भाग 018
विराटपर्व कथासार मराठी
(Virat parva marathi katha
mahabharat kahani)
ग्रीष्म ऋतुकाळाच्या शेवटी ज्याप्रमाणे मंद वाऱ्याने ढग हळू हळू पुढे जातात, त्याप्रमाणे त्या कुरुश्रेष्ठ धनुर्धरांची सैन्ये हळू हळू पुढे सरसावत आहेत असे दिसू लागले. वर योद्धे बसलेले असे उमदे घोडे, आणि सूर्यप्रकाशाप्रमाणे लखलखीत कवचे घालून व हातांत तोमर व अंकुश घेऊन हत्तींना चालवीत माहूत वर बसलेले असे अंबारीयुक्त हत्ती जवळ येऊन उभे राहिले.
अर्जुनाचा पराक्रम पाहण्यासाठी स्वयं स्वर्गीचा राजा देवराज इंद्र विमानांमध्ये येऊन व अश्विनीकुमार व मरुद्गण यांसह, जिथे युद्ध होत होते तेथे येऊन पोहाचला. तेव्हा देव, गंधर्व यक्ष आणि सुर यांनी गजबजून गेलेले ते स्वच्छ आकाश ग्रहमंडलाप्रमाणे शोभू लागले. त्या ठिकाणी त्या मानवयुद्धामध्ये होणाऱ्या अस्त्र प्रयोगांचे बळ आणि कृपाचार्य व अर्जुन यांची गांठ पडल्यानंतर होणारे ते महाभयंकर युद्ध अवलोकन करण्याकरता देव आपापल्या निरनिराळ्या विमानात बसून तेथे आले.
त्या वेळी देवराज इंद्र आकाशात फिरणाऱ्या दिव्य सुवर्णमय विमानात झळकत होते, त्या विमानाला अनेक साधे खांब असून एक सोन्याचा व एक मणिरत्नखचित खांब होता; आणि ते इच्छागामी(इच्छीलेल्या स्थळी नेणारे) विमान रत्नांनी भूषित केलेले होते. त्या विमानांमध्ये इंद्रासह तेहतीस देव बसलेले असून गंधर्व, राक्षस, सर्प, पितर व व अनेक महर्षिही होते.
त्या पाठोपाठ अंतराळीच्या गंधर्वांचीही विमानें आपआपल्या योग्यतेप्रमाणे यथोचित स्थान झळकू लागली. या प्रमाणे, कौरवांचे व अर्जुनाचे ते युद्ध पाहण्याकरता सर्व देवगण, सिद्ध आणि महर्षि तेथे जमले. तेव्हा वनामध्ये वसंत ऋतूच्या आरंभी ज्याप्रमाणे सुगंधी पुष्पांचा दरवळ सुटतो, तसा त्या ठिकाणी सर्व दिव्य अतिशय सुगंधीत पुष्पांचा चहुकडे घमघमाट सुटला; आणि देवतांनी धारण केलेली रत्ने, छत्रे, वस्त्रे, चामरे व माळा झळकू लागल्या. जमीनीवरील धूळ पार बसून गेली; सर्व आकाश किरणांनी व्याप्त झाले; आणि दिव्य सुगंध वाहून आणून वायुही योद्ध्यांना संतोषित करू लागला.
कौरवांची ती सैन्ये व्यूह रचून उभी आहेत असे पाहून तो पंडुनंदन पार्थ उत्तराला हाक मारून म्हणाला, ज्याच्या ध्वजावर जांबूनद सुवर्णाची वेदी काढलेली आहे, त्यांना उजवी घालून कृपाचार्य शस्त्रसज्ज आहेत तिकडे रथ घेऊन चल. अर्जुनाने पूर्वी सांगितलेले सर्व काही राजकुमार उत्तराच्या लक्षात होतेच. त्याने अर्जुनाचे हे बोलणे ऐकून, सोन्याचे अलंकार घातलेल्या, व रागावल्यासारख्या दिसणाऱ्या आपल्या त्वरितगति व चंद्राप्रमाणे अतिशय पांढऱ्या शुभ्र अशा घोड्यांना तिकडे चलण्याविषयीं ताबडतोब इशारा केला.
सारथ्यकर्मामध्ये निपुण असलेल्या त्या उत्तराने कौरवसैन्याच्या जवळ जाऊन पुनः ते वायुगती घोडे परत वळवले आणि याप्रमाणे डावीउजवी मंडले घेत रथ चालवून, घोड्यांच्या खुब्या जाणणाऱ्या त्या उत्तराने कौरवांची अक्कल गुंग करून सोडिली. नंतर कृपाचार्याच्या रथाकडे रोख धरून तो निर्भय व बलवान् विराटपुत्र प्रदक्षिणा घालून वळला, आणि त्यांच्यापुढे अकस्मात उभा राहिला. तेव्हा अर्जुनाने स्वतःचे नाव कळवून आपला भयंकर शब्द करणारा श्रेष्ठ देवदत्त शंख खूप जोराने वाजवला. त्याप्रमाणे तो वीर्यवान् अर्जुन रणभूमीवर जोराने शंख फुंकू लागला असतां त्याचा नाद उलणाऱ्या पर्वताप्रमाणे भयंकर होऊ लागला !
