कस्य दोष कुले नास्ति व्याधिना को न पीडित संस्कृत सुभाषित रसग्रहण sunskrit Subhashit knowledgepandit

कस्य दोष कुले नास्ति व्याधिना को न पीडित संस्कृत सुभाषित रसग्रहण sunskrit Subhashit knowledgepandit

 संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit Subhashit knowledgepandit

कस्य दोषः कुले नास्ति व्याधिना को न पीडितः ।

व्यसनं केन न प्राप्तं कस्य सौख्यं निरन्तरम् ॥

दोष कोणत्या कुळात नसतात? व्याधी कुणाला दु:खी करत नाहीत? संकटं कुणाच्या जीवनात नसतात? निरंतर सुखी कोण असतं? (प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही कमतरता असते हे लक्षात घेऊन मन स्थिर ठेवावं, गडबडून जाऊ नये!)

चिंतन :- कै गदिमांनी गीतरामायणातील "देवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" या गीतात एक कडवं असं लिहिलंय...

जरामरण यातुन सुटला कोण प्राणिजात?

दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनात?

वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा ।।

वरील श्लोकाचा आशयच यात आला आहेसं वाटतं ! व्यक्ति तितक्या प्रकृती या न्यायानं प्रत्येक व्यक्ति, कुटुंब, कुल, परिवार, समाज राष्ट्र यात काही गुणदोष असतातच. यातील प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही दुःखं, संकटं येतातच. यापैकी कुणीही निरंतर, अखंड, नित्य सुख भोगत नाही. कारण प्रत्येकाचं पूर्वकर्म हे भिन्न असल्यानं त्यांचे सुखदुःखादि भोगही भिन्न असतात. वाट्याला आलेल्या व्याधींना, संकटांना, दुःखांना आपणंच कारणीभूत आहोत...

आपलीच व्यसनाधीनता, आपलाच आळस, आपलाच उद्दामपणा आपल्याला नडतोय हे व्यक्तीनं मान्य केलं. स्वीकारलं तर त्यातून चित्ताला स्थिरता येऊन निराकरणाचा, निवारणाचा मार्ग शोधता येईल. पण त्याचा आज जरी अस्वीकार केला तरी सुटका तर होणार नाहीच पण आज ना उद्या वा कालांतरानं ते कोणत्या ना कोणत्या निमित्तानं आपलंच म्हणून आपल्या गळ्यात पडेल! व्यक्तिव्यक्तींचा मिळून कुटुंब, परिवार, कुल या क्रमानं समाज होत असतो. अनेक समाज मिळून राष्ट्र बनत असल्यानं त्यांना विकास, प्रगति, उन्नति, उत्कर्ष इ. सर्व बाबतीत व्यक्तीवरच अवलंबून राहावं लागतं!

वाट्याला आलेल्या व्याधि, दुःखं संकटं यांचा आपल्या भल्यासाठी वापर कसा करता येईल या दिशेनं चिंतन सुरू झालं तर त्यांचा विसर पडून ते सह्य होईल! व्याधिदुःखसंकट यांचं सतत स्मरणचिंतन केल्यानंच वा त्यांना नित्य कुरवाळण्यानंच अधिक त्रासताप मिळतो! पण या उलट त्यांची उपेक्षा करून अन्य काही कल्याणकारक, हितकारक. स्वतःच्या वा इतरांच्या वा समाजराष्ट्र यांच्या. गोष्टींसाठी राबलं, प्रयत्नशील राहिलं वा काही उच्च अप्राप्य असं ध्येय ठेवून सतत त्यातच मन गुंतवून ठेवलं तर त्या व्याधी, संकटं, दुःखं यांनी मन गडबडून जाणार नाही तर उलट काही चांगलं हाती पडेल.

