भाग 022
विराटपर्व कथासार मराठी
(Virat parva marathi katha
mahabharat kahani)
मागिल भागात आपण वाचले की, कौरव सैन्याचा पराभव करून अर्जुन व उत्तर दोघे विराट नगरीत प्रविष्ट झाले. व बृहन्नलेची स्तुती विराट राजाला सहन न झाल्यामुळे त्याने युधिष्ठीराला फासे फेकून मारले व त्याच्या नाकातून रक्त पडू लागले तेवढ्यात उत्तर राजाच्या भेटीस आला त्या पुढील कथा:-
राजकुमार उत्तराचे असे हे बोलणे ऐकून विराट राजाने राखेने आच्छादित अग्निप्रमाणे गुप्तरूपाने राहिलेल्या कुंतीपुत्र युधिष्ठिराची क्षमा मागितली. तेव्हां क्षमा करावी म्हणून विराट राजा प्रार्थना करीत असतां पंडुपुत्र युधिष्ठिर त्या म्हणाला, "विराट राजा, अरे ! तुला मी केव्हाच क्षमा केली आहे; मला कधीही राग येत नाही ! पण जर का माझ्या नासिकेतील हे रक्त पृथ्वीवर पडले असते, तर तु या सर्व राज्यशकट जळून भस्म झाला असतास. हे राजा, मी तुला दोष देत नाही. बलिष्ट व ऐश्वर्यवान पुरुषाला भयंकर कर्म करण्याची इच्छा होणे हे साहजिकच आहे; मग तू अविचाराने निरपराध्याला शिक्षा केली यात काहीच विशेष नाही ! "
रक्त बंद झाल्यावर बृहन्नलारूपी अर्जुन आत आला व त्याने विराट राजाला अभिवंदन करून कंकाला प्रणिपात केला. इकडे युधिष्ठिराची क्षमा मागितल्यावर विराट राजानें रणातून विजयी होऊन आलेल्या उत्तराची बृहन्नलेच्या समक्ष प्रशंसा करण्यास प्रारंभ केला. तो म्हणाला, " हे कैकेयी आनंदवर्धना उत्तरा, आज तुझ्यामुळे मी पुत्रवान् झालो ! बाबा मला तुझ्यासारखा पुत्र आजपर्यंत झाला नाही व पुढेही होणार नाहीं !
अरे, जो सहस्रावधी ठिकाणीं एकदम नेम धरून अचूक बाण मारतो, त्या कर्णाशी तुझा कसा बरे सामना झाला ? तसेच, सर्व मानवलोकामध्ये ज्याची बरोबरी कोणीही शकणार नाही, अशा व्या भीष्माशी तू कसे बरे युद्ध केलेस ? त्याप्रमाणेच यादववीर, कौरव व सर्व क्षत्रिय यांचे गुरु द्रोणाचार्य व जे सर्व शस्त्रधारी योद्ध्यांमध्ये प्रमुख, त्याच्याशी तू कसे युद्ध केलेस? तसेच, द्रोणाचार्याचा पुत्र जो महाशूर व महाविख्यात अश्वत्थामा, त्याच्याशी तुझे समर कसे झाले? त्याप्रमाणेच, ज्याला पाहताक्षणीच सर्वस्व हिरावून घेतलेल्या माणसाप्रमाणे शत्रु अगदी निराश होतात, त्या कृपाचार्याशी तू कशी टक्कर दिलीस? आणि तसाच जो आपल्या महान महान् बाणांनी पर्वतालाही बंधून टाकतो, त्या राजपुत्र दुर्योधनाशी तू कसा बरे संग्राम केलास ? उत्तरा, सावज हरण करणाऱ्या व्याघ्राप्रमाणे त्या बलिष्ठ व विजयशाली कौरवांना युद्धामध्ये भयभीत करून व जिंकून तू त्यांच्यापासून आपल्या गाई परत आणल्यास, या वरून माझ्या शत्रूंचा पूर्ण पराभव झाला आहे, व त्यामुळेच हा सुखावह वायु वाहत आहे !
