महानुभाव पंथीय आचार्य परंपरा
महानुभावांचा इतिहास
आचार्य, महंत आणि अधिकरण हे तिन्ही समानार्थी असून भिन्न आहेत. महंत : - महत् या शब्दापासून महंत शब्द बनलेला आहे. महंत म्हणजे सामान्य संतापेक्षा श्रेष्ठ, मोठा असा अर्थ होतो, ही परंपरा वगवेगळ्या पद्धतीने अनेक धर्मात आहे.
अधिकरण :- संस्कृतामध्ये ' आधारोऽधिकरण' असे म्हटले आहे. म्हणजे जे संपूर्ण परमार्ग पंथाचे आधारस्तंभ असून प्रमाणभूत आणि ज्ञान, भक्ती, वैराग्याने युक्त आहे. वैराग्य म्हणजे विरमता गुण, ज्ञानयुक्त; कपडे मळके घातले म्हणजे वैराग्य नाही.
ज्यांनी बोललेले ते सर्वमान्य करतीलच ते अधिकरण असतात . आणि हे सुद्धा महानुभावीय आचार्य परंपरेत आहेत. महानुभावीय आचार्य परंपरेचा अभ्यास करण्यासाठी विद्वानांनी सात साधनांचा उल्लेख केलेला आहे .
१. श्रुती, २. स्मृती, ३. वृद्धाचार, ४. मार्गरूढी, ५. अन्वयस्थळ, ६. चरित्र आबाब आणि, ७. इतिहास प्रकरण इत्यादी.
ह्या सात साधनांपैकी श्रुति ती श्रीचक्रधरांची, स्मृती ती श्रीनागदेवाचार्यांची, वृद्धाचार तो वृद्धानाम आचारः = वृद्धाचार. धाकुटेयाशी वडिलांचा आचार हा श्री कविश्वरबास आणि श्री आनेराजबास यांचा, मार्गरूढी ती श्री परसरामबास यांची, अन्वयस्थळ ते - अन्वय = परपरा , स्थळ = ज्यामध्ये साधक-बाधक चर्चा चालते ते सर्व अन्वयस्थळ - हे श्री सोंगोबास - कृष्णोबास पारमांडल्य इत्यादिंचे , चरित्र आबाब ते राघवपंडित पारमांडल्य यांचे, ज्यांनी शास्त्र चर्चेत माहूरचे श्रीदत्त मंदिर (देवदेवेश्वर) जिंकले आणि इतिहास प्रकरण हे नंतरच्या आचार्यांचे. या सातही साधनावरून महानुभाविय आचार्य परंपरेचा अभ्यास करावा लागतो.
महानुभाव पंथाचे प्रथमाचार्य श्रीनागदेवाचार्य यांचा जन्म शके ११५८ मध्ये झाला. ते जालना जिल्ह्यातील पुरी - पांढरी गावचे. ते ऋग्वेदी शतपत ब्राह्मण वंशाचे. यांचे वंशाचार्य - ' श्रीवामनाचार्य व महदाइसा हे' पणजोबा, महेश्वरपंडित व वैजाइसा हे आजोबा, श्रीमाधवभट व आबाईसा हे आई - वडील . श्री नागदेवाचार्य व गंगाईसा यांच्या पासून श्री महेश्वर पंडित व श्री वैराग्यदेव हे पुत्र. श्री आचार्यांना ईश्वर प्राप्ती शके १२२४ मध्ये झाली. आपण श्रीचक्रधरस्वामींचे अधिकृत पाईक आहोत स्वतंत्र आचार्य नाही ही भावना श्री आचार्यांची नेहमी असायची कारण स्वामींनी आचार्य पद देतांना भट्टोबासांना म्हटले होते, बोधदाता काइ तू ? बोधदाता तो परमेश्वर : ही जाणीव सदैव असल्यामुळे स्वामी आणि त्यांचा परमार्ग हेच त्यांच्या दृष्टीपुढे सदैव होते . श्री भट्टोबासांचे कर्तृत्व हे दुहेरी स्वरूपाचे होते . एक म्हणजे पंथीय परमार्गाचा सांभाळ आणि दुसरे म्हणजे महानुभाव वाङ्मयीन ब्रह्मविद्याशास्त्राचे जतन.
