भाग 017 विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani )

भाग 017 विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani )

भाग 017

विराटपर्व कथासार मराठी

(Virat parva marathi katha

mahabharat kahani 

याप्रमाणे जलद गतीने शत्रुसैन्याची दाणादाण उडवून देऊन गाई जिंकून घेतल्यावर, युद्धाची इच्छा करणारा तो धनुर्धराग्रणी अर्जुन पुन्हा दुर्योधनावरच चालून गेला. गाई वेगाने मत्स्य नगराकडे गेलेल्या पाहताच अर्जुन कृतकार्य झाला असे कौरववीरांनी जाणले ; आणि दुर्योधनावर चालून जाणाऱ्या त्या अर्जुनावर ते सर्व एकदम तुटून पडले. तेव्हा उत्तम प्रकारे तयार झालेली व ज्यांत भरपूर ध्वज (रथी) आहेत अशी ती सैन्ये पाहून तो शत्रुहंता अतिरथी अर्जुन मत्स्यराजपुत्र उत्तराला हांक मारून म्हणाला, "सोन्याचे लगाम व सामान घातलेले हे आपले पांढरे घोडे सर्व सामर्थ्य खर्च करून तु प्रयत्नाने या सैन्याकडे वळव ; म्हणजे दुर्योधनाकडील या मुख्य वीरसमुदायावर मी चाल करतो ! 

“हे राजपुत्रा, हत्ती हत्तीवर चाल करण्यास पाहतो त्याप्रमाणे हा दुरात्मा सूतपुत्र कर्ण माझ्याशी भिडण्याची इच्छा करीत आहे; तर दुर्योधनाच्या आश्रयावर माजलेल्या, उन्मत्त झालेल्या या कर्णाकडेच प्रथम मला घेऊन चल." अर्जुनाचे ही आज्ञा ऐकून, ज्यांच्या खोगिरांवर सोन्याचे काम केलेले आहे अशा त्या मोठमोठ्या व वायुगती अश्वांच्या योगाने त्या रथसेनेचा भेद करून तो विराटपुत्र अर्जुनास रणभूमीच्या मध्यभाग घेऊन गेला. तेव्हा कर्णाची पाठ राखण्याचे मनात आणून चित्रसेन, संग्रामजित्, शत्रुसह व जय हे महारथी विपाठ व विशिख नावाचे बाण सोडीत, चालून येणाऱ्या अर्जुनास आडवे झाले. तेव्हां वन जाळून टाकणाऱ्या अग्निप्रमाणे, धनुष्यरूप ज्वाला व बाणांचा वेगरूप ताप यांनी युक्त अशा कृद्ध झालेल्या अग्नितुल्य पुरुषर्षभ पार्थानें तो कुरुश्रेष्ठांचा रथसमुदाय भस्मसात् करून टाकिला. 

याप्रमाणे ते तुंबळ युद्ध होत असता कौरवांतील श्रेष्ठ वीर विकर्ण हा विपाठसक्षक बाणांची पेरणी करीत करीतच रथासह भीमानुज कुंतीपुत्र अतिरथी अर्जुनावर चाल करून आला; तेव्हा त्याने विकर्णाचे ते जांबूनद सुवर्णाने भूषित केलेले आणि बळकट प्रत्यंचा असलेले धनुष्य तोडून त्याच्या ध्वजही हालवून खाली पाडला ! आपला ध्वज पडलेला पाहताच विकर्णाने घाईने तेथून पोबारा केला; पण शत्रुतपाला ही गोष्ट बिलकूल सहन झाली नाही. त्या वीराने त्या अमानुष कर्मे करून शत्रूंना ताप देणाऱ्या अर्जुनावर बाणांचा वर्षाव करून त्यास पीडित करून सोडले. 

याप्रमाणे त्या राजाने बाणांची झोड उडविलेली पाहून कौरव सेनेमध्यें विहार करीत असलेल्या त्या अर्जुनाने शत्रुतपाला, कवच छिन्नभिन्न करून टाकतील असे पांच बाण मारून दहांनी त्याच्या सारथ्याला यमद्वार दाखवले. भरतर्षभ अर्जुनाचे ते बाण लागल्याबरोबर वाऱ्याने हदरून गेलेला "वृक्ष पर्वतशिखराहून कोसळून पडतो त्याप्रमाणे तो शत्रुतप राजा गतप्राण होऊन भूमीवर पडला ! तेव्हां पावसाळ्याचे आरंभी वावटळीने मोठमोठी अरण्ये (अरण्यांतील झाडे) कंपित होतात त्याप्रमाणे त्या नरश्रेष्ठ अर्जुनाच्या श्रेष्ठ पराक्रमाने रणांगणी पराजित झालेले ते वीर भयभीत होऊन कापू लागले. 

