कलियुगाच्या शेवटी काय होते? संहार कसा होतो?

कलियुगाच्या शेवटी काय होते? संहार कसा होतो?

कलियुगाच्या शेवटी काय होते? संहार कसा होतो? 

मागिल लेखात आपण कलियुगाचे गुण दोष जाणून घेतले आता या लेखात आपण ४ लक्ष वर्षाच्या कलियुगात ३ लक्ष वर्ष कलियुग झाल्यावर मनुष्याचे जीवनमान कसे असते? ते जाणून घेऊया. याचा विस्तार खुप आहे पण येथे थोडक्यात उद्धृत केले आहे. 

 कलियुगात जसा जसा काळ पुढे सरकत आहे, तसतसा बलवान काळाच्या प्रभावाने उत्तरोत्तर धर्म, सत्य, पवित्रता, क्षमा, दया, आयुष्य, बळ आणि स्मरणशक्ती या सर्व गोष्टींचा लोप होत जाईल. लोकांमध्ये नास्तिकता वाढेल. पापकर्म करण्याकडेच लोकांची प्रवृत्ती वाढेल. 

कलियुगामध्ये ज्याच्याकडे धन-संपत्ती असेल, त्यालाच लोक कुलीन, सदाचारी आणि सद्गुणी मानतील. मग तो अधर्मी असला तरी त्यालाच लोक श्रेष्ठत्वे मानतील. हे आपण आताही पाहत आहोत. नाचगाणी करून पोट भरणाऱ्या लोकांना समाजात प्रतिष्ठा आहे. लोक त्यांच्या मागे धावतात. 

धर्म आणि न्याय यांच्याबाबतीत कुशक्ती प्रभावी ठरेल. विवाहसंबंध एकमेकांच्या आवडीवरून ठरतील. व्यवहारात फसवणूकीला आणि कपटालाच महत्त्व असेल. स्त्री आणि पुरुषांचे श्रेष्ठत्व त्यांच्या रतिकौशल्यावरुन ठरेल. ब्राह्मण्याची ओळख ’जानवे’ एवढीच असेल. बाह्य वेषावरूनच वर्णाश्रम ठरेल आणि बाह्य वेषावरूनच दुसऱ्या वर्णाआश्रमात प्रवेश करणे असेल. 

कलियुगात पैशाशिवाय न्याय मिळू शकणार नाही. मिळत नाही. एखाद्या धुर्ताचे बोलण्यातील चातुर्य हेच पांडित्य समजले जाईल. गरिबी हेच दुर्जनत्त्वाचे लक्षण असेल. गरिबांनाच लोक दुर्जन मानतील. आणि दांभिकपणा हेच साधुत्वाचे लक्षण असेल. एकमेकांची पसंती हाच विवाहसंस्कार असेल आणि प्रसाधनालाच स्नान समजले जाईल. 

लोक दूरच्या जलाशयाला तीर्थ समजतील. डोक्यावर केस राखणे हे पुरुषाच्या सौंदर्याचे चिन्ह समजले जाईल. आपले पोट भरणे हाच मोठा पुरुषार्थ असेल आणि असत्य असले तरी ठासून बोलण्यालाच सत्य मानले जाईल. कुटुंबाचे पालन-पोषण हे चातुर्य समजले जाईल. कीर्ती मिळविण्यासाठी धर्माचरण केले जाईल. 

अशा प्रकारे पृथ्वी जेव्हा अशा दुष्टांनी भरून जाईल, तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय , वैश्य आणि शूद्र यांपैकी जो बलाढ्य असेल, तोच राजा होईल. त्या काळात लुटारूसारखे लोभी व क्रूर राजे प्रजेचे धन व बायका पळवतील. त्यांना भिऊन प्रजा डोंगर-दऱ्यात किंवा जंगलात पळून जाईल. त्यावेळी प्रजा भाजीपाला, कंदमुळे, मांस, मध, फळे-फुले आणि बिया इत्यादी खाऊन आपले पोट भरील. 

कधी कोरडा दुष्काळ पडेल तर कधी कर लादले जातील. कधी कडक थंडी पडेल तर कधी हिमवर्षाव होईल. कधी तुफान होईल, कधी उष्णता वाढेल, तर कधी पूर येतील. या उत्पातांनी आणि आपापसातील संघर्षाने प्रजेला अतिशय त्रास होईल आणि ती नष्ट होईल. लोक तहान-भूक, रोग व अनेक प्रकारच्या चिंतांनी दु:खी होतील. कलियुगामध्ये माणसाचे जास्तीत जास्त आयुष्य वीस किंवा तीस वर्षे असेल. असे कमी होत होत शेवटी शेवटी माणसाचे आयुष्य तर ९ दिवसांचे आयुष्य असेल. 

