17-4-2022
कुठेही जा कर्मात असेल तरच मिळते
नीतिशतकम् - neeti-shatak subhashits
संस्कृत सुभाषित रसग्रहण
कुठेही जा कर्मात असेल तरच मिळते
मुळ भर्तृहरी संस्कृत श्लोक
छंद :- शार्दूलविक्रीडित
यद् धात्रा निजभालपट्टलिखितं स्तोकं महद् वा धनं।
तद् प्राप्नोति मरुस्थलेऽपि नितरां मेरो च नातोऽधिकम्।
तद् धीरो भव वित्तवत्सु कृपणां वृत्तिं वृथा मा कृथाः ।
कूपे पश्य पयोनिधावपि घटो गृह्णाति तुल्यं जलम् ।।
मराठी श्लोकानुवाद :- वामनपंडित
शार्दूलविक्रीडित
ब्रम्ह्याने लिहिलें ललाटफलकी जे द्रव्य ज्याला जसें ।
तें लाधे मरुमंडळीं, अधिकता मेरूस गेल्या नसे ॥
सेवीं धैर्य, धनाढ्य त्यांप्रति वृथा दावू नको दीनता ।
कूपीं कीं जलधींत कुंभ जल घे माईल तें तत्वतां ॥
मराठी श्लोकानुवाद :- ल. गो. विंझे
दैवाने लिहिलें कमी अधिक वा, भाळी तुझ्या जें धन तें
सारें तुज वाळवंटिंहि मिळे; मेरूंत आधिक्य न ||
श्रीमंतांस न दावि दैन्यचि फुका, धैर्या घरी उज्ज्वल।
पाहें हा घट, अब्धि, कूप, उभयीं घे सारखेंची जल ।।
गद्यार्थ- ब्रह्मदेवानें (देवानें) तुझ्या कपाळपट्टीवर जे काय थोडे किंवा पुष्कळ घन लिहिलेले असेल, तें सर्व तुल' बाळवंटांतहि मिळेल. मेरूवर जाऊनसुद्धा त्याहून अधिक मिळणार नाहीं. तेव्हां धीर घर! आणि श्रीमंतांच्या पुढें उगाच दैन्य दाखवूं नकोस हा घट पहा विहिरींत, समुद्रांत कुठेंहि - बुडवला तरी सारखेच पाणी घेतो. अर्थात आपल्या भाग्यात लिहिले असेल तेवढेच मिळते जास्त मिळत नाही.
विस्तारित अर्थ :- ब्रह्मदेवाने आपल्या मस्तकावर (नशिबात) लिहिलेले जे काही थोडे वा अधिक धन असेल ते वाळवंटातही निश्चितपणे मिळतेच तथा त्यापेक्षा अधिक मेरू पर्वतावरही हाती लागत नाही. तेव्हा धीर धारण कर. श्रीमंतासमोर निरर्थक लाचारी दाखवू नको. पहा! विहिरीत वा सागरात (टाकला तरी) घडा सारखेच पाणी घेतो.
'समयसे पहले और भाग्य से जादा किसीको कुछ नही मिलता' हा शास्त्राचा नियमच आहे. भारतीय संस्कृती सांगते की, आपल्या भाळावर आपले नशीब लिहिले जाते. म्हणूनच आपल्याकडे कपाळावर हात मारणे अशुभ मानले आहे. जणूकाही त्याने नशीब पुसले जाते.
या नशिबात जे लिहिले असेल तेच माणसाला मिळते. कुठेही जा ते मिळतेच आणि कुठेही जा तितकेच मिळत असते. भर्तृहरी म्हणतात की, वाळवंटासमान निर्जन, ओसाड मेरू जागीही तुमच्या नशिबाचे तुम्हास मिळतेच मिळते. उलट नशीबच फुटके असेल तर अगदी पर्वतावर जाऊनही हात रिकामेच राहतात. मेरू पर्वत हा सोन्याचा बनलेला आहे, अशी संकल्पना आहे. अशा पर्वतावर गेले तर संपत्तीस काय वाण? पण नाही, नशिबातच नसेल तर कोंबून कोंबून खिशात सोने भरले आणि त्या भाराने खिसा फाटला असेच होणार!
आपल्या कथनाच्या पुष्टीकरिता महाकवी भर्तृहरींनी दृष्टान्त दिला घड्याचा. हा घडा विहिरीत टाका की अपार सागरात, त्यात पाणी सारखेच येणार. क्षमता तेवढीच आहे ना? नशिबाचेही तसेच आहे.