श्रीमुरारिमल्ल विद्वांस महानुभाव महानुभाव पंथाचा इतिहास mahanubhav-panth-history

श्रीमुरारिमल्ल विद्वांस महानुभाव महानुभाव पंथाचा इतिहास mahanubhav-panth-history

महानुभाव पंथाचा इतिहास 

mahanubhav-panth-history

श्रीमुरारिमल्ल विद्वांस महानुभाव 



महात्मा मुरारी सुविद्वांस राजा । 

तपेची तपे घाली साहित्य काजा ।

असा संत शब्दे किती गौरवावा ।। 

नमस्कार या थोर महानुभावा ॥

महानुभाव पंथाचा होऊन गेलेल्या थोर आचार्यांपैकी एक महान आचार्य श्रीमुरारीमल्ल विद्वांसबास हे कवीश्वर शाळेचे थोर आचार्य होऊन गेले. 

आचार्य श्रीमुरारीमल्ल विद्वांस हे खानदेशातील बोधरागड (नाईकवाडी मोकाशी) येथील राहणारे होते. जन्मजातीने ते (क्षत्रिय) राजपूत होते. (हे पंथाचे पहिले क्षत्रिय आचार्य होत. त्या आधी सर्व आचार्य ब्राम्हण होते.) त्यांच्या वडिलाचे भाईदास हे नाव होते. त्यांना दोन पुत्र होते. त्यांची घरची परिस्थिती चांगली उत्तम होती. गावात ते श्रीमंत सुखवस्तू यजमान म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना कोणतीही खाण्यापिण्याची उणिव नव्हती. सर्वकाही सुरळीतपणे सुरू होते. 

एके दिवशी अचानक काहीतरी द्रव्य व्यवहारासंबंधित कारणावरून भाईदासाचे व त्यांच्या वडीलभावाचे भांडण झाले. भाईदास हे सत्याच्या मार्गाने चालणारे होते वडील भावाने केलेले खोटेनाटे त्यांना सहन झाले नाही. त्याच वेळी त्यांनी रागाच्या भरात पत्नीला न कळू देता आपल्या दोन्ही पुत्रांना घेऊन घर सोडले. यानंतर ते एका खेड्यांत येऊन राहिले. 

मग काही दिवसानंतर त्यांचे वडीलबंधू त्यांना नेण्यासाठी आले. त्यांनी यांना आर्जवपूर्वक विनंती केली. पण भाईदासांचा राग कमी झालेला नव्हता. भाईदासांनी घरी येण्याचे नाकारले. यामुळे वडीलबंधू निराश होऊन घरी परतले. यानंतर भाइदास आपल्या दोन्ही पुत्राना बरोबर घेऊन फिरत फिरत अडीच महिन्यानंतर वऱ्हाडातील रिद्धपूर क्षेत्राजवळील पळसवाड्यास येऊन राहिले. 

ते ज्यांच्या घरी राहिले, ते महानुभावपंथी नव्हते. पण धार्मिक वृत्तीचे असून महानुभावपंथाच्या संत महंताचा आदर सत्कार करीत असल्यामुळे त्यांच्या घरी महानुभाव मंडळीचे जाणे-येणे असे. सहाजिकच भाइदासाची व महानुभाव पंथातील लोकांशी ओळख झाली. त्यांच्या वारंवार महानुभाव पंथाच्या साधुंशी भेटी होऊ लागल्या. 

या साधुसंताच्या सहवासाने व त्याच्या उपदेशाने भाईदासाची त्यागवृत्ति बळावली. व त्यांना महानुभाव पंथात संन्यास घ्यावा असे वाटू लागले. असे असता त्या गावात मेहकरकर आम्नायाचा मठ होता. त्या मठात एक वृद्ध तपस्विनी आई रहात असे. त्यांच्या नावे भाइदासानी संन्यास घेतला. व आपल्या दोन्ही मुलांना त्या आईकडून धर्मोपदेश दिला. संन्यासानंतर भाईदासाचे नाव भानुदास (भानोबास) ठेवण्यात आले. 

