भाग 016
विराटपर्व कथासार मराठी
(Virat parva marathi katha mahabharat kahani)
कर्णाच्या वक्तव्याबद्दल त्याचा धिक्कार करत अश्वत्थामा पुढे म्हणाला, बरं, कर्णा, अर्जुन, नकुल, सहदेव यांना तू कोणत्या द्वंद्व युद्धात जिंकलेस व त्यांची संपत्ती हरण केलीस? अरे, तूं युधिष्ठिर व भीमसेन यांचा कोणत्या संग्रामांत पराजय केलास व इंद्रप्रस्थ जिंकून घेतलेस का? त्याप्रमाणेच, हे अधमा, ती एकवस्त्रा रजस्वला द्रौपदी कोणत्या युद्धांत जिंकून तुम्हीं सभेत नेली बरे? कर्णा, पांडवांना तुम्ही अगदी दीन करून दास बनवलें, तेव्हा विदुराने काय सांगितले त्याची आठवण कर. 'ह्या द्युतापासून तुमचा सर्वस्वी नाश होईल ! ' असे त्या समयीं विदुराने सांगितलें नव्हते का? अरे, धनार्थी मनुष्याने चंदनाचें मुख्य मूळच तोडून टाकले, तर त्यात त्याचें काय हित होईल?
कर्णा, मनुष्ये तर काय. पण कीड, मुंगी वगैरे इतर जीवजंतुही काही विशिष्ट मर्यादेपर्यंतच दुःख सहन करतात, त्या मर्यादेचें अतिक्रमण झाले तर ते त्यांना कधींही सहन होत नाहीं ! तद्वत्, द्रौपदीची हालअपेष्टा पांडव कधीही सहन करणार नाहींत. अरे, दुर्योधनादिक धृतराष्ट्रपुत्रांचा नाश करण्याकरितांच हा धनंजय प्रकट झाला आहे आणि इतक्याउपरही तू आपले पांडित्य चालवलेच आहेस ? अरे, हा जिष्णु आता आपना सर्वांना मारून सर्वच वैर संपवून टाकील !
अरे, देव, गंधर्व, असुर व राक्षस या पैकी कोणीही याच्याशी युद्ध करण्यास आले, तरी याला भीतीचा स्पर्श होणार नाही ! अरे , युद्धामध्ये ज्या ज्या वीरावर हा चाल करून जाईल, त्याला त्याला हा लोळवून, या वृक्षावरून त्या वृक्षावर उड्डाण करणाऱ्या गरुडा प्रमाणे एकसारखा पुढेपुढेच सरसावत जाईल! अरे कर्णा, तुझा कधीही न घडलेला पराक्रम कोठे आणि त्या कुंतीपुत्र अर्जुनाचा पराक्रम कोठे !
अरे, याला देवेंद्राप्रमाणे धनुर्विद्या अवगत असून तो वासुदेवाप्रमाणें युद्धनिपुण आहे; त्यामुळे त्याची वाखाणणी कोण बरं करणार नाहीं ! अरे, त्या लोकोत्तर वीराचे काय सामर्थ्य वर्णावें ! तो देवांशी देवांप्रमाणे युद्ध करतो, मनुष्यांशी मनुष्यांप्रमाणे युद्ध करतो, व शत्रु कडून अस्त्रादिकांचा प्रयोग झाल्यास आपणही तसल्याच आयुधांचा प्रयोग करतो ! तेव्हां अर्जुनाची बरोबरी अमुक एक वीर करील म्हणून कसें म्हणावें !
कर्णा, 'पुत्राच्या पाठोपाठ शिष्य प्रिय असतो असे धर्मवेत्ते सांगतात. त्यासाठी या गोष्टीवर लक्ष देऊनही द्रोणाचार्यास अर्जुनच प्रिय आहे.कर्णा, ही वेळ मोठी आणीबाणीची आहे. ज्या प्रमाणे तू द्युत केले, इंद्रप्रस्थ हिसकावून घेतलें व द्रौपदीला सभेत आणलें, त्याप्रमाणेच आतां अर्जुनाशीं युद्ध कर म्हणजे झालं ! अरे, हा शकुनि मामा मोठा शहाणा असून क्षात्रधर्मात मोठा पंडित आहे; यासाठी ह्या दुष्ट द्युत करणाऱ्या गांधार शकुनीने आता, अर्जुनाशी युद्ध करण्यास पुढे सरावे!
