कलियुगाचे गुण दोष - महानुभाव पंथिय ज्ञान सरिता - kaliyugache gun-dosh

कलियुगाचे गुण दोष - महानुभाव पंथिय ज्ञान सरिता - kaliyugache gun-dosh

 कलियुगाचे गुण दोष 

हेही वाचा 👇

कलियुगाच्या शेवटी काय होते? कलियुगाचा संहार कसा होतो?

प्रश्न :- कलियुगात मनुष्यांचे विहरण वर्तन कसे असते? इतर युगांपेक्षा कलियुग हिन काबरं आहे? आणि इतर युगांपेक्षा कलियुगाचे वैशिष्ट्य काय? 

उत्तर :- या सृष्टी चक्रात सर्वप्रथम कृतयुग असते. कृतयुगाचा काळ अत्यंत सात्विक असतो. कृतयुगामध्ये सत्य, दया, तप आणि दान हे संपूर्ण धर्माचे चार पाय असतात. त्या युगातील लोक चतुष्पाद धर्माचे पालन करतात. सत्ययुगातील बहुतेक लोक संतोषी, दयाळू, सर्वांशी मैत्री असणारे, शांत, इंद्रियनिग्रही, सहनशील, समदर्शी आणि आत्म्यात रममाण होणारे असतात. इथे आत्मा शब्दाचा अर्थ संलग्न असा होतो. 

त्रेतायुग :- अधर्माचेही असत्य, हिंसा, असंतोष आणि कलह हे चार पाय आहेत. यांच्या प्रभावाने त्रेतायुगामध्ये हळू हळू धर्माचे पाय चतुर्थांशाने क्षीण होत जातात. त्या युगात ब्राह्मणांचे आधिक्य असणारे चार वर्ण असतात. लोकांमध्ये हिंसा आणि स्त्रीलंपटता विशेष नसते. कर्मकांड आणि तपश्चर्या यामध्ये निष्ठा असणारे लोक धर्म, अर्थ व काम यांचे सेवन करतात. अधिकांश लोक वेदांत पारंगत असतात. 

द्वापार युगामध्ये अधर्माच्या हिंसा, असंतोष, खोटेपणा आणि द्वेष या पायांची वाढ होते. तसेच यामुळे धर्माचे चार पाय असलेल्या तप, सत्य, दया आणि दान यांमध्ये अर्ध्याने घट होते. त्या युगातील लोक यशस्वी, कर्मकांडी आणि वेदांचे अध्ययन-अध्यापन करण्यामध्ये मोठे तत्पर असतात. लोक धनाढ्य कुटुंबवत्सल आणि सुखी असतात. त्या युगात क्षत्रिय आणि ब्राह्मण या दोन वर्णांचे प्राधान्य असते. 

कलियुगात अधर्माच्या चारी पायांची मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि त्यामुळेच धर्माचे चारही पाय क्षीण होऊ लागतात व त्यांपैकी एक चतुर्थांश भाग शिल्लक राहातो. शेवटी तोही नाहीसा होईल. कलियुगामध्ये लोक लोभी, दुराचारी, कठोर हृदयाचे, एकमेकांशी विनाकरण वैर धरणारे, भाग्यहीन आणि आशाळभूत असतात. त्या युगात लोकांमध्ये शूद्र, कोणी यांचे वर्चस्व असते.

कलियुगाचा काळ अत्यंत हीन असल्यामुळे सर्व प्राण्यांच्या ठिकाणी सत्त्व, रज आणि तम असे तीन गुण असतात. ते तिन्ही गुण काळाच्या प्रेरणेने ते मनात कमी जास्त होत असतात. ज्यावेळी मन, बुद्धी आणि इंद्रियांवर सत्त्वगुणाचा प्रभाव असतो, माणसे आत्माराम असतात तेव्हा सत्ययुग आहे असे समजावे. त्यावेळी माणसाला ज्ञान आणि तपश्चर्या यांची आवड असते. 

