आजचे संस्कृत सुभाषित
आजची लोकोक्ती - नानुशोचन्ति कालेन कवलीकृतम्।
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।
म्रियामाणं मृतं बन्धुं शोचन्ते परिदेविनः ।
आत्मानं नानुशोचन्ति कालेन कवलीकृतम् ॥
अर्थ :- शोक करणाऱ्या व्यक्ती; मरणपंथाला असणाऱ्या आपल्या बांधवा बद्दल (तसेच) मृत व्यक्तींबद्दल (तसेच) शोक करतात (पण) आपण स्वतःसुद्धा काळाचा घास होत चाललोय याचं ते दुःख करत नाहीत. (आपल्या आजारी बांधवाप्रमाणेच आपण पण मृत्युच्याच दिशेने चाललो आहोत हे कुणाच्या लक्षातच येत नाही.)
आत्मानं नानुशोचन्ति कालेन कवलीकृतम् । प्रत्येक जण आज किंवा उद्या काळाचा घास होणारच आहे मात्र मनुष्य अशा भ्रमात जगत असतो की जणू काही तो चिरंजीवी आहे. आणि गरज नसताना खूप मोठी प्रॉपर्टी घेऊन ठेवतो मोठ्या मोठ्या माड्या बांधून ठेवतो. जणू काही आपण कलियुगाच्या अंतापर्यंत जगणार आहोत अशी व्यवस्था भविष्याची करण्यात काळ घालवतो.
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।
अकस्मात तोही पुढे जात आहे॥
मनुष्य आपल्या असपास रोजच कोणाचा तरी मृत्यू झालेला पाहातो. तरीही स्वतः मात्र अमर असल्याच्या आविर्भावात वावरत असतो. यावरून मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। ही ओळ लोकोक्ती म्हणून जनमाणसात प्रचलित झाली असावी. मात्र ह्या कल्पनेमागेही एखादा संस्कृत श्लोक असावा का? संतांनी केलेले लेखन वाचत असताना त्याती दृष्टांत, रूपकं, प्रतिमा, प्रतिके वाचत असताना बऱ्याचदा असं जाणवतं की अमुकअमुक ओवी किंवा अभंगातील उदाहरणामागे अमुकअमुक संस्कृत श्लोकाचा संदर्भा असावा. हिंदीमध्येही कबीर, रहीम, वृंद, गिरिधर ह्या कविंनी अनेक दोहे रचले आहेत. त्यातही बरेचसे दोहे जणू संस्कृत श्लोकांचेच अनुवाद आहेत.
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात आहे
असे सांगतानाच संत म्हणतात,
मना पाहता सत्य हे मृत्यु भूमी ।
जिता बोलती सर्वही जीव मी मी।
चिरंजीव हे सर्वही मानिताती।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥
अरे मानसा तू नीट पाहिलेस तर जिथे आपण राहातो ती ही पृथ्वी मृत्युभूमीच आहे. इथे येणार्या प्रत्येकाला जाण्याचा दिवस आला की जाणेच आहे. पण जिवंत असताना मनुष्य अहंकारयोगे सगळं काही माझ्यामुळेच आहे ह्या भ्रमात असतो. तो असा काही जगत असतो की जणू तो अमरच आहे आणि त्याला कधीही मृत्यू येणार नाहीये. मनुष्याला आपल्या पैशाचा, स्थावरजंगम संपत्तीचा, ज्ञानाचा, मानाचा, प्रसिद्धीचा गर्व इतका असतो, की त्या मोहात तो स्वतःला अमर समजत असतो. पण अचानक त्याला हे सर्व सोडून जावे लागते. स्वकर्तृत्वाचा अभिमान बाळगणारा मनुष्य लोभापायी खूप कमावतो पण बर्याचदा कष्ट करून कमावलेलं ऐश्वर्य उपभोगण्याची वेळ आलेली असताना तो काळाचा घास होतो असेही दिसून येते. गदिमा म्हणतात तसे माणूस इथे पराधीनच आहे.
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। ह्या उक्तीच्या आशयसंदर्भाने शोध घेता मला वरील श्लोक सापडला. याचबरोबर महाभारतातील यक्ष युधिष्ठिर संवाद आठवला. महाभारताच्या वनपर्वातील यक्षप्रश्नप्रसंगी युधिष्ठिर-यक्ष प्रश्नोत्तर प्रसंगी घडलेल्या संवादात यक्ष व युधिष्ठिर या दोघांमधील नीतीविषयक विस्तृत चर्चा आहे. परंतु त्या आधी चार पांडव प्रश्नांची उत्तरे न देऊ शकल्याने पाण्यास स्पर्श होताच मरण पावले होते. तेव्हा यक्षाने युधिष्ठिराला विचारले की,
को मोदते किमाश्चर्यं कः पन्थाः का च वार्तिका।
ममैतांश्चतुरः प्रश्नान् कथयित्वा जलं पिब ।।
कोण आनंदी असतो? या जगातील मोठं आश्चर्य कोणतं? योग्य मार्ग कोणता? आणि रोचक वार्ता कोणती? या चार प्रश्नांची उत्तरे दे आणि मगच ह्य तलावाचे पाणी पी. अशी सक्त ताकीदच यक्षाने युधिष्ठिराला दिली. यातील किमाश्चर्यं? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे खालील श्लोक आहे.
अहन्यहनि भूतानि गच्छन्तीह यमालयम्।
शेषाः स्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम्।।
इथे इहलोकात (या पृथ्वीवर) प्रतिदिन (अहनिअहनि - रोजचेरोज) कोणाचा ना कोणाचा मृत्यू होतो. हे पाहून देखील, जे जिवंत आहेत ते मात्र आपल्याला कधीच मृत्यू येणार असेच वागत असतात याहून मोठं आश्चर्य ते काय!
त्यामुळे जणूकाही मी कधीच मरणार नाही अशा भ्रमात असलेल्या मनुष्यांविषयी बोलताना वरील श्लोकातील दुसऱ्या पदाचा काही भाग तसेच समर्थांच्या ओवीतील एक चरण लोकोक्ती म्हणून रूढ झाल्या आहेत.
नानुशोचन्ति कालेन कवलीकृतम्।
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।
महानुभाव पंथातील संत, भक्तगण मात्र भगवंत परब्रह्म श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये संसारताप जणू विसरून गेलेत. व जन्म-मृत्यूच्या पलिकडे गेलेले आहेत. त्यामुळे श्रीनागदेवाचार्य, म्हाईंभट यांसारखे महान संत महात्मे भक्त काळाचे सामर्थ्य जाणून देहाच्या भ्रमात नाहीत. देहात असतानांच देहावेगळे झालेले आहेत. देहाची अजिबात ममता आसक्ती नाही. कारण हे देहच त्यांनी देवाला अर्पण केले आहे.
जन्ममृत्यूच्या पलिकडे गेलेले संत जरी मृत्यूला घाबरत नसले तरी सामान्य मनुष्याने सतत मृत्यूची जाणीव राखून असावे आणि चांगले आचरण करावे. काळाच्या दाढेत सापडू नये यासाठी जास्तीत जास्त देवा धर्मात काळ घालवावा. असे न करणाऱ्यांना भानावर आणायला वरील लोकोक्ती वापरली जाते.
नानुशोचन्ति कालेन कवलीकृतम्।
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।
लेखक :- अभिजीत काळे