मग काही दिवसांनी ते पळसवाड्याहून साळनिंभोऱ्यास आले. आणि एका श्रीमंत राजपुताच्या मळ्यात राहिले. मळेकरी हा राजपूत आणि हेही राजपूत असल्यामुळे तो भानुदासाच्या दूरच्या नातेवाईकापैकीच निघाला. त्यामुळे तो भानुदासावर अधिक प्रेम करू लागला. भानुदासाच्या वडील पुत्राने नुकताच तारुण्यात प्रवेश केला होता. त्याला ही संन्यास वृत्ती आवडेना. त्याची, गाणे, खेळ, तमाशा याकडे अधिक प्रवृत्ती होती. 

भानोबासांनी त्याला समजावण्याचा खुप प्रयत्न केला पण तो काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. संन्यास धर्मावरून त्याचे मन पार उडाले होते. शेवटी त्याने संन्यासवेष टाकून गृहस्थीवेष धारण केला. आणि पिंपरडोळी या गावी जावून एका देशमुखाच्या घरी राहिला. भानोबासांच्या चांगल्या प्रसिद्धीमुळे देशमुखाने त्याला ठेवून घेतले व तो त्याच्या घरचा (मुख्य दिवाण म्हणून ) कारभार पाहू लागला. 

पण तिथेही त्याचे नाचगाणे काही सुटत नव्हते. असे असता त्याने एका वंजाऱ्याच्या मुलीसी प्रेमविवाह केला. इतक्यावरच त्याती विषयवासना थांबली नाही तर तो देशमुखाच्या पत्नीशीही रत झाला. त्याचे ते उन्मत्त वर्तन पाहून देशमुखांनी त्यांना काही कामानिमित्ते डोगरांत नेऊन त्याचा वध केला. व मृतदेहास दऱ्यात फेकून दिले. ही भानुदासांच्या वडील मुलाची कथा होय. व्यथा होय.

आपल्या वडील पुत्राने संन्यासधर्म सोडल्यामुळे भानुदासांना अत्यंत वाईट वाटले. पण त्यांचा त्यात नाइलाज होता. वडील पुत्राप्रमाणे धाकटा पुत्र मुरारीमल्ल हाहि पण धर्मपतित होईल, अशी भानुदासांना भीती वाटू लागली. म्हणून ते त्याच्याविषयी काळजी घेऊ लागले. मुरारीमल्लास पंथीय ज्ञान मिळावे. आणि मिळाल्यास हा धर्म पतित होणार नाही असे भानुदासांना वाटत होते. 

तेवढ्यात परमेश्वर कृपेने श्रीचाहेबास विद्वांस हे आपल्या दोन शिष्यासह भानुदास जेथे रहात होते तेथे आले. भेटीनंतर श्रीचाहेबासांनी भानोबासांना ब्रम्हविद्या धार्मिक तत्त्वज्ञान सांगितले. त्यांच्या सदुपदेशामुळे भानुदास प्रभावित झाले व त्यांनी चाहे बासांचे शिष्यत्व अंगिकारले. इतकेच नव्हे तर श्रीमुरारीमल्लांना त्यांच्या नावे संन्यास दिला. त्यावेळी श्रीमुरारीमल्लांचे ८-९ वर्षाचे वय असेल, अशा वयात ते बालभिक्षुक झाले. यानंतर पितापुत्र, श्रीचाहेबासाच्या सान्निध्यात राहू लागले.

श्रीचाहेबासांच्या सान्निध्यात असताना मुरारीमल्लांनी पंथीय शास्त्र अभ्यासण्यास सुरूवात केली. मुरारीमल्ल हे अत्यंत बुद्धिमान असल्यामुळे त्यांना ब्रह्मविद्याशास्त्र अवगत होण्यास फार अवधि लागला नाही. ते ब्रह्मविद्याशास्त्रात प्रवीण झाले. यापेक्षाही अधिक शास्त्रांचा अभ्यास करावा अशी त्यांची उत्कंठा होती. पण परमेश्वराची प्रवृत्ती काही वेगळीच होती. त्याच काळात श्रीगुरु चाहेबासांचे देहावसान झाले. त्यावेळी मुरारीमल्लांचे २० वर्षाचे वय होते. 

