प्रेरणादायी बोधकथा
फक्त भगवंताचा आश्रय!!
रात्री झोपण्यापूर्वी ही गोष्ट घरातील सर्वांना सांगा.
एक नितिमंत राजा नगरात फेरी मारण्यासाठी निघाला. फिरता फिरता त्याला एक मूल गल्लीत खेळताना दिसले. मुलाकडे त्यांनी बारकाईने पाहिले. व जवळ जाऊन मुलाच्या पाठीमागे उभे राहून त्याचा खेळ पाहू लागला. मुलगा मातीच्या खेळण्यांशी खेळत होता. मुलगा मातीच्या खेळण्याच्या कानात विचारत होता “कधी श्रीकृष्ण देवाचे नाम स्मरण केले आहे का?” आणि लगेच तो ते मातीचे खेळणे तोडून मातीत मिसळून देत होता.
मागे उभे राहून ऐकणाऱ्या राजाला खूप आश्चर्य वाटले, तेव्हा त्याने मुलाला विचारले की, “बाळा हे सर्व तू काय करतो आहेस?” मुलाने मागे वळून पाहिले व उभा राहिला. राजाला नम्रतेने उत्तर दिले की “मी त्यांना विचारतो की ते कधी श्रीकृष्ण देवाचे नामस्मरण करता का? आणि मी त्यांना मातीत मिसळत आहे.”
तेव्हा राजाला वाटले की एवढा लहान मुलगा इतका ज्ञानी आहे. मोठा झाल्यावर हा मुलगा फार विद्वान बनेल. याच्या उच्च शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे म्हणून राजाने मुलाला विचारले, “बाळा तू माझ्याबरोबर माझ्या महालात राहशील का?” तो मुलगा म्हणाला - “राजेश्री मी जरूर राहीन पण माझ्या चार अटी आहेत,
१- मी झोपलो की तुला जागावे लागेल.
२- मी जेवण करेन, तुम्हाला उपाशी राहावे लागेल.
३- मी वस्त्र परिधान पण तुम्हाला नग्न राहावे लागेल.
४ - जेव्हा जेव्हा मी संकटात असेन तेव्हा तुम्हाला तुमची सर्व कामे सोडून संकट निवारण करण्यासाठी माझ्याकडे धावत यावे लागेल. जर तुम्ही या अटी मान्य कराल तर मी तुमच्या महालात राहायला तयार आहे. राजा म्हणाला की, “हे अशक्य आहे, तुझ्या अटीप्रमाणे मी वागू शकणार नाही.”
मुलगा म्हणाला, राजन! मग मी माझ्या देवाचा आश्रय सोडून तुमच्या आश्रयाने काबरं राहू? तो भगवंत मी झोपलो असता जागे राहून माझे रक्षण करतो. स्वतः काहीही अन्न न स्वीकारता माझा योगक्षेम चालवतो. मला अन्न पाणी पुरवतो. स्वतः दिगंबर राहून मला वस्त्र पुरवतो. आणि माझ्यावर काहीही संकट आले असता धावत येऊन माझे रक्षण करतो. एवढं सर्व असताना मला तुमच्या आश्रयाची काय गरज?
या गोष्टीचे तात्पर्य इतकेच आहे की आपण विषय सुखाच्या नादी लागून भगवंताला विसरलो आहोत. वेळोवेळी संकटात तारुन नेणाऱ्या भगवंतांचे नामस्मरण आपण करत नाही. २४ तासातून पाच मिनिटही एकाग्र होऊन त्या भगवंताच्या ध्यान करत नाही.
सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला फक्त पैसा आणि काम या दोनच गोष्टी दिसतात. संसारिक कर्मांमध्ये आपण इतके गुंतलो आहोत की, आपल्याला मनुष्यजन्म का मिळाला आहे? उपदेश घेण्याचा योग का आला आहे? परमेश्वराचे यथार्थ ज्ञान आपल्याला का झाले आहे? या प्रश्नांवर आपण कधीच साक्षेपाने विचार करत नाही.