यावर राजकुमार उत्तर म्हणतो :- “ताता, मीं गाई जिंकून आणल्या नाहीत आणि शत्रूचा पराभवही केला नाहीं. ते सर्व त्या कोण्या एका देवपुत्राने केले ! मी भिऊन पळून जात असता त्या देवपुत्रानेच मला मागे फिरवले आणि तोच वज्रासारख्या सुदृढ देहाचा तरुण पुरुष रथातील वीरस्थानी उभा राहिला ! त्या वीरानेच त्या गाई जिंकून परत आणल्या आणि कौरवांचा पराभव केला ! ते सर्व त्या योद्धाचे कर्म होय; ते मी केले नाही ! कृपाचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थामा, भीष्म, दुर्योधन व कर्ण या सहा अतिरथ्यांना बाणांनी विद्ध करून पराङ्मुख करणारा तोच देवपुत्र होय !
त्याप्रमाणेच, गजारूढ होऊन आलेल्या विकर्णाला त्यानेच पराजित केले व भयभीत झालेल्या दुर्योधनालाही तोच महाबली देवपुत्र म्हणाला कीं, "हे कौरवात्मजा, तुझी आतां हस्तिनापुरात धडगत दिसत नाही यासाठी कोठे तरी पळून जाऊन तू आपला जीव वाचव ! राजा, पलायन करून तुझी सुटका होणार नाही ; म्हणून तूं युद्ध करण्यास सिद्ध हो ! जर तू विजयी झालास तर पृथ्वीचा उपभोग घेशील, व युद्धांत मरण पावलास तर स्वर्ग मिळविशील !
हे ताता, त्या देवपुत्राचे हे शब्द श्रवण करून भुजंगासारखा रथावर फणफणत तो दुर्योधन वज्रतुल्य बाण सोडत अमात्यांसह मागे वळला ! तेव्हां, हे आर्या, त्याला पाहून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले व मी लटलटा कापू लागलो ! परंतु, हे ताता, ते दुर्योधनाचें सिंहासारखें भयंकर सैन्य त्या देवपुत्राने बाणांनी उडवून दिले आणि त्या सैन्याची दाणादाण उडवून त्यांच्याकडे पाहून तो हसत उभा राहिला. ज्याप्रमाणे एका मत्तशार्दूलानें वनांत फिरणाऱ्या पशुंची दाणादाण करून सोडावी, त्याप्रमाणे त्या एकट्या वीराने त्या सहाही रथ्यांची दाणादाण करून सोडली ।
आश्चर्य वाटून विराट राजा म्हणाला :- उत्तरा, मग तो महा यशस्वी महाबाहु वीर देवपुत्र कोठे आहे? ज्याने कौरवांनी हरण केलेल्या माझ्या गाई युद्ध करून परत जिंकून आणिल्या, व ज्याने माझ्या गाईंचे व तुझे संरक्षण केले, त्या महा बलवान् देवपुत्रास भेटावे व त्याचा गौरव करावा, अशी मला फार इच्छा झाली आहे.
उत्तर म्हणाला:- हे ताता, तो देवपुत्र तेथेच गुप्त झाला. तो उद्या किंवा परवा प्रकट होईल असे मला वाटते. या प्रमाणें उत्तर हा तिथे गुप्त रूपानें राहिलेल्या अर्जुनाबद्दल सांगत होता, तरी राजा विराटाला त्याची ओळख पटली नाही. नंतर विराट राजाने अनुज्ञा दिल्यावर, अर्जुनाने हरण करून आणलेली वो विराटाची कन्या उत्तरा हिला दिली. तेव्हा नवीन व नाना प्रकारची उंची वस्त्रे मिळाली म्हणून उत्तरेला मोठे समाधान वाटले. नंतर युधिष्ठिरासंबंधे पुढे जे काही इष्ट कर्तव्य होते, त्याची अर्जुनाने महात्म्या उत्तराशी मसलत ठरवली आाणि तदनुरूप सर्व काहीं शेवटास नेले; तेव्हा पांडवांना मोठा संतोष झाला !
अखेर पांडव प्रकट झाले
नंतर तिसऱ्या दिवशीं त्या महारथी पांचही पंडु पुत्रांनी स्नान करून शुभ्र वस्त्रे परिधान केली; आणि सर्व अलंकारांनी मंडित होऊन योग्य काळी अज्ञातवासाचे व्रत समाप्त केले; व युधिष्ठिराला पुढे करून ते मत्त गजांप्रमाणे सभाद्वारासमीप झळकत उभे राहिले ! मग त्यांनी विराटसभेत प्रवेश केला; व तेथे राजेलोकांच्या आसनांवर ते अधिष्ठित झाले !