अर्जुनाने शेकडो वेळां जरी फुंकला असता, तरी तो शंख उलण्यासारखा नव्हता अशा त्या शंखाचा ध्वनि ऐकून कौरवांनी सैन्यासह त्याची वाहवा केली. त्या शंखाचा शब्द इतका मोठा झाला की, इंद्राने सोडलेले वज्र पर्वतावर आपटले असतां त्याचा नाद व्हावा तसा होणारा त्याचा नाद आकाशात दुमदुमुन जाऊन पुनः त्याचा प्रतिध्वनि भूमीवर उठला ! तेव्हां बलपराक्रमशाली दुर्जय कृपाचार्यांना काही तो शब्द सहन झाला नाहीं; आणि ते अर्जुनावर अतिशयच संतापले. नंतर अर्जुनावर अतिशय रागावलेल्या आणि युद्धाची इच्छा करणाऱ्या त्या वीर्यवान् महारथी कृपाचार्यानी लगेच आपलाही शंख घेऊन फुकला; आणि अशा प्रकारें आपल्या शंखाच्या शब्दाने संपूर्ण भूमी भरून काढून त्या रथिश्रेष्ठ कृपाचार्यांनी लगेच आपले प्रचंड धनुष्य घेऊन त्याच्या प्रत्यंचेचा टणत्कार केला. याप्रमाणे ते दोन्ही सूर्यासारखे वीर पवित्र्यांत उभे राहून युद्ध करू लागले.
नंतर, शत्रूकडील वीरांचा ध्वंस करणाऱ्या " त्या अर्जुनाला कृपाचार्यांनी जलदगतीने तीक्ष्ण व मर्मभेदक अशा दहा बाणांनी वेध केला. तेव्हां उलट अर्जुनानेही आपले लोकविश्रुत उत्कृष्ट गांडीव धनुष्य खेचून कृपाचार्यावर अनेक मर्मभेदक नाराच बाण टाकिले. पण खोल जखम करणारे ते पार्थाचे नाराच बाण येऊन लागण्याच्या पूर्वीच कृपाचार्यांनी तीक्ष्ण बाणांनी त्यांच शेकडों हजारों तुकडे केले.
तेव्हां अतिशय संतप्त होऊन बाण सोडण्याचे अनेक अद्भुत प्रकार दाखवत अर्जुनानें दशदिशा भरून काढल्या, आणि त्या महारथी पार्थानें बाणाच्या घनदाट छायेने आकाश व्याप्त करून टाकून शेकडो बाणांनी कृपाचार्यासही झाकून टाकिले. अग्निज्वालांसारखेने तीक्ष्ण बाण लागतांच कृपाचार्य व्यथित होऊन अतिशय संतापले; आणि लगेच त्या अप्रतिम बलवान् पार्थाला दहा हजार बाण मारून त्यांनी या रणभूमीवर मोठ्याने आरोळी दिली.
तेव्हा अर्जुनानेही सोन्याची फळे लावलेले व पेरी काढलेले असे चार तीक्ष्ण बाण गांडीव धनुष्याला जोडून त्या उत्कृष्ट बाणांनी कृपाचार्याच्या चारही घोड्यांना प्रहार केला आणि फुस्करणाऱ्या सर्पासारखे ते तीक्ष्ण बाण लागतोा घोडे एकदम भडकून जाऊन त्यांनी कृपाचार्यास रथांतून खाली फेकून दिले ! या प्रमाणे कृपाचार्य खाली पडले तेव्हा त्यांच्यावर प्रहार करण्याची चांगली संधी आली असताही त्या शत्रुहंत्या अर्जुनाने त्यांची अदब राखण्याकरता त्यांच्यावर प्रहार केला नाहीं !
परंतु कृपाचार्यांनी पुन्हा रथावर बसून घाईघाईने अर्जुनावर दहा कंकपत्रयुक्त बाण टाकिले. तेव्हां तीक्ष्ण भट्ट बाणाने अर्जुनाने त्यांचे धनुष्य तोडले; आणि दुसऱ्या एका बाणाने त्यांचे हस्तकवच उडवले. नंतर मर्मभेदक तीण बाणांनी त्यांचे कवच छेदून पाडले. परंतु त्या पार्थाने त्यांच्या देहाला पीडा दिली नाही. याप्रमाणे अर्जुनाने कवच छेदून टाकले तेव्हां कवचाभावी उघडे पडलेले ते कृपाचार्यांचे शरीर कात टाकलेल्या सर्पाप्रमाणे दिसू लागले.
अर्जुनाने धनुष्य तोडून टाकल्यावर कृपाचार्यांनी दुसरे धनुष्य घेऊन त्याला प्रत्यंचा चढविली, तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले. परंतु अर्जुनाने पेरी काढलेल्या बाणांनी त्यांचे तेही धनुष्य तोडून टाकले. याप्रमाणे त्या अतिचपल हाताच्या पांडुपुत्राने त्यांची आणखीही पुष्कळ धनुष्ये तोडून टाकली : तेव्हा धनुष्ये तुटु लागली असे पाहून कृपाचार्याने प्रताप कृपयनशक्ति उचलली आणि ती विजेसारखी शक्ति पार्थावर फेकली. परंतु उल्केसारखी ती स्वर्णभूषित शक्ति येत आहे असे पाहून त्या बुद्धिमान अर्जुनाने दहा बाण ! मारून आकाशातच तिचे दहा तुकडे करून ती भूमीवर पाडली,
नंतर लगेच धनुष्य सज्ज केलेल्या कृपाचार्यांनी तिक्ष्ण अशा दहा भट्ट बाणांनी अर्जुनाला वेध केला! तेव्हा त्या महातेजस्वी पार्थानें निमणावर घांसलेले आणि अग्नीसारखे असे तंग विशिष्ट बाण कृपाचार्यांना मारले; आणि पाठोपाठ एका बाणाने त्यांच्या रथाचे जूं तोडून दुसऱ्या चार बाणांनी त्यांच्या घोड्यांनाही वेध केला; सहाव्या बाणाने त्यांच्या सारथ्याचे मस्तक धडापासून तोडून पाडले; त्या रणभूमीवर त्याने तीन बाणांनी त्यांच्या रथाचं त्रिवेणुक मोडून टाकले; त्या महारथाने दोहीकडून रथाचा कणा मोडला; नंतर भट्ट वाणाने त्यांचा ध्वजही उलथून पडून, या इंद्रतुल्य पराक्रमी फाल्गुनाने हसतच तेरावा वज्रप्राय बाण कृपाचार्यांच्या छातीत खोचला !