मिळालेलं सुखही अल्पजीवीच आहे याची खूणगाठ मनाशी मारून ते भोगलं तर त्याच्या संपण्याचा विषाद वाटणार नाही. मिळालेलं सुख माझ्या कर्तृत्वाहून अधिक इतरांच्या सदिच्छा, आशीर्वाद, कृपा, साहाय्य यांचा परिपाक आहे असं समजून कृतज्ञबुद्धीनं भोगलं तर त्याचा उन्माद येणार नाही जो स्वतःला व इतरांनाही त्रासदायकच ठरतो. जीवन जगताना लक्ष कुठे केंद्रित करायचं. काय मिळवायचं. काय गमावलं तरी हरकत नाही... कोणत्या संयोगवियोगाचं सुखदुःख मानायचं याची मनात पूर्वतयारी करण्यासाठी हा श्लोक चिंतनात ठेवणं आवश्यक आहे!

सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता परो ददातीति कुबुद्धिरेषा ।।

अहं करोमीति वृथाभिमानः। स्वकर्मसूत्रग्रथितो मनुष्यः।।

हेही त्याच्या बरोबर चिंतनात ठेवलं तर हलक्याशा दुःखानं, संकटानं, व्याधीनं गडबडायला. गोंधळायला होणार नाही! पर्वताएवढं सुख वाट्याला येऊनही मनुष्य उन्मत्त होणार नाही!! चक्रवत् परिवर्तन्ते दुःखानि च सुखानि च हे अंतरात ठसवलं तर वृत्ति आपसूक स्थिर होईल.

सुखं हि दुःखान्यनुभूय शोभते घनान्धकारेष्विव दीपदर्शनम् ।

सुखाच्च यो याति नरो दरिद्रतां धृतः शरीरेण मृतः स जीवति ।।

दुःखांचे पहाड झेलल्यावर हलकीशी सुखाची टेकडीही आनंद देऊन जाते. दुःखांच्या काळ्याकुट्ट अंधार कोठडीतही अत्यल्प सुखाची कृशातिकृश प्रकाशशलाका चित्ताला आनंदवते. पण हा पूर्वकर्मभोगाचा परिणाम, फलभाग आहे असं आतल्या आत पटवलं तर दुःखांनी डगमगायला होणार नाही वा सुखांच्या मोहात सापडून शाश्वताची धरलेली वाट चुकणारही नाही. पण असंख्यसुखराशी भोगल्यानंतर अगदि कस्पटासमान जरी दुःख समोर आलं तरी मनुष्य देहानं जिवंत  राहूनही मृतवत् राहतो, किंमतशून्य राहतो! झगमगाटातून अंधारात शिरल्यावर डोळे उघडे असूनही दिसत नसल्यासारखा आंधळा होतो. बुद्धी चालत नाही.

इतरत्र काहीच न दिसून आपण एकटेच दुःखी आहोत या भ्रमानं अधिक दुःखी होतो व सोन्यासारखं अमूल्य असलेलं जीवन दुःखाचा प्रतिकार न करता, निवारणाचा उपाय न शोधता कधी हताशेनं तर कधी वैफल्यानं तर कधी त्मघाती अविचारानं संपवून टाकतो. पण असं अर्धवट संपवलेलं आयुष्य सुखदुःखांच्या भोगातून सुटका करत नाही उलट त्या पापाचा आणखी मोठा बोजा शिरावर येऊन पडतो! म्हणून सतत चिंतनात ठेवण्यासारखा व  मनाला समजावण्यासारखा हा विचार आहे... हे चार प्रश्न स्वतःलाच विचारावे आणि आनंदी राहावे.

१) कुणाला व्याधी नाहीत? सर्वांनाच आहेत!

२) कुणाला दुःखं नाहीत? सगळ्यांनाच आहेत!

३) कुणावर संकटं येत नाहीत? सगळ्यांवरच येतात!

४) कुणाला सतत, अविरत, निरंतर, खूप सुखं भोगायला मिळतात? कुणालाच नाही!

मग मीच का उदास, हतप्रभ, हतबल राहायचं! खूप सुखं किंवा अत्यल्प सुख हेही जर दुःखाचं कारण होऊ शकतं... कोणतंच संकट नाही हेही जर संकट ठरू शकतं. कोणतीच व्याधि नाही हे ही व्याधिरूप ठरू शकतं तर अत्ताचा.. हातातला वर्तमान मी का बिघडवावा! निर्द्वंद्व असलेला आनंद मी आहे याच परिस्थितीत का भोगू नये?

श्री. श्रीपाद केळकर

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post