त्या समयीं जणू आसनावर अग्निच मूर्तिमंत बसले आहेत की काय, असा भास होत होता! याप्रमाणे सभेत पेडुतनय राजासनांवर अधिष्ठित असता तेथे काही वेळाने विराट राजा राजकार्य करण्याकरता आला; तेव्हा त्याने त्या पांडवांकडे पाहिले, आणि त्याचे ते अग्नितुल्य दैदीप्यमान तेज अवलोकन करून तो काही वेळ पहातच करीत राहिला; व मरुद्गणांनी वेष्टित असलेल्या देवेंद्राप्रमाणे भीमादिक पंडुपुत्रांनी वेष्टित असलेल्या प्रत्यक्ष देवरूप युधिष्ठिराकडे पाहून त्यास सक्रोध मुद्रेनें म्हणाला,
"अरे, कंका अक्षविद्येत तू प्रवीण असल्यामुळे मी तुला ह्या सभेत सभासद म्हणून बसण्याची परवानगी दिलेली आहे: आणि असे असतो तू राजचिन्हें धारण करून राजासनावर बसलास हे काय ? " विराटाचे ते बोलणे ऐकून अर्जुनाने हसत हसत युधिष्ठिराच्या अधिकाराचें वर्णन केले.
अर्जुन म्हणा लाः – विराटाधिपा, या पुरुषाचा अधिकार फारच मोठा आहे. अरे, इंद्राच्या अर्ध्या आसनावर बसण्यास हा योग्य आहे. हा ब्राह्मणांस फार पूज्य मानितो. हा मोठा ज्ञानी आहे. हा मोठा दाता व यज्ञकर्ता आहे. हा अगदी सत्याचा मुर्तिमंत अवतारच आहे. हा केवळ मूर्तिमंत धर्मच आहे. सर्व पराक्रमी पुरुषांमध्ये हा मुख्य आहे. लोकांत याच्यासारखा कोणीही बुद्धिमान् नाही.
तपश्चर्येचें तर हें मुख्य निधान होय. याला नानाप्रकारची शास्त्रे अवगत आहेत. सर्व स्थावरजंगम विश्वांत ह्याच्याप्रमाणे ज्ञानी कोणी झाला नाहीं व कोणी होणारही नाहीं. देव, अमुर, मनुष्य, राक्षस, श्रेष्ठ श्रेष्ठ गंधर्व, व यक्ष, किन्नर यापैकी कोणीही याची बरोबरी करणार नाही. हा दूरवर दृष्टि देणारा असून महातेजस्वी आहे. नगरातील व देशांतील लोक याच्यावर फार प्रेम करतात.
हा पाच पांडवांमध्ये अतिरथी असून मोठा जितेंद्रिय आहे. यज्ञक्रिया व धर्माचरण ही करण्यात हा मोठा तत्पर आहे. या राजची गणना महर्षीत केली तरी चालेल. याची ख्याति तिन्ही लोकात आहे. हा बलवान्, धैर्यवान्, दक्ष, सत्यवादी व इंद्रियजेता असून इंद्राप्रमाणे व कुबेराप्रमाणे धनवान् व निधिमान् आहे. महातेजस्वी मनूप्रमाणे हा लोकांचे रक्षण करणारा व तसाच प्रजांवर अनुग्रह करणारा आहे. हा कौरवेश्वर धर्मराज युधिष्ठिर होय. उदय पावणाऱ्या सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे याची कीर्ति नेहमीं लोकांत वाढत आहे. प्रातःकाळी सूर्याचे किरण जसे दशदिशात पसरत असतात, तसे याचे यश नेहमी दशदिशांत पसरत आहे. हा जोपर्यंत कुरु देशांत होता, तो पर्यंत याच्या स्वारीच्या मागून दहा हजार वेगवान् हत्ती चालत असत; तसाच याच्या पाठीमागून रथांचा लवाजमाही फार मोठा चालत असे.
