राजाश्रयी माणसाकडे हे सहा गुण असावेत नीतिशतकम् - neeti-shatak subhashits

राजाश्रयी माणसाकडे हे सहा गुण असावेत नीतिशतकम् - neeti-shatak subhashits

 

16-4-2022 

नीतिशतकम् - neeti-shatak subhashits

संस्कृत सुभाषित रसग्रहण 

राजाश्रयाने असताना हे सहा गुण असतील तर फायदा होतो असं या श्लोकात सांगितले आहे. 

मुळ भर्तृहरी संस्कृत श्लोक 

छंद :- शालिनी 

आज्ञा कीर्तिः पालनं ब्राह्मणानाम्। 

दानं भोगो मित्रसंरक्षणं च। 

येषामेते षडगुणा न प्रवृत्ताः । 

कोऽर्थस्तेषां पार्थिवोपाश्रयेण ।।


मराठी श्लोकानुवाद :- वामनपंडित

छंद :- उपजाति

आज्ञा, यश, त्राण महीसुरांचें। 

दान, स्वमित्रावन, भोग साचे ॥ 

सहा न अंगीं गुण ज्यांचिया ते 

किमर्थ जाती नृपसंश्रयातें ? ॥


मराठी श्लोकानुवाद :- ल. गो. विंझे -

छंद :- शालिनी

आज्ञा, कीर्ती, रक्षिणें विप्र, मित्र ।

भोगोनीही दान देतां उदार ।।

साधे हे ना ज्यां सद्दा, ते कशास

सांगा जाती व्यर्थ राजाश्रयास ।।

गद्यार्थ- (राजाच्या आश्रयाने माणसानें सहा गोष्टी साधावयाच्या असतात.) - लोकांकडून आपली आशा पाळविणे, (सत्ता गाजविणें); कीर्ति मिळविणे, ब्राह्मणांचें (विद्वानांचें) पालन करणे, (करविणे), दान ( देण्याइतकी संपत्ति मिळविणें), उपभोग घेणें, मित्रांना ( अभव) संरक्षण देणें; हीं सहा ज्याला (राजसेवेंत) साध्य करतां तये नाहींत त्यानें राजाश्रय घेतल्याचा उपयोग काय ?

विस्तारित अर्थ :

आज्ञा, कीर्ती, विद्वानांचे पालन, दान, भोग आणि मित्रांचे संरक्षण हे सहा गुण ज्यांना लाभत नाहीत त्यांच्या राजाश्रयाचा काय उपयोग?

राजाश्रय ही प्रत्येकाचीच इच्छा असते. राजपदावर तर कुणीतरी एकच बसणार! मात्र इतरांना त्या राजाच्या आसपास राहून राजपदाप्रमाणेच अधिकार उपभोगता येऊ शकतात. असा राजाश्रय मिळाल्यावर त्याचा काय विनियोग व्हावा, ते महाराज भर्तृहरींनी येथे विशद केले आहे. असा राजाश्रय सहा पद्धतीने उपयोगी पडावा. प्रथम म्हणजे आज्ञा. अर्थात आज्ञा देण्याचा अधिकार राजाची आज्ञा जशी सर्ववंद्य असते तशीच राजपुरुषाचीही असते. राजदरबारी जवळीक असण्याचा हा लाभ असतो.

कीर्ती राजदरबारी असलेल्याची कीर्ती सर्वत्र पसरते. राजदरबाराच्या सूचीतील अस्तित्वच कीर्तीचा आधार ठरतो. ब्राह्मणांचे अर्थात ज्ञानी, विद्वानांचे पालन. आपल्या राजदरबारातील ओळखीचा अशाच कामाकरिता उपयोग व्हायला हवा. तरच ती कामाची. दान अर्थात चांगल्या कामाकरिता स्वतःच्या मिळकतीतून व राजकोशातून साहाय्य मिळवून देऊन दान करता यायला हवे. भोग अर्थात या अधिकाराचा सुयोग्य कार्यासह उपभोग घेता यावा. तथा मित्रांचे संरक्षण अर्थात आपण सत्तेशी संलग्न असू तर त्याद्वारे आपल्या सहकारी वा आप्तांची सुयोग्य कार्ये सुलभतेने करून देता यावीत अन्यथा यापैकी कोणत्याच उपयोगी पडणारच नसेल, तर राजाश्रयाचा उपयोगच काय?


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post