अव्हेरणाचा दुष्परिणाम

अव्हेरणाचा दुष्परिणाम

 अव्हेरणाचा दुष्परिणाम



कळत नकळत आपण सभोवतालची परिस्थितीनुसार जे काही भिक्षु महात्म्यांचे अव्हेरण करतो त्यासंबंधित हे लेखन आहे. कळत नकळत आपल्याकडून किती मोठी चूक होते हे आपण या लेखात पाहू. 

काल मी आणि माझा उपदेशी मित्र औरंगाबादच्या बस स्टॉपवर उभे होतो. गाडीची वाट पाहताना गप्पा मारत आजूबाजूच्या स्थिती बद्दल बोलत होतो. मध्ये मध्ये धार्मिक विषयांबद्दलही आमचे बोलणे सुरु होते.

तितक्यात एक वैरागी भिक्षू महात्मे बस स्टॉप वर आले. आचरणाने कृश झालेले देह, त्यांच्या पायात चपला नव्हत्या. उन्हातून चालत आल्यामुळे चेहरा मलूल झालेला होता. साधारण गव्हाळ वर्णाने त्यांची अंगकांती शोभून दिसत होती. राखाडी रंगाचे कपडे डोक्यावर पंथीय टोपी, काखेत गवसणी. हातात मनगटी गळ्यात गाठी असा त्यांचा पेहराव होता. त्यांच्या देहावरचे वैराग्याचे तेज पाहून मला त्यांच्याविषयी आदर वाटला. मित्रही त्यांच्याकडे पाहत होता पण त्याच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव होते. त्यांना पाहिल्यावर तो थोडा संकोचल्या सारखा वाटला. दंडवत करावा की नाही अशा द्विधा मनस्थितीत तो असावा. 

ते पाहून मी मित्राला म्हणालो, “चल रे, बाबांना दंडवत करू”

 “तु जा, मी नाही येत” तो म्हणाला. 

मला त्याचे असले उत्तर ऐकून आश्चर्य वाटले. कारण स्थानाच्या ठिकाणी किंवा साधुसंतांच्या आश्रमात गेल्यावर सर्वांना भावपूर्वक दंडवत प्रणाम करणारा माझा मित्र आज चक्क दंडवत करण्यासाठी नकार देत होता. 

मी आश्चर्याने त्याला विचारले, “तू का येत नाहीस?” 

तो म्हणाला, “अरे हे वैरागी बाबा आहेत, इथे सगळे लोक आपल्याकडे पाहत आहेत. आपण जर यांना दंडवत केला तर सगळे आपल्यावर हसतील, आपल्याला नाव ठेवतील. म्हणून मी मनातूनच दंडवत करतो तू जा बाबा” 

“काल तर तू पैठणच्या बसस्टॉपवर त्या बाबांना दंडवत केला होता, मग यांना दंडवत करायला काय झालं?” मी जरा आवाज वाढवूनच विचारले.

त्यावर तो म्हणाला, “अरे त्या बाबांची कपडे किती चकाचक होते. ते उपाधिमंतही होते. यांचे कपडे पाहिले का तू? कसे आहेत? यांना दंडवत केला तर सगळे आपल्याकडे विचित्र नजरेने पाहतील किंवा हसतीलही म्हणून मी येत नाही.” 

मित्राच्या संकुचित बुद्धीचा मला मनातून खूपच राग आला. धर्माविषयी उदारतेने बोलणाऱ्या माझ्या मित्राचे धर्माचरण करणार्‍या साधुसंताविषयी विषयी किती संकुचित विचार आहेत. हे पाहून त्याबद्दल वाईट वाटले. 