अरे, अर्जुनाचे गांडीव धनुष्य काही फासे फेकीत नाहीं; फाशांतून दुट्टी चव्वा पडतात तसे गांडीवांतून चार दोन पडत नाहीत! गांडीवापासून तीक्ष्ण धारेचे अनेक प्रचलित बाणच बाहेर पडत असतात ! हे राधेय जलाल बाण मध्यंतरी अडकून वगैरे न राहतां प्रत्यक्ष पर्वतांचेही विदारण करितात ! अरे, यम, वायु, मृत्यु किंवा वडवाग्नि यांच्यापासूनही कदाचित् सुटका करून घेता येईल, पण क्रुद्ध झालेल्या धनंजयापासून सुटका करून घेणे सर्वथा अशक्य होय ! कर्णा, ज्याप्रमाणे शकुनि मामाच्या साहाय्याने तू ते द्यूत केले, त्याप्रमाणे आतां त्याच शकुनांच्या साहाय्याने सुरक्षित राहून अर्जुनाशी संग्राम कर म्हणजे झाले ! कर्णा, इतरांनी वाटेल तर अर्जुनाशी लढावे, मी तर काही लढणार नाही ! जर या गाई सोडविण्याकरिता मत्स्यराज विराट मागोमाग आला, तर मात्र आम्ही त्याच्याशी युद्ध केले पाहिजे !
भीष्म म्हणाले, अश्वत्थाम्याचे म्हणणे बरोबर आहे, व कृपाचार्यानीही दुरदृष्टि ठेऊन योग्य तेच सांगितले आहे; परंतु कर्ण मात्र केवळ क्षत्रियाच्या कर्तव्यावर लक्ष देऊन युद्ध करण्याची इच्छा करीत आहे. परंतु विचारी पुरुषाने आचार्यास दोष न देतां, देश कालांवर दृष्टि पुरवून युद्ध करण्याचा किंवा न करण्याचा निश्चय ठरवावा, असे माझ्या मनास येतें. ज्यावर स्वारी करण्याला सूर्यासारखे प्रतापशाली पांच शत्रु आहेत, तो मनुष्य जर विचारी असेल, तर त्या शत्रूचा अभ्युदय होत आहे असें पाहून त्याचे चित्त गोंधळल्याशिवाय राहणार नाहीं !
धर्मवेत्ते पुरुषही स्वार्थाच्या समयी गोंधळून जातात असा सर्वत्र नियम दिसतो; त्यामुळे , हे दुर्योधन राजा, तुला आवडत असेल तर मी असे सांगतों कीं, कर्णानें जे काही म्हटले आहे, त्यांत त्याचा हेतु आचार्यांची निंदा करावी हा नाहीं, तर त्यांस अधिक वीरश्री उत्पन्न करावी हाच होय. पित्याची निंदा श्रवण करून आचार्यपुत्रास क्रोधास आला, हे वाजवीच आहे; परंतु कार्याच्या महत्त्वाकडे दृष्टि देऊन त्याने आपला क्रोध शांत करावा. ज्या अर्थी आता कुंतीपुत्र प्रकट झाला आहे, त्या अर्थी आपसात विरोध वाढविण्याची ही वेळ नव्हे. म्हणून तूं, आचार्य व कृप या सर्वानी जें काही झाले असेल त्याची क्षमा केली पाहिजे.