श्रीचाहेबासानंतर त्यांचे परमस्नेही कारंजेकर घराण्यातील गुरव एल्होबास यांच्याकडे मुरारीमल्ल गेले, व त्यांच्याजवळ काही दिवस राहून त्यांच्याकडून शास्त्रश्रवण केले. मुरारीमल्लाची बुद्धी तीव्र व तर्कप्रधान असल्यामुळे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर, गुरव एल्हेराजांना देता येईना. तेव्हा ते यांना घेऊन कपाटे श्रीनागराजव्यासांकडे पैठणला गेले. 

गुरव एल्हेराज श्रीनागराजव्यासांना म्हणाले, 'मुरारी मल्लाची वृत्ती धार्मिक व यांना शास्त्र श्रवणाची उत्कंठा असल्यामुळे तुम्ही यांची परीक्षा न पाहता शास्त्र सांगावे.' यानंतर यांच्या विनंतीवरून कपाटे श्रीनागराजव्यासांनी मुरारीमलांची थोडीशी परिक्षा घेऊन त्यांना मनोधर्मपूर्वक शास्त्र सांगण्यास आरंभ केला.

थोड्याच काळात श्रीमुरारीमल्लबासांनी सकळ ब्रम्हविद्या शास्त्र अभ्यासले. अभ्यासानंतर कपाटे श्रीनागराजबासांनी त्यांना एकांकी जाऊन अटन, विजन, करीत स्मरणानुष्ठान करण्याचे सांगितले. त्या प्रमाणे ते असतिपरीचे आचरण करू लागले. असे असता कोणी अभ्यासू त्यांच्याजवळ आला तर, त्यास ते शास्त्र सांगत असत. हे पाहून एका भिक्षुकाने श्रीनागराजबासांना तुमचे शिष्य मुरारीमल्ल कोणालाहि शास्त्र सांगतात. कोणासमोरही ब्रह्मविद्येचे शास्त्र भांडार फोडत आहेत. तवं श्रीकृष्णरावो म्हणे उद्धवदेवा : हा ज्ञानरत्नाचा ठेवा : भलतेया हाती नेदावा : अधिकारेविन ।। या भगवंताच्या उक्तीप्रमाणे ते वागत नाही. असे सांगितले. 

हे ऐकून श्री नागराजव्यासांना असंतोष वाटला. मग काही दिवसांनी श्रीमुरारीमल्ल हे श्रीनागराजव्यासाच्या भेटीस आले. तेव्हा एकमेकांनी आपली क्षेमवार्ता सांगितली. यामुळे श्रीनागराजबासाना मुरारीमल्लाविषयी आलेले किल्मिष निघून गेले. या नंतर श्रीनागराजबासांनी मुरारीमल्लांनी ३ नियम सांगितले. १) कोणतीही स्त्री धर्मरूप जरी असली तरी तिच्याकडून सेवा करून घेऊ नको. २) अनधिकारी पुरुषास शास्त्र सांगू नको. ३) भगवे वस्त्र नेसू नको. हे तीन नियम देह असेपर्यंत पालन करावयास सांगितले. मग त्यांनी राखाडी रंगाचे वस्त्र परिधान केले. 

मग तेथे काही दिवस राहून ते एकांकी तपश्चर्या करण्याकरिता निघून गेले. तिकडे असताना त्यांनी दानस्थळ प्रमेय नावाचा ग्रंथ लिहिला. श्रीगुरुजींना भेटून हा ग्रंथ दाखवावा, या हेतूने ते गुरूंच्या भेटीस निघाले, पण मध्यंतरी मार्ग आक्रमत असताना श्रीगुरुजींचा देहान्त पुणे जवळील चाकण येथे झाला. असे धर्मोपदेशीयाकडून समजले. ते ऐकून त्यांचे मन उदासले व तेथूनच ते परत डोंगरात तपश्चर्या करण्यास निघून गेले. 