जेव्हा माणसांची भक्ती धर्म, अर्थ आणि काम यांवर असते, तसेच अंत:करणात रजोगुण प्रबळ असतो, तेव्हा त्रेतायुग आहे, असे समजावे. आणि ज्यावेळी रज-तम प्रबळ झाल्यामुळे लोभ, असंतोष, अभिमान , दंभ, मत्सर इत्यादी दोष दिसू लागतात, तसेच माणसांना सकाम कर्मे आवडतात, तेव्हा द्वापार युग आहे, असे समजावे. आणि ज्यावेळी खोटेपणा, कपट, आळस, झोप, हिंसा, खेद, शोक, मोह, भय आणि दीनता यांची प्रधानता असेल, तेव्हा तमोगुणप्रधान कलियुग आहे, असे समजावे. 

कलियुगात लोकांची दृष्टी, भावना संकुचित होईल, अधिकांश लोक अभागी व खादाड, हावरट असतील, पैश्या अडक्याने दरिद्री असूनही मनात मोठमोठ्या कामना, इच्छा करतील. कलियुगात स्त्रियाही स्वैराचारी होतील. सर्व देशात चोर-लुटारूंच्या संख्येत वाढ होईल. पाखंडी लोक देवा-धर्माला नावे ठेवतील. नास्तिक लोकांमध्ये वाढ होईल. 

अधर्मी राजे प्रजेचे रक्तशोषण करतील. ब्राह्मणही षट्कर्मांपासून ढळतील. ब्राह्मण पोट भरणे आणि कामवासना तृप्त करणे यातच मग्न असतील. ब्रह्मचारी ब्रह्मचर्यव्रताचे पालन करणार नाहीत व अवित्रपणे राहू लागतील. गृहस्थाश्रमी, भीक मागू लागतील. वानप्रस्थ, गावामध्ये राहू लागतील आणि संन्यासी धनाचे लोभी होतील. 

कलियुगात स्त्रियांची शरीरे लहान असली तरी त्यांचा आहार जास्त असेल. त्यांना संतती पुष्कळ होईल. त्या कलियुगात काही संस्कारहिन निर्लज्ज, नेहमी कर्कश बोलणाऱ्या आणि चोरी व कपट करण्यात मोठ्या धाडसी होतील. व्यापारी हलक्या वृत्तीचे व कपटाने व्यापार करणारे होतील. संकटकाळ नसूनही सत्पुरुषांनी त्याज्य मानलेला व्यापार ते उचित समजून करू लागतील.

मालक सर्वश्रेष्ठ असला तरी निर्धन असल्यास सेवक त्याला सोडून जातील. सेवक संकटात असला तरी मालक त्याला सोडून देईल. गाय दूध देणे बंद करील, तेव्हा लोक तिचाही त्याग करतील. गोमांस भक्षणाकडे लोकांची वृत्ती वाढेल. मांसाहार, मद्य पिणे, याची प्रबलता होईल. 

कामवासना तृप्त करण्यासाठी प्रेम करणारी कलियुगातील माणसे स्त्रीलंपट व दीन होतील. ती माता-पिता, बंधू, मित्र आणि नातलगांना सोडून बायकोच्या बहीण-भावांकडून सल्ला घेऊ लागतील. शूद्र तपस्व्याचा वेष घेऊन दान घेऊ लागतील. आणि धर्माचे ज्ञान नसणारे उच्चसनावर बसून धर्माचा उपदेश करू लागतील. 

कलियुगाच्या शेवटी दुष्काळामुळे आणि करांमुळे त्रासलेली कलियुगातील प्रजा नेहमी खिन्न राहील. अन्न नसलेल्या पृथ्वीवर पाऊस न पडण्याच्या भीतीने नेहमी व्याकूळ राहील. कलियुगातील प्रजा अन्न -वस्त्र, पाणी, झोप, कामसुख, स्नान, अलंकार यांपासून वंचित राहील. लोकांचे दिसणे, पिशाच्चासारखे असेल. कलियुगात लोक, काही कवड्यांसाठीसुद्धा मैत्री सोडून आपापसात भांडणे करतील आणि एवढेच नव्हे तर आपल्या सग्या-सोयऱ्यांची हत्या करतील आणि आपले प्रिय प्राणही गमावून बसतील. 