ज्यांना सुत्रणीलंकारांनी शृंगारिलें आहे असं उत्कृष्ट घोडे लावून तीस हजार रथ याच्या स्वारीमागून जात असत. राजा, ऋषींनी ज्याप्रमाणे इंद्राची स्तुति केली, त्याप्रमाणे, रत्नखचित व देदीप्यमान् कुंडले धारण केलेले आठशे सूत मागधांसह याची स्तुति करीत असत. देव जसे द्रव्याधिपति कुबेराच्या सेवेत निमग्न असतात. तसे कौरव व इतर राजे दासांप्रमाणे याच्या सेवेत सदोदीत निमन असत.
राजा, स्वतंत्र किंवा परतंत्र असे सर्वच राजे याने आपले मांडलिक करून सोडले होते. त्या सर्वांना वैश्यांप्रमाणे यास कर द्यावा लागत असे. या सदाचरणी राजाच्या आश्रयास अठ्ठ्यांशी सहस्र महात्मे स्नातक असत. वृद्ध, अनाथ, अंधळे व पांगळे अशा मनुष्याचे या पुत्राप्रमाणे पालन केले आहे. त्याप्रमाणेच य महात्म्याने धर्माप्रमाणे प्रजेचे संगोपन केले आहे. हा मोठा धार्मिक, जितेंद्रिय शांत, दयाळू ब्राह्मणभक्त व सत्यवादी राजा आहे. याचे दुःसह तेज पाहून दुर्योधन, कर्ण शकुनि. आणि इतर त्या पक्षाचे लोक तात्काळ तप्त होतात. हे नराविया, त्यांचे सर्व गुण वर्णन करणे अशक्य आहे. हा नेहमी धर्मनिष्ठ व दयाशील असतो. तेव्हा हा महाराज नृपश्रेष्ठ युधिष्ठिर राजासनावर बसण्यास योग्य नाही. असे कसे म्हणावंं?
विराट राजा अतिशय आश्चर्यचकित झाला त्याच्यासाठी हा फार मोठा धक्का होता तरीही तो स्वतःला सावरत म्हणाला: - जर हा कुरुकुलोत्पन्न कुंतीपुत्र युधिष्ठिर आहे, तर मग त्यामध्ये याचा बंधु अर्जुन तो कोणता ? तसाच तो बलवान् भीमसेन कोणता त्याप्रमाणेच ते नकुल- सहदेव व ती यशस्विनी द्रौपदी कोणती ते पृथापुत्र द्युतात हरल्यापासून मला त्यांचे काहीच वर्तमान कळले नाहीं !
अर्जुन म्हणाला :- हे नराविपा, हा जो तुझा बल्सव नामक आचारी आहे, तोच हा महाभयंकर वेग व पराक्रम यांनी शोभणारा भीमसेन होय. यानेच गंधमादन पर्वतावर क्रोधायमान झालेल्या त्या कुबेरसेवकांना मारून द्रौपदीकरता दिव्य कमळे आणली. राजा, त्या महायोद्ध्या कीचकांचा वध करणारा गंधर्व तो हाच व तुझ्या अंतःपुरांत व्याघ्र अस्वले व वराह यांचा वध हाच करीत असे.
राजा, तुझ्या अश्व शाळेवरचा जो अधिकारी झाला होता, तोच शत्रुना जर्जर करणारा नकुल होय; आणि तुझा जो मुख्य गोपाळ तोच हा सहदेव होए. हे दोन्ही माद्रीपुत्र महारथ आहेत. हे मनोहर वेष व आभरणे धारण केलेले हे भाग्यशाली सुंदर पुरुष भरतवंशांतील महारथी महाश्रेष्ठ आहेत. राजा, जिच्याकरितां कीचकांचा वध झाला, ती ही मृगनयना, सिंहकटी , चारुहासिनी जी सैरंध्री , तीच द्रौपदी होय. हे महाराजा, मी स्वतः अर्जुन होय. मी भीमापेक्षा लहान व नकुल सहदेवांपेक्षा वडील आहे. तुझ्या राज्यात आम्ही मोठ्या सुखाने दिवस काढले. आम्ही तुझ्या घरी रहात असताना, आम्हाला कोणीही ओळखले नाही.
अर्जुनानें ते पांच पांडव वीर अमुक अमुक म्हणून विराट राजाला सांगितले, तेव्हां उत्तराने लागलाच अर्जुनाचा पराक्रम वर्णावयास आरंभ केला; आणि प्रथम त्याने पुनः ते पांचही पांडव विराट राजास दाखविले.