अरे आदित्याच्या ठिकाणी जशी प्रभा, तशी तुमच्या ठिकाणी अस्त्रनिपुणता वास करीत आहे; सर्वथा अपकर्ष व पावणाऱ्या चंद्रकांतीप्रमाणे तुमच्या ठिकाणी ब्राह्मण्य व ब्रह्मास्त्र हीं दोन्ही आहेत; चार वेद व क्षात्रतेज हीं एका व्यक्तव्या ठिकाणी असलेली कोठेही आढळत नाहींत, पण ती ह्या द्रोणाचार्याच्या व अश्वत्थाम्याच्या ठिकाणी एकत्र वास करीत आहेत ! वेदान्त, पुराणे व पुरातन इतिहास ह्यांत पारंगत असलेल्या द्रोणाचार्यापेक्षां एक जमदग्निपुत्र परशुराम मात्र अधिक आहे ; आणि त्याहीपेक्षा हा अर्जुन अधिक आहे. ब्रह्मास्त्र व वेद ही इतर कोठेही एकत्र आढळणार नाहीत ! त्यामुळे ह्या समयी आचार्यपुत्रानें क्षमा करावी. आपसांत फूट करण्याला हा योग्य काळ नाही. आता आपण सर्व एकत्र होऊन अर्जुनाशीं युद्ध करूं. अहो, ज्ञात्यांनी सैन्याचे जे दोष कथन केले आहेत, त्यांत आपसात फूट असणे ' हा मुख्य दोष म्हणून मानला आहे !
अश्वत्थामा म्हणाला:- हे पुरुषश्रेष्ठ, या आचार्यांच्या न्याय्य भाषणाला तुम्ही अगदी नावे ठेवू नका. रागाच्या आवेशांत गुरूंनी ( माझ्या पित्याने ) अर्जुनाचे गुण वर्णन केले ह्यांत दोष तो कोणता ? गुण हे शत्रूच्या ठिकाणी असले तरी ते ग्रहण करावे, व दोष हे गुरूच्या ठिकाणीं असले तरी त्यांचा धिक्कार करावा; हर प्रयत्नानें पुत्राचें व शिष्याचें ज्यात सर्वतोपरी कल्याण असेल ते त्यांस सांगावें.
दुर्योधन म्हणालाः - या प्रसंगी द्रोणाचार्यांनी कर्णास क्षमा करावी. अशा समयी शांति धरल्याशिवाय उपाय नाहीं. द्रोणाचार्याची आम्हाविषयीं भेदबुद्धि नसल्यामुळे, त्यांनी जे उद्गार काढिले ते केवळ क्रोधाच्या आवेशांतच काढले, यात संदेह नाहीं !
नंतर कर्ण, भीष्म व महात्मा कृप यांच्यासह दुर्योधनाने द्रोणाचार्याची क्षमा मागितली.
द्रोणाचार्य म्हणाले :- अहो, शांतनुपूत्र भीष्मांनी प्रथम जे भाषण केले, त्यानेच माझा कोप नष्ट झाला आहे. मी प्रसन्नपणाने सांगतों कीं, या वेळीं काहीतरी मसलत योजली पाहिजे. जे केले असतां अर्जुन हा साहसाने किंवा मोहानें रणभूमीवर दुर्योधनावर चाल करून येणार नाही, असे काही तरी केले पाहिजे. ज्या अर्थी अर्जुन प्रकट झाला आहे, त्या अर्थी पांडवांचा अज्ञातवास खास संपला आहे, यात वानवा नाही; आणि जर का त्यास आज गोधन मिळाले नाहीं, तर तो त्याचा खचीत सूड घेईल. म्हणून अशी काहीतरी युक्ति योजा कीं, अर्जुनाची व धृतराष्ट्रपुत्राची गांठ पडू नये व आपल्या सैन्याचा पराभव होऊ नये. याक रता, हे गंगानंदना, पूर्वी दुर्योधनानें पांडवांचा अज्ञातवास समाप्त झाला किंवा नाहीं याबद्दल जो प्रश्न केला आहे, त्याचा विचार करून यथावत् उत्तर द्यावें.
भीष्म म्हणाले, कळा, काष्टा, मुहूर्त, दिस, पक्ष, मास, नक्षत्रे, ग्रह, ऋतु आणि - संवत्सर यांच्या योगे काळाची गणना करतात. या कालविभागाने कालचक्र फिरत असते. कालगतीनें सूर्यचंद्रांच्या नाक्षत्रिक लंघनकाळाशीं भेद पढत जातो तो नाहींसा करण्यासाठी प्रत्येक पांच वर्षी दोन दोन महिने अधिक धरतात. त्यामुळे पांडवांच्या तेरा वर्षात पांच महिने बारा दिवस ज्यास्त होतात, असे मला वाटते. म्हणून पांडवांनी आपली प्रतिज्ञा योग्य रीतीने पार पाडली आहे व हे जाणूनच अर्जुन या समयी युद्धार्थ आला आहे, ! पहा सर्वच पांडव मोठे महारथी आहेत सर्वासच धर्मार्थज्ञान उत्तम; आणि तशांत त्यांचा युधिष्ठिर हा राजा; मग त्यांच्या हातून धर्मलोप कसा होईल बरें ?
