मधुर वाणी हाच मनुष्याचा अलंकार
नीती शतक सुभाषित
neeti shatak subhashit
भर्तृहरी मुळ संस्कृत श्लोक
केयूरा न विभूषयन्ति पुरुषं हारा न चन्द्रोज्ज्वला ।
न स्नानं, न विलेपनं, न कुसुमं, नालङ्कृता मूर्धजा: ।
वाण्येका समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते ।
क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वागभूषणं भूषणम् ॥२०॥
~ नीतीशतक.
ल. गो. विंझे मराठी श्लोक
शोभा देति न हार शुभ्रहि, न वा केयूरही मानवा न स्नानें, न विलेपनें, न कुसुमें, शृंगारिले केस वा । वाणी संस्कृतियुक्त एकच नरा शोभा खरी देतसे वाणी हीच अपूर्व भूषण सदा, नाशा दुर्जे जातसे ॥ २० ॥
--------
वामनपंडित मराठी अनुवाद
वसंततिलका
सद्रत्न- हार, मणि ताइत बाहुदंडी ।
कीं स्नान, चंदन, फुलें अणि लांब शेंडी ॥
यांनीं खरी न घडते पुरुषास शोभा ।
बाणीच भूषण सुशिक्षित-शब्दगर्भा ॥२०।।
अर्थ :-
ना केयूर (बाजूबंद), ना चन्द्रासमान उज्ज्वल तेज असणारे मोत्यांचे हार, ना (अभ्यंग) स्नान, ना चंदनादी सुगंधी लेप ना फुले, ना डोक्यावरील केसांची अभूषणयुक्त सुशोभित रचना, यापैकी कशानेही मनुष्य शोभून दिसत नाही, कशानेही माणसाला सुंदरता लाभत नाही. माणसाने धारण केलेली सुशील, शुद्ध, सुसंस्कारयुक्त वाणी हाच एकच माणसाचा एकमेव अलंकार होय. अहो इतर सर्व अलंकार कालांतराने क्षीण होतात, झिजून जातात परंतु माणसाचा खरा अलंकार असलेले सुसंस्कृत वाणीचे आभूषण सदैव तुम्हाला भूषणावह ठरेल. वाणी हाच सर्वोत्तम अलंकार होय.
शास्त्रीबुवा पेशव्यांच्या सभेत बसू लागले. त्यांची विद्वत्ता पाहून इतर मोठ्या मोठ्या सरदार दरकदारांप्रमाणे त्यांचेही आसन पेशव्यांच्याजवळ मांडले जाऊ लागले. पेशवे स्वारी आणि बहाद्दूर सरदार यांच्या अंगावर जडजवाहीर झगमगत असायचे, पण शास्त्रीबुवांची वेषभूषा तपस्वी ब्राह्मणाची होती. एखाद्या वेळेस पेशव्यांनी सल्ला विचारला असता ते बोलू लागले की शास्त्रीबुवांच्या वाग्भूषणाचा सर्वांना परिचय व्हायचा. 'वाग्भूषणं भूषणं' हे वचन त्या वेळी सार्थ प्रत्ययास येई.
टीप-
वागभूषणं भूषणम्। ही उक्ती नीतीशतकाच्या वरील श्लोकातून आपल्याला प्राप्त झाली आहे.
'शब्दसुंदर वाणी हाच माणसाचा खरा दागिना होय.'
नीतीशतकातच एका श्लोकामध्ये विद्वान व्यक्तीचे वैशिष्ट्य सांगताना शास्त्रोपस्कृत शब्दसुंदर गिरः शिष्यप्रदेयागमा असा शब्दप्रयोग केला गेला आहे. शिष्यांना ज्ञान देणारी शास्त्रज्ञानाने सुसंकृत वाणी ज्यांच्याकडे असते ते विद्वान. असा अर्थ वरील असलेल्या ओळीतुनही सुसंकृत वाणी हा विद्वानाचा अलंकार आहे हेच सांगितले गेले आहे.
कदाचित आजच्या श्लोकातील अर्थावर काही मतभेदही असू शकतील. पु. ल. देशपांड्यांनी देखील 'ती फुलराणी' या नाटकामध्येही शुद्ध आणि अशुद्ध बोलण्यावरून माणसा माणसामधला फरक दाखवला आहे. या श्लोकातून तसाही अर्थ घेता येऊ शकतो. पण या श्लोकातला 'वाणी' ह्या शब्दाचा अर्थ 'ज्ञानयुक्त वाणी' 'संस्कारयुक्त वाणी' असा आहे समजून श्लोक पाहिला, तर माणसाकडे विद्या/ज्ञान असेल तरच अर्थ, तेच खरं भूषण असा अर्थ निघतो.