याप्रमाणे धनुष्य तुटून जाऊन सारथी व अश्व मरून पडल्या कारणाने विरध झालेल्या कृपाचार्यांनी घाई घाईनें गदा उचलून ती अर्जुनावर भिरकावली पण कृपाचार्याच्या हातून सुटलेली ती उत्कृष्ट प्रकारें भूषित केलेली प्रचंड गदा अर्जुनाने बाण मारल्यामुळे परत फिरली! तेव्हां रागाने बेफाम होऊन गेलेल्या त्या कृपाचार्याचा बचाव करण्याकरतां त्या रणांगणांत अनेक वीरांनी अर्जुनाला चहूकडून वेढा दिला, व त्याच्यावर बाणांची सारखी धार सुरू झाली. परंतु घोडे अप्रदक्षिण फिरवून त्या विराटपुत्र उत्तराने शत्रूचा निरोध करणारें यमकमंडल घेऊन वीरांचें निवारण केले. तेव्हां त्या विरथ झालेल्या कृपाचार्यास घेऊन ते इतर नरर्षभ कुंतीपुत्र धनंजयापासून घाईघाईने दूर पळून गेले !
याप्रमाणे कृपाचार्याला रणातून दुर काढून नेल्यावर, तांबडे घोडे जोडलेल्या रथांत बसलेला अजिंक्य असा द्रोणाचार्य हाती धनुष्यबाण घेऊन श्वेतवाहनावर चालून आले. परंतु सुवर्णरथावर बसून जवळ आलेला तो गुरू द्रोण दृष्टीस पडताक्षणीच विजयिश्रेष्ठ अर्जुन उत्तरास म्हणाला, तुझे कल्याण असो. उत्तरा, श्रेष्ठ दंडावर उभारलेली आणि पताकांनी भूषित कळली ही सोन्याची वेदी ज्यांच्या ध्वजावर झळकत आहे, त्या या द्रोणाचार्याच्या सैन्यावर मला घेऊन चल.
त्यांच्या त्या मोठ्या रथाला लावलेले तांबडे घोडे रथ ओढण्यांत मोठे कुशल आहेत ; त्यांच्या मुद्रा आल्हादकारक आहेत; आणि तेजस्वी दिसत असलेले हे मोठे घोडे सर्व कौशल्यांत तरबेज झालेले आहेत. त्याचप्रमाणे या प्रतापी भारद्वाजपुत्र द्रोणाचा यांची पराक्रमाविषयीं त्रैलोक्यांत ख्याति आहे. हे बुद्धीने शुक्राचार्यांसारखे असून विद्येत बृहस्पतीप्रमाणे आहेत; आणि यांचे ठिकाणीं चारही वेद, पूर्ण धनुर्वेद ही सदैव वास करीत आहेत ; त्याचप्रमाणे यांचे ठिकाण नेहमी क्षमा, दम, सत्य, सौजन्य, सरळपणा यांचे व दुसऱ्याही पुष्कळ गुणांचे नित्य वास्तव्य आहे. उत्तरा, अशा ह्या महाभाग्यवान् द्विजांशी रणांत दोन हात करण्याची माझी इच्छा आहे, तर लवकर घोड्यांना इषारा करून मला त्या आचार्याकडे घेऊन चल."
अर्जुनाचे हे बोलणे ऐकून, सोन्याचे अलंकार घातलेले ते घोडे उत्तराने द्रोणाचार्याच्या रथाकडे हांकले. तो रथी श्रेष्ठ अर्जुन त्वरेने आपल्यावर चालून येत आहे असे पाहतांच, एका मस्त हत्तीवर धावून जाणाऱ्या दुसऱ्या मस्त हत्तीप्रमाणे द्रोणाचार्य पार्थावर चालून गेले; आणि शंभर भेरींच्या आवाजासारख्या आवाजाचा आपला मोठा शंख त्यांनी फुंकला; तेव्हा खवळलेल्या समुद्राप्रमाणे त्या सैन्याची खळबळ उडून गेली. नंतर त्या रणभूमीवर द्रोणाचार्याचे ते तांबडेलाल उत्कृष्ट घोडे अर्जुनाच्या मनोजव पांढऱ्या शुभ्र घोड्यांशी अगदी मिसळून गेलेले पाहून लोकांना फार आश्चर्य वाटले; आणि रथी, वीर, क्षात्रगुणसंपन्न, कृतविद्य आणि मनस्वी असे ते अजिंक्य गुरु शिष्य द्रोणार्जुन रणाच्या अगदी परस्परांच्या जवळ येऊन ठेपलेले पाहून, या उभयतांचं सख्य झाले तर द्रोणाचार्याभावीं हा अर्जुन आपल्या सर्वांना कणीकेसारखाच मळून काढील या भीतीने कौरवांचे ते मोठे थोरले सैन्य थरथरा कांपू लागले !
