दृष्टिपूतं न्यसेत् पादं वस्त्रपूतं पिबेत् जलम् संस्कृत सुभाषित रसग्रहण sunskrit Subhashit knowledgepandit

दृष्टिपूतं न्यसेत् पादं वस्त्रपूतं पिबेत् जलम् संस्कृत सुभाषित रसग्रहण sunskrit Subhashit knowledgepandit

 संस्कृत सुभाषित रसग्रहण मराठी अर्थ

sunskrit Subhashit knowledgepandit

दृष्टिपूतं न्यसेत् पादं वस्त्रपूतं पिबेत् जलम् ।

सत्यपूतां वदेत् वाचं मनःपूतं समाचरेत् ।।

(श्रीमद्भागवत स्कं. ११ अ. १८ श्लो. १६)

मराठी अर्थ :- वानप्रस्थाश्रमी व संन्यासाश्रमी लोकांचा आचारधर्म उद्धवाला उलगडून सांगताना भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून महर्षि व्यासांनी हा श्लोक खरं तर सर्वसामान्यांसाठीच दिलेला आहे. कारण सर्वांना व प्रत्येकाला सर्व क्षेत्रात वावरताना तो उपयोगी पडणारा आहे. अर्थ अगदि सोपा आहे. माणसानं आपलं प्रत्येक पाऊल  समोरची जागा स्वच्छ आहे की नाही हे आपल्या दृष्टीनं तपासून टाकावं.

पाणी वस्त्रानं गाळून स्वच्छ केलेलं प्यावं. जे सत्य पडताळून पाहिलं असेल तेच तोंडानं बोलावं आणि मनाला जे पवित्र वाटेल तेच.. तसंच आचरावं! आध्यात्मिक / पारमार्थिक जीवनात या गोष्टी आवश्यक आहेतच पण दैनंदिन जीवनात देखील व्यक्ति पासून कुटुंब, कुलपरिवार, समाज, प्रांत, राष्ट्र इथपर्यंतच्या भौतिक पातळीवर हे कल्याणप्रद व अत्यावश्यक आहे. दृष्टिपूतं न्यसेत् पादं देहाचं पाऊल स्वच्छ, समतल जागेवर पडणं हे नित्य अनुभवाला येणार्‍याघटनांवरून आवश्यक आहे यात शंकाच नाही... 

लहानसा खडा पायाखाली येण्याच्या निमित्तानंही आबालवृद्ध रस्त्यातून येताजाता पडतात व अस्थिभंगाचं संकट ओढवतं. आर्थिक नुकसान, देहवेदना, मानसिक अशांतता इ. सर्व त्यामुळे वाट्याला येतं. काटे टोचतात, शेणाचिखलात, केळीची साल त्यावर पाय घसरून पडायला होत पुनः वर सांगितल्याप्रमाणे दुःख वाट्याला येत. त्यापेक्षा इतर आपल्याकडे पाहतायत की नाही इ. पाहण्याच्या नादात वर.. इकडेतिकडे पहात चालण्याऐवजी पायाखाली बघून चांगल्या जागेवर पाऊल ठेवीत चालावं हे अधिक हिताचं नाही का

तसंच लक्षणेनं वा व्यंजनेनं सुद्धा नीट बघून चालणं याचा अर्थ कुठल्याही क्षेत्रात पदार्पण करताना वा केल्यावर पुढेपुढे जाताना साधकबाधकाचा पूर्ण विचार करून प्रत्येक पाऊल टाकणं. पुढची पायरी चढणं व भावनांच्या प्रवाहात वाहवत न जाता निर्णय घेणं हेही दृष्टिपूतं न्यसेत् पादम् असंच आहे. अध्यात्म / परमार्थ हा भौतिकाच्या पार असल्यानं व तिथली वाट अधिक घसरडी.. निसरडी असल्यानं परमेश्वराकडे. ब्रह्मज्ञानप्राप्तीकडे जाताना प्रत्येक पाऊल बुद्धिपुरस्सर. विवेकपूर्वक सावधगिरीनंच टाकलं पाहिजे! न पेक्षा सापशिडीतल्या खेळाप्रमाणे नव्व्याण्णवावरून खाली पाचसातावर येण्याची नामुष्की पदरी पडेल. 

वस्त्रपूतं पिबेत् जलम् हे तर शरीराच्या आरोग्यासाठी सर्वांनाच आवश्यक आहे. जंतुसंसर्ग टाळायचा, पाण्यातली घाण टाळायची तर वस्त्रातून पेयजल गाळून घ्यावं हा अत्यंत प्राथमिक व सोपा उपाय आहे! पारमार्थिकानं / आध्यात्मिकानं आपल्याला वापरायचं पाणी आपणच आणून गाळून घ्यावं म्हणजे इतरांच्या विचार संस्कारांचा, वासनाविकारांचा त्यावर प्रभाव पडणार नाही व आपलं दैनंदिन शारीरिक व मानसिक / बौद्धिक आरोग्य अबाधित राहील.