उत्तर म्हणाला : – हे ताता, जांबुनद सुवर्णाप्रमाणे ज्याच्या देहाची कांति गौर आहे ; महान् सिंहाप्रमाणे जो पुष्ट आहे; ज्याची नासिका मोठी आहे; ज्याचे नेत्र विशाल व विस्तृत आहेत, तो हा कौरवाधिपति युधिष्ठिर होय. हा मदोन्मत्त हत्तीप्रमाणे चालणारा, तापलेल्या सुवर्णाप्रमाणे शुद्ध गौरवर्ण असलेला, ज्याला विशाल व दीर्घ असे स्कंध आणि स्थूल व लांब असे बाहु आहेत, असा हा दुसरा पुरुष वृकोदर भीमसेन होय.
याच्या बाजूस मोठे धनुष्य घेऊन बसलेला, नीलकांति असलेला, गजेंद्राप्रमाणे शोभणारा, सिंहाप्रमाणे उन्नत स्कंध असलेला व ऐरावताप्रमाणे गमन करणारा हा कमलनेत्र वीर अर्जुन होय. तसेच राजाच्या समीप बसलेले हे दोघे जुळे वीरपुंगव विष्णु व महेंद्र ह्यांची बरोबरी करणारे नकुल व सहदेव होत. शील व रूप यांमध्ये यांचे साम्य सर्व भूमंडलावर कोणाच्याही ठिकाणी आढळावयाचें नाहीं; आणि, राजा, यांच्या बाजूला, जिचे सुवर्णोपम दिव्य शरीर आहे. जिचा प्रत्यक्ष मूर्तिमंत गौरवर्ण आहे, जिची अंगकांति नीलोत्पलाप्रमाणे आहे, व जी अगदी लक्ष्मीप्रमाणे विलसत आहे. ती द्रौपदी होय !” याप्रमाणें उत्तराने पांचही पांडव विराट राजास निवेदन केल्यावर अर्जुनाचा पराक्रम त्यास सांगितला.
पुढे उत्तर म्हणाला:– हे ताता, सिंह ज्याप्रमाणे मृगांचा वध करतो, त्याप्रमाणे त्या या अर्जुनाने शत्रूंचा वध केला. राजा, हाच त्या त्या श्रेष्ठ रथ्यांचा वध करीत त्या रथसमुदायामध्ये प्रविष्ट झाला. यानेच संग्रामामध्ये सुवर्णाची झुल घातलेल्या एका महान् गजावर बाण टाकून त्याला ठार केले ; व तो खाली पडतांच त्याते दोन्ही दांत भूमित घुसले ! यानेंच गाई जिंकून आणिल्या व कौरवांना पळावयास लावलें; आणि याच्याच शंखनादानें माझ्या कानठाळ्या बसल्या ! मी परवा म्हटलेला देवपूत्र तो हाच अर्जुन होए.
राजकुमार उत्तराचे ते बोलणे ऐकून, प्रतापशाली मत्स्याधिपतीस युधिष्ठिराला अपकार केल्याबद्दल फार वाईट वाटले व तो म्हणाला, “बा उत्तरा, आता फक्त पांडुपुत्र धर्मराजाची कृपा संपादन करणे हेच उचित आहे ; जर तुला मान्य असेल, तर अर्जुनाला उत्तरा समर्पण करावी असे मला वाटते. "
उत्तर म्हणालाः - ताता, हे - महाभाग्यवान् पांडव श्रेष्ठ, वंद्य व मान्य असेच आहेत; यास्तव या पूज्यांचा सत्कार व्हायलाच पाहिजे हेच योग्य वाटते.
विराट राजा म्हणालाः- “बा उत्तरा, मीही खरोखर संग्रामामध्ये शत्रूच्या हाती लागलो होता. परंतु भीमसेनाने माझी सुटका केली व गाई परत जिंकून घेतल्या. या वीरांच्या पराक्रमानेंच आम्हांस युद्धांत विजय मिळाला. यामुळे आपण सर्व प्रधानादिकांसह व भ्रात्यांसहित या पांडव धर्मराजाला प्रसन्न करू. बा उत्तरा, तुझे कल्याण असो. जर आम्हांपासून अज्ञानामुळे धर्मराजाला उद्देशून काही वावगा शब्द गेला असेल, तर त्या धर्मात्म्याने त्याबद्दल आम्हाला क्षमा करावी !”