प्रथम आचार्य श्रीभट्टोबासांपासून ते चौथे आचार्य श्री परसरामबासापर्यंत महानुभाव पंथात उत्तम प्रकारे एकसूत्री व्यवस्था होती, त्यांच्या कार्यकाळात पंथाची गुरुकुल पद्धती व्यवस्थित होती. मानवतेचे गुण एकरूप करून अंतिम साध्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे शिक्षण होय व अशा प्रकारचे शिक्षण हे आचार्यांपासून मिळत असते म्हणून आचार्य परंपरेचे महत्त्व आहे .
श्रीचक्रधरस्वामींच्या अविद्येमानी देमाईसाला स्वप्न पडलं, कोणी चार पुरुष रांजण उचलून नेत आहेत, ती त्या पुरुषांना आडवते तेंव्हा त्यांचा म्होरक्या बाकीच्यांना म्हणतो अरे हिच्या ओंजळी तीन रत्ने घाला. देमाईसाने हे स्वप्न आचार्यांना सांगितलं तेव्हा श्री आचार्य म्हणाले, आता मज सर्वज्ञांचा हाकारा येईल रांजण तो मी, रत्ने तीये सर्वज्ञाचा परीवारू, तीन आंजुळी म्हणजे तीन अधिष्ठाने म्हणजे श्री बाइदेवबास, कविश्वरबास, परसरामबास.
श्रीनागदेवाचार्यांनंतर पंथाचे दुसरे आचार्य कोण ? हा संशोधनाचा प्रश्न आहे -
अन्वयस्थळ, महानुभाव इतिहास, महानुभाव वंशवृक्ष आणि इतिहास प्रकरण यामध्ये महानुभाव पंथाचे दुसरे आचार्य कविश्वरबास असल्याचे सांगितले जाते ; पण महानुभाव वृद्धाचार आणि डॉ. शं. गो. तुळपुळे यांच्या मतानुसार व महानुभाव परंपरेनुसार महानुभाव पंथाचे दुसरे आचार्य बाइदेवबास ठरतात ; कारण वृद्धाचारामध्ये श्री भट्टोबास म्हणतात, हा काळपर्यंत सर्वज्ञाचिया प्रवृत्ती मिया सर्वज्ञाचा व्यापार चालविला : आता तुवा चालवावा... आणि सर्व शिष्यांना म्हणाले, आता तुम्ही यांचिया आज्ञे - अनुज्ञे अधिन वर्तावे ...
श्रीभट्टोबासांनी पंथाचे दुसरे आचार्य बाइदेवबास यांना अधिष्ठित केले तेव्हा कोणत्याही प्रकारचे भद्रासन नव्हते. शके १३८० मध्ये आठवे आचार्य पंडित श्री गुर्जर शिवव्यास यांचे शिष्य श्री वैद्ये दत्तोबास यांच्यापासून पाच पायऱ्यांचे भद्रासन सुरू झाले. महानुभाव पंथाचे तिसरे आचार्य कविश्वरबास आणि चौथे आचार्य पंडित परसरामबास ज्यांनी ज्ञानाची गगना गवसणी लावली ते खेइदेवपंडित- जोमाईसाचे पुत्र परसरामबास यांच्या काळात महानुभाव पंथाचे तेरा आम्नाय झाले .
रत्नाचिया खाणि रत्न निफजति ।
तैसे आचार्य शोभती तेरा जण ।।
स्मृतिस्थळ आणि डॉ. कोलते यांचे महानुभाव संशोधन भाग - १ ' या ग्रंथातील आचार्य आम्नाय क्रम बरोबर जुळत नाही. हा क्रम महानुभाव अन्वयस्थळात असा आहे, सहा कविश्वर - सहा उपाध्य -एक पारमांडल्य पण काही ग्रंथात गटाच्या नावाला आम्नाय क्रमात घातले.
अन्वयस्थळातील क्रम:-
कवीश्वर आम्नाय
१. खामनीकर (नागोबास )
२. कोठी (कुमरे रेमाइसा )
३. गुंफेकर (महेश्वरबास )
४. अमृते ( मायाबास )
५. जामोदेकर (मदळसा सामको )
६. मेहकरकर ( जयदेव योगी )
उपाध्य आम्नाय
१. बीडकर (संतराज )
२. साळकर (महादोबास )
३. यक्षदेव (यक्षदेवबास )
४. ऋद्धिपूरकर (दामोदरबास)
५. लोणारकर (हरिबास )
६. पैठणकर (देवबास )
पारमांडल्य.
१.आनेराजबास ( लासूरकर, तळेगांवकर. )
प्रस्तुत तेरा आम्नाय म्हणजे आचार्यांचे तेरा मुख्य शिष्य. प्रश्न असा पडतो.