सुंदर सुंदर पोषाख घातलेले ते नरवीर पार्थाच्या बाणांचे तडाखे बसताच पटापट गतप्राण होऊन भूमीवर पडू लागले. शिवाय दुसरेही पुष्कळ दानशूर व इंद्रतुल्य पराक्रमी योद्धे-वर सोन्याचे काम केलेली लोहमय कवचे घातलेली असल्यामुळे हिमालयावरील धिप्पाड हत्तीप्रमाणे दिसणारे महायोद्धे इंद्रपुत्र अर्जुनाकडून युद्धात पराजित झाले. अशा प्रकारे समरभूमीवर शत्रूंचा सफाया करीत तो गांडीव धनुर्धारी महावीर ग्रीष्मांतील अग्नि अरण्य जाळीत सुटतो तसा रणभूमीवर सर्वत्र संचार करूं लागला. 

वायु जसा वसंत ऋतूंत गळून पडलेली पाने आणि मेघ यांना उडवीत वाहू लागतो. तसा तो रथांत बसलेला अतिरथी किरीटी अर्जुन आपल्या शत्रूंची धूळधाण उडवीत समरांगणावर वावरू लागला. होतां होतां त्यानें सूर्यपुत्र कर्ण याच्या भावाच्या रथाला जोडलेले तांबडे लाल घोडे मारून टाकले; आणि मुकुट व माला धारण केलेल्या त्या महा धैर्यवान् संग्रामविजयी वीराने एकाच बाणाने त्याचे मस्तक तोडून पाडिलें !

आपल्या भावाचा अशा प्रकारे वध झालेला पाहताच, दांताळ हत्तीसारखा किंवा पोळावर धावणाऱ्या वाघासारखा तो कर्ण सामर्थ्याच्या जोरावर अर्जुनावर धावून आला; आणि तडाक्यासरशी अर्जुनाला बारा पृथक बाण मारून व घोड्यांनाही वेध करून त्याने विराटपुत्र उत्तराच्या हातावरही प्रहार केला. तेव्हा गरुड पक्षी वेगाने सर्पावर तुटून पडावा त्याप्रमाणे चालून येणाऱ्या त्या सूतपुत्र कर्णाजवळ वेगाने जाऊन अर्जुन त्यावर तुटून पडला. याप्रमाणे कर्णार्जुनाचे महायुद्ध जुंपले. असे पाहताच, कशाही शत्रुला दाद न देणाऱ्या महाबल व सर्व धनुर्धरात श्रेष्ठ अशा त्या दोघां वीरांचे युद्ध ते सर्व कौरववीर तटस्थ होऊन पाहूं लागले.

ज्याने आपले अनेक अपराध केले तो कर्ण समोर आलेला पाहतांच अर्जुनाला फारच संताप आला, व त्यातल्या त्यातच आनंदही झाला; व घोर शरवृष्टी करून त्याने अश्व, रथ व सारथी यासह कर्णाला घाबरवून सोडले. मग अर्जुनानें प्रपत्क बाण मारून कौरवांकडील भीष्मप्रभृति योद्धे रथ, अश्व, गज यांना सुद्धा बाणांनी झोडपून काढले असतां.! त्याच्या बाणांचे भयंकर तडाके वर्मु लागल्यामुळे ते वीर मोठमोठ्याने ओरडू लागले. तेव्हा अर्जुनाच्या हातून सुटलेल्या बाणांचा आपल्या बाणांनी प्रतिकार करत तो धनुष्य बाणयुक्त कर्ण ठिणग्या उडत असलेल्या दैदीप्यमान् अग्नीप्रमाणे अर्जुनाशी तोंड देऊन उभा राहिला. 

