खालील सुभाषिताचे रसग्रहण करा
इषणात्रयाचा त्याग - आशा हि परमं दुःखं नैराश्यं परमं सुखम्
संस्कृत सुभाषित रसग्रहण
हे पाहिजे, ते पाहिजे, घर पाहिजे, गाडी पाहिजे, साधं घर असेल तर बंगला पाहिजे, सामान्य गाडी असेल तर Audi पाहिजे, असं सतत कोणत्या ना कोणत्या आशेने भरलेले हे माणसाचे मन नेहमीच पुर्ण होणाऱ्या इच्छांच्या मागे धावत असते. आणि सोमेश्वराच्या यथार्थ ज्ञानापासून दूर जात असते.
इच्छा, अनुकांक्षा, अभिलाषा, आकांक्षा, आरजू, आशा, आस, इरादा, इश्तियाक़, इष्टि, एषणा, कांक्षा, काम, कामना, काम्या, क्षुधा, ख़्वाहिश, चाव, चाह, चाहत, तमन्ना, तलाश, मंशा, मतलब, मनीषा, मनोकामना, मनोभाव, मनोरथ, मनोवांछा, मरज़ी, मुद्दा, मुराद, राग, रुचि, लाषा, वांछा, वासना इतक्या समानार्थी शब्दांनी या भूतलावर विख्यात असलेली “आशा” हा दोष प्रत्येक अज्ञान माणसाला भुतासारखा झपाटून टाकत असतो.
या दोषाचे वर्णन करताना एक शंकराचार्यांनी म्हटले आहे,
दिनमपि रजनी सायं प्रातः
शिशिरवसन्तौ पुनरायातः।
कालः क्रीडति गच्छत्यायुः
तदपि न मुञ्चत्याशावायुः।।
या श्लोकाचा अर्थ असा की, दिवस, रात्र, सकाळ, दुपार संध्याकाळ, शिशिर, वसन्त इत्यादि सर्व कालघटीका पुनःपुन्हा येत राहतात. या विविध परिमाणरूपी खेळण्यांनी काळ सर्व जीवांशी विशेषतः माणसांशी खेळतच असतो. त्या खेळातच आयुष्य क्षणाक्षणानं कणाकणानं सरत असतं. मात्र तरीही “हे पाहिजे ते पाहिजे” हा आशारूपी वायु माणसाला काही सोडायला तयार नाही. आशा, आकांक्षा, इच्छा, वासना ही पिशाचिका, डाकीण मानवी देहपिंडाचा ताबा सोडत नाही!
विस्तृत चिंतन :- भारतीय असो वा पाश्चात्य वा आणखी कोणत्याही पद्धतीची कालगणना असो. ते कालचक्रच आहे. त्यात दिवस वार नक्षत्र सकाळ दुपार संध्याकाळ, विविध ऋतु हे विविध नामांनी येतातच व तसेच जाताही! या काळाच्या मोजपट्टीतच. नित्य ओघात, प्रवाहातच सर्व जीव जन्माला येतात, काही काळ राहतात आणि शेवटी मरून जातात.
पंच महाभूतातील भूमि जल अग्नि वायु यापैकी कोणत्या ना कोणत्या तरी तत्त्वात मिळून मिसळून जातात. विरून जातात! हे समस्त मानवजातीलाही नितांत लागू आहे. मृत्यु हा अटळ आहे. सुभाषितकाराची अपेक्षा आहे की कृमि, कीटका, पशु, पक्षी, हिंस्र श्वापदं इत्यादीना जरी या कालचक्राचं महत्त्व कळत नसलं तरी बुद्धिवंत, विचारवंत, भावनाशील म्हणवून घेणाऱ्या माणसांना तरी सतत क्षणाक्षणानं झरून जाणाऱ्या हातातल्या वाळूप्रमाणं निसटून जाणाऱ्या या काळाचं महत्त्व कळायला हवं!
मनुष्यत्व ही मुमुक्षुत्वाची व महापुरुषसंश्रय या केवळ दैवानुग्रहामुळंच मिळणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या दोन गोष्टींप्रमाणेच व त्यांच्यासाठीची मूलभूत प्राथमिक आवश्यकता आहे. कर्मरहाटीची शास्त्रे असं मानतात की, पापपुण्ये समे कृत्वा नरयोनिषु जायते। मागील अनेक मनुष्यजन्मातून केलेल्या फलाशापूर्वक व अहंकारयुक्त पापपुण्यात्मक कर्मांची समानता जेव्हा साधते तेव्हाच मनुष्यजन्म मिळतो! पण हे मत अन्यथा मत आहे.
