मृत्युशी गांठ - Mrutyushi gathha
आम्ही जगतो आहोत केवळ जगतो आहोत. विचाराअंती असे
दिसते की, आम्ही जगत नाहीत तर रोजचे मरणे सुरू असते. आम्ही याला
'जीवन' असे गोंडस नाव देतो. हयाला जीवन
कसे म्हणयचे? कोडेच आहे. जीवनाचा रोजच एक एक दिवस कमी होतो
आहे. हे आम्ही प्रत्यक्ष पाहतच असतो. वास्तविक आम्ही रोजच एक एक दिवस कमी करून
मृत्युला कवटाळतो आहोत असे म्हणणे जास्त सोपस्कर होईल. शरीर मरते आहे. बालपण गेले,
तारूण्य आले, आता वार्धक्याकडे वाटचाल सुरू
झाली तरी वाटते की आम्ही अमर आहोत.
शरीर जुने होत आहे.
जीर्ण होत आहे. सुरकुत्या पडल्या आहेत, तिकडे आमचे लक्ष नसते. निसर्ग
आपल्याला कधि काच फसवत नाही, आपणच आपली फसवणूक करीत असतो. मरे एक दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. भौतिक शिक्षण सुरू आहे. शोध सुरू आहे. शरीराचे लाड पुरविले जात आहेत.
मात्र आत्मशांतीचा ठणठणाट सारीच बोंबाबोंब! हाच आमचा इतिहास आहे. ही गोष्ट हळूहळू
होते, चोरपावलांनी होते आहे. घडत आहे पण पताच लागत नाही.
आम्ही मात्र फसतो आहोत. एक मार्मिक पण सुंदर दोहा संत कबिराने जगासमोर मांडला आहे.
मालीन आवत देखके, कलीयन करे पुकार
फुले
फुले चुन लिये, कल हमारी बार ।।
बागेतील टवटवीत दिसणारी फुले सायंकाळी कोमेजून जातात. आजच्या झाडाला असलेल्या. कळ्यांचे फुलांमध्ये रूपांतर होते व त्याचीही लवकरच संध्याकाळ होते. विचित्र संसार आहे हा! कैदी तर पिंजऱ्यात असतो. पाखरही पिंजऱ्यात कोंडली जातात. मानुसही पिंजऱ्यात कोंडला आहे. त्याला तो पिंजरा मात्र दिसत नाही. तो देखील कैदेत आहे. त्याचा पिंजरा मात्र सुक्ष्म आहे. तो मतभेदाच्या पिंजऱ्यात अडकला आहे. अहंकाराच्या पिंजऱ्यात अडकला आहे. हया पिंजऱ्यातून बाहेर उडण्याची त्याला चिंता नाही. आम्ही आमचे सारे जन्म असेच वाया घालवित आलो आहोत.
भौतिक सुखाचे भागीदार बनत चाललो आहोत. हेच अमर जीवन
आहे असा गोड समज करून बसलो आहोत. आम्ही चंद्रावर पोहोचलो पण चंद्राची शीतलता
आमच्यात बहरली नाही. आमची शेकवणुक झाली की आम्हाला आमचा धर्म सुचतो. हिंदु धर्म, मुसलमान
धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्धधर्म,
जैन धर्म हे काही धर्म नव्हेत. तर ईश्वर काय आहे. आम्ही कोण आहोत. ?
हे जाणून घेणे हा खरा धर्म होय. हयालाच सनातन धर्म ( शाश्वत धर्म)
म्हणतात. हे योग्य गुरूच सांगू शकतात. 'तमसो मा ज्योतिर्गमय'
अधःकारातून प्रकाशाकडे तेच नेवू शकतात. ज्यांच्याजवळ पैसा अतोनात
आहे, त्यांच्या काळज्याही अनंत आहेत. ज्यांच्याजवळ पैसा नाही
त्यांना तो कसा मिळेल हया काळजीने ते त्रस्त आहेत. आश्चर्यच आहे. परंतु
आत्मसुखाच्या तृप्तांचीढेकर आत्मज्ञानांनेच मिळते.
पुनरपि
जननम पुनरपिमरणम, पुनरपि जननी जठरे शयनम् ।
(शंकराचार्य)
ही विचित्र अवस्था
माणसाची झाली आहे. केवळ धर्मकांड सुरू आहेत. धर्माचे राजकारण सुरू आहे. राजकारण हा
खोटा संसार आहे. जन्म फुकट वाया जात आहे. जन्माच्या येरझारा सुटता सुटत नाही.