तेव्हां तलत्राण आणि प्रत्यंचा यांचा टणत्कार करीत असलेल्या कर्णाची ते सर्व कौरववीर प्रशंसा करू लागले; आनंदाने टाळ्या वाजवू लागले आणि शंख, नगारे, पणव वाजवू लागले. पण त्यांचा आनंद थोडावेळच टीकला कारण नंतर मग ज्याच्या रथाचे ध्वजावर पृच्छाची मोठी थोरली पताका आहे, व त्या ध्वजाचे ऊर्ध्वभागी असलेल्या फळीच्या दोन्ही टोकांवर भयंकर भूते गर्दी करून बसली आहेत; आणि जो स्वतः गांडीवाच्या टणत्काराबरोबरच मोठ्याने गर्जना करीत आहे, अशा त्या अर्जुनाला पाहून कर्णाने मोठ्याने आरोळी दिली. 

तेव्हा अर्जुनाने रथ, सारथी व अश्व यासह कर्णावर उपक बाणांचा वर्षाव करून त्याला त्राहि त्राहि करून सोडले; आणि भीष्म, द्रोण व कृप हे दृष्टीस पडतांच त्यांवरही बाणांचा पाऊस पाडला. उलट कर्णानेही अर्जुनावर मेघाप्रमाणे एषक बाणांची धार धरिली. तेव्हां किरीटधारी अर्जुनानेही निर्माणावर घांसलेल्या प्रपत्क बाणांनी च कर्णाला बेजार करून सोडलें. अशा प्रकारे भयंकर शस्त्रवृष्टीच्या योगाने त्या रणांत सारखी कत्तल उडून राहिली असता व बाणांचा सारखा वर्षाव करीत असलेले ते रथी परस्परांच्या बाणदृष्टीने आच्छादित होऊन गेले, मेघाच्छादित चंद्र-सूर्याप्रमाणे लोकांच्या दृष्टीस पडले. 

नंतर कर्णाने तीष्ण बाणांनी अर्जुनाच्या चारही घोड्यांना वेध केला ; मोठ्या रागाने तीन बाण त्याच्या सारथ्याला मारले. पण उत्तर बचावला. 

आणि लगेच त्याच्या ध्वजावरही तीन बाण टाकले. तेव्हा रणांत शत्रुला खंडे चारणारा तो अर्जुन, डिवचून जागा केलेल्या सिंहाप्रमाणे कर्णाने मारलेल्या बाणांनी क्षुब्ध झाला; आणि तो कुरुवंशज गांडीव धनुष्यधारी बाणांची झोड उठवीत कर्णावर धावून गेला; आणि बाण व अस्त्रे यांनी ताडित झालेल्या त्या महात्म्याने मनुष्यांना दुष्कर असे कर्म करून, सूर्य आपल्या किरण जालाने मृत्युलोक भरून काढतो त्याप्रमाणे कर्णाचा रथ पृषक बाणांनी भरून काढला. नंतर, अंकुशाने टोचलेल्या गजेंद्राप्रमाणे चिडलेल्या त्या अर्जुनाने भात्यातुन तीक्ष्ण भट्ट बाण घेऊन धनुष्याला जोडले; आणि पुरापूर धनुष्य खेचून त्या कर्णाच्या वर्मावर प्रहार केला; आणि रणांत शत्रुस धूळ खावयास लावणाच्या त्या अर्जुनाने आपल्या गांडीव धनुष्यापासून सोडलेल्या विद्युत्तुल्य तीक्ष्ण बाणांनी त्या रणभूमीवर कर्णाचे हात, पाय, कपाळ, कंठ व श्रेष्ठ अवयव विंधले. याप्रमाणे अर्जुनाने सोडलेल्या बाणांच्या योगाने पीडित झालेला तो कर्ण हत्तीने पराभव केलेल्या हत्तीप्रमाणे दिसू लागला; आणि अर्जुनाच्या बाणांनी घाबरून गेलेल्या त्या वैकर्तनाने कर्णाने सारथ्यास रथ फिरव असे सांगून तेथून पाय काढला ! आणि पळून गेला. 

महाभारत विराटपर्व संदर्भ श्लोक 👇

( जे लोक तथा कादंबरीकार कर्णाला अर्जुनापेक्षा श्रेष्ठ योद्धा मानतात. आणि अर्जुनासमोर कैक वेळा घुटने टेकलेल्या कर्णाला हिरो समजतात, त्यांनी हे लक्षात घ्यावे. कि संपूर्ण कौरव सेनेला व कर्णाला एकट्या अर्जुनाने पराभूत केले. व कर्ण पळून गेला.) 

