुस्तके वाचावी, आपणही आपल्या मनात येणारे चांगले विचारांचे लेखन करावे. काहीतरी सर्जनशील कार्य करावे. किंवा काही चांगली माहितीपूर्ण मार्गदर्शक पुस्तक वाचून स्वतःला
चांगले बनवावे.
काम विकार कमी करण्यासाठी तामस आहार सोडावा. तामस आहार जसे की मांस मनुष्याला माज आणणारे पदार्थ आहेत. नशा माणसाला पशुत्वाकडे घेऊन जाते. नशेमुळे माणूस आंधळा होतो, नशा केल्याने धर्म-अनैतिक, नैतिक-अनैतिक, पाप-पुण्य यांचे ज्ञान मावळते. आपल्या समाजातील बहुतांश गुन्हे हे ड्रग्जमुळे, अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होतात. त्यामुळे अंमली पदार्थांपासून जितके दूर राहाल तितके चांगले. नशेत असताना शरीरावर नियंत्रण ठेवता येत नाही, मग मनावर नियंत्रण कसे ठेवता येईल याचा विचार करावा. दारु पिणारा मनुष्य स्वतःचे भान विसरून गटारात लोळतो, घरी येऊन धर्मपत्नीला मारपीट करतो, आजच्या काळात कित्येक संसार हे दारुमुळे मोडले आहेत. कित्येक स्त्रीयांची आयुष्ये दारुमुळे उध्वस्त झालेली आहेत.
कामवासनेवर विजय कसा मिळवावा?श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की "मन हे रानटी घोड्यासारखे चंचल आहे. ते नेहमी विषयाच्या दऱ्याकडेच धावतो." त्या मनरूपी घोड्याला अध्यात्माचा लगाम घालून सत्संगाची ट्रेनिंग द्यावी लागते. मन नेहमी नरकात नेणाऱ्या विषयांकडेच धावत असते. पण आपण त्या मनरूपी घोड्याचे मालक आहोत, तो मनरूपी घोडा तुमचा मालक नाहीये. हे इथे लक्षात घ्यावे. त्यामुळे जर आपल्याला त्या मनावर स्वार होऊन, त्या मनावर नियंत्रण आपल्या गंतव्यस्थानी म्हणजेच परमेश्वराप्रत पोहोचायचे आहे. जर आपण या मनरूपी घोड्यावर ताबा ठेवला नाही, नियंत्रण ठेवले नाही, तर लगाम नसलेला हा घोडा कुठे घेऊन जाईल हे आपल्याला, स्वत:लाही कळत नाही.
आपले हे चंचल मन भौतिक आणि क्षणिक सुखांच्या हव्यासापोटी नेहमीच भरकटत असते, पण अध्यात्म अभ्यासून बुद्धी आणि विवेकाचा लगाम घालून ते आपल्या ताब्यात ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे भगवंतांचे नामस्मरण आणि श्रीमद्भगवद्गीतेच्या मदतीने मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा.
मनाला कसे शुद्ध करावे? धर्मबंधुंनो !! ययाति नावाचा राजा महाभारतात म्हणतो, ‘न जातु काम कामानां, उपभोगेन शाम्यति । लक्षात ठेवा, काम वासना ही अशी आग आहे. जितके आपण ती विझवण्याचा प्रयत्न करतो तितकीच तो अग्नि अधिक भडकत जातो आणि त्या सोबत आपले शरीर नाना रोगांचे माहेरघर बनते आणि मन देखील नाना विकृतींनी त्यात वाहत जाऊन आयुष्य बरबाद होऊन जाते.
आणि मनाला नियंत्रीत
केल्याने आपल्याला इतकी शांतता आणि सुख मिळेल की आपले जीवन धन्य होउन जाते. आपल्याला ते माहित आहे की, हे इतके सोपे नाही, यासाठी आपल्याला सतत सराव करावा
लागेल. मन भगवंतांच्या भक्तीत
योजावे लागेल. म्हणून दूषित मन शुद्ध करण्यासाठी पूजा पारायण करावे, धार्मिक कार्यात भाग घ्यावा, सत्संग करावा, महिण्यातून, आठवड्यातून एकदा
तीर्थस्थानाला,
स्थान नमस्कार करावे, साधु-संतांकडून शास्त्र
ऐकावे. शास्त्रात सांगितल्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करावा. तरच आपण मनावर
नियंत्रन ठेवून आपल्या आयुष्याचे कल्याण करू शकू ।।