कलिकाळाच्या दोषांमुळे प्राण्यांची शरीरे लहान आणि रोगग्रस्त होऊ लागतील. वर्ण आणि आश्रम यांचे धर्म सांगणारा वेदमार्ग नष्टप्राय होऊन जाईल. धर्मकार्यात पाखंडी लोकांचे वर्चस्व राहील. राजे चोरांसारखे लोकांना लुबाडतील. चोरी, खोटे बोलणे, विनाकारण हिंसा इत्यादी अनेक प्रकारची वाईट कर्मे करून लोक उपजीविका चालवितील. चारही वर्णांचे लोक शूद्रांप्रमाणे होतील. गाई शेळ्यांप्रमाणॆ लहान शरीराच्या आणि कमी दूध देणाऱ्या असतील. आश्रमही घरांसारखे होतील. वैवाहिक संबंध असलेल्यांनाच नातलग मानले जाईल. 

धान्यांची रोपे आखूड होत जातील. मोठी झाडे शमीच्या झाडांप्रमाणे कमी उंचीची व दाट सावली नसलेली होतील. ढगांमध्ये विजाच जास्त चमकतील. घरेही सुनी सुनी होतील. अशा रीतीने कलियुगाच्या शेवटी माणसे अंगठ्याएवढी होऊन ९ दिवसाचे आयुष्य भोगून कृमीकिटकासारखे मरण पावतील.

मग चौकडीचा संहार होईल. १२ वर्षपर्यंत १२ आदित्य तपतील. सगळी पृथ्वी चुनखड्यासारखी भाजून निघेल. पृथ्वीवर एकही जीव शिल्लक राहणार नाही. नंतर या भूतलावर बारा वर्षे सोंडाधारी पाऊस पडेल. संपूर्ण पृथ्वी जलमय होईल. नंतर बारा वर्षे पर्यंत या पृथ्वीवर सोसाट्याचा वारा सुटेल आणि सगळे पाणी शोषून घेईल. संपूर्ण भूमी समतल झाल्यावर कृतयुगाची रचना होईल. पुन्हा परमेश्वराची माया इथे मनुष्य देह निर्माण करील. आणि तिथून पुढे जीवनप्रवाह चालता होईल.

नंतर परमेश्वर अवतार घेतील आणि ज्ञानदानाचे कार्य सुरू होईल. आणि जीवांचे उद्धरण सुरू होईल. अशी ही चहुयुगांची व्यवस्था प्रत्येक चौकडीमध्ये आहे. असं हे सृष्टीचक्र अव्यहात सुरू आहे. या सृष्टीचक्रात प्रत्येक युगात परमेश्वर अवतार घेऊन ज्ञानदानाचे कार्य आणि जीवोद्धरणाचे कार्य करीत आहेत. अनंत जीवांचा उद्धार करीत आहेत.

या चौकडीमध्ये कृतियुगात परब्रम्ह परमेश्वराने हंस अवतार घेऊन सनकादिक ऋषींना ज्ञानदानाचे कार्य केले. व आपला परधर्म, मोक्षमार्ग स्थापन केला. पुढे त्याच परब्रम्ह परमेश्वराने श्री दत्तात्रेय या नावाने प्रकट होऊन जीवोद्धरणाचे कार्य आरंभले. श्रीदत्तात्रेय महाराजांनी यदु राजा परळक राजा इत्यादीकांना ज्ञान देऊन त्यांचे उद्धरण केले.

श्रीकृष्ण भगवंतांनी द्वापार युगात अवतार घेऊन जरासंधाच्या कैदेत असलेल्या २२००० राजांना ज्ञान देऊन त्यांचा उद्धार केला. श्रीउद्धव देव, अर्जुनदेव, पाचही पांडव यांना ज्ञान प्रेम देऊन त्यांचाही उद्धार केला. आणि आपला मोक्षमार्ग स्थापन केला. तोच मोक्षमार्ग पुढे हजारो वर्षानंतर लोप पावला. आणि कलियुगात पुन्हा तो लोपलेला धर्म स्थापन करण्यासाठी त्या परब्रम्ह परमेश्वराने श्री चक्रधर स्वामींच्या रूपाने अवतार धारण केला. आणि परमार्गाची, मोक्षमार्गाची, महानुभाव पंथाची स्थापना करून जीवोद्धरणाचे कार्य आरंभ केले.

हेही वाचा 👇

कलियुगाचे गुण दोष वर्णन - कलियुगात मनुष्यांचे विहरण वर्तन कसे असते? इतर युगांपेक्षा कलियुग हिन काबरं आहे? आणि इतर युगांपेक्षा कलियुगाचे वैशिष्ट्य काय?

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post