कृपाचार्यासमोर बढाया मारणाऱ्या कर्णाने पोबारा केल्यांवर दुर्योधनासह सर्व कौरववीर आपापल्या पथकासह एकामागे एक अर्जुनावर येऊन कोसळले. तेव्हा नानाव्यूहाकार असलेले ते सैन्य चाल करून येत असतां, महासागराला मर्यादेत ठेवणाऱ्या तीराप्रमाणे अर्जुनानें बाणांनी त्याच्या वेगाला आळा घातला. नंतर त्या रथी श्रेष्ठ बीभत्सु कौन्तेय श्वेतवाहनाने हसत हसतच दिव्य अस्त्र सोडीत पुढे पाऊल घातले आणि ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी सर्व भूमि आच्छादित करतो, त्याप्रमाणे आपल्या गांडीव धनुष्यापासून बाण सोडून त्या पार्थाने दाही दिशा भरून काढिल्या. 

तेव्हा अर्जुनाच्या तीव्र बाणांनीं विद्ध झाली नाहीं अशी दोन बोटे देखील जागा गज. रथ, अश्व व वीरांचीं कवचे यावर उरली नाहीं. पार्थाच्या दिव्यास्त्र प्रयोगामुळे, उत्तराच्या व घोड्यांच्याही अंगी शिक्षणाचे मर्म उत्तम प्रकारें बिंबून गेले असल्यामुळे, आणि मुदत असलेल्या अस्त्रांच्या सामर्थ्यामुळे अनुभवास येऊ लागलेला तो अर्जुनाचा पराक्रम पाहून त्याचे शत्रुही मान डोलवू लागले; आणि धडाडलेल्या अग्निकडे पहावत नाहीं तद्वत् जणू प्रलयकाळाच्या अग्नी प्रमाणे सर्व कौरवसेना भस्म करण्यास उद्युक्त झालेल्या ल्या अर्जुनाकडे वर डोळा करून बघण्यास शत्रु समर्थ होत नव्हता. 

अर्जुनाच्या बाणजालांनी आच्छादित झालेलीं ते सैन्य पर्वतासम सूर्यकिरणांनी व्याप्त झालेल्या प्रचंड मेघांप्रमाणे शोभू लागले. अर्जुनाच्या शुभ बाणांनी अनेक प्रकारे छिन्न झालेली तीं सैन्ये खच्ची केलेल्या अशोकवनाप्रमाणे शोभू लागली. सुकून गळून पडलेली सोनचाफ्याची फुले वाऱ्याने उडून जातात त्याप्रमाणे अर्जुनान्या बाणांच्या तडाक्यांनी छत्रे व पताका आकाशात उडून जाऊ लागल्या. आपल्या सेनेच्या भीतीनें आधीच त्रासलेले घोडे अर्जुनाने जूं तोडून टाकल्यामुळे रथाच्या शिलक राहिलेल्या सांगाड्यासह सैरावैरा दशदिशा धावू लागले. 

अर्जुनानें कान, कक्षा, दांत, अधरोष्ठ व मर्म याठिकाणीं प्रहार करून त्या रणभूमीवर हत्ती लोळविले, तेव्हां मेघांनीं नभस्तल भरून जावें त्याप्रमाणे त्या कुरुश्रेष्ठांकडील गतप्राण झालेल्या गजांच्या शरीरांनीं ती भूमि आच्छादून गेली. कालगतीनें क्षय पावणारे हे चराचर जगत युगांतसमयीं ज्याप्रमाणे तीव्र ज्वालांनी युक्त असा अग्नि भस्म करून टाकतो. त्याप्रमाणे पार्थ त्या रणांगणाचे ठिकाणीं शत्रूंना भाजून काढू लागला. नंतर, सर्व अस्त्रांचें तेज, गांडीव धनुष्याचा टणत्कार, ध्वजावर बसलेल्या अमानुप भूतगणांचा अट्टहास, भ्यासूर शब्द करणाऱ्या त्या वानराचा गर्जना, आणि आपल्या देवदत्त शंखाचा भयंकर शब्द यांच्या योगाने त्या बलवान् अरिमर्दन अर्जुनाने दुर्योधनाच्या सैन्याची गाळण करून सोडिली. प्रथमतः केवळ दर्शन मात्रेकरूनच अर्जुनाने शत्रुचा शक्तिपात करून सोडला होता ! नंतर, अवसान येण्याकरतां जरा मार्गे सरून तो वीर एकदम शत्रूवर तुटून पडला; आणि आकाशांत संचार करणारे पक्ष्यांप्रमाणे आपल्या गांडीव धनुष्यापासून शत्रुचें रक्त प्राशन करणारे असे तीखट टोक असलेले असंख्य बाण सोडून त्याने दाही दिशा छावून टाकल्या. तेव्हां, राजा, तीक्ष्णतेजस्वी सूर्याच्या किरणांप्रमाणे अर्जुनाचे ते असंख्य बाण दश दिशांना पसरले आहेत असे दिसू लागले.


