संस्कृत सुभाषित रसग्रहण
संस्कृत सुवचनानि
आजची लोकोक्ती - परिधानेन वृतमौलिः पुमानिव।
कमरेचे काढून डोईस गुंडाळणे
अकृत्वा निजदेशस्य रक्षां यो विजिगीषते ।
स नृपः परिधानेन वृतमौलिः पुमानिव ॥
अर्थ :- स्वतःच्या राज्याची संरक्षणव्यवस्था भक्कम केल्याशिवायच जो पर राज्य जिंकण्याची इच्छा करतो, तो राजा कमरेच वस्त्र सोडून ते डोक्याला गुंडाळणाऱ्या माणसाप्रमाणे मूर्खच होय. परिधानेन वृतमौलिः पुमानिव। श्लोकार्थात जरी असे करणारा तो राजा मूर्ख, नाकर्ता या अर्थाने आले असले तरी प्रत्यक्षात बोलताना हा वाक्प्रचार 'लाज सोडणे' किंवा 'कोडगेपणे वागणे' या अर्थाने वापरला जातो.
कमरेचे काढून डोईस गुंडाळणे. हा वाक्प्रचार वरील श्लोकाच्या शेवटच्या चरणावरूनच प्रचलित झाला असावा. परिधानेन वृतमौलिः पुमानिव। ही लोकोक्ती अशा लोकांना गृहीत धरून बोलली जाते ज्यांना स्वार्थापुढे कणभराचीही शरम वाटत नाही. ज्यांनी जनांची पर्वा तर कधीच सोडलेली असते पण मनाचीदेखील किंचितसुद्धा लाज त्यांना उरलेली नसते. म्हणूनच परिधानेन वृतमौलिः पुमानिव। ही लोकोक्ती
लाज नाही मला कोणी काही म्हणा. सामान्यतः कामेच्छेने आणि लोभाने माणसे अशी वागतात. म्हणून वरील लोकोक्ती कामातुराणां न भयं न लज्जा ह्या अर्थानेही बोलली जाते. अशा लाज सोडलेल्या माणसाची काय गती असते हे रामदासांनी मनाच्या श्लोकांमध्ये लिहितात,
क्रियेवीण नानापरी बोलिजेते ।
परी चित्त दुश्चित्त ते लाजवीते ॥
मना कल्पना धीट सैराट धावे ।
तया मानवा देव कैसेनि पावे ॥
तुकोबाराय तर ह्या निर्लज्ज लोकांची मानसिकता एका अभंगात मांडताना म्हणतात,
कामातुरा भय लाज ना विचार ।
शरीर असार तृणमूल्य॥१॥
नवल हे लीळा करि त्याचें लाघव।
प्रारब्धें भाव दाखविले॥२॥
लोभालोभ एका धनाचिये ठायी।
आणिकांची सोई चाड नाहीं॥३॥
तुका म्हणे भूक न विचारी।
योजे तें चि सार यथाकाळें॥४॥
कामातुर, कामांधाला कसलीही भीती वा लाज वाटत नाही कारण कामवासनेने त्याच्या सारासार विचारदृष्टीवरच पांघरुण घातलेले असते. वासनेच्या भुकेपुढे त्याला आपल्या शरीराचीही काळजी वाटत नाही. शरीराचेही मूल्य त्या कामपूर्तीपुढे कस्पटासमान असते, तृणवत असते. आपल्या वासनापूर्तीसाठी, कामभावना पूर्ण करण्यासाठी (कामेच्छा पूर्ण करण्यासाठी ) तो ज्या काही करामती दाखवतो त्या पाहून सामान्य माणूस खरोखरच आश्चर्यचकित होतो.
जसे काही त्याचे प्रारब्धच त्याच्याकडून हे असले चाळे करवून घेत असते. अशा लोकांना फक्त धन हवे असते. त्यांना माणसाला फक्त पैशांचाच लोभ असतो. पैशांपुढे त्याला इतरांच्या सोयी-गैरसोयीची सुखदुःखाची चाड (लाज, पर्वा) नसते. तसेच कामांधही. वरील अभंगात शेवटी तुकाराम महाराज सांगतात की, 'भुकेला माणूस खायला काय आहे? हे कधीच विचारत नाही, जे समोर येईल ते निमूटपणे तो खातो.' तो त्याचा निरुपाय असतो कारण तो भुकेने व्याकुळ झालेला असतो त्यामुळे तो स्थळकाळाची लाज बाळगत नाही, पण लोभी आणि कामातुर हे ठरवून निर्लज्जपणे वागत असतात.
तहान, भूक यांसारखीच 'काम' हीदेखील एक शारिरीक भूक आहे. तिच्या आहारी गेलेला माणूस जनरीतीची लाज तर सोडाच पण स्वतःच्या मनाची देखील किंचितही लाज बाळगत नाही.
तर कबीरजी सांगतात,
कामी लज्या ना करै, मन माहें अहिलाद।
नींद न मांगै सांथरा, भूख ना मांगै स्वाद॥
ज्या प्रमाणे अतिशय झोप आल्यावर सतरंजी गादी वगैरे लागत नाही किंवा भूकेलेल्या माणसाची 'चविष्ट अन्नच हवे! अशी अट नसते.' त्याचप्रमाणे कामांधपणे वासनेच्या प्रभावाखाली गेलेल्या व्यक्तीला लज्जेचे काही देणघेणेच नसते. त्यामुळे वस्त्र कमरेभोवती लपेटले काय किंवा डोक्याला गुंडाळले काय? त्यांना त्याची काहीच लाजशरम नसते. ते अगदी
परिधानेन वृतमौलिः पुमानिव।
कमरेचे काढून डोईस गुंडाळणारे.
असतात.
अभिजीत काळे,