यानंतर कपाटे श्रीनागराजबासाचे गृहस्थी शिष्य मुधोपंत नगरकर यांचे बोलावणे आले असल्यामुळे ते नगरला आले. मुधोपंतांनी त्यांच्याशी शास्त्रीय चर्चा केली. यातून सिद्धांत सार नवनीत निर्माण झाले. म्हणून मुधोपंताचे मन प्रसन्न झाले व त्यांनी श्रीमुरारीमल्लाना काही दिवस ठेवून घेतले. या काळात मुरारीमल्लांनी संस्कृत व्याकरण सारस्वताचा थोडासा अभ्यास केला. 

त्यानंतर ते नाशिक भागात गेले. तेव्हा त्यांनी मूर्तीज्ञान प्रमेय लिहिले. पुनश्च मुधोपंताचे आग्रहपूर्वक बोलावणे आल्यामुळे ते नगरला आले. तेथे असताना पाटोदेकर भानुदास मुरारीमल्लाच्या भेटीस आले. भेटी अंती यांना विनंतीपूर्वक म्हणाले, 'तुमच्याविना कवीश्वरकुळ पोरके झाले आहे. तर तुम्ही त्यांना भेटावे.' मग त्यांच्या विनंतीस मान देऊन ते नगर जिल्ह्यातील 'चिचोंडी' या गावी आले. 

तेथे दीड हजार भिक्षुमंडळी जमली होती. अशावेळी विद्वांसानी आपले विद्यागुरु कारंजेकर गुरव एल्हेराज यांना बोलावून घेतले, व सन्मानपूर्वक भेटले. शास्त्रचर्चा मंथन झाले. यानंतर कवीश्वर शाळेच्या मंडळींनी विचार विनिमय करून एक शुभमुहूर्त पाहिला, व मुरारीमल्ल विद्वांसाना कविश्वर आचार्य गादीवर प्रतिष्ठित केले.याप्रसंगी धावंडकर, श्रीगोविंदराज दुतोंडे व त. रेखाइसा आई कुरुंदकर यांनी अन्नदानासाठी बावीस शते सुवर्णमुद्रा खर्च केल्या. अशारितीने हा आचार्य स्थापनेचा शुभमंगलकाळ आनंदाने पार पडला.

यानंतर श्रीविद्वांस हे काही दिवस चिचोंडीस राहून पैठणला आले. यावेळी यांची व उपाध्ये आचार्य श्रीसंतराजबास बिडकराची भेट झाली. येथेही पुष्कळ भिक्षुवर्ग जमला होता. हे विशाल समुदायाचे संतसंमेलन आनंदाने पार पडले. यानंतर हे दोन्ही आचार्य (श्रीविद्वांस व श्रीसंतराजबास) आपापल्या मार्गमंडळीसहित सातारा भागात गेले. तिकडे एक वर्षाचा काल व्यतीत केला. 

मग गोवर्धन येथील जैत माळीपाटील यांच्या आग्रहावरून क्रमवशे मुक्काम करीत करीत गोवर्धन येथे येऊन राहिले. यानंतर पुढील वर्षी दुष्काळ पडला. मग कोठे तरी राहून दुष्काळाचे दिवस काढावे, या हेतुने तेथून निघून पावसाळा येण्यापूर्वी पुणतांब्यास आले. तेथील धर्मोपदेशी यजमानाने चातुर्मासाकरीता ठेवून घेतले. 