आत्मज्ञान नसल्याने त्याची किंमतही कोणाला होत नाही. नीट समजावून घेतले तर शरीर
हाडामासाचा एक पिंजरा आहे. मनाने आपणास वेठीस धरले आहे. मनही एक पिंजरा आहे.
मनाच्या कहयात आम्ही गुरफटून जात आहोत. म्हणून म्हटले आहे.
मन के
मते न चालिये, मन के मते अनेक ।
जो मनपर
अपसा नही, ऐसा साधु कोई एक ।।
सुखी जीवन हे
आत्मज्ञानाने शक्य आहे. आत्मज्ञान पैलतीरावर नेऊन पोहचवते. शांतीची वाट दाखविते.
आमचे शरीरात चैतन्याचे धर आहे. ते जाणायचे आहे. पैलतीरी परमात्म्याचे मंदीर बनून
जाते. गुरूकडे जाणे आवश्यक आहे. आम्ही रोज हसतो आहोत. हसून आमची फसवणुक होत आहे.
आम्हाला वाटते आम्ही खुप सुखी आहोत. पण हास्य केवळ महान संतांचे चेहऱ्यावरच झळकू
शकते तेथेच ते शक्य आहे.
कारण त्यांचे
चेहऱ्यावर आत्मज्ञानाचे,
शांतीचे वलय असते. आमचे हसणे कृत्रिम असते. हसू येत नाही पण हसावे
लागते. खोटेखोटेच हसत असतो. सुखी आम्ही नसतोच. प्रत्येकजण आपल्या भौतिक विवंचनेत
असतो. कुणाला महाल बांध यचा असतो. कुणाला सुंदर बायको पाहिजे असते. कुणाला धंदा
वाढवायचा असतो. कुणीमात्र रोगराईने त्रस्त असतात. नाना विवंचनेत तो स्वतःहूनच
गुरफुटला असतो.
जनी सर्व
सुखी, असा कोण आहे । विचारे मना तूचि शोधूनि पाहे ।।
मना
त्वाचि रे पूर्वसंचीत केले । तया सारिखे भोगणे प्राप्त झाले ।।
आपल्या अंतर्यामी
केवळ अश्रू आहेत. आपण आपली फजिती करून घेतो आहोत. आम्हाला दिखाव्याचे नाटक मात्र
चांगले वठवता येते. बाकी नगण्यच ! जीवन गुढ आहे. आम्ही इतरांना फसवता फसवता
स्वतःला फसवतो आहोत. जीवनाचे भविष्य आम्ही जाणत नाही. आत्मज्ञानाशिवाय हसणे केवळ
कृत्रिम हसणे होय. हे आम्हाला उमगले पाहिजे. सकाळचे सुंदर फुल सायंकाळी गळून पडते
हे समजले पाहिजे. जे आता गर्वाने ताठरल होत, मगरूर होत त्याची सायंकाळ ठरलेली असतेच.
केवळ भौतिक उत्कर्ष हे एका अर्थाने 'पतन' आहे. भौतिक सुख व दुःख नाण्याच्या दोन बाजू आहेत. येथे सुखही नाही व
दुःखही नाही. तर मृत्युशी रोजच गाठ आहे.
संध्याकाळ होते, पाने पिवळी
होतात. तेथे बराच उशीर झालेला असतो. गळून कारण ती पडण्याच्या मार्गावर असतात.
म्हणून तारूण्यातच नव्हे बालपणातच गुरूचा आधार आवश्यक असतो. गुरू आपल्या पदरचे
काही देत नाही तर आपल्याजवळ असलेला आपलाच प्रकाश (ज्ञान) सत्याचा ठेवा कोठे आहे
त्याचा शोध करावयास आम्हास भाग पाडतात, तोच खरा गुरू होय.
गुरू आपले अज्ञान दूर करण्यास मदत करून आम्हाला ज्ञानी मात्र नक्कीच करतात. जीवन
जगण्याची कला तेच शिकवितात. आम्हाला गुरूचा शोध घ्यावयाचा आहे. स्वतःला जाणायचे
आहे. ज्ञानाचा दिवा शोधायचा आहे. जीवन रहस्य जाणून आहे.
जो
तिलमाही तेल है, ज्यों चकमकमें आग ।
तेरा साई
तुझमें है, जाग सके तो जाग ।। - संत कबीर