नंतर, द्रोणाचार्याच्या रथापाशी जाऊन पोहचलेल्या त्या महारथ वीर्यवान् रथस्थ कुंतीपुत्राने हर्षयुक्त होऊन हास्य करीत त्यांना अभिवंदन केले ; आणि तो शत्रुहंता महापराक्रमी कौंतेय नम्रतेने व गोड वाणीने म्हणाला, "ठरल्याप्रमाणे आम्हीं वनामध्ये वास्तव्य केले असून आता प्रतिपक्षी या नात्याने प्राप्त झाले कर्तव्य बजावण्याची आमची इच्छा आहे. तेव्हा, हे आचार्य, आपण आम्हावर कोप करू नये. हे निष्पाप, प्रथम आपण प्रहार केल्यावर मग आपल्यावर प्रहार अशी माझी मनोदेवता म्हणते; तर माझा हेतु पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे.
तेव्हा द्रोणाचार्यांनी प्रथम अर्जुनावर विसांपेक्षा अधिक बाण मारले; परंतु ते आपले जवळ येऊन पोहचण्याचे आधींच त्या सव्यसाची अर्जुनाने तोडून पाडिले. नंतर त्या पराक्रमी द्रोणाचार्यांनी हजार बाण टाकून अर्जुनाचा रथ भरून सोडला; आणि आपले अस्त्रकौशल्य दाखवीत त्या अजेय द्रोणांनी निसणावर घांसलेले कंकपत्रयुक्त बाण मारून जणू अर्जुनाला चिडविण्याकरताच त्यांचे घोडेही व्याप्त करून सोडिले. याप्रमाणे द्रोणाचार्य दीप्त तेजस बाण सोडूं लागले, तेव्हा मग त्यांची आणि अर्जुनाची चांगलीच लढाई जुंपली.
दोघेही नामांकित पराक्रमी, दोघेही वायूसारखे वेगवान् दोघेही दिव्यास्त्रतज्ञ आणि दोघेही , उत्तम तेजस्वी असे ते वीर एकमेकांवर बाणांचा वर्षाव करीत असतां त्यांनी सर्व राजांची अक्कल गुंग करून सोडली. इतकेच नव्हे, तर तेथे दुसरे योद्धे आले होते त्यांनाही फार विस्मय वाटला; आणि ते द्रोणार्जुन फारच त्वरेने बाण टाकू लागले, ते पाहून तर त्यांनी 'वाहवा, शाबास! ' म्हणून त्यांची प्रशंसा केली. त्या समरभूमीवर असलेले इतर जन म्हणूं लागले की, “समरांत द्रोणांशी चंग बांधून उभे राहण्याची अर्जुनावांचून दुसऱ्या कोणाची हिंमत आहे? अरे ! हा क्षात्रधर्म किती भयंकर की यामुळे अर्जुनाला प्रत्यक्ष गुरुशीही युद्ध करावे लागते आहे”
इकडे ते दोघेही महाभुज व अपराजित वीर अतिशय त्वेषाने भिडून राहिले असता त्यांनी बाणांनी एकमेकांस झाकून टाकले नंतर सोन्याच्या पाठीचे आपले भले मोठे अवजड धनुष्य ताणून, संतप्त झालेल्या त्या भारद्वाजपुत्र द्रोणाचार्यांनी अर्जुनास वेधलें; निसणावर घासलेल्या उज्ज्वल बाणांचा अर्जुनाच्या रथावर मंडप करून सूर्यप्रभा झांकून टाकली; आणि मंत्र पर्वतावर वृष्टी करतो त्या प्रमाणे या महाबाहु महारथ द्रोणांनी महावेगवान् अशा तीक्ष्ण बाणांचा अर्जुनावर पाऊस पाहून त्याला पीडा केली.
तेव्हां आनंदित झालेल्या त्या वीर्यवान् अर्जुनाने आपले भारक्षम दिव्य व उत्कृष्ट गांडीव धनुष्य उचलून त्यापासून अद्भुत असे. अनेक सोनरी बाण सोडून तो द्रोणाचार्यांच्या बाणवृष्टीचे निवारण करू लागला; व रथावर बसून संचार करणाऱ्या त्या प्रेक्षणीय वीराने आपले अस्त्रकौशल्य प्रकट करून सर्व बाजूंनी सर्व दिशांस बाणांचे जणू छतच घालून टाकले. तेव्हां लोकांना फारच आश्चर्य वाटले ! त्या वेळी धुक्याने आच्छादित झाल्याप्रमाणे द्रोणाचार्य दिसेनासे झाले; आणि उत्कृष्ट बाणांनी भरून गेलेल्या त्या द्रोणांचें रूप चहूंकडून पेटलेल्या पर्वताप्रमाणे दिसू लागले.
