महानुभाव पंथीय इतिहास श्रृंखला
Mahanubhav panth history
पुर्वजांचा पवित्र पावन इतिहास
थोर महापात्र
महानुभाव पंथाचे तृतीय आचार्य श्रीकविश्वरव्यास
महानुभाव पंथाचे तृतीय आचार्य कविश्वरव्यासाचे मूळ नाव बोरीकर भास्करभट होते. हे बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील बोरी या गावचे रहाणारे होते. त्यांचे पूर्वाश्रमीचे गुरु केशवाचार्य होते. ते कळंकी नावाचा एक देवताभक्तीचा पंथ त्याचे प्रमुख होते.
एकदा श्रीभास्करभटांना श्रीनागदेवाचायचे दर्शन झाले. काही शास्त्रीय चर्चा झाली. त्यात श्रीनागदेवाचार्यांनी त्यांना पराभूत केले. भास्करभट्टांना आचार्यांविषयी आवडी संचारली. त्यांनी श्रीनागदेवाचार्यांजवळून धर्मोपदेश घेवून संन्यास घेतला. आणि त्यांच्याजवळच राहू लागले.
श्रीभास्करभट उर्फ श्रीकवीश्वरव्यास थोर प्रकांड पंडित होते. ते संस्कृत व मराठी काव्य करीत असत. आकाशात वर फेकलेला निंबु खाली येईपर्यंत एक संस्कृत श्लोक रचत असत. इतकी प्रचंड दांडगी प्रतिभा त्यांची होती. म्हणून श्रीनागदेवाचार्य हे श्रीभास्करभटांना भटाला 'कविश्वर', भटो, या नावाने संबोधित असत. तसेच श्रीबाईदेवव्यास आणि त्यांच्या सान्निध्यातील गुरुकुळ बोरीकरांना ! भटो या नावाने संबोधित असत.
श्रीकवीश्वरव्यास रूपाने अतिशय सुंदर व दैवी संपन्न होते. त्यांचा तो राजबिंड पिंड पाहून आचार्यांनी त्यांना सदऱ्याची शिलाई बाहेर ठेवून उलटा सदरा घालण्याची आज्ञा केली होती. त्यामुळे तरी निदान हा थोडाफार कुरूप दिसून याचे धर्मरक्षण होईल हा उदात्त हेतू त्या आज्ञेत होता. परंतू अंगातील वस्त्र उलटे घातल्यानेही ते सुंदर दिसत असत.
श्रीकवीश्वरव्यास जसे सुंदर होते तसेच ते महान विद्वानही होते. त्यांना विशेषतः संस्कृत भाषेचा आणि इतर साहित्याचा विशाल व्यासंग होता. पंथात प्रविष्ट झाल्यानंतर अन्यपंथीय विद्वानांशी वाद करून त्यांचा पराभव करणे हा त्यांच्या हातचा मळ होता.
असेच एकदा ते झोळी प्रक्षालण करणासाठी नदीवर गेले. तेथे त्यांना त्यांचे पूर्वाश्रमीचे गुरू केशवाचार्य भेटले. आणि तिथेच शास्त्र चर्चा सुरू झाली त्यात त्यांनी काही क्षणातच केशवाचार्याला निरुत्तर केले. व आचार्यांजवळ संन्यास घेण्यासाठी आणले पण तो अनधिकारी होता म्हणून काही दिवसांनी तो परत आपल्या स्वस्थळी गेला.
उत्तरापथावरून प्रत्येक राज्यातील प्रत्येक नगरातील विद्वानांना निरुत्तर करीत शास्त्र चर्चेत पराभूत करीत पैठण येथे आलेला एका विद्वानाला त्यांनी निरुत्तर करून सोडले. व त्याचा गर्वहरण केला. एकाच श्लोकाचे वेगवेगळे दहा अर्थ करून त्यांनी त्या विद्वानाला त्याची लायकी दाखवली होती. शेवटी तो श्रीकवीश्वरव्यासांना नमस्कार करून नम्रपणे म्हणाला, “आपण साक्षात् देवतेचे अवतार आहात, माझा गर्व हरण्यासाठी प्रकट झालेले आहात.” यावर श्रीकवीश्वरव्यासांनी तितक्याच नम्रतेने उत्तर दिले, “मी कोणी देवता नाही, मी महानुभाव पंथाचे आचार्य वेधवंती श्रीनागदेवभटांचा शिष्य आहे.” असे तत्काळ संस्कृत श्लोक रचून उत्तर दिले. यावरून ते नसुद्धे पढोक पंडित नव्हते तर ते वादविवादातही कुशल होते. याशिवाय त्यांच्या ठिकाणी धर्मचर्चा मंथन करण्याचे थोर बुद्धिसामर्थ्य व उत्तम वक्तृत्वही होते.