कलियुगातील क्षुद्र मानसिकतेची माणसे फक्त कामवासनापूर्ती आणि आपले पोट भरणे यातच मग्न असतील. ती आपल्या म्हाताऱ्या आई-बापांचे रक्षण करणार नाहीत आणि आई-वडिलसुद्धा सर्व कामांत कुशल अशा पुत्रांना वेगळे ठेवतील. आणि संस्कारहीन पुत्रांच्या हाती घरातील सत्ता देतील. 

कलियुगामध्ये पाखंडामुळे बुद्धिभेद झालेली माणसे इंद्र, ब्रह्मदेव, महादेव, विष्णु नारायण भैरव, चैतन्य माया, इत्यादी त्रैलोक्याच्या अधिपती देवतासुद्धा ज्यांच्या चरणकमलांवर आपले मस्तक लववतात, त्या जगताचे परम गुरू श्रीकृष्ण भगवंतांचीही पूजा करणार नाहीत. एखाद्या माणसाने मरतेवेळी व्याकुळतेने किंवा पडताना, घसरताना, अगतिक होऊन जरी भगवंतांचे नाव घेतले, तरीसुद्धा त्याची सर्व कर्मबंधने तुटतात आणि त्याला उत्तम गती प्राप्त होते. परंतु कलियुगातील लोक त्या भगवंतांच्या आराधनेला विन्मुख होतील.

कलियुगामुळे वस्तू, ठिकाणे आणि अंत:करणे यांमध्ये उत्पन्न झालेले दोष भगवंतांचे स्मरण केले असता नाहीसे होतात. हृदयत असलेले भगवान, श्रवण, संकीर्तन, ध्यान, पूजन किंवा आदरभाव बाळगला तरी मनुष्याच्या हजारो जन्मातील पापे नष्ट करतात. जसा सोन्याशी संबंध आल्यावर अग्नी त्या धातूतील हीन नाहीसे करतो, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण साधकांच्या हृदयात राहून त्यांच्या अशुभ वासना कायमच्या नाहीशा करतात. 

भगवान पुरुषोत्तम श्रीकृष्ण भगवंत हृदयामध्ये विराजमान झाल्यावर मनुष्याचे अंत:करण जसे शुद्ध होते, तसे ते वेदांमध्ये सांगितलेल्या कर्मकांडानी आणि पुराणांमध्ये सांगितलेल्या तपश्चर्या, प्राणायाम, सर्व प्राण्यांविषयी मैत्रीचा भाव, तीर्थस्नाने, व्रत, दान, जप इत्यादी कोणत्याही अंतर्याग बहिर्याग साधनाने शुद्ध होत नाही. वेद हे त्रिगुणात्मक आहेत. ते जीवाला मुक्त करू शकत नाहीत. 

आता तुझ्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे. म्हणूनच एकाग्रचित्ताने सर्वभावे भगवान श्रीकृष्णांची आपल्या हृदयसिंहासनावर स्थापना कर. असे केल्याने तुला परमगती प्राप्त होईल. मृत्युकाळ जवळ आलेल्यांनी भगवंतांचेच ध्यान करावे. असे केल्याने सर्वांचे परम आश्रय आणि सर्वात्मा भगवान त्याला आपल्या स्वरूपात लीन करून घेतात. 

दोषांचा खजिना असलेल्या कलियुगाच्या ठायी एक मोठा गुण आहे. तो म्हणजे कलियुगात श्रीकृष्ण भगवंतांचे फक्त संकीर्तन केल्यानेच सर्व आसक्ती सुटून परमात्म्याची प्राप्ती होते. आणि द्वापारयुगात, त्रेतायुगात, कृतयुगात दिर्घकाळ परमेश्वराचे नामस्मरण करावे लागते. दिर्घकाळ आचार करावा लागतो त्या मानाने कलियुगात फार कमी काळ आचार करावा लागतो. तोच आचार स्वदेशा स्वग्रामाचा त्याग करून अनन्यभक्तीपूर्वक अव्यभिचारपूर्वक केला तर लवकरच परमेश्वरप्राप्ती होते.

हेही वाचा 👇

कलियुगाच्या शेवटी काय होते? कलियुगाचा संहार कसा होतो?


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post