मी तसाच त्याच्या जवळ निघालो व त्या वैरागी बाबांजवळ जाऊन त्यांना दंडवत केला. विचारपूस केली. ते तीर्थानुक्रमे अटण करत करत पैठणला जात होते. पण त्यांच्या बाटलीतले पाणी संपल्यामुळे पाणी घेण्यासाठी बसस्टॉपवर आले होते. मग मी त्यांना विनंती केली व म्हणालो, “बाबा माझ्याकडून काहीतरी घ्या. उन्हाळा सुरू झालाय उणही जास्त आहे आणि आपणही थकल्यासारखे दिसत आहात, काहीतरी थंडगार कोल्ड्रिंक वगैरे घ्या” 

ते म्हणाले, “मी कोल्ड्रिंक्स वगैरे काही घेत नाही थंड पाणी पिलं पुरे झालं, माझे गोड पदार्थ बंद आहे.” 

“बाबा येथे मसालेदार थंडगार ताक मिळते ते मी आणतो” माझ्या बोलण्याला त्यांनी मूक संमती दिली. 

मी थंड पेयाच्या दुकानावर ताक घेण्यासाठी गेलो आणि मला तिथे गेलेले पाहून पाठीमागे मित्रही येऊन उभा राहीला. मी त्या वैरागी बाबांना दंडवत केलेला पाहून आजूबाजूच्या लोकांना कोणाला काहीही फरक पडला नाही. हे एव्हाना त्याच्या लक्षात येऊन त्याला आपली चूक कळली असावी. त्याच्या चेहर्‍यावर पश्चातापाची भावना दिसत होती. त्यामुळे मीही काही म्हटले नाही. ताकाच्या लहान लहान दोन पिशव्या घेऊन मी आणि मित्र दोघेही वैरागी बाबांजवळ आलो. 

मित्राने ही बाबांना दंडवत केला. त्यांना ताकाच्या पिशव्या संपादून पन्नास रुपये पूजा करून मी पुन्हा दंडवत केला. ते पैसे घेण्यास तयार नव्हते पण मी आग्रहानेच दिले.

“बाबा ताक आत्ताच घ्या आता ते थंड आहे नंतर गरम होईल” म्हणून वैरागी बाबांना बाकड्यावर बसून घेण्याची विनंती केली. 

आणि म्हणालो “बाबा आपल्या पायात चप्पल नाहीत. आता उन्हाळा सुरू होतोय, मी आपल्यासाठी चप्पल आणतो. आपल्या पायाचा नंबर काय? किती नंबरची चप्पल लागते आपल्याला?” 

“नको भाऊ, राहूद्या, देव अनवाणी पायांनीच फिरले आहेत, मग मला कशाला पाहिजे चप्पल!” असे म्हणून त्यांनी निराकरण केले. 

मी आग्रह केला. व त्यांनी होकार देऊन ९ नंबरची चप्पल लागते असे सांगितले. व जास्त महाग आणू नका हे सांगायला ते अजिबात विसरले नाहीत. आपल्याला कितीही उन्हाचा त्रास झाला तरी पुढच्याच्या खिश्याला त्याची झळ बसायला नको, असा विचार करणारे साधु क्वचितच भेटतात. मी जाताना हाच विचार करत होतो की, किती निरूपद्रवी साधु आहेत. ९ नंबरची  venus कंपनीची चप्पल मी त्यांना आणली. तरी ते म्हणालेच “एवढी भारी का आणली?” मी म्हटलं, “बाबा राहू द्या, माझं भाग्य आहे मला असा योग आला.” 

मित्र मात्र शांत उभे राहून बाबांच्या वैराग्याचे तेज असलेल्या त्यांचा देहाकडे पाहातच होता. तसे तसे त्याच्या वागण्यात बदल होत नम्रता वाढत चालली होती. हात जोडून उभा होता. आता मात्र त्याला कसलेही भान नव्हते की, आपल्याकडे कोणी पाहिल किंवा आपल्याकडे पाहून कोणी हसेल. 