अरे, ह्या निर्लोभी पांडवांनी मोठी दुर्घट गोष्ट करून दाखविली ! ते साम दाम दंड भेदादि उपाय योजल्याशिवाय एकदम राज्य घेण्यासाठी उद्युक्त होणार नाहींत; ते मोठे विचारी आहेत; धर्मरक्षण हे ते प्रधान कर्तव्य मानतात ; नाही तर त्यांनी त्याच वेळी पराक्रम करून दाखविला असता! पण धर्मपाशाने बद्ध असलेले ते पांडव क्षात्रधर्मापासून मुळीच च्युत झाले नाहीत ! आणि होणारही नाहीत.
अरे, अर्जुन असत्य वर्तन करणार आहे, असे जो म्हणेल त्याचा खरोखर नाश होईल ! अरे, पांडव मरण सुद्धा पत्करतील, पण असत्याला ते कधीही पत्करणार नाहीत ! अरे, त्या पांडवांना जी गोष्ट प्राप्त व्हावयाची असेल ती गोष्ट यथाकाळी प्राप्त करून घेतल्याशिवाय ते कधीही शांत राहणार नाहीत ! मग ती गोष्ट जरी प्रत्यक्ष वज्रधारी इंद्राने रक्षण करून ठेवली असली, तरीही ते ती साध्य करून घेतील ! कारण पांडवांच्या ठिकाणी तसाच पराक्रम आहे !
म्हणून आपल्याला सर्वशस्त्रधर श्रेष्ठ अर्जुनाशी युद्ध करायचे आहे याकडे लक्ष पुरवून, जी गोष्ट हितावह असेल, व जी आजपर्यंत थोर लोकांनी केली असेल ती लवकर करण्याविषयी विचार ठरवा आणि ही गोष्ट शत्रुस कळू देऊ नका.
हे दुर्योधना, युद्धामध्ये निश्चयाने आपणास जय मिळेलच असे मला सांगता येणार नाही. धनंजय तर आला आहे हे खरे! संग्राम सुरू झाला म्हणजे जय किंवा पराजय अथवा उत्कर्ष किंवा ऱ्हास यापैकी एक कोणाच्या तरी वाट्याला निश्चयाने येणार, यात संदेह नाही. यासाठी धर्माला अनुसरून जे काही कर्तव्य असेल, ते लवकर कर. उशीर लावू नको. अर्जुन अगदी जवळ येऊन ठेवला !
दुर्योधन म्हणाला:- पितामह, मी पांडवांना राज्य देणार नाही. युद्धासंबंधी जे काही कर्तव्य इष्ट असेल, ते त्वरित करा.
असा धर्म अधर्म जाणत असूनही भक्त पांडवांना विरोध करणारा, अधर्मीयांना साथ देणारा भीष्म म्हणाला :- हे कुरुनंदना, तुला आवडेल तर माझे मत ऐक. जे श्रेयस्कर असेल तेच मला सर्व प्रकारे तुला सांगणे आहे. बा दुर्योधना, तू चतुर्थांश सैन्य बरोबर घेऊन हस्तिनापुरास जा. तसेच चतुर्थांश सैन्य गाईच्या रक्षणासाठी देऊन गाईची रवानगी कर. आम्ही राहिलेले अर्ध सैन्य घेऊन अर्जुनाशी युद्ध करतो. युद्ध करण्याच्या निश्चयाने अर्जुन येथे आला आहे; त्यामुळे त्याच्याशी मी, द्रोण, अश्वत्थामा, कृप व कर्ण असे सर्व मिळून युद्ध करतो. अरे, विराट राजा जरी पुन्हा आला किंवा इंद्रही जरी आला, तरी समुद्रांच्या मर्यादे प्रमाणे मी त्याचे निवारण करीन.
भीष्माने जी सल्ला दिली, ती त्या सर्वांना रुचली व दुर्योधनाने पुढे तसेच केले. नंतर भीष्माने दुर्योधनाची व गाईंची रवानगी केली; आणि मुख्य योद्ध्यांना व्यवस्थित उभे करून सैन्याचा व्यूह रचण्यास सुरुवात केली.