हे लक्षात घेऊनच मिळालेला हा मनुष्यजन्म हा नरदेह इकडेतिकडे व्यर्थ दवडण्यापेक्षा, विविध वासनांच्या-भोगांच्या मागे धावण्यात खर्ची पाडण्यापेक्षा, लोकैषणा, दारैषणा, पुत्रैषणा, वित्तैषणा इत्यादींच्या साठी उरस्फोड करून देहाला दमवण्यापेक्षा भगवद्भक्तीसाठी जर वापरला गेला तर सुखदुःखांच्या पार असलेला निर्द्वंद्व, निरतिशय, एकमेवाद्वितीय ब्रह्मानंद मिळून जन्ममरणाच्या चक्रातून त्याची सुटका होईल!
वास्तविकतः जन्मदुःख (जन्मतांना होणारे दुःख) जरादुःख (म्हातारपणाचे दुःख) जायादुःख (स्त्री मेल्याचे दुःख) क्षुधादुःख (भुक लागली तर खायला काही मिळाले नाही तर दुःख होते) मृत्युदुःख (मरणसमयी होणारे अंतीकाचे दुःख अथवा कुणी जवळचे मरण पावले तर होणारे दुःख) यांनीच माणसाचं आयुष्य सतत पोखरलं जात असतं.
दुःखाच्या तुलनेत मिळणारे सुखाचे भोग संख्येनं खूप कमी, अल्पजीवीच व भ्रामकच असतात! आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्य शृंखला. या न्यायानं आशेने बद्ध झालेला मनुष्यजीव सतत धावत असतो. धड पडेपर्यंत अहोरात्र धडपडत असतो! जीविताशा बलीयसि या न्यायानं सर्पाच्या मुखातल्या बेडकानं किडामुंग्यांना गिळण्यासाठी धडपडावं तशी माणसाची अवस्था आहे!
महाभारतातही दुर्योधन सांगतो..
हते भीष्मे गते द्रोणे कर्णे च विनिपातते।
आशा बलवती राजन् शल्यो जेष्यति पांडवान् ।।
म्हणजे भीष्म मेला द्रोणाचार्य मेला कर्णही मेला तरी पण युद्ध जिंकण्याची आशा माझ्या मनाला सोडायला तयार नाही म्हणून मला असे वाटते की शल्य तरी पांडवांना हरवेल म्हणून दुर्योधन शल्य राजाला सेनापती करतांना हा श्लोक म्हणतो आणि हट्टानं भारतीय युद्ध लढून कौरववंशाचा नाश ओढवून घेतो! म्हणूनच भगवंत अर्जुनाला निमित्त करून गीतेत सर्वांना सांगतात.
निराशीः निर्ममो भूत्वा युद्ध्यस्व विगतज्वरः। निर्मम होऊन, खोट्या आशांचा त्याग करून, आसक्तींचा ताप झटकून देऊन स्वकर्तव्यरूप युद्ध लढ! हताशा, गताशा, विफलाशा या गोष्टींहून निराशा भिन्न आहे. श्रीमद्भागवताच्या ११व्या स्कंधात यदुअवधूतसंवादात पिंगला नामक वेश्याही स्वीकारते. मान्य करते की आशा हि परमं दुःखं नैराश्यं परमं सुखम् । म्हणूनच ती सुखानं झोपू शकली व अवधूतांच्या चौवीस गुरूंमधे स्थान मिळवू शकली.
माणसाच्या मनात देहाहंकारानं, कर्तृत्वभोक्तृत्वादि अहंकारानंच आशा जागते व तिच्या परिपूर्तीसाठी मनुष्य आयुष्यभर धावपळ करीत असतो. पण सतत सरकणाऱ्या काळाकडे जर दुर्लक्ष झालं तर नकळत येणाऱ्या व चकवत राहणाऱ्या मृत्युमुळे सर्व आशांवर पाणी पडतं. केलेल्या कार्यकर्तृत्वाची माती होते. म्हणून आचार्य माणसाला आशापाशातून मुक्त होण्यासाठी विवेक करायला सांगतात भज गोविंदम् ।
लोकेषणा म्हणजे लोकांनी आपल्याला मानावे. मानपान करावा. दारेषणा म्हणजे स्त्रीयांचा विकाररूप अभिलाष. वित्तेषणा म्हणजे भरपूर द्रव्य मिळावे. पुत्रेषणा म्हणजे भरपूर शिष्य परिवार व्हावा असे साधूला वाटते. आणि गृहस्थाश्रम्याला तर पुत्र व्हावा असे वाटणे, पुत्र व्हावा अशी इच्छा. अशा नाना इच्छांनी मनुष्याचे अंतःकरण सहेतूकतेने माखले गेले आहे. त्यामुळेच जीव परमेश्वरापासून दुरावला आहे.
लेखक :- श्रीपाद साहेब केळकर (कल्याण)