जिज्ञासा - अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा मार्ग
मनाच्या गाभाऱ्यात असलेले सुप्त प्रश्न हे विद्यार्थी होऊन जिज्ञासेच्या माध्यमातूनच सुटतात. जे ज्ञात नसत पण जाणूण घेण्याची तिव्र वासना असते ; ती वासना म्हणजेच जिज्ञासा. भुकेलेल्याची भुक तहानलेल्याची तहान भागवण्याची क्षमता असते जिज्ञासेत. अंधाराला प्रकाशाकडे तर अज्ञानाला ज्ञानाकडे नेऊन समृध्द करते ती जिज्ञासा. आपला जन्म झाला आपण बोली भाषेपासून ते अगदी व्यवहारा पर्यंत प्रत्येक गोष्ट शिकलो ती जिज्ञासेतुनच.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मानवाच्या हृदयामध्ये अविकसीत असलेला एक महत्वाचा भाव मराठीतून जागा केला . तो भाव पहीला तसाच पडून होता. पावसाची वाट पाहणाऱ्या जमीनीतील बीजासारखा. आंब्याच्या कोयीत आंब्याच झाड होण्याचं सामर्थ्य असतं . पान, मोहर, साल, लाकुड अगदीच मातीतला रस देखील कोयीतच असतो . तो रस फळात पोहचविण्यासाठी रसवाहीन्या देखील असतात . निसर्गाची कमालच आहे . आम्ही गच्चीवरच्या टाकीत मोटरपंपाने पाणी साठवतो ; पण नारळात साठवलेलं पाणी झाडाने कस पाठवलं असेल? जस पाणी नारळात असत, इतर जागी नाही, तसा आमरस हा फक्त आंब्यातच असतो खोडात, फांदीत, पानात नसतो.
अगदी या प्रमाणेच मनूष्य अनेक सद्गुणांचा समुच्य आहे. त्यातील काही गुण हळू हळू विकसीत झाले काही तसेच राहतात. म्हणूणच अपूर्ण ज्ञानामूळे माणुस सिध्दांता पर्यंत पोहचण्यास अडथळे प्रसवतात. अधुन मधुन त्या जीवाच्या योग्यतेच्या बळावर परमेश्वर, व संत महात्मे अशा जीवांना सुस्कांरीत करुन जागवण्याच कार्य करीत असतात. परंतू या साठी देखील त्या जीवाची जिज्ञासा वृत्ती व विद्यार्थीदशा जिवंत ज्वलंत असणे तितकेच महत्वाचे असते . म्हणूणच संत तुकाराम देखील म्हणतात," मला जागवलं" (याच संतानी मला देखील अध्यात्मीक वाटचालीसाठी जागवलं)
'काय सांगो आता संतांचे उपकार ।
मज निरंतर जागविती ।।
एखादी घटना वर्णण करण्याच्या पलीकडील असली की आपण त्याचे वर्णण करताना," काय सांगू आता " असे विशेषण वापरुन त्या घटनेचे महात्म्य विकसीत करुन वर्णण करीत असतो. अगदी याच प्रमाणे संत तुकाराम देखील म्हणतात की या संताचे माझ्यावर उपकार आहेत कारण याच संतानी माझ्यातील विवेकाला जागृत करुन मला जागवलं . त्यांच्यातही जिज्ञासा निर्माण झाली. आणी त्या जिज्ञासेचा सुगंध अध्यात्माचा राज मार्ग होऊन प्रवाही झाला.
' का रे नाठविसी कृपाळू देवासी।
पोसितो जगासी एकलाचि ।।
बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती।
वाढवी श्रीपती सवे दोन्ही।।
फुटे तरुवर उष्णकाळ मासी।
जीवन तयासी कोण घाली ।।
ब्रम्हसूत्रात 'अथातो ब्रम्ह जिज्ञासा ' असं पहिलंच सुत्र आहे. पण ते विशीष्ठ वर्गालाच कळालं सामान्यवर्ग अनभिज्ञ राहीला ही मात्र मोठी शोकांतीका आहे. प्रभू श्री चक्रधर स्वामींनी समस्त विश्वाकल्याणास्तव याच महंतराष्ट्र असलेल्या महाराष्ट्राच्या विचार करण्याच्या शक्तीने श्रीमंत असलेल्या मातीत माणसातल्या विचाराला श्रीमंत करणारं ," जिज्ञासा करावी" हे सुत्र सांगीतलं आहे . हे उपदेश प्रकरणातलं सूत्र आहे.
आपणही खुप काही करतो . उचापत्या करतो, खोड्या करतो, चोरी करतो, भांडण करतो, अनावश्यक बडबड करतो, चुगल्या करतो, एकमेकांना हरवतो तसे एकमेकांची जिरवतो ही आणी एव्हढ सगळ करुन जिथे आहे तिथेच राहतो. विचार न करता परंपरावादी किंवा परिवर्तनवादी होतो आणी हे सगळ करत असताना विवेकवादी होण्याचे विसरुनच जातो.
ज्ञानप्राप्तीची जिज्ञासा ती महत्वाची, आत्मकल्याण साधणारी असतो परंतू सांसारीक कर्तव्यात हिच जिज्ञासा उपाशीच राहते. मी कोण? दिसते ते काय? दिसत नाही पण असते ते काय ? जन्म, मृत्यु, सुख- दुखाच्या मुळात जाऊन करण्याची ईछ्चाशक्ती देखील नसते. आपण शंका करतो हिच शंका याच शंकेच संशयात रुपांतर झाल तर विनाश होतो. जाणुण घेण्याची प्रबळ आत्मिक ईछ्चा म्हणजेच जिज्ञासा अशीच जिज्ञासेची परीभाषा आहे. जिज्ञासा बाहेरुन आयात करता येत नाही. जिज्ञासेला आपल्यालाच जन्म द्यावा लागतो.
'तुझे आहे तुजपासी परी जागा चुकलासी ' असे आपण आहोत. जगातले महर्षी , तत्वज्ञ, शास्त्रज्ञ यांनी जग बदलवलं. या सगळ्या प्रगतीचे उगमस्थान जिज्ञासा आहे. खरंच स्वामींनी क्रांतीकारी सुत्र सांगीतल आहे. जिज्ञासा ज्ञान - विज्ञानाचं दालन उघडण्याची ती गुरुकिल्ली आहे. श्रीमद्भगवद्गीते मध्ये श्री कृष्ण चक्रवर्ती महाराज सांगतात,
"यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पांडव
येन भूतान्येशेषेण दृश्यस्यात्मन्यथो मयी ' ।।
जिज्ञासा हा ज्ञानाचा दरवाजा आहे .मनुष्याने जिज्ञासा गुण जागृत करावा आणी यातूनच" वसुधैव कुटुंबकम् " हि धारणा मिळेल . अज्ञानमुलक कलह नष्ट होईल. ज्ञानवृध्दी व संशोधन प्रवृत्ती प्राप्त करण्यासाठी जिज्ञासा महत्वपूर्ण ठरेल
दंडवत
लेखकाचे नाव माहीत नाही. कुणाला माहीत असल्यास नक्की कमेंट करा