संस्कृत सुभाषित रसग्रहण
संस्कृत सुवचनानि
आजची लोकोक्ती - सुखं हि दुःखानि अनुभूय शोभते।
सुखं हि दुःखान्यनुभूय शोभते यथान्धकारादिव दीपदर्शनम्।
सुखात्तु यो याति दशां दरिद्रतां स्थितः शरीरेण मृतः स जीवति॥
- 'चारुदत्त', भास.
अर्थ :- ज्याप्रमाणे अंधारामधे दिव्याचे दर्शन दिलासादायक असते त्याप्रमाणेच दुःखाच्या अनुभवानंतर सुख आनंददायक ठरते. परंतु सुखकारक जीवन जगल्यानंतर ज्याच्या आयुष्यात दारिद्र्य येते तो जिवंतपणेच मृतप्राय जीवन जगतो.
सुखं हि दुःखानि अनुभूय शोभते।
क्लेशः फलेन हि पुनर्नवतां विधत्ते।
कष्टाचे फळ गोड असते. किंबहूना असेही म्हटले जाते की, दुःखानंतरच सुखाला महत्त्व येते खऱ्या आनंदाची किंमत तो कष्ट करून मिळविलेला असेल तरच कळते. असेच या दोन्ही लोकोक्तीं द्वारे कळून येते. कष्ट करून, रक्ताचे पाणी करून जेव्हा त्याचे अनुकूल फळ लाभते तेव्हाच खरेतर श्रमसाफल्याचा अनुभव येतो.
सकाम कर्माचा भौतिक आनंद असो वा निष्काम तपश्चर्या करून विरक्तीच्या मार्गाने मिळणारे सात्विक समाधान असो. सत्चिदानंदघन असा आत्माराम पंचमहाभौतिक शरिरात स्थानापन्न असल्याने जीवासही आनंदची ओढ असते. ह्या अनादीअनंत विश्वाच्या प्रत्येक कालमानातील जीवाला आनंदाचीच ओढ असते.
हा आनंद प्राप्त करण्याचा प्रत्येक जीवाचा मार्ग मात्र त्याची स्वाभाविक प्रकृती व कार्मानुसारी संस्कारांवर अवलंबून असते. म्हणूनच त्रिगुणमयी प्रकृतीतील सत्व, रज, तम यांपैकी विशिष्ट गुणभारित जीवाचा आनंदही त्याच्या व्यक्तिविशिष्ट गुणप्रकृतीनुसार वेगवेगळा असतो आणि स्वतःच्या विशिष्ट प्रकृतीगुणानुसार आपला आनंद मिळविण्याच्या प्रयत्नात सृष्टीतील प्रत्येक जीव कार्यरत असतो. त्यामुळे अथक परिश्रम करून निश्चित फल प्राप्त झाल्याचा आनंद अवीट गोडीचा असतो हे मात्र खरे. यशवृक्षाची फळे गोडच असतात.
वरील श्लोक महाकवी 'भास'रचित 'चारुदत्त' या नाटकातील आहे. भासानंतर होऊन गेलेल्या शूद्रकाच्या 'मृच्छकटिकम्' या नाटकातही हा श्लोक पाठभेदासह अंतर्भूत आहे. भास व शूद्रक यांचा काळ कालिदासापूर्वीचा आहे. म्हणजेच भासाचा काळ इसवीसनाचे पहिले शतक किंवा इसवीसनापूर्वी पहिले शतक असावा. भासाने तेरा संस्कृत नाटके लिहिली आहेत. कालिदासानेही आपल्या साहित्यात भासाचा उल्लेख केला आहे.
सुखं हि दुःखानि अनुभूय शोभते। दुःख सोसल्यानंतरच सुख उपभोगण्यात आनंद असतो. असा या लोकोक्तीचा अर्थ आहे. वर उद्धृत केलेल्या दोन्ही नाटकांमधील 'चारुदत्त' या श्रीमंत वैश्यास (व्यापाऱ्यास) काही कारणवश दारिद्र्य येते तेव्हा तो वरील श्लोक उच्चारतो. यातील पहिले चरण नंतर लोकोक्ती म्हणून रूढ झाले.
'मृच्छकटिकम्' मधील श्लोक असा आहे,
सुखं हि दु:खान्यनुभूय शोभते
घनान्धकारेष्विव दीपदर्शनम्।
सुखात्तु यो याति नरो दरिद्रतां
धृत: शरीरेण मृत: स जीवति।
~ मृच्छकटिकम्.
