बुद्ध्यांक वाढविण्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे पुस्तक वाचन - The most effective way to IQ increase is reading books
पुस्तके ही तुमची सगळ्यात चांगली गुंतवणूक असते. त्यासाठी तुम्ही खर्च केलेला प्रत्येक रुपया तुम्हाला त्याची किंमत वसूल करून देतो. तेव्हा स्वतःवर उपकार करा आणि वाचायला लागा. टीव्ही मालिका आणि फालतू गप्पांमधून बाहेर पडा.
अमेरिकी कॉमेडियन आणि चित्रपट अभिनेता ग्रोशो मार्क्सचे म्हणणे अगदी अचूक आहे. तो एकदा म्हणाला होता, टीव्हीद्वारे लोकांचे शिक्षण होते असे मला वाटते. त्यामुळेच घरात टीव्ही लावला की, मी लगेच उठून दुसऱ्या खोलीत जातो आणि चांगले पुस्तक वाचायला घेतो.
दिल्लीजवळील गुडगावमधील एका मोठ्या कंपनीत अरुण नावाचा तरुण यशस्वी व्यवस्थापक म्हणून काम करतो. सेल्समन म्हणून त्याने करिअरला सुरुवात केली. कंपनीत वेगाने प्रगती करत वरच्या पदावर पोचला. तो विवाहित आहे आणि त्याच्या छंदांमध्ये त्याने टीव्ही पाहणे आणि वाचन असेल लिहिले आहे; पण दुर्दैवाने माझ्या व्यस्त वेळापत्रकामुळे मला वाचन करायला वेळच मिळत नाही, अशी त्याची तक्रार आहे.
कृतिका ही पदवीधर तरुणी मुंबईत बीपीओमध्ये काम करते आणि एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढवण्यासाठी ती खूप मेहनत घेते. कामावर जाताना रोज तुम्ही तिला लोकलमध्ये पाहिले तर ती फ्लॅशकार्डस् वाचत असते आणि येत्या तीस दिवसांत इंग्रजी शब्दसंग्रह वाढवण्याचा तिचा प्रयत्न आहे; पण त्याचवेळी तिच्या कानाला लावलेल्या मोबाइलमधील गाणी तिच्या कानाच्या पडद्यावर आदळत असतात. तिला ती गाणी मनापासून आवडतात.
आपण लिहिता वाचता येणारे अशिक्षित आहोत का? अरुण आणि कृतिका वेगळ्या शहरांमध्ये राहतात; पण त्यांच्यात एक गोष्ट समान आहे. ते वाचक नाहीत. काळाच्या ओघात ते वाचनाची सवय विसरून गेले आहेत. त्यामुळेच आता शिकलेल्या आणि अशिक्षित व्यक्तींमध्ये फारसा फरक राहिलेला नाही. अशिक्षित व्यक्ती वाचू शकत नाही आणि शिकलेली व्यक्ती वाचत नाही, असा तो फरक आहे. त्यामुळे आता स्वतः ला प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे की, आपणही सुशिक्षितांमधील अशिक्षित आहोत काय ? प्रत्येक पुस्तक तुमची बौद्धिक उंची वाढवते.
तुमचे मन विशाल व्हावे आणि जगण्यात सुधारणा व्हावी, असे वाटत असल्यास वाचायला सुरुवात करा. एक पुस्तक तुमचे आयुष्य बदलून टाकू शकते. जगातील काही उत्तम मशागत केलेल्या मनांच्या अंतरंगात डोकावण्याची संधी आपल्याला पुस्तक उपलब्ध करून देते. विचारांचे आवरण पुस्तक वाचणे म्हणजे जणू काही लेखकाशी संवादच असतो. त्याच्या गोष्टी ऐकणे आणि त्याच्या अनुभवातून शिकणे. पुस्तकातून तुम्हाला कल्पना, प्रेरणा मिळते, अंतर्मुख होऊन विचार करण्याची शक्ती मिळते. तुम्ही वाचलेले प्रत्येक पुस्तक तुमच्या ज्ञानावर आणखी एक विचारांचे आवरण घालते. प्रत्येक पुस्तक किंचितशी का होईना तुमची वैचारिक उंची वाढवते. त्यामुळे जीवनाच्या सुपरमार्केटमध्ये उत्कृष्ट वस्तू नेहमीच शेल्फमध्ये वरच्या कप्प्यात ठेवलेल्या असतात. तुम्ही वाचक नसाल तर तुमचा हात तिथपर्यंत कधीच पोचू शकणार नाही.
