श्रीकृष्ण चरित्र भाग 08
ब्राम्हणांना विक्राळ रूप दर्शन
रिठासुराचा वध झाला, पूतना मेली, तृणावर्त मेला. महाबळही अपयशी झाला. शकटासुरही मेला. असे सर्व उपाय करूनही शत्रु हातात येत नाही असे पाहून कंस जास्तच चिंताक्रांत झाला. किंकर्तव्यमूढ झाला. त्याला काय करावे काहीच सुचत नव्हते. असे पाहून त्याच्या एका राक्षस मित्राने त्याला सांगितले की दिक्षितांकडून गोकुळात यज्ञ करवून युक्तीने तुझ्या शत्रूला यज्ञात होमावे.
दुष्ट बाळहत्याऱ्या कंसाला त्याचे म्हणणे. त्याने यज्ञ करणाऱ्या दीक्षितांना बोलावले. आणि म्हटले, “तुम्ही गोकुळात जा तिथे यज्ञ करा. त्या यज्ञात नंदाच्या पुत्राची आहुती द्या. तुम्हाला कोणी आड येईल तर आमच्या पुढे सांगा आम्ही त्याचा अडथळा दूर करू. आणि जर हे कार्य जर तुम्ही केले नाही तर तुमचीच आहुती यज्ञात दिली जाईल. लक्षात ठेवा.” कंसाचे बोलणे ऐकून ते याज्ञीक ब्राह्मण घाबरले.
आम्ही हे कार्य अवश्य करू म्हणून गोकुळाकडे निघाले. गोकुळात आल्यावर नंदराजांच्या वाड्यात आले. त्यावेळी नंदराजे ब्राह्मणांना दान दक्षिणा देत होते. ब्राह्मण स्वस्ती मंत्र म्हणत होते. नंदराजा सामोरे आले. आणि म्हणाले, “आज माझे दैवभाग्य उदयाला आले. तुमच्यासारखे ब्राम्हण माझ्या वाड्यात आले.” असे म्हणून त्यांना नमस्कार केला. आणि बसायला आसन टाकले.
नंदराजांनी विचारले, “इथे आपले आगमन झाले याला काहीतरी कारण असेलच, आपण मला सांगा किम् प्रयोजनार्थ आपण येथे आलेले आहात?”
दिक्षित ब्राम्हण म्हणाले, “सर्वांना आनंदविणारे नंद हो! आम्हाला येथे एक यज्ञ करायचा आहे, तुमचा गाव खुप रम्य आहे. येथिल भूमी अत्यंत सात्विक आहे. म्हणून आम्ही इथे यज्ञ करावा या विचाराने आलो आहोत, त्या यज्ञकर्माचा तुम्हालाही लाभ होईल. तुमच्या गावातील वातावरण यज्ञामुळे आणखी सात्विक होईल.” नंदराजे आणि गोकुळातले इतर ब्राह्मणही म्हणाले, “फारच चांगला विचार आहे.”