एकदा काही कामानिमित्त पुण्याला जाण्याचा योग आला तिथे एका नाम धारकाची भेट झाली. त्यांना उपदेश घेऊन २०-२५ वर्षे झाली असतील. सहज बोलता बोलता मी त्यांना विचारले तुम्ही कोण कोणती तीर्थस्थाने नमस्कार केलेली आहेत? तेव्हा ते म्हणाले मी फलटणला तीन वेळा जाऊन आलो आहे. इतर तीर्थस्थाने करण्याचा योग येत नाही. कारण वेळ मिळत नाही माझ्यामागे व्याप खूप आहे. पत्नी ही आयटी इंजिनियर आहे. तिलाही वेळ मिळत नाही. मी म्हणालो वीस वर्ष तुम्ही पुण्यात आहात आणि फक्त तीन वेळा फलटणला गेलेले आहात कमाल आहे? ते म्हणाले “काय करावे वेळच मिळत नाही.”
“पंथिय आश्रमांमध्ये काही अन्नदान पंगत वगैरे करता का?” मी विचारले. तो म्हणाला, “नाही हो तेही शक्य होत नाही मुलांच्या शिक्षणाचा खर्च खूप आहे, आत्ताच पुण्यात नवीन फ्लॅट घेतला. मागच्या वर्षी सुट्ट्यांमध्ये न्यूयॉर्कला ट्रीपला गेलो होतो तेथे बराच खर्च झाला. बरीच सेविंग उधळली गेली.”
हे ऐकून मी काय समजायचं ते समजलो. या महाभागांना न्यूयॉर्क ट्रीपला जायला वेळ आहे पण तीर्थस्थान करायला जाण्यासाठी वेळ नाही. मौज मजा करण्यासाठी पैसे आहेत पण अन्नदान करण्यासाठी पैसे नाहीत. पुढे त्यांच्याशी वार्ता करण्याचा काही अर्थ नव्हता म्हणून मी गप्प राहिलो. तेव्हा मला एक सुभाषित आठवले. धर्मेण हिना पशुभी: समाना । जो धर्महीन आहे ज्याच्या ठिकाणी कुठलाही धर्म नाही. ती व्यक्ती पशुसमानच आहे. कारण खाणे, पिणे, झोपणे, मलमूत्र करणे हे तर पशुही करतात.
तात्पर्य हेच की, माणसाने धर्मवान असावे. धर्म म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण, चिंतन, ब्रह्मविद्या शास्त्राचे पाठांतर, अन्नदान, वर्षातून किमान तीन वेळातरी ऋद्धिपुर, डोमेग्राम, फलटण, वेरुळ, पांचाळेश्वर, या महास्थानांना जावे. व इतर तीर्थस्थानांना जसा वेळ मिळेल तसे जात राहावे. देवाशी आपले नाते तुटू देऊ नये. ही साधी गोष्ट आहे एखाद्या नातेवाईकांशी आपण जर बराच काळ संपर्क ठेवला नाही तर त्याचा विसर पडतो. हीच गोष्ट परमेश्वराविषयीही आहे आपण जर काहीच देवधर्म आचरला नाही तर आपल्यालाही देवाचा विसर पडेल. आणि जो देवाला विसरला तो देवतांच्या तावडीत सापडलाच म्हणून समजा. म्हणून देवाशी नाते तुटू देऊ नये. नेहमी देवाच्या, देवाच्या भक्तांच्या, तीर्थस्थानांच्या संपर्कात रहावे.
कुठेही आपल्या महानुभाव पंथाचे साधू दिसले तर त्यांना जवळ जाऊन दंडवत करावा दोन मिनिटे का होईना संवाद साधावा त्यामुळे आपले पुढे येणारे बरेच अनिष्ट टळते. साधू संतांचे आशीर्वाद लाभतात. परमेश्वरही प्रसन्न होतात. भगवंताशी संपर्क असला म्हणजे संसारात असल्यावरही आपण थोडेफार का होईना भगवंताच्या आश्रयाने राहतो. एऱ्हवी अनुसरण घेतल्यावरच भगवंतांचा पूर्णपणे आश्रय होतो.
दंडवत प्रणाम
महानुभाव पंथीय महत्वपूर्ण जिज्ञासा व उत्तरे वाचण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा 👇
Click here 👉 वासनिक धर्म प्रश्नोत्तरी