नंतर विराट राजाने मोठ्या आनंदाने आपल्या पुत्राचा विचार घेऊन पुढील कर्तव्याबद्दल निश्चय ठरविला; आणि राजदंड, कोश, नगरे वगैरे सर्व काही देऊन युधिष्ठिराला समस्त राज्य अर्पण केले. त्या प्रसंगी तो प्रतापशाली विराट राजा सर्व पांडवांना व विशेषेकरून अर्जुनाला अनुलक्षून म्हणाला. " अहो, मी किती भाग्यवान आहे! आज माझं भाग्यच उदयास आले !" नंतर त्याने युधिष्ठिर , भीम, नकुल व सहदेव यांना पुनःपुन: आलिंगन दिले.
तथापि त्याचे समाधान होईना. तेव्हा शेवटी तो प्रेमातिशयानें उचंबळून जाऊन म्हणाला. “अहो, आपण सर्वांनी वनवास सुखाने पार पाडला व या अधम कौरवांना कळू न देतां आमच्याकडे अज्ञातवासाचे दिवस घालवले, हे आमचे मोठे सुदैव होय. हे राज्य व इतर सर्व जे काही माझे म्हणून आहे, ते सर्व मी पृथापुत्र धर्मराजाला अर्पण करीत आहे. तर पांडुपत्रांनी ने निःशंकपणे स्वीकारावे. माझी कन्या उत्तरा हिचा सव्यसाची धनंजयाने अंगीकार करावा; कारण तिला हाच पति योग्य होय. "
याप्रमाणे विराटाधिपतीची प्रार्थना ऐकून युधिष्ठिराने अर्जुनाकडे पाहिले तेव्हां तो विराट राजास म्हणाला. "हे राजा, तुझ्या कन्येचा मी स्नुषा म्हणून स्वीकार करतो. आपणां मत्स्य व भारतांचा वैवाहिक संबंध घडून येणे योग्य आहे !
विराट राजा म्हणाला:- हे पांडव श्रेष्ठा अर्जुना, मी अर्पण केलेल्या या माझ्या दुहितेचा भार्या म्हणून स्वीकार करण्याची तुझी का बरं इच्छा नाहीं !
अर्जुन म्हणाला:- - राजा, तुझी कन्या भार्या म्हणून स्वीकारणे मला उचित नाही. कारण तुझ्या अंतःपुरामध्ये मी रहात असल्यामुळे तुझी कन्या नेहमी माझ्या दृष्टीसमोर राहत होती. आणि तिने गुप्तपणे व उपडपणे माझ्यावर पित्याप्रमाणे विश्वास ठेवला आहे. शिवाय, राजा, गायनकलेत निपुण असलेला मी नृत्याचा शिक्षक असल्यामुळे तुझ्या कन्येचे माझ्यावर अतिशय प्रेम होते व ती मला नेहमी गुरूप्रमाणे मानीत असे.
हे विराट राजा, वयांत आलेल्या तुझ्या कन्येसह मी एक संवत्सर घालवला आहे; यास्तव तुझी कन्या जर मी वरली, तर तुझ्या किंवा लोकांच्या शंकेला मोठे स्थान मिळेल म्हणून सुन या नात्याने अंगीकार करण्यास मी तिला मागणी घालीत आहे. असे झाले म्हणजे इंद्रियजय व मनोनिग्रह दमन मी शुद्ध राहिल्याचे सार्थक होईल व तुझ्या मुलीविषयीही लोकापवादास जागा राहणार नाही. सारांश, मी तुझ्या मुलीचा स्नुषा म्हणून स्वीकार केल्यास मला किंवा माझ्या पुत्राला अथवा तुझ्या कन्येला कोणत्याही प्रकारचा कोणताच दोष न लागता सर्व मिथ्यापवादाची पूर्ण मुक्ति अनायासे होणार आहे.