मग ते याज्ञिक ब्राह्मण यज्ञ कुठे करावा? स्थळ कोणते निवडावे? याबद्दल आपसात चर्चा करू लागले. तेव्हा नंदराजे म्हणाले, “आमच्याच वाड्यात करा. माझ्या घरासमोर अग्निष्टीका आहे. तिथेच यज्ञ करून माझ्या वाड्याला आणि गोकुळाला पवित्र करावे.” त्या दुष्ट ब्राम्हणांना मनात आनंद झाला. आपल्या या निर्घृण कामात नंदच सहाय्यक होत आहे, आपले काम आणखी सोपे झाले, शिकार स्वतःहून जाळ्यात अडकत आहे. म्हणून ते मनात असलेला असुरी आनंद लपवून म्हणाले, “ठिक आहे, तुमच्याच घरी यज्ञ करू”
दीक्षित आणि ब्राह्मण सर्व नंदराजांच्या वाड्यात आले. आणि बसले यज्ञवेदी पेटवली मंत्र म्हणायला सुरुवात केली. आणि यज्ञाची प्रथम आहुती झाल्यानंतर कंसाने पाठवलेले दीक्षित ब्राह्मण म्हणाले, “नंदराजे हो, तुमच्या मुलाला आणा, त्यालाही वेद मंत्रोच्चार ऐकू, पवित्र धुमाग्नि पाहू द्या, आणा त्याला, आम्हालाही पाहूद्या तुमच्या बाळाला”
नंदराजे श्रीकृष्ण भगवंताला घेऊन आले. आणि देवाने त्यांच्याकडे पाहून मोहक हास्य केले. सुंदर श्रीमूर्ति पाहून आणि ते मनमोहक सुमधूर हास्य पाहून सर्व ब्राम्हणांची कुमती हरली. ते अत्यंतिक वेधले. मग भगवंतांनी त्यांना भयानक रूप दाखवले. बाबरझाटी, गुंजावर्ण डोळे, विक्राळ दाढा, सहस्रावधी हस्त, इतके भयंकर मुख पसरलेले की जणूकाही त्या सर्वांना गिळंकृत करणार, आणि त्या सर्वांना “कालोSस्मि कालोSस्मि” असा भयंकर आवाज ऐकू येऊ लागला.
आणि ते दीक्षित ब्राह्मण खुप घाबरले. आणि मोठ्याने ओरडून म्हणाले, “नंदराजे वाचवा आम्हाला, आम्हाला जीवदान द्या, आमचे रक्षण करा” नंदराजांना व इतरांना काहीच दिसत नव्हते, आणि ऐकू येत नव्हते. फक्त त्या दीक्षित ब्राह्मणांनाच तो भयंकर ध्वनी ऐकू येत होता आणि ते अक्राळ विक्राळ रूप दिसत होते. नंदराजे म्हणाले, “तुम्हाला अचानक काय झालं? इतके का बरं घाबरत आहात? इथे आम्ही हा बाळ आणि तुम्हीच आहोत, दुसरे कोणी नाही, तुम्ही काबरं एवढे थरथर कापत आहात? ”
यावर ते दीक्षित ब्राह्मण म्हणाले “नंदराजा हा कै झाला बाळ, हा तवं साक्षात काळ (अरे हा बाळ आहे का हा तर साक्षात काळ आहे) असं म्हटल्यावर नंदराजांना राग आला आणि त्यांनी म्हटलं “आता तुम्ही इथून निघा” म्हणून त्यांना वाड्याबाहेर काढले. आणि “कालोSस्मि कालोSस्मि” हा ध्वनी त्यांच्या पाठीशी लागला. ते मागे वळून पाहायचे तर भयंकर अकराळ विक्राळ रूप दिसायचे आणि कालोSस्मि कालोSस्मि” हा ध्वनी ऐकू येत होता.
ते भीतीने थरथरा कांपत, पळायला लागले खूप घाबरले धावता धावता अडखळत पडले गुडघे कोपर फुटले, काहींचे तोंडावर पडल्यामुळे दात पडले. कसेतरी यमुना नदीजवळ आले. नदी पार केली. आणि तो कालोSस्मि कालोSस्मि” आवाज येणे बंद झाले. आणि तसेच कंसाजवळ आले. सांगायला लागले,
हेही वाचा 👉परमेश्वर हृदयात येण्यासाठी निर्दोष आणि रिकाम्या मनाची गरज असते
“राजे हो आम्ही गोकुळात गेलो, पण कसला यज्ञ आणि कसलं काय? आमची तिथे फार मोठी फजिती झाली, तो नंदाचा बाळ, बाळ नाही तर साक्षात काळ आहे, आम्ही तिथून पळालो म्हणून वाचलो नाही तर आता आमचे शव इथे आले असते.” असा सगळा वृत्तांत सांगत भीतीने थरथर कापत रडत ते निघून गेले. तो सगळा वृत्तांत ऐकून कंसाला खूप आश्चर्य वाटले. आणि भीतीही वाटली. आता पुढे काय करावे म्हणून तो चिंताक्रांत झाला. त्याचे सर्व उपाय निष्क्रिय झाले होते.