याप्रमाणे अर्जुन शत्रुवर धूम गाजवून राहिला असता, त्याच्या रथाजवळ आलेल्या शत्रुचा व त्याचा सामना होण्याचा योग एकदाच येत होता ! कारण, एकदा अर्जुनाची गांठ पडली झणजे तेथून जिवंत निघणे शक्य असेल तर त्याची पुन: गांठ पडायची गोष्ट नव्हती कारण  अर्जुन कोठें त्याला जिवंत सोडत नव्हता ! शत्रुची गांठ पडली रे पडली की त्याला रथावरून खाली लोळवून अश्वांसह त्याने त्याची यमलोकी पाठवणी केलीच ! त्या बीभत्सूचे बाण जसे शत्रुशरीरांत न अडकतां पार निघून जात असा अर्जुनाचा त्याचा रथही शत्रुसैन्यांत अप्रतिहत फिरत होता. याप्रमाणे तो अर्जुन महासागरात क्रीडा करणाऱ्या अनंत फणांच्या नागाप्रमाणे शत्रुसेनेचा सहज खळबळ उडवून देऊ लागला. 

या प्रकारे अर्जुन सारखी शरवृष्टि करू लागला असतां, सर्वांवर त्राहि करणारा असा त्याच्या धनुष्याचा शब्द पूर्वी कधी ही ऐकिला नाही अशा सर्व प्राण्यांच्या कानीं पडूं लागला. त्या रणांगण एकमेकांच्या अगदी जवळ जवळ असे एका हारीने उभे राहिलेले हत्ती अर्जुनाच्या बाणांनी भरून गेल्यामुळे सूर्य किरणांनी व्याप्त झालेल्या मेघांप्रमाणे दिसूं लागले. डाव्याउजव्या दोन्ही बाजूंनी सारखे बाण सोडीत अर्जुन सर्वत्र संचार करीत असल्यामुळे, त्याचे एकमार बिटकलीप्रमाणे वांकलेले धनुष्य अलातचक्राप्रमाणे दिसू लागले. सुंदर वस्तूंशिवाय दृष्टि इकडे तिकडे मुळींच जात नाही. त्याप्रमाणे त्या गांडीव धनुष्याचे बाण निशाण सोडून अन्यत्र जात नव्हते. 

वनांत संचार करीत असलेल्या हजार हत्तीच्या मनाप्रमाणे अर्जुनाच्या रथाचा मार्ग ऐसपैस झाला होता. अर्जुनाच्या बाणांचे सारखे तडाखे बसू लागले तेव्हां शत्रूंना वाटले की, 'अर्जुनाला विजय मिळावा म्हणून साक्षात् देवराज इंद्रच सर्व देवतांसह आमच्याशी युद्ध करीत आहे आणि तो एकसारका शत्रूचा सप्पा उडवीत चालला असता कित्येकांना तर असेही वाटू लागले की, 'अर्जुनरूपाने हा प्रत्यक्ष काळच आपसरून सर्व सैन्य गट्ट करीत सुटला आहे!' 