अशा प्रकारे त्या रणभूमीत आपला रथ अर्जुनाच्या बाणांनी झाकून गेलेला पाहून द्रोणाचार्यांनी आपलें मेघगर्जनेसारखा आवाज होणारे सर्वोकृष्ट व अग्निचक्रासारखें घोर धनुष्य प्रत्यंचेचा टणत्कार करून ताणलें; आणि त्या रणभूमीत शोभणाऱ्या त्या आचार्यानीं अर्जुनाचे ते बाण तोडून पाडले. तेव्हां पेटू लागलेल्या कळकांप्रमाणे मोठा आवाज होऊ लागला; आणि त्या नंकर द्रोणाने आपल्या अद्भुत धनुष्यापासून सोडलेल्या त्या सोन्याच्या पिसाऱ्याच्या बाणांनी दिशा व सूर्यप्रभा झाकूनन सोडली.
नंतर सोन्याच्या पिसाऱ्याच्या व पेरी काढलेल्या त्या आकाशात जाणाऱ्या बाणांचे अनेक समुदाय अंतराळी दिसूं लागले. द्रोणाचार्याच्या धनुष्यापासून एकसारखे एकाच्या पिसाऱ्यांत दुसऱ्याचे टोंक घुसून गेलें आहे असे मुदत असलेले ते बाण म्हणजे जणू काय आकाशांत एक लांबच लांब बाण पसरला आहे असे दिसले ! याप्रमाणे ते वीर मोठमोठे स्वर्णमय बाण सोडू लागले असता त्यांनी आकाश जसे काही विजांनीच भरून सोडले. त्यांनी सोडलेले ते कंक व मयूर पक्ष्यांचे पिसारे लावलेले बाण आकाशांत खुशाल हिंडणाऱ्या हंसांच्या रांगांप्रमाणे शोभू लागले.
त्या द्रोणार्जुनांचं ते तुंबळ युद्ध वृत्रासुर आणि इंद्र यांच्याप्रमाणे अति घणघोर झालें. ज्याप्रमाणे हत्ती एकमेकांना दांतांच्या टोकांनी प्रहार करितात, त्याप्रमाणे पुरेपूर धनुष्य खेचून सोडलेल्या बाणांनीं ते एकमेकांना प्रहार करूं लागले. याप्रमाणे अतिशय खवळून गेलेले ते वीर जरी एकामागून एक सारखी दिव्यास्त्रें सोडीत होते, तरी त्या रणांत शोभणाऱ्या त्या उभयतांमध्ये धर्मयुद्धच चालले होते.
आचार्यश्रेष्ठ द्रोणाने जे निसणावर घासलेले बाण अर्जुनावर टाकले होते, त्यांचे त्या विजयश्रेष्ठ अर्जुनाने तीक्ष्ण बाणांनी सहज निवारण केले. आणि त्या पराक्रमी अर्जुनाने लगेच असंख्य बाणांनी आकाश भरून टाकून प्रेक्षकांना आपले अस्त्रकौशल्य दाखवले. याप्रमाणे तेजस्वी अर्जुनाने बाणांची जरी झोड उठवून दिली होती, तरी त्या शस्त्रधर आचार्याने सन्नतपर्व बाणांनी त्याशी खेळत खेळतच युद्ध चालविलं होतं.
त्या तुंबळ युद्धामध्ये फाल्गुन दिव्य अस्त्रांचा वर्षाव करूं लागला तेव्हां द्रोणांनी दिव्यास्त्रांनीच त्यांचे निवारण करून त्याला अडवले. तेव्हां परस्परांचा सूड उगविणाऱ्या देवदानवांप्रमाणे त्या खबळून गेलेल्या योद्ध्यांची चांगलीच जुंपली. ऐंद्र, वायव्य, आग्नेय इत्यादिकांपैकी कोणतेही अस्त्र द्रोणाचार्यांनी सोडलें कीं अर्जुनानें लगेच ते आपल्या अस्त्रानें वरचें वर हाणून पाडलेच ! याप्रमाणे युद्ध करतां करतां त्या महाधनुर्धर शूरांनी एकमेकांवर तीक्ष्ण बाण टाकून आकाशांत घनदाट मंडप करून सोडला.
अर्जुनाने सोडलेले बाण सैनिकांच्या शरीरांवर पडू लागले असतां पर्वतावर आदळणाऱ्या वज्राप्रमाणे मोठा शब्द ऐकू येऊं लागला. तिथे रक्ताने न्हालेले हत्ती, घोडे व रथ हे फुललेल्या पळसांप्रमाणे दिसूं लागले. याप्रमाणे त्या द्रोणार्जुनांची हातघाई उडून राहिली असतां बाहुभूषणांसह हात, मोठमोठे अद्भुत रथ, सुवर्ण कवच, मोडून पाडलेले ध्वज आणि पार्थाच्या बाणांचे तडाके बसल्यामुळे मरून पडलेले योद्धे पाहून ते सैन्य भेदरून गेले. त्या दोघांनी आपली भारक्षम धनुष्ये ताणून बाणांच्या साहाय्याने परस्परांस झांकून टाकून अगदी जेरीस आणले.
द्रोणाचे आणि अर्जुनांचे ते तुंबळ युद्ध इंद्र आणि बलि यांच्याप्रमाणे झाले. नंतर धनुष्ये ताणून सन्नतपर्व बाणांच्या योगे ते एकमेकांस इतके घायाळ करूं लागले की, त्यांनी परस्परांचे प्राण घेण्याची जणू पैजच लावली आहे. तेव्हां अंतरिक्षांतून द्रोण प्रशंसापर असे शब्द एक आले की, "अहो, शत्रूची धूळधाण करून सोडणारा हा महारथी अर्जुन दृढमुष्टि, महावीर्यवान् व सर्व देवदैत्यांनाही न जिंकणारा आहे. अशा ह्या अर्जुनाशी द्रोणाने युद्ध केले हे फारच दुष्कर कर्म केलें!"