सुसंस्कृत, ज्ञानयुक्त, विनम्र वाणी हाच माणसाला शोभणारा सर्वोत्तम दागिना आहे असे सांगणारे अनेक श्लोक व सुभाषिते संस्कृत मधे आहेत.
उदाहरणादाखल भवभूती लिखित उत्तर रामचरित नाटकाच्या पाचव्या अंकातील एक श्लोक पाहूया,
कामान् दुग्धे विप्रकर्षत्यलक्ष्मी कीर्तिं सूते दुष्कृतं या हिनस्ति।
शुद्धां शान्तां मातरं मङ्गलानां धेनुं धीरा: सूनृतां वाचमाहु:॥
~ उत्तररामचरित.
इच्छांचे दोहन करणाऱ्या, कामनारुपी दूध देणाऱ्या, मनोरथ पूर्ण करणाऱ्या, अलक्ष्मीला (अकल्याणाला) दूर करणाऱ्या, कीर्तीला जन्म देणाऱ्या (कीर्तीदायक), पापांचा नाश करणाऱ्या, अतिशय शुद्ध आणि शांतीदायक असणार्या, मांगल्याची माता असणाऱ्या वाणीला धीर आणि बुद्धिमान व्यक्ती कामधेनू असं विशेषण देतात. कामधेनू जशाप्रकारे इच्छिलेले सर्वकाही देते त्याचप्रकारे ज्ञानपूर्ण आणि सुसंकृत वाणी देखील इच्छित वस्तूंची प्राप्ती करून देणारी असते हे वरील श्लोकातून भवभूतीनेही सांगितले आहे.
श्रीमद्भागवतपुराणामधल्या गोपीगीतामध्ये गोपिकांनीही श्रीकृष्णाचे स्तवन करताना “मधुरया गिरा वल्गुवाक्यया” ज्याची वाणी मधुर आहे आणि ज्याच्या मुखातील वाक्यही मनोहर आहेत असे म्हटले आहे. मधुर शब्दांनी सुसंस्कृत वाणी हे मनुष्याचे भूषण आहे हेच गोपिकांच्या या स्तवनातूनही दिसून येते.
म्हणूनच ज्ञानसंपन्न आणि सुसंकृत वाणी खरोखरच मनुष्याचा सर्वात सुंदर असा दागिना आहे.
'वागभूषणं भूषणम्।'
सर्व जगाचे आपल्याकडे लक्ष असावे. इतरांनी आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी ही प्रत्येकाची स्वाभाविक इच्छा असते. मी सुंदर दिसावे, आकर्षक असावे, अशीही नैसर्गिक ऊर्मी सगळ्यांच्या ठिकाणी असतेच. त्याचकरिता वेषभूषा, केशभूषा, दागिने इत्यादी विविध बाबींचा लोक आपापल्या क्षमतेनुसार वापरही करतात. मात्र, व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वास खरा निखार यापैकी कशानेही येत नाही.
केयूर अर्थात बाहुभूषणांनी माणसाला खरी शोभा येत नाही. चंद्राप्रमाणे चमकदार मोत्यांच्या माळांनीही तो शोभत नाही. संस्कृत भाषेत हार म्हणजे मोत्याची माळ. त्या कितीही सुंदर असल्या व त्याने घालणाराही सुंदर दिसत असला, तरी ते शाश्वत सौंदर्य नाही. स्नान, विलेपन, पुष्पमाला वा सजविलेले केस या सगळ्यांची देखील तीच अवस्था. यापैकी कशानेही खरी शोभा येत नाही. कारण, या बाबी विशिष्ट परिस्थितीतच बऱ्या वाटतात. वयाच्या ८० वर्षी मोत्याच्या माळा घातल्या तर? उटी लावली तर? हातच जिथे लटलटता तिथे बाहुभूषणे कुठे लटकवणार? मग माणसाने सौंदर्यार्थ काय करावे? कविवर्य म्हणतात, एकटी सुसंस्कारित वाणीच माणसाला अलंकृत करते. ती वय, देश, काल इत्यादी सर्वच बाबतीत सर्वदा अलंकारच ठरते. अन्य सर्व अलंकार हे क्षयशील आहेत, अर्थात ते झिजत राहतात. मात्र, वाणी हा असा दागिना आहे जो सदैव उज्ज्वलच असतो. कमी तर होतच नाही, उलट वाढतच राहतो.