17-4-2022
पैशाची ऊब संपली की मनुष्य एकाकी पडतो
नीतिशतकम् - neeti-shatak subhashits
संस्कृत सुभाषित
मुळ भर्तृहरी संस्कृत श्लोक
छंद :- वसंततिलका
तानीन्द्रियाणि सकलानि तदेव कर्म ।
सा बुद्धिरप्रतिहता वचनं तदेव ।
अर्थोष्मणा विरहितः पुरुषः स एव ।
त्वन्यः क्षणेन भवतीति विचित्रमेतत् ।।
मराठी श्लोकानुवाद :- वामनपंडित
वसंततिलका
तीं इंद्रियें सकल कर्महि धी तशी हे ।
अन्याहता, वचन ते नर तोचि आहे ॥
उष्मा नरा जरि धनोद्भव एक नाहीं।
अन्य क्षणांत तरि होय विचित्र पाहीं ॥
मराठी श्लोकानुवाद :- ल. गो. विंझे
छंद :- वसंततिलका
तीं इद्रियें सकल, कर्महि तें असोनी,
बुद्धी अकुंठितहि तीच; तशीच वाणी ॥
होई दुजाचि जर, ऊब निवे धनाची
एक्या क्षणें, किति विचित्र तऱ्हा जगाची ॥
गद्यार्थ – माणसाचीं इंद्रियें (दारिद्य येण्यापूर्वी) होतीं तींच असून; कर्म (होतें) तेंच असून; बुद्धि (पूर्वी होती) तशीच अकुंठित असून; बोलणें (पूर्वी होतें) तसेंच असून केवळ धनाची ऊब होती ती निवल्याबरोबर, क्षणाभरांत तो मनुष्य जगाला निराळाच वाटूं लागावा ही जगाची केवढी विचित्र तऱ्हा आहे.
विस्तृत अर्थ : - सगळी इंद्रिये तीच राहतात. सगळी कर्मेही तीच राहतात. तीच अनिर्बंध बुद्धी राहते. वचन तेच असते. मात्र पैशाची ऊर्जा संपली की तोच पुरुष क्षणात वेगळा होतो हे विचित्र आहे.
महाकवी भर्तृहरीं प्रस्तुत श्लोकात एका वेगळ्याच पद्धतीने धन महात्म्य सांगत आहेत. माणसाजवळ असणाऱ्या सगळ्या गोष्टी इतरांना त्याच वेळी आकर्षित करतात ज्या वेळी त्याच्या जवळ पैसा असतो.
धनवंतांच्याच गुणांना हे जग कसे महत्त्व देते? ते सांगताना महाकवी म्हणतात की एखाद्या माणसाच्या जवळ असंख्य गुण असलेले आणि कदाचित दुर्दैवाने त्याला दारिद्र्य प्राप्त झाले तर कालपर्यंत ज्या गुरांनी जग आश्चर्यचकित होत होते आज त्या गुणांकडे पाहण्याची सुद्धा जग तसदी घेत नाही.
वास्तविक एखाद्याला दारिद्र्य प्राप्त झाले तर त्या माणसाची इंद्रिय असतात त्याची कर्मे देखील त्याच प्रकारची असतात. त्यात काही बदल होण्याची शक्यताच नाही. त्याची कालपर्यंत असणारी बुद्धिमत्ता देखील तशीच असते. त्या बुद्धीची तीव्रता सर्वत्र प्रवेश करण्याची क्षमता आहे तशीच असते. त्याचे बोलणे देखील तसेच असते अर्थात त्या विचारांची अभिव्यक्ती समानच असते मात्र असे असले तरी एकदा जवळ पैसा नसला की या सर्व गोष्टींची दखल घेतली जात नाही.
महाकवी भर्तृहरी तेथे अर्थोष्मणा असा अत्यंत सुंदर शब्द वापरतात. उष्मा म्हणजे गर्मी. एखादा खाद्य पदार्थ गरम केला तर त्याची चव किंवा वजन बदलत नाही पण त्याची परिणामकारकता बदलत असते.
त्या पदार्थामधील गरमी निघून गेली म्हणून तिचे वजन कमी होत नाही पण आकर्षकता कमी होते. या सिद्धांताच्या आधारे महाकवी म्हणतात पैशाची गर्मी संपली की आहे त्या सगळ्या गोष्टी पूर्वीप्रमाणे असून देखील त्यांची दखल घेतली जात नाही.
जगाची ही रीत विचित्रच आहेत की त्या सगळ्या गुणांनी युक्त असणारा माणूस पैसा संपला की त्याच गुणांनी युक्त असून देखील जग त्याला महत्त्व देत नाही.