महानुभाव पंथिय संस्कृत काव्य रचना माहिती

महानुभाव पंथिय संस्कृत काव्य रचना माहिती

 महानुभाव पंथिय संस्कृत काव्य रचना 

संस्कृत भाषा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. प्राचीनकाळी ऋषी मुनींनी एकांतात बसुन आत्मचिंतन करून वैचारिक धन आपल्यासाठी संस्कृतमध्ये उपलब्ध करून दिले. उपनिषदं, वेद, रामायण, १८ पुराणे, महाभारतादी ग्रंथाव्दारे उपलब्ध करून दिले. त्याकाळी संपुर्ण भारतभर संस्कृत ही विव्दान पंडीतवर्गाची सम्पर्क भाषा म्हणून प्रचलित होती "देववाणी" म्हणून तिचा गौरवाने उल्लेख होत होता. त्यामुळे साहजिकच प्रत्येक विद्वान पंडीत आपली साहित्य रचना संस्कृत भाषेमधूनच करायचा संस्कृत भाषेविषयी एका कवीने म्हटले आहे. 

केयूरा न विभूषयन्ति शरीरं हारा : न चन्द्रोज्वला :।

न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजा ।। 

वाण्यैका समलंकरोति पुरूषं या संस्कृता धार्यते। 

क्षियन्ते खलु भूषणानि सततं वाक्भूषणं भूषणम् ।। १ ।। 

सोन्या चांदीच्या अलंकाराने शरीराची शोभा वाढत नाही तसेच स्नान केल्याने चंदनाच्या लेपाने, फुलामुळे किंवा सुन्दर डोक्यावरील केशरचना केल्याने शरीराची शोभा वाढत नाही. जो पुरूष संस्कृत वाणीचा अंलकार वापरतो तो सुशोभित होतो. अलंकाराचा क्षय होतो म्हणून संस्कृत वाणी हा खरा अलंकार आहे.

बाराव्या शतकात भगवान श्रीचक्रधर स्वामींनी सर्व साधारण सामान्यजनांना धर्माचे रहस्य आकलन व्हावे यासाठी कटाक्षाने धर्मोपदेश मराठी भाषेतून केला असला तरी त्यांच्या उपदेशामध्ये त्यांनी संस्कृत भाषेचा प्रचुर वापर केला आहे. त्यांची अनेक सुत्रे संस्कृत भाषेत आहेत. महानुभाव पंथाचे आद्याचार्य श्री नागदेवाचार्य यांच्या सानिध्यात अनेक ख्यातनाम विदांन मंडळी होती. 

त्यामध्ये प्रामुख्याने श्री केशिराज व्यास, कवीश्वर व्यास, श्री लक्ष्मीन्द्रभट्ट, श्री आनेराज व्यास, दामोदर पंडितबास, राघवभट, हे होते. श्री केशिराज व्यासांनी श्रीचक्रधर स्वामींचे चरित्र “रत्नमालास्तोत्र” या नांवाचा १८०० श्लोकांचा काव्यग्रंथ संस्कृतमध्ये तयार केला. हा महानुभाव पंथाचा संस्कृतमधील पहिला ग्रंथ म्हणता येईल. सुन्दर पदललित्य रसाळ प्रसादमयी वाणीतून रत्नमालास्तोत्राची निर्मिती झाली आहे. त्यानंतर 'ज्ञानकलानिधी स्तोत्र' तसेच दृष्टान्त स्तोत्राची रचना केशिराज व्यासांनी केली आहे. 

श्रीचक्रधर स्वामींनी ब्रह्मविद्या उपदेश करतांना गूढ तत्वाज्ञान समजावून सांगताना अनेक दृष्टान्त निरूपण केले त्यावर केशिराजांनी दृष्टान्तस्तोत्र निर्माण केले. दृष्टान्त स्तोत्रांतील चंदनाचा दृष्टान्त स्वामींच्या द्वैत तत्वज्ञानावर सुन्दर उदाहरण म्हणून उद्धृत करीत आहे. वृक्षो यथा चंदन सन्निधानात् सुगन्धतां याति न चन्दनत्वं । जीवस्तथैव ईश्वर सन्निधानात् उपैति मोक्ष न परमेश्वरत्वम् ।। १५२।। उपरोक्त दृष्टान्तस्तोत्र या काव्यातील प्रसादपूर्ण व रसाळ शब्दरचना वाचकाचे मन मोहुन घेते. भास्करभट्ट बोरीकर उर्फ कवीश्वरव्यासांनी “नरविलाप स्तोत्र” तसेच “चालिसाख्य स्तोत्र” आणि “संस्कृत पूजावसर” “श्रीयाष्टक” इत्यादी संस्कृतमध्ये त्यांची रचना प्रसिध्द आहे. 

श्रीलक्ष्मीन्द्रभट्टांनी “ज्ञानभास्कर” स्तोत्राची रचना केली. श्री आनेराज व्यासांनी लक्षण रत्नाकर नावाचा श्रीचक्रधर स्वामींच्या सुत्रावर अर्थनिश्चिती करण्यासाठी शास्त्रीय ग्रंथ लिहिला. श्री केशिराज व्यासांनी श्रीचक्रधर स्वामींनी निरूपण केलेले “उध्दरण” प्रकरण संस्कृतमध्ये करण्याची अनुमती श्रीनागदेवाचार्यांना मागितली. तेव्हा श्रीनागदेवाचार्य म्हणाले नको गा केशवदया : येणे माझिया म्हातारीया नागवतील : मग केशोबास संस्कृतबंधु न करीतीचिः

म्हणजे सामान्य लोकांना संस्कृत भाषा कळत नाही त्यांच्या पदरी ब्रह्मविद्येचा ज्ञान पडणार नाही त्यामुळे आचार्यांनी केशरात भाषांना संस्कृत बंद करू दिला नाही. श्रीनागदेवाचार्यानी संस्कृतमध्ये सहित्य निर्मिती करण्याची अनुमती जर दिली असती तर आपणाला संस्कृतमधील महत्वपूर्ण साहित्याचा लाभ झाला असता. त्या विशेष लाभापासुन आपण वंचित झालो. असे असले तरी श्रीभास्करमुनी पारिमाण्डल्य यांनी संस्कृतमध्ये सूत्रपाठाची रचना केल्याचे उल्लेख आढळतात. 