भीष्म म्हणाला :- अहो आचार्य, मध्यभागी तुम्ही उभे रहा; तुमच्या उजवीकडेस अश्वत्थाम्याने उभे रहावे ; बुद्धिमान् कृपाचार्याने दक्षिणभागाचे रक्षण करावे ; सर्वाच्या पुढे कवच घालून कर्णाने उभे रहावे ; आणि सर्व सैन्याच्या पाठीमागे मी उभा राहून सर्वाचे रक्षण करीन.
याप्रमाणे कौरवीय वीर व्यूह रचून उभे राहिल्यानंतर. आपल्या रथाच्या घोषाने अंतराळ दणाणून सोडीत अर्जुन त्वरेने जवळ येऊन ठेपला, तेव्हा त्याच्या ध्वजाचे अग्र कौरवांच्या दृष्टीस पडले; आणि त्याच्या रथाचा भयंकर शब्द व तो भयंकर टणत्कार करीत असलेल्या गांडीव धनुष्याचाही शब्द त्यांच्या कानी पडला. तो सर्व प्रकार अवलोकन करून आणि गांडीवधारी महारथ अर्जुन प्राप्त झाला आहे असे पाहून द्रोणाचार्यांनी बोलण्यास आरंभ केला.
द्रोण म्हणाले - पार्थाच्या ध्वजाचा हा शेंडा दुरूनच झळकत आहे; हा ऐकू येत असलेला आवाज त्याच्याच रथाचा आहे; आणि हा पहा तो वानरही गर्जना करीत आहे. या श्रेष्ठ रथामध्ये बसलेला हा रथिश्रेष्ठ अर्जुन आपले वज्राप्रमाणे भयंकर शब्द करणारे श्रेष्ठ गांडीव धनुष्य उचलून धरीत आहे. हे पहा दोन बाण माझ्या पायांशी एकदम येऊन पडले आहेत; आणि दुसरे दोन माझ्या कानांस स्पर्श करून निघून गेले ! यावरून, वनांत राहून अद्भुत शक्ती प्राप्त करून येथे आलेला हा अर्जुन मला प्रथम वंदन करून व नंतर कानी लागून युद्धार्थ माझी अनुज्ञा मागत आहे. बुद्धिमान, अतिशय उज्ज्वल कांतीने युक्त आणि बांधवप्रिय असा हा पांडुपुत्र धनंजय कितीतरी दिवसांनी आमच्या दृष्टीस पडला !
असो; याच्याजवळ रथ, शर, सुंदर शिस्त्राण, भाता, शंख, कवच, मुकुट, खड्ग आणि धनुष्य आहे; आणि त्या सर्व शस्त्रांनी युक्त हा पार्थ, इकडे येत आहे, वीरांनो सावधान व्हा, हा जाळून भस्म करणाऱ्या अग्नीप्रमाणेच जणू काय दिसत आहे ! इकडे अर्जुन म्हणालाः - हे सारथे, ही सेना बाणांच्या टप्प्यांत आली आहे, तेव्हा आता घोडे जरा आवरून धर, म्हणजे तो कुरुकुलाधम दुर्योधन या सैन्यांत कोठे आहे ते मी न्याहाळतो; आणि तो अतिमानी दृष्टीस पडताक्षणीच या सर्वांना सोडून देऊन त्याच्या मस्तकावर जाऊन आदळतो, म्हणजे ह्या सर्वांचा आपोआपच पराजय झाल्यासारखा आहे !
हे पहा येथे द्रोणाचार्य सज्ज होऊन उभे आहेत. आणि त्यांच्या समीपच अश्वत्थामा उभा आहे. शिवाय भीष्म, कृपाचार्य व कर्ण हे महाधनुर्धरही येथे आलेले दिसत आहेत. पण येथे तो पापी राजा दुर्योधन काही दिसत नाही ! मला वाटतें, तो जीव घेऊन गाईसह दक्षिणमार्गाने पळून जात असावा. तेव्हा, उत्तरा, या वीरांना येथेच सोडून, तो दुर्योधन असेल तिकडे चल; मी तेथेच युद्ध करीन. कारण, त्याला पराभूत केल्यावांचून युद्धाची मजा नाहीं ! तेव्हा त्याला जिंकून आपण गाई घेऊन पुनः परत येऊं.