महानुभाव पंथात एकच आचार्य असते तर? इतर धर्मात एकच मुख्य आचार्य असतो आणि आपल्याही पंथात एकच आचार्य होते नंतर तीन अधिष्ठान झाले आता तीनचे तेरा झाले असे का ? एकसूत्री आचार्य पद नको का ? याचं उत्तरही असं आहे पंथात एकाच आचार्यांनी अनेक आर्तवंतांना उपदेश देऊन धर्माला लावणे, प्रचार प्रसारासाठी परिभ्रमण करणे हे काम काळा आभावी आवरता येणे शक्य नसल्याने उपदेश देण्याची, शिष्य करण्याची अनुमती प्रमुख आचार्य श्री भट्टोबासांनीच दिली असावी,
याचे कारण असे की, श्री पुरुषोत्तम उपाध्यांची मुलगी, जानोपाध्याची पुतनी कमळाईसा ही बालविधवा होती, ती काका जानोपाध्यांकडे उपदेश - दीक्षा घेण्यास आली तेव्हा त्यांनी उपदेश - दीक्षा न देता कमळाउसाला श्री भट्टोबासांकडे घेऊन गेले. आचार्य म्हणतात- दादो तुम्हीच का तिला उपदेश देत नाही ? मी काय तिला एक देव सांगेन आणि तुम्ही काय दुसरे देव सांगणार ! तेव्हा जानोपाध्य म्हणाले, गोसावियांनी तुम्हाला आचार्य केले असे,
नंतर श्री भट्टोबासांनी कमळाउसाला उपदेश - दीक्षा दिली. पण सांभाळी मात्र जानोपाध्यांकडेच घातले आणि सर्व शिष्यांना सूचना केली की, हिला उपाध्य कमळाउसे म्हणा . याचा अर्थ काय ? पंथात मुख्य गुरूचा आदर ठेवून, अनेक आचार्य होऊन पंथाचा विस्तार व्हावा. याला श्री चक्रधरस्वामींचा सुद्धा पाठपुरावा आहे. श्रीचक्रधरस्वामी म्हणतात, यथौनि एका दोघा तुम्हापासौनि साता -पाचा. याचा अर्थ काय ? तर तुमच्यापासून पुढे पंथाचा विस्तार होईल, म्हणून तेरा आम्नाय होऊन महानुभाव आचार्य परंपरेचा वंशवृक्ष वाढीला लागला .
महानुभाव आचार्यांचे महत्त्व:-
जगात विश्वशांती पाहिजे असेल तर त्याचा उपाय धार्मिक आचार्य सांगू शकतात. आचार्यांना भूत - भविष्य - वर्तमान, याचे ज्ञान असते. श्रीनागदेवाचार्य वर्तमान सांगू लागले. रामदेवो धरीला परी सूटेल, जवळिक म्हणितले, ते का भट्टो? श्रीआचार्य म्हणतात,
यस्मिन् देशे वसेत् ज्ञानी योगी स्वाध्यात्म चेतसः ।
तन्मंडळं पवित्रं च प्रयाति निमिषाधृवं ।।
याचा अर्थ असा ज्या देशात ज्ञानी, योगी, आचार्य पुरुष, चिंतन, स्मरण करणारे असतात, तो मंडळ, देश, पवित्र आणि सर्वोपद्रवविवर्जित असतो. याचं उदा. सांगायचं झाल्यास, शके १३५७ बिदर येथील बहामनी वंशाचा राजा अहमदशहा यांना असाध्य आजार झाला. तो विहिरीत आत्महत्या करण्यासाठी निघाला होता. माळरानाच्या विहिरीजवळ आला. विहिरीच्या बाजूच्या झाडाखाली आचार्य श्रीकमलाकर मुनी कोठी बसलेले होते,
आचार्य म्हणतात, आपण, एकटेच इथून कुठे जात आहात? तो म्हणाला आपण तपस्वी आहात म्हणून खरे तेच बोलतो, मला असाध्य आजार झाला म्हणून मी आत्महत्या करण्यासाठी ह्या विहिरीकडे आलो. आचार्य कमलाकरमुनी म्हणतात, तुम्हाला आजार कुठे आहे ? अहमदशहाने रोग दाखविण्यासाठी आपल्या शरीराकडे बघितले, पण तो आता दिसेनासा झाला. त्याला रोग होता पण तपश्वी आचार्यांच्या दर्शनाने व शब्द सामर्थ्याने रोग नाहीसा झाला. हेच तर आचार्यांचे महत्त्व आहे. श्री नागदेवाचार्यांच्या शंभर वर्षे नंतरच्याही काळात महानुभाव आचार्यांना, सामर्थ्याचे महामेरू म्हणायचे .