आजकाल जलशुद्धीकरणासाठी अधिकाधिक प्रगत वैज्ञानिक साधनं उपलब्ध होत असली तरी सर्वांनाच ती स्थलपरिस्थितिदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या मिळवता येतील असं नाही व ती जमवण्यासाठी जीवनात अमूल्य असा काळही दवडावा लागेल. साधकाला तर अत्यल्प काळही सोन्यासारखा मौल्यवान असून तो वाया दवडता येणार नाही. म्हणून वस्त्रपूतं पिबेत् जलम् हा सोपा सुलभ सल्ला महर्षि देतात!

सत्यपूतां वदेत् वाचम् या चरणाचा शास्त्रपूतां वदेत् वाणीम् किंवा शास्त्रपूतं वदेत् वाक्य असाही पाठभेद काही लोकांकडून ऐकायला मिळतो! वाणीचा.. बोलण्याचा संबंध सत्याशीव्याकरणादि शास्त्रांशी जोडल्यामुळे लौकिक व पारलौकिक व्यवहारात बोलण्यामुळे जे अनर्थ घडू शकतात ते टाळण्याचा उपाय सांगितला गेलाय! व्यवहारातही आपण दुसर्‍याला सहज सांगतो... 

तोंड सांभाळून बोल, जबान सँभालके बोलना, जीभ आवर इ इ. बोलण्यामुळे समोरचा दुखावला जाऊ शकतो, गैरसमज तयार  होऊन क्वचित दीर्घकाळ टिकू शकणारी वैर / शत्रुत्व भावना निर्माण होते, कटुता येते, मैत्री. सख्यभाव नष्ट होऊन बोलणार्‍यालाच शारीरिक व मानसिक त्रास होतो. व्यक्तीची अशांतता, अस्वस्थता सर्वत्र पसरत जाते. म्हणून वाणीवर संयम ठेवण्यासाठी ती सत्यानं पवित्रच असेल, व्याकरणादि शास्त्रांनी शुद्धच असेल अशी काळजी सर्वांनीच घेणं आवश्यक आहे. 

परमार्थात / अध्यात्मात कामक्रोधादिवश उच्चारलेली वरशापयुक्त वाणी साधनेनं मिळवलेलं सामर्थ्य क्षणात नष्ट करते व पुनश्च जय श्रीकृष्णऽऽ म्हणत पहिल्यापासून साधनेला सुरवात करावी लागते... यात अनेक जन्मही वाया जाऊ शकतात व ईप्सित लांबच राहतं! मनःपूतं समाचरेत्... आजकाल लोक संस्कृतविषयक अज्ञानातून "माणसानं मनाला येईल तसं वागावं" असा याचा अर्थ करतात व वागतात.... 

आचार, विचार, उच्चार, विहार, आहारादि स्वातंत्र्यं जी आजकालच्या लोकशाही राज्यपद्धतीत घटनेनं दिली आहेत त्याचा वाटेल तसा उपयोग करावा अशी बर्‍याच सुशिक्षितांची नवविचारवाद्यांची धारणा झालेली आढळते. स्वतःला जसं हे स्वातंत्र्य हक्क, अधिकार रूपात अपेक्षित व अभिप्रेत आहे तसं ते इतर प्रत्येकालाच आहे हा विचार बरेच वेळा बाजूला पडतो वा टाकला जातो वा दुर्लक्षिला / उपेक्षिला जातो! त्यातूनच व्यक्तिविरोध, कुटुंबकलह, समाजराष्ट्रविघातक घटना इ.. प्रसवतात.  

भागवतकार म्हणतात.. ऐहिक असो वा पारत्रिक असो कोणत्याही विषयात मनाला विवेकविचारांती व विकार टाळून जे पवित्र, स्वच्छ, हितावह असेल तसंच वागावं! सारासार, नित्यानित्य, सदसत्, ग्राह्याग्राह्य, नीरक्षीर इ.. विवेक केवळ माणसाला दिलेल्या बुद्धीनं मनात करून जे सर्वदृष्ट्या पवित्र आहे तेवढंच स्वीकारावं व तदनुसार आचरण करावं! श्रीमद्भागवतात असे अनेक सुविचार. ज्याला आजकाल practical view म्हटलं जातं. तो घ्यायला उपयुक्त ठरतील असे आहेत.

श्रीपाद केळकर कल्याण

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post