हे शत्रुतापना विराटाधिपा, मी मिथ्या अपवादास फार भितो यास्तव तुझी कन्या उत्तरा हिला मी आपली सून म्हणून स्वीकारतो. राजा माझा पुत्र सामान्य नाही. तो प्रत्यक्ष वासुदेवाच भाचा असून जसा काही देवकुमारच आहे. माझा पुत्र श्रीकृष्णाचा अत्यंत लाडका असून सर्व अस्त्रांमध्ये प्रवीण आहे. यास्तव, राजा, माझा पुत्र आजानुबाहु अभिमन्यु हा तुला योग्य जांवई आणि तुझ्या कन्येला अनुरूप पती होय !
विराट राजा म्हणालाः – अर्जुना, या प्रकारच्या तुझ्यासारखा धर्मनिष्ठ व ज्ञानी हे पुरुषास हे उचितच होय. त्याकरता, हे कुंतीपुत्रा, तुला संमत असेल, ते आता तू कर! या अर्थी माझा अर्जुनाशी आप्तसंबंध घडत आहे, त्या अर्थी माझे सर्व मनोरथ परिपूर्ण झाले असेच मी मानतो.
या प्रमाणे विराटाचे बोलणे श्रवण करून कुंतीपुत्र युधिष्ठिराने मत्स्यराजा व पांडव या मध्ये तो वैवाहिक संबंध मुमुहूर्तावर घडवून आणण्याविषयी आपली मान्यता दिली. नंतर युधिष्ठिर व विराट राजा यांनी आपापल्या सर्व आप्त सुहृदांकडे व श्रीकृष्ण भगवंतांकडे निमंत्रणासाठी दूत पाठवले. पुढे तेरावे वर्ष समाप्त झाल्यावर ते सर्वही पांडव विराटाच्या उपलव्य नगरांत प्राप्त झाले.
नंतर पांडुपुत्र अर्जुनाने द्वारका देशाहून अभिमन्यु, श्रीकृष्ण भगवंत व यादव यांना आणवले ; आणि युधिष्ठिरावर प्रेम करणारे काशिराज व शैब्य हे राजे बरोबर दोनदोन अक्षौहिणी सैन्य घेऊन तेथे आले. एक अक्षौहिणी सैन्यासह महाबली यज्ञसेन त्या ठिकाणी प्राप्त झाला; आणि द्रौपदीचे वीर पुत्र अपराजित शिखंडी, व सर्व शस्त्रधरश्रेष्ठ पराक्रमी धृष्टद्युम्न हे सर्व तेथे जमा झाले. असे त्या ठिकाणी जमलेले सर्वही राजे मोठे शूर असून धारातीर्थी देह टाकण्यास तयार असे होत; सर्वही मोठमोठे यज्ञयाग करणारे असून विपुल दक्षिणा देणारे होते; आणि सर्वहीजण वेदमंत्रांनीं अवभृतस्नान करणारे असून पदरीं अक्षौहिणी सेना बाळगणारे होते.
तिथे आलेल्या त्या भूपतींस अवलोकन करून महाधर्मनिष्ठ विराटराजाने सेवक, सैन्य व वाहने यासुद्धा त्या सर्वांचा यथाविधी मोठा आदरसत्कार केला; व त्यांस मोठ्या आनंदानें अभिमन्यूला आपली कन्या दिल्याचे (देण्याविषयी निश्चय केल्याचे) निवेदन केले. तिथे आलेल्या राजांमध्ये वनमाळी भगवान् वासुदेव श्रीकृष्ण , बलराम, हृदीकपुत्र कृतवर्मा, युयुधान सात्यकी , अनावृष्टि, अक्रूर, सांब हे सुभद्रेसह अभिमन्यूला बरोबर घेऊन आले होते; तसेच इंद्रसेनादिक सर्व सेवक एक वर्षपर्यंत पांडवांपासून दूर राहिले होते, ते आपआपल्या व्यवस्थित रीतीने ठेवलेल्या रथांसह एकदम प्राप्त झाले होते.
