15-4-2022
नीतिशतकम् - neeti-shatak subhashits
संस्कृत सुभाषित रसग्रहण
राजकारणाची सटीक व्याख्या
मुळ भर्तृहरी संस्कृत श्लोक
छंद :- वसंततिलका
सत्यानृता च परुषा च प्रियवादिनी च।
हिंस्रा दयालुरपि चार्थपरा वदान्या।
नित्यव्यया प्रचुरनित्य धनागमा च।
वाराङ्गनेव नृपनीतिरनेकरूपा ।।
मराठी श्लोकानुवाद :- वामन पंडित
छंद :- शार्दूलविक्रीडित
केव्हा सत्य वदे, वदे अनृतही, केव्हां वदे गोडही।
केव्हां अप्रियही दयालुहि असे, केव्हां करी घातही ॥
जोडी अर्थहि जे यथेष्ट, समय की वेचही आदरी
ऐशी हे नृपनीति भासत असे वारांगनेचे परी ॥
मराठी अनुवाद :- ल. गो. विंझे -
छंद :- वसंततिलका
खोटें, खरें, वदत, कर्कश गोड भारी ।
लोभी, उदार, सदया कधिं घातकारी ॥
संपत्ति नित्य उधळी मिळवी, सदा ती
वेश्येपरी विविधरूपचि राजनीति ॥
गद्यार्थ— कधीं, खरें बोलेल (वागेल) तर कधीं खोटें, कधीं कठोर बोलेल तर कधीं गोड बोलेल; कर्धी क्रूर, कर्धी दयाळू; कधीं लोभी असेल तर कधीं उदार; नेहमी खूप उधळपट्टी करील नेहमीं खूप संपत्ति मिळवीलहि; अशी राजनीति ही वेश्येसारखी (क्षणाक्षणाला) रूपें पालटणारी आहे.
विस्तारित अर्थ :
कधी सत्य तर कधी असत्य, कधी कठोर तर कधी लडिवाळपने मृदू, कधी हिंस्र तर कधी दयाळूदेखील, कधी द्रव्यलोलुप तरी कधी विपुल खर्च करणारी आज एकदा खूप उधळपट्टी करणारी तर उद्या अलोट संपत्ती लुटणारी अशी राजनीती ही वेश्येप्रमाणे अनेक रूपाची असते.
भर्तृहरी सारख्या एका महान सम्राट राजाने राजनीतीचे केलेले हे वर्णन किती वास्तव आहे, किती सार्वकालिक आहे, किती सार्वत्रिक आहे, किती चिंतनीय आहे.
परिपूर्ण परस्परविरोधी बाबींनी ठासून भरलेली ही राजनीती स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, हा आपलाही रोजचा अनुभव असतो. आपल्या बाजूने काही घडले की 'सत्याचा विजय' रूपात स्वतःला ओवाळते आणि काहीही विरोधी घडले की 'विरोधकांचे षडयंत्र' म्हणून मोकळी होते. स्वार्थ असला की कालवरच्या शत्रूच्याही गळ्यात गळे घालते नाहीतर मित्राचेही गळे कापायला कमी करीत नाही.
कोणतेही काम करायचे तर 'वजन' ठेवल्यावरच कागद पुढे सरकतो, तर दुसरीकडे कशावरही पैसा उधळायला तयार असते. निवडणुका आल्या की पैसा पाण्यासारखा खर्च होतो आणि सत्ता हाती आली की, सगळ्या प्रकारांनी तो अव्वाच्या सव्वा परत उकळला जातो. याच सगळ्या गुणांनी (?) एखादी वारांगनाही आपल्या गिर्हाईकांना लुभावते. मात्र, तिचे ते लुभावणे लुबाडण्याकरिताच असते. म्हणून तर एक सम्राट राजनीतीला वेश्या म्हणत आहे. हे अनुभवाचे बोल आहेत. वास्तवाचे नग्न दर्शन आहे.