अर्जुनाचें बोलणे ऐकून उत्तराने मोठ्या प्रयत्नाने ते घोडे आवरून धरले; आणि त्या भीष्मादि कुरुश्रेष्ठांकडून सा घोड्यांचे लगाम वळवून, जिकडे दुर्योधन गेला होता तिकडे चलण्याविषयी घोड्यांना इशारा केला. अशा प्रकारें वीरसमुदायाकडे दुर्लक्ष करून अर्जुन निघाला. मे पाहताच कृपाचार्यांनी त्याचा बेत ताडला, आणि ते म्हणाले, "राजाशिवाय येथे थांबण्याचा काही अर्जुनाचा विचार दिसत नाही ; आणि तो फारच त्वरेने तिकडे चालला आहे; तर आपण लवकर त्याच्या मागोमाग जायला पाहिजे . चला. कारण तो अतिशय संतापलेला आहे, आणि अशा वेळी रणांत त्याच्याशी एकाकी युद्ध करण्यास देवराज इंद्र वांचून कोणीही समर्थ नाहीं ! तेव्हां समुद्रांत बुडणाऱ्या नावेप्रमाणे राजा दुर्योधन अर्जुनाच्या तडाक्यांत सोडला असतां आपल्याला गाई किंवा पुष्कळ द्रव्य याच्याशी काय करायचे आहे ? तर चला आधी तिकडे जाऊं. "
याप्रमाणे कृपाचार्य बोलत आहेत तोपर्यंत अर्जुन त्या दुर्योधनाच्या तुकडीजवळ जाऊन ठेपला; आणि आपले नाव कळवून त्याने लगेच टोळधाडीप्रमाणे बाणांची पेर करून ती सर्व सेना झोडपली अशा प्रकारे अर्जुनाच्या बाणांनी आच्छादित झालेले ते योद्धे इकडेतिकडे पाहू लागले तो भूमि व अंतरिक्ष यांपैकी अर्जुनाच्या बाणांनी भरून गेली नाही अशी तिळभरही जागा त्यांना दिसेना. तेव्हां लढाईत भिडणाऱ्या त्या योद्ध्यांच्या मनात पळून जाण्याची कल्पनाही आली नाही आणि अर्जुनाचे ते हस्तलाघव पाहून ते त्याचीच प्रशंसा करीत राहिले !
इतक्यांत सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहतील असा आपला भयंकर शंख अर्जुनाने वाजविला; आणि आपल्या श्रेष्ठ धनुष्याचा टणत्कार करून, ध्वजावरील भुतगणांनाही महाशब्द करण्याविषयीं इशारा दिला. तेव्हां त्या रथावर बसलेल्या वानराने केलेल्या भुभूःकाराने, रथाच्या आवाजाने, शंखाच्या शब्दाने, धनुष्याच्या टणत्काराने आणि ध्वजावर बसलेल्या त्या अमानुष भूतगणांच्या गर्जनेने पृथ्वी हादरली ! आणि तो भयंकर शब्द कानी पडताच गाई शेपट्या उभवून हंबरडा फोडूं लागल्या आणि दक्षिणेकडे परत वळल्या !
क्रमशः
पुढची कथा पुढिल सतराव्या भागात
भाग 17👇
आधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
भाग एक 001 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html
भाग दोन 002
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/002-virat-parva-marathi-katha.html
भाग तीन 003 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/003-virat-parva-marathi-katha.html
भाग एक 004 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/004-mahanubhav-panth-dnyansarita.html
भाग पाच 005
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/005-virat-parva-marathi-katha.html
भाग सात 006👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/006-virat-parva-marathi-katha.html
भाग 007 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/007-virat-parva-marathi-katha.html
भाग 011 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/011-virat-parva-marathi-katha.html
भाग 012 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/012-virat-parva-marathi-katha.html
भाग 13👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/012-virat-parva-marathi-katha_28.html
भाग 14👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/013-virat-parva-marathi-katha.html
भाग 15👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/015-virat-parva-marathi-katha.html
भाग 16👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/016-virat-parva-marathi-katha.html