परंतु हे दिवस त्यांना फार त्रासाचे गेले. चातुर्मास देणारा यजमान श्रीमंत नव्हता. आणि श्रीविद्वांसमहानुभावाजवळही द्रव्य संचय नव्हता. दुष्काळ असल्याने भिक्षाही होत नव्हती यामुळे मंडळींना अन्न पिडेचा त्रास सोसावा लागत होता. हे पाहून श्रीविद्वासबासांना अत्यंत वाईट वाटत असे. पण यात त्यांचा नाइलाज होता. हे पावसाळ्याचे दिवस श्रीविद्वांसबासांनी व शिष्य मंडळींनी अल्प आहार घेऊनच काढले. असे किती दिवस काढावे म्हणून विद्वांसांनी आपल्या सान्निध्यातील दोन भिक्षुकांना खान्देशातील 'वीरवाडे' यागावी कुकाई पाटलीनकडे पाठविले. ही बाई अत्यंत धार्मिक, श्रीमंत असून पंथानुयायी होती. 

तिने आलेल्या भिक्षूंना पुष्कळशे द्रव्य देऊन पाठविले. त्यांनी ते सावधपणे गोधडांमध्ये शिवून श्रीविद्वांस महानुभावाजवळ आणून दिले. यामुळे हे दुष्काळाच्या संकटातून मुक्त झाले. अशा समयी एक ज्योतिषाचार्य विद्वासांकडे आले. आणि म्हणाले, 'तुम्ही सिन्नरला जा ! तेथे तुम्हाला लाभ होईल' याप्रमाणे श्रीविद्वांस आपल्या मंडळीसह सिन्नरास गेले. तेव्हा गुजरात मधील धर्मोपदेशी श्रीमंतबाई स्थान नमस करण्याकरिता सिन्नरला आली होती. तिने यांना बरेचसे द्रव्य दिले. ते द्रव्यही विद्वासांनी साधू मंडळीकरिता अन्नदानात खर्च केले.

यानंतर हे कुकाई पाटलीनच्या गावी गेले. त्या बाईने यांना चातुर्मासाकरता ठेवून घेतले. या दिवसात या बाईला ब्रह्मविद्या शास्त्राचे ज्ञान करून नित्यपाठाकरिता प्रसादसेवा व मूर्तिज्ञानाचे भाष्य लिहून दिले. मग तेथून ते भडेगावास आले.

येथे असता मुरारीमल्लाना 'खुप मोठा संत झाला आहेस पण तुझे सात वर्षे आयुष्य राहिले.' असे स्वप्न पडले. पण त्यांनी त्याचा खेद न मानता ते समाधानपूर्वक राहिले. या नंतर श्रीविद्वांस आपल्या मंडळीसह खान्देशातून क्रमवशे मुक्काम करीत करीत वऱ्हाडातील आखदवाडा या गावी आले. येथे बरेच दिवस राहिले. 

त्यावेळी श्रीसंतराजबास बिडकर ऋद्धिपुरात होते. त्यांच्या भेटीसाठी श्री विद्वांस आपल्या मंडळीसह ऋद्धिपुरात आले. तेव्हा श्रीसंतराजव्यासांनी महान् सत्कार करून मिष्टान्न पदार्थाचे भोजन दिले. सत्कारानंतर शास्त्रीय चर्चा झाली ही चर्चा मुख्यतः उपाध्ये व कविश्वराच्या तत्वज्ञानावर अपूर्व अशी करण्यात आली. हा दोघाचा भेटकाळ (संतसम्मेलन) अपूर्व व अखेरचा होता. यात कांहीच उणीव न पडता हा सोहळा आनंदाने पार पडला. 

रिद्धपुरचा भेटकाळ आटोपून श्रीविद्धांस आखादवाड्यास आले. तेव्हा तेथील यजमान नागोबा देशमुख यांनी श्रीविद्वांसांना आयुष्य पर्यंत रहाण्याचा आग्रह केला. त्यांच्या आग्रहावरून त्यांनी आपले शेवटचे दिवस तेथेच घालविले. श्रीविद्वांस महानुभावांचा रंग गोरा, अगकांती सतेज, व सडपातळ तसेच रूबाबदार चेहरा, आणि वक्तृत्व चांगले होते. यामुळे श्रोते मंडळीवर त्यांचा प्रभाव पडे. त्यांची पुष्कळसे गृहस्थी शिष्ये झाली. त्यापैकी २१ शिष्यांनी संन्यास घेतला. संन्यास घेतलेल्या शिष्यापैकी गोपदाये, कृष्णराज, गोविंदराज, हे तीन प्रमुख होते. आणि पंथातील हजारेक लोक नेहमी त्यांच्या सान्निध्यात राहून शास्त्राभ्यास करीत. 