रोज अर्धा तास वाचन, वर्षभरात २६ पुस्तकांशी संवाद तुम्ही आजूबाजूला पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की, बहुतेक यशस्वी व्यक्ती या वाचक असतात. त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यास तुम्हाला पुस्तके दिसतील. त्यांच्या घरी जाण्याची संधी मिळाली, तर अनेक पुस्तके कपाटात ठेवलेली दिसतील.
तुम्ही फक्त रोज अर्धा तास वाचायचे ठरवले, तर तुम्ही दोन आठवड्यांत सुमारे २५० पाने वाचून पूर्ण करू शकता. म्हणजेच वर्षाला २६ पुस्तके. पुढच्या चार वर्षांत शंभर पुस्तके. सर्वसाधारण भारतीय व्यक्ती आयुष्यात कधीच शंभर पुस्तके वाचत नाही. जरा विचार करा, शंभर पुस्तके वाचली तर तुमच्या मानसिकतेत, विचारपद्धतीत केवढा फरक झालेला असेल. त्याचा परिणाम तुमचे करिअर, जीवनमान सगळ्यांवरच होणार असतो. रोज केवळ तीस मिनिटे वाचण्यासाठी दिल्यास तुमच्या आयुष्यात जादू होऊ शकते. त्यामुळे उगाच कारणे सांगत बसू नका. वाचायला सुरुवात करा.
वाचताना पेन्सिल बरोबर ठेवा, मार्जिनमध्ये नोटस् लिहा. महत्त्वाच्या ओळींखाली रेघा मारून ठेवा. त्यातून तुम्हाला वाचनाचा पुरेपूर फायदा मिळेल. बीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझा एक सहकारी, देशातील प्रख्यात एफएमसीजी कंपनीत सेल्स मॅनेजर होता. तो नेहमी वाचनात आकंठ बुडालेला असायचा. त्याने वाचलेल्या प्रत्येक पुस्तकात खुणा करून ठेवलेल्या असायच्या. हा त्याचा अगदी छोटासा गुण होता. आज तो भारतातील सगळ्यात मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीचा सीईओ आहे.
कोणत्या ना कोणत्या तरी विषयात आपला अभ्यास हवाच. त्याशिवाय, या जगात आपल्याला तरणोपाय नाही. म्हणजे, विषय कोणताही असला, तरीही त्याची माहिती मिळवली पाहिजेच. अर्थात, ही माहिती मिळवून सगळेच तज्ज्ञ होतात, असेही नाही. पण, किमान काही माहिती आपल्याकडे असेल, तर त्याचा उपयोग मात्र आपल्याला नक्कीच होत असतो.
कला आणि अभ्यास या दोन्हींच्या बाबतीत हेच आहे. एखादा तरी विषय असा हवाच, ज्यामध्ये आपल्याला चांगली गती असते. तरच आपण समाजामध्ये काही मान्यता मिळवू शकतो. निदान, त्या एका विषयाच्या अभ्यासामुळे का होईना, पण लोक आपल्याला ओळखतात. आपल्याला प्रतिष्ठा मिळू शकते. क्वचित प्रसंगी मान सन्मानही मिळू शकतो. या अनुषंगाने काही ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्ती अशा काही ज्ञानी लोकांबद्दल सांगतात की,
- रोजच्या जगण्यात जसे व्यवहार ज्ञान पाहिजे, तसेच प्रपंच करताना काहीसे आत्मज्ञानही असेल तर उत्तम. असे लोक जगात कुठल्याही परिस्थितीत तग धरू शकतात. रोजच्या व्यवहारामध्ये किंवा लोकांच्या गर्दीत, समाजामध्ये वावरताना कसे जगायचे...? हे त्यांना कळते आणि घरात आल्यानंतर आपली वर्तणूक कशी हवी, हेही त्यांना माहिती असल्यामुळे त्यांच्या सोबतच्या लोकांनाही त्याचा फायदा होतो. अशा लोकांचा सहवास सगळ्यांना हवाहवासाच वाटतो. म्हणूनच, कुठल्या तरी एका विषयातील निश्चित असे ज्ञान आपण मिळवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. जो अज्ञानी असतो, जो अभ्यासाचा कंटाळा करतो, जो एखाद्याही विषयात काहीच प्रभुत्व मिळवू शकत नाही, त्याचे जगणे जणू व्यर्थच असते.