श्रीकृष्ण चरित्र भाग 08 - रिठासूर वध
साक्षात भगवंत गोकुळात अवतरला होता. सगळीकडे मंगलमय वातावरण होते. नंद-यशोदेचे पुत्रप्रेम दिवसेंदिवस वाढतच होते. आनंदस्वरूप परमेश्वर आपल्या बाळलीलांनी संपूर्ण गोकुळात आनंदामृत वर्षत होता. थोड्याच दिवसांत बळभद्रदेव आणि श्रीकृष्ण भगवंत हात व गुडघे टेकून रांगू लागले.
इकडे शकटासूर आणि तृणावर्तासारख्या महाक्रोधी राक्षसांचा अंत संहार झालेला पाहून कंस अधिकच चवताळला. त्याने आपलाच बंधू असलेला रिठासूर नावाचा राक्षस, त्याला बोलावणे धाडले. रिठासूर कंसासमोर आला त्याने कंसाला नमस्कार केला आणि म्हणाला, “राजे! आपण इतके चिंताक्रांत का आहात? आणि मला येथे का बोलावले आहे? माझ्यासाठी काय आज्ञा आहे सांगा?”
कंस म्हणाला “तू गोकुळात जा आणि माझा शत्रू नंदाचा पुत्र श्रीकृष्ण त्याला ओखटे करून ये” रिठासूर म्हणाला “एवढेच ना! हे तर माझ्या डाव्या हाताचे काम आहे, तुम्ही निश्चिंत रहा. माझे कामे पूर्ण केले नाही तर मी तोंड दाखवणार नाही” अशी प्रतिज्ञा घेऊन रिठासूर गोकुळाकडे निघाला. गोकुळात आल्यावर त्याने गोकुळ नगरीचे अवलोकन केले.
आणि आपल्या मायावी सामर्थ्याने एक जोगिनी स्त्री निर्माण केली. आणि जादूनेच रिठाच्या गाठी तयार केल्या. मग त्याने आपल्या मायावी सामर्थ्याने एका रिठ्याच्या गाठी मध्ये प्रवेश केला. नंतर ती जोगिनी स्त्री गोकुळ नगरीच्या चौकात चव्हाट्यावर रिठेगाठी विकण्यासाठी बसली. आणि अगदी स्वस्त भावात रिठेगाठी विकू लागली. गोकुळातील सर्व गवळणी आपापल्या मुलांसाठी रिठेगाठी विकत घेऊ लागल्या.
त्या जोगिनी स्त्रीने त्या रिठेगाठी मधली एक गाठी बाजूला काढून ठेवली होती त्याच गाठी मध्ये रिठासूर लपलेला होता. सर्व गाठी विक्री झाल्यावर ती जोगिनी नंदराजांच्या वाड्यात आली. आणि मोठ्याने ओरडू लागली “घ्या हो आया बहिणींनो आपल्या बाळासाठी सुंदर बाळलेणे (बाळाचे अलंकार) आणले आहेत. यशोदा मातेने बाहेर येऊन पाहिले. व ती सुंदर रिठेगाठी घेऊन तिला एक साडी दिली. ती मायावी स्त्री गेली. व वाड्याबाहेर येऊन अदृश्य झाली. नंतर यशोदा मातेने ती रिठेगाठी श्रीकृष्ण भगवंतांच्या गळ्यात घातली. व आपल्या कामाला लागली.
यशोदा माता घरामध्ये काही काम करत होती. श्रीकृष्ण भगवंत क्रीडा करत करत रांगत रांगत अंगणात आले. व ज्या रिठामध्ये रीठासूर लपलेला होता तो रिठा दाढेत धरून चूर्ण केला आणि रिठासुराचा तेथेच प्राण गेला. देवाने तो रिठा श्रीमुखा बाहेर काढून समोर फेकून दिला.
आणि अंगणातच रक्ता माणसाचा फार मोठा सडा पडला. सर्व अंगणात रक्त वाहू लागले. तेवढ्यात यशोदा माता घराबाहेर आली आणि ते दृश्य पाहून अधिक खूप घाबरली. राजांना हाक मारली, नंदराजेही धावतच आले. नंदराजांनी श्रीकृष्ण भगवंतांना उचलून घेतले व यशोदा मातेच्या कडेवर दिले. यशोदा मातीने रक्ताने माखलेले श्रीमुख, अलंकार, वस्त्र ते स्वच्छ प्रक्षालण करून देवाला स्नान घातले. आणि निंबलोण केले. दिठी काढली.
नंतर नंदराजांनी त्या रिठासुर दैत्याचे कलेवर ५०० बैल लावून गोकुळाबाहेर काढले. आणि त्याला अग्नीडाग दिला. सर्व गोकुळ वासियांना खूप आश्चर्य झाले. अशाप्रकारे श्रीकृष्ण भगवंतांनी रिठासुराचा वध करून गोकुळवासियांची आवडी वाढवली. हा रिठासूर पूर्वी कोण होता याविषयी एक पौराणिक कथा आलेली आहे ती पुढील प्रमाणे :-
एकदा महादेव कैलास पर्वताहून बद्रिकाश्रम येथे जात होते. जाताना ते नर नारायण ऋषींच्या आश्रमात आले. महादेवाला पाहून सगळे ऋषी उभे राहिले व नतमस्तक झाले. पण एक ऋषी अहंकारामुळे उभा राहिला नाही त्यामुळे महादेवाला राग आला. आणि महादेवाने त्याला शाप दिला, “असा तू ऋषी असून अहंकाराने उन्मत्त झालेला आहेस, आणि तू माझा अपमान करीत आहेस म्हणून तू दैत्य योनीला पाठवशील. तोच ऋषी पुढे रीठासुर होऊन जन्मला आणि श्रीकृष्ण देवाचा हस्ते दैत्ययोनीतून मुक्त होऊन लीळा दानाला गेला.
पुढे वाचण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा
ब्राह्मणांना विक्राळ रूप दाखवणे 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/09-shreekrishna-charitra-09-marathi.html