घनदाट अशा अंधारात ज्याप्रमाणे दिव्याचा प्रकाश पडल्याने खूप आनंद होतो, त्याप्रमाणेच खूप दु:खे भोगल्यावर मिळणारे सुख (माणसाला) आनंदित करते. परंतु आधी सुख उपभोगल्यानंतर ज्या माणसाला गरिबी येते; तो शरीराने जिवंत असला तरी मृतवतच जगतो.
महाकवी कालिदासाच्या 'विक्रमोर्वशीयम्' या नाटकातील एक श्लोक इथे उद्धृत करावासा वाटतो,
यदेवोपनतं दु:खात् सुखं तद्रसवत्तरम्।
निर्वाणाय तरुच्छाया तप्तस्य हि विशेषतः॥
- विक्रमोर्वशीयम्.
ज्याप्रमाणे सूर्याच्या उन्हाने तापलेल्या वाटसरूला झाडाची सावली अल्हाददायक शीतलतेचं सुख देते, अगदी त्याप्रमाणेच दुःख भोगल्यानंतर मिळणारे सुख हे अधिक आनंददायी असते.
वरील लोकोक्तीशी अर्थसाधर्म्य दर्शविणारी, महाकवी कालिदासाने लिहिलेल्या 'कुमारसंभवम्' नाटकातील एक लोकोक्ति प्रसिद्ध आहे. ती म्हणजे, क्लेशः फलेन हि पुनर्नवतां विधत्ते। कष्ट केल्यानंतर मिळालेले फळ त्यासाठी केलेले श्रम विसरायला लावून नवचैतन्य देते.
ही लोकोक्ती असलेल्या कुमारसंभव या कालिदासाच्या महाकाव्यातील श्लोक प्रसंग असा आहे. माता पार्वती कष्टप्रद असे तप करते व भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न होतात व म्हणतात,
अद्य प्रभृत्यवनताङ्गि ! तवास्मि दासः
क्रीतस्तपोभिरिति वादिनि चन्द्रमौलौ।
अह्नाय सा नियमजं क्लममुत्ससर्ज
क्लेशः फलेन हि पुनर्नवतां विधत्ते॥
- ५.८६, 'कुमारसंभव', कालिदास.
"हे कोमलांगी (अवनताङ्गि - वक्षभारानेजिचे कोमल शरील थोडे झुकल्याप्रमाणे भासते अशी)! आज पासून तू मला तुझ्या तपाच्या शक्तीचे मोल देऊन विकत घेतलेला दास समज." असे चंद्रमौळी (भगवान शिव) तिला म्हणाले आणि तिने त्वरित सर्व व्रतनियमांमुळे आलेला थकवा झटकून टाकला. खरेच आहे की, 'कार्य संपूर्ण झाल्यानंतर जर त्याचे फळ मिळाले तर माणूस त्यासाठी घेतलेले सर्व कष्ट विसरून पुन्हा ताजातवाना होतो.'
या श्लोकावरून एका उर्दू शेराचा अर्थ मला अधिक सहजतेने समजला. तो शेर असा,
बहुत ताख़ीर से पाया है ख़ुद को
मैं अपने सब्र का फल हो गई हूँ
- हुमैरा राहत.
खूप उशिराने मी मला स्वतःला मिळवलंय, मी स्वतःच माझ्या प्रतिक्षेचे फळ झालेय. इथेही मी मला स्वतःला खूप काळाने भेटलेय, बऱ्याच उशिरा मी मला मिळवलेय असे सांगताना खडतर प्रतिक्षेनंतर आत्मबोधाच्या किंवा एक स्त्री म्हणून वैयक्तिक स्वातंत्र्याच्या आनंदाची अनुभूती शेरातून मांडलेली दिसून येत आहे.
तुकोबारांच्या एका सुप्रसिद्ध अभंगाची एका ओळइचा इथे आवर्जौन उल्लेख करायला हवा.
याजसाठी केला होता अट्टाहास ।
दिस शेवटचा गोड व्हावा ॥
अगदी हेच तर खालील दोन्ही लोकोक्ती सुचवतात.
सुखं हि दुःखानि अनुभूय शोभते।
असो वा,
क्लेशः फलेन हि पुनर्नवतां विधत्ते ।
असो,
दुःख भोगल्यानंतर झालेली सुखाची प्राप्ती, श्रमानंतर अथवा संयमपूर्वक वाट पाहिल्यानंतर मिळालेले फळ हे अधिक आनंददायक असते हेच खरे.
लेखक अभिजीत काळे