पंधराव्या शतकात बोपदेव शिष्य भीष्माचार्य वायंदेशकर यांनी दिनकर प्रबंध, श्रीदत्तात्रय प्रबंध, महात्म्यदीक्षा स्तोत्र, संजीवनीस्तोत्र आम्नायस्तोत्र, ध्यानचंद्र स्तोत्र, पदारविंदस्तोत्र इत्यादी स्तोत्रांची रचना संस्कृतमध्ये केली आहे. श्रीसारंगधर पुजदेकर यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर “कैवल्यदीपिका” नावाची संस्कृत टीका केल्याचे आढळते. आणि त्यांचा “विवेक चुडामणी"” नावाचा ग्रंथ तर संस्कृत अभ्यासकांसाठी एक प्रकारचे आव्हानच आहे. 

श्रीकेशराज बासांची संस्कृत ग्रंथ निर्मिती झाल्यानंतर पुढे तीन-चारशे वर्षांनी दायमुनी शिष्य श्री गुंडेराज यांनी नरविलाप स्तोत्र ज्ञानकलानिधी ज्ञानभास्कर दृष्टान्तस्तोत्र या चार स्तोत्रांवर तसेच पूजावसर आणि चाळिसाख्य या संस्कृत काव्यांवर देखील अतिशय सुंदर आणि सुबोध टीका लिहिल्या आहेत. महानुभाव संस्कृत पंडितांनी जुन्या आचार्यांनी लिहिलेल्या संस्कृत काव्यांवर संस्कृत मधूनच लिहिलेल्या टीकाही महानुभावांचा साहित्य निर्मितीतील नव्या अविष्काराची उपलब्धी होय. 

महानुभाव संतानी मराठी भाषेमध्ये जी विपुल साहित्य निर्मिती केली आहे त्यावर संस्कृत भाषा सहित्याचा विशेष प्रभाव जाणवतो. महानुभावीय संस्कृत सहित्य निर्मितीचा प्रवाह कमी अधिक प्रमाणात अव्याहतपणे प्रवाहित असून वर्तमान काळातही संस्कृत साहित्य निर्मिती सुरू आहे. चालु शतकामध्ये कै. महंत शेवलीकर बाबाचे “देहि मे दत्तदर्शनम् स्तोत्र" कै. महंत दुतोण्डे बाबांचे “रूग्णभाक् स्तोत्र” श्रीधरानंद शास्त्री पातुरकरांचे “संकटमोचक स्तोत्रत्रयी” प्राचार्य श्री दि.वि. बीडकर शास्त्री लिखीत “सार्थ सुबोधम् सर्वज्ञ श्रीचक्रधर लीलामृतम्” इत्यादी संस्कृत साहित्य रचनांचा उल्लेख करता येईल. उपरोक्त महानुभाविय संस्कृत सहित्याकडे अभ्यासकांचे म्हणावे तसे लक्ष गेल्याचे दिसून येत नाही, ही खेदाची बाब म्हणावी लागेल. हे संस्कृत सहित्य सुयोग्य समीक्षकाची वाट पाहत आहे. सुप्रसिध्द मोरोपंत कवी म्हणतात 

कविता करावी कवी राजयाने। 

परंतु घ्यावा रस पंडिताने । 

पित्या पासूनी जन्मली रम्य बाला । 

परंतु भोगी नर तो निराळा ।।१।। 

हा संस्कृत वाङ्मय निर्मितीचा प्रवाह असाच अव्याहतपणे प्रवाहित राहो ही सदीच्छा.

महानुभाव पंथिय संस्कृत ग्रंथ यादी

१) रत्नमाला स्तोत्र - श्रीकेशराजबास 

२) नरविलाप स्तोत्र - श्रीकवीश्वरबास

३) ज्ञानकलानिधी स्तोत्र - श्रीकेशराजबास

४) ज्ञान भास्कर स्तोत्र - श्रीलक्ष्मिंधर भट

५) चालिसाख्य स्तोत्र - श्रीकवीश्वरबास

६) दृष्टांत स्तोत्र - श्रीकेशराजबास

७) दृष्टांत नामावली स्तोत्र - श्रीकेशराजबास

८) निलांभोज स्तोत्र - श्रीदामोदरव्यास पंडितबास

९) संस्कृत पूजावसर - श्रीकवीश्वरबास

१०) श्रीयाष्टक - श्रीकवीश्वरबास

११) विवेक चुडामणि - श्रीसारंगधरबास पुसदेकर

१२) दिनकर प्रबंध, 

१३) श्रीदत्तात्रय प्रबंध, 

१४) महात्म्यदीक्षा स्तोत्र, 

१५) संजीवनीस्तोत्र 

१६) आम्नायस्तोत्र, 

१७) ध्यानचंद्र स्तोत्र, 

१८) पदारविंदस्तोत्र

ही यादी फक्त प्राचिन काळातील ग्रंथाची आहे. 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post