चातकान्योक्ती - दातृत्व गुण सर्वांमध्ये नसतो
नीतिशतकम् सुभाषित रसग्रहण - neeti-shatak subhashits
भर्तृहरी संस्कृत श्लोक
रे रे चातक सावधानमनसा मित्रं क्षणं श्रूयताम्
अम्भोदा बहवो हि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशाः ।
केचित् वृष्टिभिरार्द्रयन्ति वसुधां गर्जन्ति केचिद् वृथा।
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः ।।
मराठी श्लोकानुवाद :- वामनपंडित
शार्दूलविक्रीडित
ऐके चातक ! सावधान करुनी चित्ता सख्या वैखरी
आकाश वसती पयोद बहु तैसे सर्व नाहीं परी ॥
कांहीं वृष्टि करोनि पोषिति जगा, कांहीं वृथा गर्जती
ज्या ज्या पाइसि दीनभावणि नको प्रार्थच सर्वाप्रति ॥
मराठी श्लोकानुवाद :- ल. गो. विंझे
छंद :- शार्दूलविक्रीडित
बा रे चातक ! लक्ष्य देउनि सख्या, हे ऐक एक क्षण
आकाशीं असती किती धन जरी, ते सारखे सर्व न ॥
वृष्टींनीं कुणि या जगा भिजविती, कोणी वृथा गर्जती
ज्या ज्या पाहसि त्यापुढें न वदणें वाणी तुझी दीन ती ॥
गथार्थ – हे चातका!! मित्रा, मी तुला सांगतों तें क्षणभर नीट लक्ष्य देऊन - ऐक. आकाशांत मेघ तर पुष्कळच असतात; पण ते सारे कांहीं एकसारखे नसतात. कांहीं जलबर्षाव करून पृथ्वीला मिजवून टाकतात तर कांहीं उगाचच गर्जना करतात. म्हणून जो जो मेघ दिसेल, त्या त्या प्रत्येकापुढें तू दीनवाणेपणे उगाच वाचना करूं नकोस. (दान करणारांना जसा पात्रापात्र विवेक सांगतात,
अर्थ :- हे मित्रा! चातका! क्षणभर सावध मनाने श्रवण कर. आकाशात अनेक मेघ असले, तरी सगळेच सारखेच नसतात. काही वृष्टीने पृथ्वीला चिंब करतात (तर) काही विनाकारणच (निरुपयोगी) गर्जना करतात. जो जो (मेघ) दिसेल त्याच्यासमोर उगाच दीनवचने बोलत राहू नकोस.
नीतिशतकात समाविष्ट आणखी ही एक सुंदर अशी अन्योक्ती. चातकान्योक्ती. चातकाचे जीवन जरी मेघानुवर्ती असले, याचकाचे असले तरी याचकाला योग्य दाता भेटला तरच त्याची मागणी पूर्ण होईल. उगाच दिसेल तो मेघ जलदायीच समजण्याची चूक त्याने करू नये. हे म्हणताना चातकाच्या निमित्ताने समस्त याचकांना महाकवि भर्तृहरी हा संदेश देत आहेत.
ते म्हणतात, आकाशात ढग तर अनेक असतात, पण सगळेच कुठे पाणी देतात? या ढगांच्या रूपात कवीने जगातील श्रीमंतांची वास्तविकता अधोरेखित केली आहे. जगात श्रीमंत तर अनेक असतात, पण सगळ्यांमध्ये दातृत्व कुठे असते? एखादाच मेघ जलाने पृथ्वी सजल करतो तसा एखादाच श्रीमंत गरिबांना श्री संपन्न करीत असतो.
आपल्याजवळील संपदेने इतरांच्या व्यथा दूर करतो. बाकीचे नुसतेच राजकीय वचननाम्यानुसार 'देतो देतो' म्हणून गर्जना करतात. पडत मात्र थेंबही नाही. अशांच्या समोर कितीही याचना केली, तरी त्याचा उपयोग तरी काय? अशांसमोर दीनवचने काढण्यात वेळ घालवू नको. त्यांच्या मनी कळ येणारच नाही. हेच कवी सांगत आहेत.