हे चार मूर्खाला पाहून हसतात नीतिशतकम् सुभाषित रसग्रहण - neeti-shatak subhashits

हे चार मूर्खाला पाहून हसतात नीतिशतकम् सुभाषित रसग्रहण - neeti-shatak subhashits

 हे चार मूर्खाला पाहून हसतात 

नीतिशतकम् सुभाषित रसग्रहण - neeti-shatak subhashits 



छंद :- वसंततिलका 

अर्था हसन्त्युचितदान विहीन चित्तम् 

भूमिर्नरं मम भूमिरिति ब्रुवाणम् !! 

जारा हसन्ति तनयानुपलालयन्तम् 

मृत्युर्हसत्यवनिपं रणरङ्गभीरूम् !!


मराठी श्लोकानुवाद :- ल. गो. विंझे 

छंद :- वसंततिलका

लक्ष्मी हसे उचित दान न दे त्यास । 

भूमी हसे 'ममचि ती' म्हणतो तयास ॥ 

पुत्रांस लाड करत्याप्रति जार हासे ।

युद्धांत भीरु नृपतीप्रति मृत्यु हासे ॥

गद्यार्थ - योग्य दान न देणाराला लक्ष्मी हसते; (कारण याच्या हातून पैशाचा खरा मुख्य सद् व्यय न झाल्याने हा शेवटी पस्तावणार या अर्थी) भूमि 'माझी माझी' म्हणणाऱ्याला भूमिहि हसते; (भूमि सारखी पति बदलीत असते हे या मूर्खाला कळले नाहीं या अर्थाने) मुलांचे लाड करणाऱ्याला जार स्त्रीया हसतात; (याची पत्नी व्यभिचारी असून हे मुलगे जारोत्पन्न आहेत हे या बावळटाला माहीत नाहीं या अर्थानें) आाणि युद्धाची भीति वाटणाऱ्या राजाला मृत्यु हसत असतो (भित्र्याला वीरमरण नसतें हे या मूर्खाला कधी कळणार या अर्थाने).

विस्तृत अर्थ :- पैशाचे महत्त्व सांगताना त्याची सुयोग्य उपयुक्तता अधोरेखित करतांना महाकवी भर्तृहरी एक वेगळीच रचना सांगत आहेत.

ते म्हणतात जो माणूस उचित अशा दानाचा विचार करीत नाही त्याचा पैसा त्याला हसतो. अर्थात केवळ भोग किंवा नाश यासाठीच पैशाचा उपयोग हा हास्यास्पद आहे असे महाकवी सुचवत आहेत.

याच स्वरूपात आणखी काय-काय हास्याचे कारण ठरते त्याची सूची देत ते म्हणतात, जो माणूस ही भूमी माझी आहे असे म्हणतो त्याला भूमी हसत असते. वास्तविक आज पर्यंत असंख्य राजा राजवाड्यांनी सम्राटांनी या भूमीला जिंकले मात्र त्यापैकी कोणीही एक इंच देखील भूमी आपल्या सोबत नेऊ शकले नाही. भले भले त्या भूमीतच गाडले गेले.

पैसा असो की भूमी दोन्ही फक्त भगवंताची. लक्ष्मी त्यांच्याच पायाशी स्थिरावते. सब भूमी गोपाल की ! असेच आपली संस्कृती सांगते. त्याचप्रमाणे आणखी उदाहरण देताना म्हणतात की जारा अर्थात् व्याभिचारी स्त्री आपल्या पतीला मुलांचे लाड करताना पाहून हसते. वास्तविक मुलांचे लाड करणे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे मात्र जारा शब्दांमध्ये जो व्यभिचार सांगितला आहे त्यानुसार ती संतती त्या माणसाचीच नसते त्यामुळे त्याच्या या अज्ञानावर ती स्त्री हसते. असे महाकवी म्हणत आहेत.

शेवटच्या ओळीत आणखी एक उदाहरण देताना म्हणतात, युद्धभूमीला घाबरणाऱ्या अवनी पती अर्थात राजाला मृत्यू हसत असतो. कारण कोणीही युद्धाला घाबरतो कारण त्यात मृत्यू येईल अशी त्याला भीती वाटते. पण प्रश्न असा आहे की ज्यांनी आयुष्यात कोणतेही युद्ध केले नाही ते तरी कोठे अमर झाले आहेत ? अर्थात युद्धात मृत्यू येवो की न येवो पुढे मृत्यू येणारच आहे. त्यामुळे मृत्यूच्या भीतीने जो रणांगणावर जात नाही अशा राजाला मृत्यू हसत असतो.

उरलेल्या उदाहरणांच्या द्वारे अज्ञान सिद्ध करून असेच अज्ञान पैशाच्या केवळ साठवणुकीत आहे हे सांगून पैशाच्या उचित दानाचे महत्व महाकवी भर्तृहरी यांनी अधोरेखित केले आहे.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post