त्याच्यात हा तत्काळ झालेला बदल पाहून मला हायसे वाटले. नंतर “देवरक्षो” असा आशिर्वाद देऊन ते बाबा आपल्या वाटेने निघून गेले. नंतर मित्र मला म्हणाला, “बरं झालं रे तू माझं ऐकलं नाहीस, आणि मलाही वाचवलंस” 

तर मित्रांनो या घटनेचे तात्पर्य असेच की, बऱ्याच वेळेला आपण लोक काय म्हणतील म्हणून आपली धर्म कट्टरता बाजूला ठेवतो. आणि फार मोठ्या अदृष्ट लाभापासून स्वतःला दूर करतो. तान्हेल्याला पाणी पाजणे हे तर कर्मराहाटीतही फार मोठे पुण्य समजले जाते. आणि इथे तर माझ्या देवाचे भक्त साक्षात वैरागी बाबा तहानलेले होते. जर मी ही माझ्या मित्रासारखाच विचार केला असता तर या फार मोठ्या गोमट्यापासून मी अंतरलो असतो. 

आणि सर्व काही जाणणाऱ्या सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींना माझी खंती आली असती ते वेगळे. म्हणून वासनिक धर्मबंधुना एकच सांगावेसे वाटते की, धर्माचा अभिमान जाज्वल्याने असावा. लोक काय म्हणतील कींवा हसतील या विचाराने आपण आपले धर्माचरण का सोडायचे? इतर धर्मिय लोक रस्त्यावर बसून, रेल्वे स्टेशनवर बसून प्रार्थना करताना दिसतात. ते असला काही विचार करत नाही, मग आपण का करायचा? 

देवाला पाठविणारा भक्त किती दुर्लभ असतो? याचं ज्ञान करणारी एक स्मृती स्मृतिस्थळ या ग्रंथात येथे. एकदा महादाइसा आणि एक दुसऱ्या तपस्विनी आई दोघी भिक्षेला गेल्या. गावात भिक्षा करत असताना एका गृहस्थाचे लेकरू “गोविंद गोविंद श्रीचक्रधर श्रीचक्रधर” असे म्हणून खेळत होते. ते ऐकून महादाइसांना खूप आनंद झाला. व त्यांनी झोळी सांघातीनीकडे देऊन त्या मुलाला उचलून कडेवर घेतले. जवळ असलेल्या तपस्विनी आईने विचारले, “आई हे असे काई केले?” 

यावर महादाईसांनी उत्तर दिले “आ वो हा देवाचे नाव घेत आहे म्हणून मला याच्याविषयी खूप स्नेह वाटले म्हणून मी त्याला उचलून घेतले का सृष्टीमध्ये देव दुर्लभ का त्या देवाला आठवतो तो दुर्लभ” असे म्हणून त्या मुलाला खाली ठेवले व पुन्हा आपला भिक्षा विधी पूर्ण केला.

एका साधारण लहान बाळकाने देवाचे नाव मुखात घेतले म्हणून महादाईसांना इतका आनंद झाला, त्या मुलाला त्या डावलू शकल्या नाहीत. आणि आपण तर साक्षात परमेश्वर भक्त, परमेश्वर शास्त्राप्रमाणे आचरण करणारे महान साधू त्यांचे कसे बरे डावलणे करावे? 

आपण जर असेच साधु डावलले तर कदाचित पुढे देव आपल्या समोर येईल पण आपण दुर्लक्ष करू. कारण हे अव्हेरन पुढे वाढत जाऊन अवतारापर्यंत प्रसव जातो असा निर्णय ब्रम्हविद्या शास्त्रात आहे. म्हणून या सदृश बऱ्याच घटना पाहायला मिळतात. समोर दिसणार्‍या महानुभाव साधुबाबांकडे आपण दुर्लक्ष करतो. हा फार मोठा दोष आहे. 


म्हणून बंधुंनो एकच सांगावेसे वाटते की समोर कोणीही साधू दिसो गुलाबी कपडे असो, नीलवर्ण कपडे असो, की राखाडी रंगाचे कपडे असो आपल्या नामधारकाचे वासनिकाचे हेच कर्तव्य आहे की आपण त्यांना सामोरे जाऊन नमस्कार केलाच पाहिजे.




Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post