दुःखात काहीतरी अर्थ लपलेला आहे.
जगातील अनेक लोकांना असे वाटत असते की, जगात सर्वात जास्त दुःख हे माझ्याच वाट्याला आले आहे. जगातील इतर सर्व लोक माझ्यापेक्षा सुखी आहेत. असे अनेकांना नेहमीच वाटत असते. मी एकटाच दुःखी आहे आणि इतर सर्व लोकं सुखी आहेत. असा विचार करुन माणूस स्वतःला आणखी जासत दुःखी करुन घेत असतो.
संत तुकारामांनी एका अभंगात, सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे, असे म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तीला आपले दुःख हे पर्वताएवढे महाभयंकर वाटत असते. या अभंगामध्ये संत तुकारामांनी जव आणि पर्वत याचे उदाहरण वापरले आहे. आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांकडे कसे पाहतो यावर आपण आयुष्यात दुःखी होणार की आनंदी होणार हे अवलंबून असते.
ज्या ज्या वेळी आपण बाह्य वातावरणातील गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करु त्या त्या वेळी दुःख आपल्या वाट्याला येणार आहे. आनंद आणि दुःख या दोन्हीही मनाच्या अवस्था आहेत. गोष्टी मनासारख्या घडल्या तर आपलं मन आनंदी होतं आणि मनाच्या विरुध्द घडल्या की हेच मन क्षणाार्धात दुःखी होतं. याचाच अर्थ आपला आनंद हा कशावर तरी अवलंबून आहे. कोणत्या तरी कारणावर तो अवलंबून आहे.
मित्रांनो आपण एक गोष्ट लक्षात घेवूया... ती म्हणजे आपल्या आयुष्यात कोणत्याही घटना विनाकारण घडत नाहीत. अगदी याचप्रमाणे जर आपल्याही आयुष्यात दुःख आले असेल तर त्यालाही काहीतरी कारण असेल. हे दुःख माझ्याच आयुष्यात का आले? असे म्हणण्यापेक्षा या आलेल्या दुःखामध्ये काहीतरी चांगले लपलेलं सुध्दा असू शकतं. असा विचार आपण कधी केला आहे का? आपण नेहमीच दुःखाला विरोध करत असतो. व्हिक्टर फ्रैंकल असं म्हणतात की, दुःखात काहीतरी अर्थ लपलेला आहे. असं जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्ही ते दुःख सुध्दा आनंदाने स्वीकाराल.
आपलं आयुष्य हे क्षणभंगूर आहे. त्यामुळे आयुष्यात येत असणाऱ्या दुःखांना किती काळ कुरवाळत बसणार? पृथ्वीच्या तुलनेत आपलं अस्तित्व खूप कमी काळ आहे. म्हणूनच मिळणारा प्रत्येक क्षण आपण भरभरुन जगण्याचा, प्रयत्न करायला हवा. आपण जर प्रत्येक वेळेला दुःखीच होत राहिलात आणि त्या दुःखामध्ये काहीतरी चांगलं दडलेलं आहे. याचा शोधच घेतला नाहीत तर यामुळे आयुष्यातील रस कमी होईल.
आपण जर दुःखाला विरोधच करत राहिलात तर ते परत परत आपल्या आयुष्यात येत राहिलं व तुम्ही पुन्हा पुन्हा स्वतःला विनाकरण दुःखी करत राहाल. असं म्हटले जाते की, उणीव जाणीव निर्माण करते. याचाच अर्थ असा की, एखादी गोष्ट आपल्याकडे भरपूर प्रमाणात उपलब्ध असेल, तर त्या गोष्टीची किंमत आपल्याला राहत नाही. म्हणूनच एखाद्या गोष्टीची उणीव भासली की त्याची जाणीव मनात निर्माण होते.
मित्रांनो, सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्याला या दोन्हीही गोष्टींकडे तटस्थपणे पाहता आले पाहिजे. या दोन्हीही गोष्टींमध्ये आपण स्वतःला स्थिर ठेवायला शिकूया. सुख आणि दुःख या दोन्हीही गोष्टींमध्ये आपण स्वतःला खूप गुंतवून घेत असतो. आपल्याला स्वतःला कधीकधी अलिप्त सुध्दा राहता यायला हवं.
यापुढे तुमच्या आयुष्यात ज्या ज्या वेळी दुःख येईल तेव्हा तटस्थपणे कोणताही विरोध न करता या दुःखामध्ये सुध्दा काहीतरी चांगला अर्थ लपलेला असेल याचा शोध घेवूया. कधी कधी आपल्या जगण्याची दिशाच चुकीची असते. परंतू आपल्या हे लक्षात आलेले नसते. या दुःखामुळे आपण पुन्हा जगण्याच्या योग्य मार्गावर पुन्हा येऊ शकतो.
आपलं जीवन खरचं खूपचं अनमोल आहे आणि कितीही किंमत मोजली तरीही हे परत मिळणारचं नाही. जीवनातील अनेक गोष्टींना वन्स मोअर असू शकतो. परंतु आयुष्याला वन्स मोअर नाहीये. म्हणून स्वतःला आणि इतरांना जितकं आनंदी ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करा. आनंद वाटत राहा, जितका वाटाल तितका तो वाढत जाईल.
लेखक :- गोविंद सुभाषराव रोडगे परभणी,