अर्जुनाच्या प्रहारानी पडणारी ती कुरुसैनिकांची शरीरें अर्जुनाने प्रहार केलेल्या शरीरांप्रमाणेच पडत होती कारण, पार्थाच्या त्या पराक्रमाला उपमा त्याच्याच पराक्रमाची ! धान्याची कणसें खुडावी त्याप्रमाणे अर्जुनानें शत्रुची गिरे तोडून पाडण्याचा सपाटा लाविला असता त्याच्या भयानें कौरवी यांच्या कंबरा खचल्या ! अर्जुनरूप वायूने छिन्न भिन्न झालेल्या त्याच्या शत्रूच्या शरीरांपासून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्यामुळे सर्व जमीन तांबडी-लाल होऊन गेली! रक्ताने भिजलेले तेथील ते रजःकण वाऱ्याने उडू लागले असता त्यांमुळे सूर्यकिरणेही अतिशय आरक्त दिसू लागलीं; आणि त्या योगाने संध्याकाळच्या क्षितिजाप्रमाणे सूर्यासह आकाश तत्क्षणींच लाल दिसू लागले सूर्यही अस्ताला जाऊन नाहीसा झाला (अंधार पडला) तरी अर्जुन काही परतणार नाही असा शत्रूना भीती वाटू लागली.

नंतर, आपल्या पराक्रमाच्या घमेंडींत असलेल्या कौरवातल्या सर्व धनुर्धरांना त्या असामान्य शूराने दिव्यास्त्रांनीं त्या समरभूमीवर ताडन केले. त्याने त्र्याहात्तर क्षुरप्र बाण द्रोणांवर टाकले. दुःसहाला दहा बाण मारले, अश्वत्थाम्यावर आठ सोडले, बारांनी दुःशासनाला ताडन केले, तीन बाणांनी कृपाचार्याला वेधले, व भीष्मांला साठ बाणांनी प्रहार केला, दुर्योधनाचा शंभर बाणांनी समाचार घेतला आणि शत्रूची धूळधाण उडवून देणाऱ्या त्या अर्जुनानें कर्णाच्या कानावर एक कर्णी बाण मारून वेध केला. याप्रमाणे महाधनुर्धर कर्णाचा वेध करून अर्जुनाने त्याचा सारथी व अश्व यांची यमपुरीं पाठवणी केल्यामुळे तो विरथ झाला, तेव्हा सैन्याची पांगापांग झाली. 

याप्रमाणे ते सैन्य पलायन करीत आहे तरी अर्जुन आपला ठाण मांडून उभाच आहे. असे पाहून उत्तराने त्याचे मनोगत ओळखले आणि म्हटले, "हे जिष्णो, या सुंदर रथावर मज सारथ्यासह बसून आतां कोणत्या सेनेवर चाल करण्याची तुझी इच्छा आहे ते सांग, म्हणजे मी रथ घेऊन तिकडे चलतो. 

अर्जुनानें सांगितले, ज्यांच्या रथाला शुभ असे तांबडे घोडे जोडलेले असून व्याघ्रचर्मानें परिवृत असे जे नीलध्वजाच्या आश्रयाने स्थित आहेत, ते हे कृपाचार्य पाहिलेस ना हे पहा त्यांचे श्रेष्ठ पथक! तिकडेच मला घेऊन चल, म्हणजे त्यांना मी आपले शीघ्रास्त्रत्व दाखवतों. हा ज्यांच्या ध्वजावर सोन्याचा शुभ कमंडल झळकत आहे, ते सर्व शस्त्रधरांमध्ये वरिष्ठ आचार्य द्रोण आहेत. हे मला तसेच सर्व शस्त्रधरांनाही सदैव मान्य आहेत. तेव्हां तू येथेच रथाखालीं उतर, व या सुप्रसन्न महावीराला प्रदक्षिणा करून मान दे, आणि फिरून रथावर चढ, कारण, बाबा रे. हा सनातन धर्म आहे. 

प्रथम जर द्रोण मजवर प्रहार करतील, तरच मी त्यांवर हत्यार उचलीन; म्हणजे मर्यादा पालन केल्यामुळे यांचा मजवर कोप होणार नाही. त्यांच्या सन्निधच ध्वज फडकत आहे यावर धनुष्य काढलेले आहे तो! तो या आचार्याचा पुत्र महारथी अश्वत्थामा ! हाही सर्वदा मला तसाच सर्व शस्त्र धरांनाही मान्य आहे. याच्या रथाजवळ गेल्यावर तुला पुनःपुनः परत फिरावे लागेल ! हा जो रथदलामध्यें सोन्याचें कवच घालून ताज्या दमाच्या तिसऱ्या तुकडीसह उभा आहे. आणि ज्याच्या ध्वजावर सुवर्णमय हत्ती काढलेला । आहे, तो हा धृतराष्ट्रात्मज राजा दुर्योधन आहे, समजलास? तेव्हा, हे वीरा, शत्रु रथाचा चुराडा करून सोडणारा हा आपला रथ त्याच्या समोर घेऊन चल पाहूं.

