मेघदूतम् - Meghadutam Kalidasa shlok Sanskrit
(टीकाकार :- विद्यावाचस्पती
प्रा. स्वानंद गजनान पुंड)
पूर्वपीठीका
प्राणप्रिय प्रियतमेपासून दुरावलेला एका उत्कट भावनाप्रधान प्रेमिकाचे हे विरहगीत आहे. तिच्या स्मृतीत मग्न होत, एकेक दिवस युगाप्रमाणे व्यतीत करणाऱ्या एका प्रियकराची ही अन्तर्व्यथा आहे. धनपती कुबेराचा एक सेवक आहे यक्ष. नुकताच विवाह झालेला. पत्नी इतकी मनोरमा की स्वर्गाधिपतीलाही इच्छा निर्माण व्हावी. मग त्यांचे मन असणार तरी कुठे? सतत तिच्याच चिंतनात मग्न असणाऱ्या त्याच्याकडून स्वामीकार्यात काहीतरी चूक होते आणि चिडलेल्या कुबेराकडून शाप मिळतो- एका वर्षाच्या विरहाचा. जिच्या सहवासात क्षणन्क्षण बेधुंद होत स्वामीकार्य चुकले तिचा एक वर्षाचा विरह. यक्षाला वीज पडली असती तरी इतके दुःख झाले नसते, पण नाईलाज आहे.
शापग्रस्त यक्ष, रामाच्या चरणस्पर्शाने पुनीतपावन झालेल्या रामगिरीवर दिवस कंठू लागतो. क्षण क्षण झुरत राहतो. परिणाम इतका होतो की हातातील कडे कधी गळून पडले तेही कळत नाही. बिचाऱ्याला केवळ आशातंतूने अद्याप जिवंत ठेवलेले आहे. श्वास चालू आहे इतकेच. आषाढाच्या प्रथम दिवशी त्याला रामगिरीवर महागिरीस दूसण्या देणाऱ्या व क्रीडारत गजाप्रमाणे प्रेक्षणीय मेघ दिसतो. सुखात लोळणाऱ्यांनाही मेघदर्शन हुरहूर लावते, मग विरहाग्नितप्ताची काय अवस्था? तेवढ्यात त्याच्या लक्षात येते की मेघ उत्तरेकडे जात आहे. आणि मग एक अद्भुतरम्य कल्पना चमकून जाते की, हा तर असाच अलकेलाही जाईल. मग तर हा आपल्या कामाचा आहे. हा विचार येण्याचा अवकाश, मेघ निर्जीव, क्षणिक आहे इत्यादी सामान्य विचारांचा स्पर्शही होऊ शकणार नाही, अशा शक्याशक्यतातील मनोवृत्तीने भारलेला यक्ष, त्या मेघालाच दूत बनवितो आणि आपल्या प्रियतमेस संदेश पोहचवण्याचे कार्य करण्याची प्रार्थना करतो.
मेघ बोलण्याचा प्रश्नच नसतो. पण
यक्षासाठी ते मौन नकारात्मक नसते. तर मूक संमती असते. तो आश्रमीय कुसुमांनी मेघास
अर्ध्य देतो. त्याची गोड वचनांनी स्तुती करतो आणि त्याच्याशी हितगुज साधण्यास
प्रारंभ करतो. यक्षसंवाद एकांगीरीत्या सुरू होतो. यक्ष
प्रारंभी मेघास रामगिरीपासून अलकेपर्यंतचा मार्ग सांगतो. मार्गातील प्रत्येक
स्थळाचे सौंदर्य वर्णन करीत तुझा प्रवासमार्ग कसा अत्यधिक आकर्षक आहे, याची उत्सुकता निर्माण करतो. मार्गातील निसर्ग, रम्य
दऱ्याखोऱ्या, मनोहारी पर्वतराजी, जीवनरेषास्वरूपिणी
सरिता, गर्द वनराई, अवखळ प्रवाह,
नद्याकाठाची उद्याने, प्रेमीजनांनी
भरलेल्या बागा आणि नगरे, धनिक गृहीच्या लावण्यलतिका, विभ्रमकारी गणिक आत्मभानगलित प्रेमिका, तीर्थ,
संगम, दरी, खिंड,
नगाधिराज हिमालय, सुरयुवतींचा आरसा असा कैलास
आणि त्यावर प्रियकरांगी विराजमान प्रेयसीवर अलकानगरी असे संपूर्ण मार्गाचे यक्षाने
अत्यंत तपशीलवार व तन्मयतापूर्ण वर्णन केलेले आहे.