आणि समरप्रसंगीही अर्जुनाचें मनःस्थैर्य, त्याचे हस्तलाघव, त्याचे समरनैपुण्य, आणि कितीही अंतरावरून नेम मारण्याचे त्याचे कौशल्य पाहून द्रोणालाही विस्मय वाटला ! नंतर क्रुद्ध झालेल्या त्या पार्थाने आपले दिव्य गांडीव धनुष्य तोलून धरून त्या रणांत आपल्या बाहूंनी खेचलें, तेव्हा त्यापासून टोळधाडीप्रमाणे सुटलेले बाणांचे थवेचे थवे पाहून ते सर्व विस्मित झाले; आणि देवतांनी 'शाबास, शाबास !' म्हणून अर्जुनाची प्रशंसा केली.
अर्जुनाचे बाण इतके दाट भरून गेले होते कीं. वायूलाही त्यामधून फिरकण्यास जागा नव्हती ! भात्यांतून बाण घेणे, तो धनुष्याला जोडणे आणि सोडणे यांमध्ये वेळेचे अंतर ते मुळींच दिसत नव्हते. या प्रमाणे अतिशय घाईने ते भयंकर अस्त्रयुद्ध सुरु झाले असता अर्जुन अधिकाधिकच व इरेने आणखीनच बाण सोडू लागला. नंतर, द्रोणाचार्याच्या रथाच्या सभोवर लक्षावधि बाण पडू लागले; आणि याप्रमाणे तो गांडीव धनुर्धारी अर्जुन द्रोणाचार्याला बाणांनी भरून काढू लागला तेव्हा त्या सैन्यांत एकच हाहाकार माजला !
देवराज इंद्रही अर्जुनाच्या या शस्त्रविद्येची प्रशंसा करू लागला; आणि तेथे जमलेले गंधर्व आणि अप्सरा यांनीही त्याची प्रशंसा केली. तेव्हा अश्वत्थामा अनेक रथ बरोबर घेऊन अर्जुनाचे निवारण करण्याकरता पुढे सरसावला. पण तोही महारथी अर्जुनाच्या त्या पराक्रमाची मनांतले मनांत प्रशंसा करीत होता, परंतु बाह्यतः तो अतिशय संतप्त झालेला होता. याप्रमाणे तो अत्यंत संतापलेला अश्वत्थामा वर्षणाऱ्या मेघाप्रमाणे हजारो बाणांची पेर करीत त्या रणांत अर्जुनावर धावून गेला, तेव्हां अर्जुनानेही महाबाहु अश्वत्थाम्याकडे आपले घोडे वळवले; आणि द्रोणांलाही बाजूला जाण्यास वाट सोडली !
याप्रमाणे वाट मिळाली असतां, अर्जुनाच्या भयंकर बाणांनी कवच फुटून गेलेले आणि ध्वज पडलेले ते शूर आचार्य वेगवान् घोड्यांच्या साह्याने त्वरेने रणांतून दूर पळून गेले !
नंतर अश्वत्थामा व अर्जुन यांचे महा भयंकर युद्ध झाले. त्या रणांत अश्वत्थामा अर्जुनावर चालून आला. तेव्हा मेघाप्रमाणे शरदृष्टि करीत सोसाट्याच्या वाऱ्यासारखा तो अश्वत्थामा येत असतां अर्जुनानेंही त्याचा आदर केला. मग शरजालांची वृष्टि करणाऱ्या त्या उभयतांची देवदैत्यांप्रमाणे मोठ्या निकराची लढाई जुंपली. आकाश सर्व बाजूंनी शरजालांनी भरून गेल्यामुळे घनदाट सावली पडून सूर्यही दिसेनासा झाला आणि वाऱ्याचेही वाहणे बंद पडले. ते दोघे वीर एकमेकांबर प्रहार करू लागले तेव्हां जळणाऱ्या कोरड्या लाकडांसारखा ताडताड असा प्रचंड शब्द होऊं लागला! अर्जुनाच्या प्रहारांनी अश्वत्थाम्याचे सगळे घोडे मरणाच्या पथास लागल्यामुळे अगदी भांबावून जाऊन त्यांना दिशाभूल झाली!
नंतर, रणात वावरणाऱ्या त्या अर्जुनाचे बारीक छिद्र पाहून महावीर्यवान्अश्वत्थाम्याने एका क्षुर बाणानें त्याच्या गांडीव धनुष्याची प्रत्यंचा तोडून टाकली ! त्याचें ते अद्भुत कर्म पाहून सर्वांनी त्याची वाहवा केली; आणि द्रोण, भीष्म, पाहून कर्ण, कृप ह्या महारथांनीही 'शाब्बास ! शाबास ! म्हणून त्याच्या त्या कृत्याची प्रशंसा केली.