 कारण, हा रणमस्त वीर मोठा बलाढ्य असून, द्रोणाचार्याचे जेवढे म्हणून शिष्य आहेत या सर्वात शीघ्रास्त्राविषयीं हा पहिला अशी याची मोठी आख्या आहे. तेव्हा यालाही आपले अस्त्रकौशल्य थोडे बहुत दाखवले पाहिजे. हत्तीच्या साखळदंडाचे सुंदर चिन्ह ज्याच्या ध्वजावर आहे, तो हा वैकर्तन कर्ण तुला मघांशी माहीत झालेलाच आहे ! या दुष्ट राधेयाच्या रथाजवळ गेलास म्हणजे तू डोळ्यांत तेल घालून बैस; कारण युद्धामध्ये हा मला नेहमी पाण्यांत पहात असतो. निळ्या पताकेवर काढलेल्या सोन्याच्या पांच ताऱ्याचा ध्वज असलेल्या रथावर हातीं भले मोठे धनुष्य घेऊन व हस्तकवच घालून जो उभा आहे; सभोवते पांच तारे मध्य सूर्य यांनी सुशोभित झालेला तो ध्वज ज्याच्या श्रेष्ठ रथावर झळकत आहे; ज्याच्या मस्तका वर ते पांढरेशुभ्र निर्मल छत्र शोभत आहे: मेघांच्या अग्रभागी असलेला जणु सूर्यच उभा जो ह्या नानापताकाध्वजयुक्त मोठ्या थोरल्या रथदळाच्या बीनीवर उभा आहे; ज्याने अंगांत घातलेले सोन्याचे कवच चंद्रसूर्याप्रमाणे लखलखीत दिसत आहे; आणि ज्याचे सुवर्णमय शिरस्त्राण माझ्या मनाला क्षोभवून सोडीत आहे, तो हा राजतेजाने झळकत असलेला व दुर्योधनाच्या मर्जीप्रमाणे चालणारा आम्हां सर्वांचा पितामह शांतनव भीष्म आहे. सर्वांचा समाचार घेतल्यानंतर मग याच्याशी गांठ घालायची; म्हणजे मग मला काही अडचण पडणार नाही. मात्र यांच्याशी जुंपुन राहिले झणजे आपले घोडे फार सावधगिरीने हाक हो !

याप्रमाणे अर्जुनाने सांगितल्यावर, जेथे कृपाचार्य अर्जुनाशी दोन हात करण्याची इच्छा करून उभे होते, तिकडे त्या दक्ष उत्तराने अर्जुनाला नेले.

क्रमशः 

पुढची कथा पुढिल अठराव्या भागात

भाग 18👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/018-virat-parva-marathi-katha.html

आधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

भाग एक 001 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html


भाग दोन 002 

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/002-virat-parva-marathi-katha.html

भाग तीन 003 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/003-virat-parva-marathi-katha.html


भाग एक 004 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/004-mahanubhav-panth-dnyansarita.html


भाग पाच 005

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/005-virat-parva-marathi-katha.html


भाग सात 006👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/006-virat-parva-marathi-katha.html

भाग 007 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/007-virat-parva-marathi-katha.html


भाग 008👇

भाग 009 👇

भाग 011 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/011-virat-parva-marathi-katha.html

भाग 012 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/012-virat-parva-marathi-katha.html

भाग 13👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/012-virat-parva-marathi-katha_28.html

भाग 14👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/013-virat-parva-marathi-katha.html

भाग 15👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/015-virat-parva-marathi-katha.html

भाग 16👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/016-virat-parva-marathi-katha.html

भाग 17 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/017-virat-parva-marathi-katha.html

भाग 18👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/018-virat-parva-marathi-katha.html

भाग 19👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/019-virat-parva-marathi-katha.html

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post