महानुभाव आचार्यांची वैशिष्ट्ये काय?
१. या पंथातील आचार्यांचा आत्यंतिक निवृत्तीवादी दृष्टिकोन नाही. म्हणजे संन्यास धर्माचाच पुरस्कार करणारे नसून प्रवृत्तवादी म्हणजे उपदेशी लोकांचाही पुरस्कार करणारे आहेत. उदा. श्रीचक्रधरस्वामी हिरडपूरी (पैठण) येथे असताना त्यांच्या दर्शनासाठी बळेगावचे महाजन आले ते म्हणाले "जी जी गोसावी आम्हासी संन्यासधर्म निरूपावा जी:, तेव्हा स्वामी म्हणतात, संन्यास धर्म तुम्हा काय प्रयोजन ? जे होऊनी असा तेथची काही पुसा: मग गोसावी गृहस्थ धर्म निरूपिले .
२. जनसामान्यांपासून दूर राहण्याची वृत्ती या पंथातील आचार्यांची नाही. या पंथात सर्व जाती समावेशक धर्माचे लोक व आचार्य आहेत. नांदेड येथे जातिपंथाच्या लोकांनी वेदांची अप्रतिष्ठा करण्याची मोहीम केली वेदविद्याशास्त्रात पारंगत ब्राह्मण पंडितांना जती संन्याशांनी पराभूत केले वेदांचे उच्चाटन झाले. तत्कालीन ब्राह्मण पंडित महानुभाव आचार्य श्रीकारंजेकर पिढीचे मुख्य कुलाचार्य श्रीमुनीव्यास नांदेडकर पूर्वाश्रमीचे देशपांडे यांना तत्कालीन ब्राह्मण पंडितांनी विनंती करून जतीपंथाच्या आचार्यांसोबत चर्चा करण्यासाठी सांगितले.
आचार्य श्री मुनीव्यास नांदेडकर यांनी चर्चा करून त्यांना पराभूत केले व वैदिक धर्माची प्रतिष्ठापणा करून दिली. एवढेच नाही तर जतीपंथाचे लोक तंत्र मंत्रामध्ये प्रसिद्ध होते, त्यांनी आचार्य श्री मुनीव्यास नांदेडकरांना तंत्र विद्येसाठी पाचारण केले तेव्हा महानुभाव आचार्य श्री मुनीव्यास नांदेडकर यांनी श्री नारोव्यास बहाळीये महानुभाव यांना बोलावून जतीसंन्याशांसोबत तह दिला, नांदेड येथील कालिया डोहाच्या अथांग पाण्यात केळीच्या पानावर न बुडता बसून दाखवावे या प्रणातही महानुभाव आचार्य जिंकले व स्वतःला आणि हिंदु - वैदिकांना संरक्षण दिले आणि तेव्हाच तत्कालीन नांदेडचा राजा देपाळदरणा यांनी महानुभाव आचार्यांना जयपत्र दिले.
३. जीवनात व साहित्यात सौंदर्य साधनेचा अधिक्षेप महानुभाव आचार्यांनी कधिच केला नाही. जनमानसावर आचार्यांच्या वेशभूषांचाच प्रभाव पडत नसून गुण व कार्यांचा प्रभाव पडत असतो.
४. मानवशास्त्रीय सामंजस्यपणाचा अभाव - सामंजस्यपणाचा अभाव महानुभाव आचार्यात नाही सर्वांत मिळून मिसळून राहतात. पण ईश्वरी द्वैत तत्त्वाला सोडून नाही. शके १३२४ मध्ये पाथरी या गावी महानुभाव ब्रह्मविद्याशास्त्राची म्हणजे तिन्ही स्थळांची बांधणी पं अचळमुरारबास, गुर्जर शिवव्यास, सिद्धांते हरिबास या आचार्यांनी केली. महानुभाव पंथात अनेक आचार्य झालेत आणि आहेत प्रत्येकांचे काहीना काही योगदान या महानुभाव पंथासाठी आहे . या सर्व आचार्य परंपरेला महानुभाव पंथ उतराई होऊ शकत नाही. त्या सर्व आचार्यांना दंडवत प्रणाम .