नंतर अश्वत्थाम्याने आपले श्रेष्ठ धनुष्य खेचून पुनः त्या पार्थाच्या छातीवर कंकपत्र बाणांनी प्रहार केला. मग महाबाहु अर्जुनाने मोठ्याने हसून घाईघाईनें आपल्या गांडीव धनुष्याला नेत्री प्रत्यंचा लावली; आणि अर्धचंद्राकृति वळण घेऊन, मत्त हत्तीशी भिडणाऱ्या मत्तगज पतीप्रमाणे तो अश्वत्थाम्याशी भिडला. तेव्हां अस्त्रदुनियेत विख्यात असलेल्या त्या दोघा वीरांचें त्या समरांगणांत अंगावर रोमांच उभे राहतील असे घनघोर युद्ध माजले. मस्ती आलेल्या हत्तीसारखे ते महावीर्यवान् वीर युद्ध करूं लागले असतां सर्व कौरव विस्मित होऊन त्यांच्याकडे पाहू लागले.
मग त्या पुरुषश्रेष्ठांनी रागानें जळत असलेले जणू सर्पच अशा सर्पाकार बाणांनी एकमेकांस प्रहार करण्यास सुरवात केली. महात्म्या पांडुपुत्राचे भाते अक्षय्य होते, यामुळे तो शूर कुंतीपुत्र रणांत पर्वताप्रमाणे अढळ उभा होता. परंतु युद्धात अतिशय त्वरेनें बाण फेकीत असल्यामुळे अश्वत्थाम्याचे बाण संपून गेले; तेव्हां अर्जुनाची त्यावर सरशी झाली असे दिसूं लागले. अश्वत्थामा पराजित होत आहे, हे पाहून कर्णाने आपले प्रचंड धनुष्य अगदी पुरापूर खेचून टणत्कार केला, तेव्हा मोठाच हाहाकार उडून गेला. तेव्हां जिकडून धनुष्याचा शब्द ऐकू येत होता तिकडे अर्जुनाने नजर फेकली, तो राधेय दृष्टीस पडला ! त्याला पाहतांच अर्जुनाचा क्रोध अधिकच वाढला; आणि क्रोधवश झालेला तो कुरुपुंगव अर्जुन कर्णाला ठार करण्याच्या इच्छेने त्याकडे डोळे वटारून पाहूं लागला.
अशा प्रकारें अर्जुन अश्वम्याच्या बाण मर्यादेंतून निघून कर्णाकडे वळल्याचें पाहताच हजारों वीर अर्जुनावर धावून आले; पण शत्रुजित् अर्जुनाने अश्वत्थाम्याचा नाद सोडून देऊन एकदम कर्णावरच चाल केली; आणि रागानें डोळे वटारत लालबुंद झालेला तो कुंतीपुत्र त्यावर धावून गेल्यानंतर, द्वैरथयुद्ध करण्याच्या इच्छेने त्याला अतिशय घालून पाडून बोलला.
अर्जुन म्हणाला - सुतपूत्रा कर्णा, “अर्जुन रणात माझी बरोबरी करण्यासारखा नाहीं” इत्यादि पुष्कळ प्रकारे आपल्याच तोंडाने जी तूं आपली प्रौढी सभेमध्ये मिरविलीस, ती खरी करून दाखविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. काही वेळा पूर्वीच तू पाठ दाखवून पळून गेलास, पुन्हा तुझ्याशी युद्ध करणे हे मला लांछनास्पद आहे तरीही मी तुला जिंकण्याची दुसरी संधी देतो, कर्णा, आज या महासमरांत माझ्याशी दोन हात केल्यानंतर आपला कमजोरपणा तुला चांगला कळून येईल; आणि मग तू कधीही अशा प्रकारे दुसऱ्याचा अवमान करण्याच्या भानगडीत पडणार नाहींस.
अरे, पळपुट्या धर्माचा उघड उघड त्याग करून तू पुष्कळ कठोर भाषणे केलीस खरी; पण तुला वाटते त्याप्रमाणे हे युद्धाचें काम तुझ्या हातून पूर्ण होईल असे मला काही वाटत नाहीं. हे राधेया, तुझा माझा हा सामना होण्यापूर्वी कौरवांजवळ ज्या कांहीं लांब लांब बाता तू झोडल्यास, त्या सर्व आज खऱ्या करून दाखव.
हे पहा दुष्ट कौरव पांचालीला सभेत आणून तिचा छळ करीत असतां ते तुं आनंदाने पहात बसला होतास, त्याचे आज तुला चांगलेच फल मिळेल. हे सुतपूत्रा, धर्मपाशाने जखडून गेल्यामुळे जो कोप मीं पूर्वी आवरून धरला होता, त्याचा विजय आज तू रणामध्ये पहा. हे दुर्मते, अरण्यामध्ये बारा वर्षे राहून जे कष्ट आम्ही सोसले, त्यांमुळे उत्पन्न झालेल्या क्रोधाचें फल आजच तुला मिळेल. हं, कर्णा, चल ये, होऊ दे तुझे माझे दोन हात; आणि पाहू दे तुझ्या या सर्व कौरवसैनिकांना ती मजा !