मार्गातील निसर्ग वर्णनांनी परिपूर्ण पूर्व मेघानंतर उत्तरमेघात आरंभीच यक्ष अलकानगरीचे चित्रोपम वर्णन सादर करतो. त्यातही तो आपल्या घराचे वर्णन करताना अधिक भावविभोर होतो आणि त्यानंतर तो आपल्या जीवनसर्वस्व अशा प्रियतमेचे वर्णन करताना देहभान विसरतो. शेवटी मोजक्या १२ श्लोकात संदेश दिलेला आहे. स्वतःची विकलवस्था सांगत जिवंत असल्याचा निरोप आणि तुझ्याविना तडफडणारा हा जीव लवकरच तुझ्याकडं येईल त्यावेळी आपण दुःखमुक्त होऊ असा तो संदेश. पण त्या संदेशाच्या प्रस्तावनारूपात अवतीर्ण झालेले पूर्वश्लोक म्हणजे मानवी भावनांची अजरामर अशी विलक्षण गुंफण आहे की मात्र १२० श्लोकांचे हे गीतकाव्य आज हजारो वर्षानंतरही प्रत्येक रसिकप्रेमीचे जणू आत्मकथन ठरावे. मानवी अन्तःकरणाचे शाश्वत चित्रण आहे मेघदूतम् !
मेघदूतम् श्लोक – १
कश्चित्कान्ताविरहगुरूणा
स्वाधिकारात् प्रमत्तः ।
शापेनास्तंगमित महिमा वर्षभोग्येण
भर्तुः ।।
यक्षश्चक्रे जनकतनया स्नान पुण्योदकेषु ।
स्निग्धच्छायातरूषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ।।१।।
अन्वयार्थ:-
स्वाधिकारात् :– स्वतःच्या कर्तव्यापासून
प्रमत्तः - चुकलेला,
कान्ताविरहगुरूणा - पत्नी
विरहाने भयानक अशा
वर्षभोग्येन – वर्षभर भोगण्याच्या
भर्तुः - स्वामीच्या
शापेन :- शापामुळे
अस्तंगमितमहिमा - वैभव
नष्ट झालेला, प्रभाव नाहीसा झालेला
कश्चित्- कोणीतरी
यक्षः – यक्ष
जनकतनया स्नानपुण्योदकेषु – सीतेच्या
स्नानान पवित्र झालेले जलाशय असणाऱ्या
स्निग्धच्छायातरूषु – घनदाट
सावलीचे वृक्ष असलेल्या,
रामगिर्याश्रमेषु - रामगिरी
वरील आश्रमांमध्ये
वसतिं चक्रे - निवास
करता झाला.
सरलार्थ :- स्वतःच्या
कर्तव्यापासून चुकलेला आणि त्यामुळे पत्नी विरहाने भयानक अशा वर्षभर भोगण्याच्या, स्वामींच्या शापामुळे वैभव नष्ट झालेला कोणीतरी यक्ष, सीतेच्या स्नानाने पवित्र झालेले जलाशय असणाऱ्या घनदाट सावलीचे वृक्ष
असलेल्या रामगिरीवरील आश्रमांमध्ये निवास करता झाला.
१. यक्ष :- देवतांचा एक प्रकार, जे
कुबेराचे सेवक असतात हे अत्यंत रसिक, स्त्रीलोलुप तथा कामी वर्णिले आहेत.
२. यक्षाची चूक - यक्षाला
चुकीमुळे शाप मिळाला पण चूक कोणती ते कालिदास
देत नाहीत. त्यामुळे अनेकांनी अनेक तर्क लावले आहे.
अ) कुबेराला
रोज सकाळी फुले देण्याचे याचे काम होते. सकाळी पत्नीपासून दूर जाणे जीवावर आल्याने
रात्रीच कमलपुष्पे आणली पण सकाळी रात्रभर फुलात अडकलेला भुंगा कुबेराला चावल्याने
त्याने शाप दिला.
आ) यक्षाकडे
उद्यान रक्षण कार्य होते. पण त्याचे दुर्लक्ष्य झाल्याने हत्तीने उद्यान उध्वस्त
केल्याने यक्ष कृद्ध झाला.
इ) महाकवी
कालिदासांचे राजाशी भांडण झाल्याने ते दूर गेले व स्वानुभूतीवरच हे काव्य लिहिले.
३. रामगिरी
- मल्लिनाथानुसार चित्रकुट, आधुनिक अभ्यासकांच्या मते नागपूर जवळचे रामटेक तर काहींच्या मते म.प्र. चे रामगढ म्हणजे रामटेक
होय.
४. अनेक
आश्रम - यक्ष एकच आहे मग आश्रम अनेक कशाला? तर पत्नी विरहग्रस्ताचे
मन एका जागी रमत नसल्याने तो वारंवार जागा बदलत होता हा भाव.
५. कश्चित्
- कालिदासांची यक्षाचे नाव दिले नाही. 'भर्तृराज्ञां
न कुर्वन्ति ये च विश्वास घातकाः। तेषां नामापि न ग्राहयं ।' या
न्यायाने कविवर्य त्याचे नाव घेत नाहीत
असे एक मत आहे.
६. कश्चित्
- शब्दात प्रथमाक्षर 'क' हे ब्रह्मदेवांचे एक नाव
असल्याने कवींनी भगवन्नमोच्चारणाने
मंगलाचरण साधले असे टीकाकारांचे मत आहे.