कविश्वरव्यास वक्तृत्व करू लागले म्हणजे ते असा रस निर्माण करत की, श्रोते स्वतःचे देहभान विसरत असत. एकदा निंबा या गावी गोदावरीच्या तीरी श्रीमद् भागवत कथा सांगताना त्यांनी असामान्य भक्तीरस प्रकट केला पूर्ण गावच वेधून घेतले, शेतात जाताना डोक्यावर आऊत घेतलेले शेतकरीही वेधले आणि कथामृत ऐकू लागले, नदीवर पाणी भरण्यासाठी आलेल्या स्त्रिया यांच्या डोक्यावर पाण्याचे हंडे अशाच अवस्थेत त्या उभे राहून पुराण ऐकू लागल्या, याप्रकारे सर्वच वेधले. कोणी तरी ही गोष्ट आचार्यांना जाऊन सांगितली तेव्हा आचार्यांनी त्यांना बोलावून घेतले आणि “तुला भागवत सांगण्याची इतकी आवडीचा हे तर माझ्यासमोर भागवत कथा व्याख्यान कर अशी आज्ञा केली.” मग त्यांनी आचार्य समोर श्रीमद्भागवत कथेचे व्याख्यान केले. त्यांच्या या रसिपणाला कवित्वाची जोड मिळाली होती.
विद्वानांशी चर्चा करतेवेळेस किया अन्य प्रसंगी ते ताबडतोब श्लोक रचना करून त्यांना आश्चर्यचकित करून सोडीत. असे हे श्रीकविश्वरव्यास हे अत्यंत श्रेष्ठ विद्वान होते. आचार्याच्या सर्व शिष्यात यांच्यासारखे कोणीही काव्य करणारे नव्हते. यांची कविता श्रृंगार रसयुक्त असल्यामुळे आचार्य त्यांना 'श्रृंगारिया कवि' असे म्हणत असत.
श्रीनागदेवाचार्यांच्या देवदर्शनाला गेल्यानंतर आचार्यपदाचा मान श्रीबाईदेवव्यासांना मिळाला. ते तीन वर्ष आचार्य पदावर होते नंतर तेही देवदर्शनाला गेले. मग नंतर सर्वांनी मिळून श्रीकविश्वरव्यासांनाच आचार्यपदी प्रतिष्ठीत केले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत व श्रीभटोबासाच्या विद्यमान काळात 'शिशुपालवध' आणि 'श्रीउद्धवगीता' हे दोन मराठी महाकाव्य रचले. ज्ञानेश्वरीच्या समकालीन या काव्यांची रचना आहे. नंतर संस्कृत भाषेत त्यांनी नरविलाप स्तोत्र, श्रीयाष्टक, चालिसाख्य स्तोत्र, इत्यादी अनेक काव्यांची रचना केली.
त्यानंतर पंथीय तत्वज्ञानाचा तुरकांच्या धाडीत गेलेला सुत्रपाठ श्रीकवीश्वरव्यासांना मुखोद्गत होता. त्यांनी तो पुन्हा यथाप्रति लिहून काढला. व पंथीय विद्यार्थ्यांना पाठांतरासाठी उपलब्ध करून दिला. अशा अन्वय संबंध लावण्याचे महत्वाचे कार्य केले. श्री कविश्वरव्यासांकडे पंथाचे आचार्यत्व होते. तरी त्यांनी एके ठिकाणी राहून त्यांनी मार्ग चालविला नाही. ते सतत फिरस्तीवर अटणक्रमे रहात असत.
त्यांनी आपल्या आयुष्याचे दिवस विशेषेकरून अटण क्रम (एकांक फिरस्तीवर) करण्यात घालविले. अटण करीत असताना परमेश्वराच्या वियोगात मना इंद्रिया देहावर संयम करीत त्यांनी देह सुकवून टाकले होते. व एके ठिकाणी बाभळीच्या लहान झाडाखाली ते अशक्त होऊन पडले होते. तितक्यात दंते गोपाळबासांची भेट होऊन त्यांनी श्रीकवीश्वरव्यासांना पुन्हा परमार्गात आणले. इतकी उत्कृष्ट चर्या त्यांची होती.
दुष्काळात पुरंधराकडून चंदनवनाकडे गेलेल्या दंते गोपाळबासाचे देहावसान झाले. तेव्हा त्यांनी देहावसानापूर्वी गोपाळबासांनी एका दगडावर "येथे छिन्नस्थळी आसे" असे लिहून ठेवले होते तेथे श्रीकविश्वरव्यास गेले. व ती दगडाखालील छिन्नस्थळी घेऊन निघून आले. नंतर श्रीकवीश्वरव्यास उपाध्ये शाळेच्या आचार्य श्रीकमळाउसांना वाल्हा येथे येऊन भेटले. तेथे त्यांनी ती छिन्नस्थळी कमळाईसांना दिली. तो छिन्नस्थळीचा विशेष आता पाथरीकर महंतीत आहे.
त्याचप्रमाणे सत्रसंगी येथे मृत्यू पावलेल्या नात नागाइसेचा शोध करीत करीत तेथे गेले तेव्हा श्रीकविश्वरव्यासाना तेथे नागाईसांनी दगडाखाली ठेवलेली छिन्नस्थळी मिळाली. ते पाहून त्यांना फार दुःख झाले. तिथे त्यांनी नाती नागाईसांच्या स्तुतीपर एक संस्कृत श्लोक केला.
यानंतर श्रीकवीश्वरव्यासांनी आपल्या आयुष्यातील शेवटचे दिवस आष्टी येथे घालविले. असे हे अष्टपैलू विद्वान, पंथीयाचे द्वितीय आचार्य यांनी सुमारे १२४५ मध्ये आपला देह ठेवला.