त्याबरोबर त्या समयी दहा हजार हत्ती, एक लाख घोडे, एक कोटि रथ, आणि एक निखर्व पायदळ इतके सैन्य होते. त्याप्रमाणेच श्रीकृष्णांच्या मागोमाग वृष्णि, अंधक व भोज या कुळातील महान् महान् वीर तेथे प्राप्त झाले. नंतर श्रीकृष्णाने महात्म्या पांडवांना पृथक् पृथक अनेक स्त्रिया, रत्ने व वस्त्रे अर्पण करून आहेर केला; व नंतर मत्स्याधिप विराट व पांडव यामध्ये विवाहसमारंभ यथाविधि सुरू झाला. विराटाच्या गृहीं शंख, दुंदुभि, संबळ, आडंबर वगैरे मंगलवाद्ये वाजू लागलीं. गवई, कथेकरी, नट भाट, सूत, मागध इत्यादिक मंडळी स्तुतिपाठ गाऊ लागली; आणि मत्स्यकुळातील सुंदर स्त्रिया रत्नाभरणांनी मंडित सुदेष्णेला पुढे करून तेथे आल्या.
त्या स्त्रिया मोठ्या रूपसंपन्न व शृंगारभूषणांनी अलंकृत अशाच होत्या, तरी त्या सर्वांना द्रौपदीने आपल्या रूपानें, कांतीने व भाग्याने मागे टाकले. नंतर, राजकन्या उत्तरा अलंकार वगैरे घालून महेंद्रकन्येप्रमाणे उभी होती, तिच्या भोंवती गराडा घालून त्या सर्व स्त्रिया उभ्या राहिल्या; आणि मग अर्जुनाने त्या उत्तरेचा अभिमन्यूकरता अंगीकार केला. तसाच त्या ठिकाणी इंद्रतुल्य रूपवान् कुंतीपुत्र महाराज युधिष्ठिर उभा होता, त्यानेही त्या विराटतनयेचा स्नुषा म्हणून स्वीकार केला. याप्रमाणे त्या सुंदर उत्तरेचा प्रतिग्रह केल्यावर युधिष्ठिराने श्रीकृष्ण भगवंताला पुढाकार देऊन तिच्याशी अभिमन्यूचा विवाह करविला.
नंतर विराट राजाने वायुतुल्य वेगाचे सात हजार घोडे, दोनशे निवडक हत्ती व विपुल धन अभिमन्यूला दिले. तसेच, अग्निमध्ये यथाविधि हवन करून व ब्राह्मणाचे पूजन करून विराट राजाने आपले राज्य, सैन्य कोश वगैरे सर्व काही पांडवांना देऊन आपणा स्वतःलाही त्यांना अर्पण केले. विवाहसंस्कार पूर्ण झाल्यावर, इकडे धर्मराजानेही श्रीकृष्ण भगवंतांनी तेथे आणलेले सर्व धन ब्राह्मणांस वाटले. हजारो गाई, नानाप्रकारची वस्त्रे, श्रेष्ठ श्रेष्ठ अलंकार, वाहनें, शय्या आणि अनेक प्रकारचे स्वादिष्ट भक्ष्य, भव्य, पेय वगैरे पदार्थ - त्या युधिष्ठिराने ब्राह्मणांना दिले; आणि जिकडेतिकडे आनंदी आनंद होऊन ते विराटनगर मोठ्या उत्सवाने गजबजून गेले !
समाप्त
आधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
भाग एक 001 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html
भाग दोन 002
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/002-virat-parva-marathi-katha.html
भाग तीन 003 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/003-virat-parva-marathi-katha.html
भाग एक 004 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/004-mahanubhav-panth-dnyansarita.html
भाग पाच 005
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/005-virat-parva-marathi-katha.html
भाग सात 006👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/006-virat-parva-marathi-katha.html
भाग 007 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/007-virat-parva-marathi-katha.html
भाग 011 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/011-virat-parva-marathi-katha.html
भाग 012 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/012-virat-parva-marathi-katha.html
भाग 13👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/012-virat-parva-marathi-katha_28.html
भाग 14👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/013-virat-parva-marathi-katha.html
भाग 15👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/015-virat-parva-marathi-katha.html
भाग 16👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/016-virat-parva-marathi-katha.html
भाग 17 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/017-virat-parva-marathi-katha.html
भाग 18👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/018-virat-parva-marathi-katha.html
भाग 19👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/019-virat-parva-marathi-katha.html
भाग 20 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/020-virat-parva-marathi-katha.html
भाग 21👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/021-virat-parva-marathi-katha.html
भाग 22👇 शेवटचा भाग
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/021-virat-parva-marathi-katha_19.html