श्रीमुरारिमल्ल विद्वांस महानुभाव यांनी आपल्या आयुष्यात अनेक गद्य आणि पद्य ग्रंथांचीनिर्मिती केली आहे. त्या ग्रंथाची नावे पुढीलप्रमाणे :- 

१) दानस्थळ 

२) उद्धरण असतिपरी प्रमेय 

३) निर्वचन असतिपरी प्रमेय 

४) मूर्तिज्ञान प्रमेय

५) महावाक्य असतिपरी प्रमेय 

६) साध्यपट 

७) काकुस्थळ

 ८) रजस्तमाची कारणे यावर विश्लेषण 

९) प्रतिष्ठान वर्णन काव्यग्रंथ 

१०) अर्थवचनाच्या माळिका स्थळ

११) महावाक्यप्रमेय 

१२ ) विद्यासार 

१३) संसरण 

१४) कल्पद्रुमाची असतिपरी 

१५) प्रसादसेवा 

१६) दृष्टांताची टीका (दृष्टांत मालिका) 

१७) चौकडीचा निबंध 

१८) विचारस्थळ असतिपरी 

१९) माळेकाराचा दृष्टांत 

२०) वर्तविहाराची असतिपरी 

२१) विदेह प्रबोध काव्यग्रंथ 

२२) ज्ञानचंद्रिकागद्य  

२३) झोळीचा गुढा 

२४) युगधर्म प्रमेय 

२५) विद्यामार्ग प्रमेय 

२६) भागवत एकादश स्कंधाची टीका 

२७) श्रीमद्भगवग्दीतेची टीका 

२८) तीन स्थळाची लापिका 

२९ ) वचनानुरूप दृष्टांत 

३०) सरोळे 

३१) ऐश्वर्यांचा बंध 

३२) मूळसंसरण 

३३) माहूर असतिपरी  

३४) स्मरणबंध 

३५) पूर्वी प्रकरणाचे व्याख्यान 

३६) धाकुटी मूर्तिज्ञान 

३७) एका पानाची प्रसाद सेवा. 

या वेगळे श्रीचक्रधरस्वामीचे एकांक, पूवार्ध उत्तरार्ध चरित्रे व श्रीगोविंदप्रभुचे चरित्र याचे संशोधन करून एक नवा पाठ लिहिला. तसेच बल्होपाठाचे संशोधन करून नवे पुस्तक लिहिले. स्मृतीस्थळ शोधून लिहिले. या प्रकारे त्यांनी लेखनाचे दुर्घट काम अत्यंत परिश्रम घेऊन केले. या कार्यांविषयी श्रीविद्वांसबाबांची प्रशंसा जितकी करावी, ती अपुरीच पडणार आहे. अशा महान पुरुषाचे देहावसान आखदवाडा येथे झाले. 

हे त्यांचे अति संक्षिप्त चरित्र आम्ही इथे मांडले त्यांचे विस्तृत चरित्र अन्वयस्थळ या ग्रंथात आलेले आहे तसं पाहायला गेले तर तेही संक्षिप्तच आहे. अन्वयस्थळातले त्यांचे चरित्र वाचताना आपल्या लक्षात येते की ते अति थोर महापात्र महानुभाव होते. 

अशा थोर महापात्र महानुभावांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम 

=========

असेच थोर महानुभावांचे चरित्र वाचण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा 

श्रीबाइदेवव्यास👇

श्रीनरेन्द्रव्यास👇

श्रीलुखाइसे बाबुळगावकर👇

श्रीआनेराज व्यास👇

श्रीकवीश्वरव्यास👇

श्रीमुरारिमल्ल विद्वांस महानुभाव 👇

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post