यावर कर्ण उसने अवसान आणून म्हणाला, पार्था, तू तोंडानें जेवढे बडबडत आहेस. तेवढे खरे करून दाखव ' करणे थोडे आणि मचमच फार !' अशी जी म्हण आहे, तशातलीच तुझी गोष्ट आहे. कारण, पूर्वी जे जे तूं सहन केलेस, ते तूं निर्बल होतास म्हणून! पण आज जर तुझा काही पराक्रम दिसून आला, तर मग आम्ही तुझे म्हणणे कबूल करूं. धर्मपाशाने जखडल्यामुळे पूर्वी सहन केले असे तुं म्हणतोस, पण आतां तरी तू मोकळा आहेस कोठे! आतांही तूं बद्धच असून मी मोकळा आहे असे उगीच समजत आहेस ! ठरल्याप्रमाणे जर तु अरण्यात राहिला आहेस,
तर अशा प्रकारे धर्मार्थपालन करण्यात कष्ट भोगलेला तू सांप्रत माझ्याशी युद्ध करू इच्छीत आहेस हे काय? पण, अर्जुना, माझी सारी भिस्त पराक्रमावर आहे; आणि तुझ्या कैवाराने प्रत्यक्ष इंद्र जरी रणांत माझ्याशी येऊन भिडला, तरी मला त्याची बिलकूल दिक्कत वाटणार नाही. अर्जुना, माझ्याशी सामना करण्याची ही बुद्धि नुकतीच तुला आठवली आहेसे वाटते ! बरे असो तुझे आमचे दोन हात होतील, आणि मग कळून येईल तुला आमचे सामर्थ्य !
अर्जुन म्हणतो: – अरे भेकडा! ! नुकताच तू रणातून पळून गेला होतास. आणि म्हणूनच तर वाचलास ! पण, कर्णा, तुझा धाकटा भाऊ तर केव्हांच यमाच्या भेटीस गेला ! आणि अशा प्रकारे स्वतः तोंड चुकवून आपल्या भावाचा घात करवूनही आतां सज्जनांना मोठमोठ्या बाता सांगणारा पुरुष तुझ्यावांचून दुसरा कोण सापडणार आहे ?
असे बोलतच तो अपराजित बीभत्सु कवच फोडून जाणारे बाण टाकीत टाकीत कर्णाजवळ येऊन ठेपला. तेव्हां मेघाप्रमाणे शरवृष्टि करणाऱ्या त्या अर्जुनाचा महारथी कर्णानेही मोठ्या आनंदाने उलट शर वृष्टीनेच सत्कार केला. नंतर चहुकडे भयंकर बाणांचे जाळे पसरून कर्णाने अर्जुनाच्या घोड्यांवर, बाहूंवर आणि हस्तकवचावरही पृथक पृथक बाण टाकून त्याला वेधले पण अर्जुनाला ते मुळीच सहन न होऊन त्याने उग्र टोकाच्या नतपर्व बाणाने कर्णाचा भाता लटकावण्याची दोरी तोडून टाकिली ! तेव्हा कर्णाने दुसऱ्या भात्यांतून बाण घेऊन अर्जुनाच्या हातावर वेध केला, त्यामुळे त्याची मूठ फुटून गेली ! मग महाबाहु पार्थानेही कर्णाचे धनुष्य तोडून टाकले; आणि त्यानें शक्ति सोडिली असतां तीही बाणांनीं फोडून टाकली !
तेव्हां कर्णाचे पुष्कळच पाठीराखे अर्जुनावर येऊन कोसळले; पण आपल्या गांडीव धनुष्यातून बाण सोडून अर्जुनानें त्या सर्वांना यमपुरीस पाठवले. नंतर आपले भारक्षम धनुष्य पुरापूर खेचून सोडलेल्या तीक्ष्ण बाणांनी अर्जुनानें त्याच्या घोड्यांना वेध केला, तेव्हां ते घोडेही मरून जमीनीवर पडले ! मग दुसरा एक महातेजस्वी लखलखीत तक्ष्ण बाण घेऊन अर्जुनाने कर्णाच्या छातीवर मारला, तो कर्णाचें कवच फोडून आंत खोल घुसला ! तेव्हां कर्णाला गाढ मूर्च्छा येऊन त्याला शुद्धबुद्ध उरली नाही !
असह्य वेदना त्याला सोसवतना, तेव्हां युद्ध सोडून तो उत्तर दिशेकडे पळून गेला ! हे पाहून अर्जुन व महारथी उत्तर हे मोठमोठ्याने आरोळ्या देऊ लागले !
वाचक हो अशाप्रकारे महारथी? कर्ण या युद्धात दुसऱ्यांदा पळून गेला.
क्रमशः
पुढची कथा पुढिल एकोणिसाव्या भागात
भाग 19👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/019-virat-parva-marathi-katha.html
आधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
भाग एक 001 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html
भाग दोन 002
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/002-virat-parva-marathi-katha.html
भाग तीन 003 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/003-virat-parva-marathi-katha.html
भाग एक 004 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/004-mahanubhav-panth-dnyansarita.html
भाग पाच 005
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/005-virat-parva-marathi-katha.html
भाग सात 006👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/006-virat-parva-marathi-katha.html
भाग 007 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/007-virat-parva-marathi-katha.html
भाग 011 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/011-virat-parva-marathi-katha.html
भाग 012 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/012-virat-parva-marathi-katha.html
भाग 13👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/012-virat-parva-marathi-katha_28.html
भाग 14👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/013-virat-parva-marathi-katha.html
भाग 15👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/015-virat-parva-marathi-katha.html
भाग 16👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/016-virat-parva-marathi-katha.html
भाग 17 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/017-virat-parva-marathi-katha.html
भाग 18👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/018-virat-parva-marathi-katha.html
भाग 20 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/020-virat-parva-marathi-katha.html
भाग 21👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/021-virat-parva-marathi-katha.html