संस्कृत सुभाषित रसग्रहण हिंदी मराठी अर्थ - Sunskrit Subhashit hindi marathi artha
वृत्त :- शार्दुल
विक्रिडित
ऐश्वर्यस्य
विभूषणं सुजनता,
शौर्यस्य वाक्संयमो
ज्ञानस्योपशमः
श्रुतस्य विनयो,
वित्तस्य पात्रे व्ययः।
अक्रोधस्तपसः
क्षमा प्रभवितुर्धर्मस्य निर्व्याजता
सर्वेषामपि
सर्वकारणमिदं शीलं परं भूषणम् ॥ - नीतीशतक.
अर्थ :- वैभव हे सौजन्याने (सुजनतेने) विभूषित होते, खुलून दिसते; शौर्य हे वाणीच्या संयमाने शोभून दिसते; ज्ञान हे शांत स्वभावाने, विद्या ही विनम्रतेने, धन हे त्याचा सदुपयोग केल्याने, तप हे क्रोधरहीत वागल्याने, स्वामित्व ही क्षमावृत्तीने, धर्माचरण हे साध्यासरळ निष्कपट वागण्याने शोभून
दिसते. पण या सर्वांचहून अधिक मनुष्य सत्शील वागण्याने सद्चारित्याने शोभून दिसतो त्यामूळे
शील (सत्चारित्र्य) हाच माणसाचा सर्वश्रेष्ठ दागिना (अलंकार, अभूषण) होय.
टीप- या श्लोकासंदर्भात काही पाठभेद आहेत ते असे,
ज्ञानस्योपशमः
श्रुतस्य विनयो,
वित्तस्य पात्रे व्ययः।
ज्ञानस्योपशमः
कुलस्य विनयो, वित्तस्य
पात्रे व्ययः।
तसेच
अक्रोधस्तपसः
क्षमा प्रभवितुर्धर्मस्य निर्व्याजता।
अक्रोधस्तपसः
क्षमा बलवतां धर्मस्य निर्व्याजता।
मराठीमध्ये संस्कृतभाषेतील अनेक उक्ती रोजच्या
संभाषणातही वापरल्या जातात इतक्या त्या मराठीत मिसळून गेल्या आहेत. त्यातीलच 'शीलं परं भूषणम्' ही उक्ती होय. वरील श्लोकापासून ही उक्ती प्रचलीत
झाली असावी.
राजर्षी भर्तृहरीने रचलेल्या नीतीशतकातील काही
श्लोक 'शील (चारित्र्य) महात्म्य' वर्णन करतात. त्यापैकीच एक वरील श्लोक होय. या
बरोबरच शील हा मनुष्यप्रजातीचा सर्वश्रेष्ठ दागिना आहे हे सांगणारा अजून एक श्लोक नीतीशतकात
आहे. तो असा,
वाचो हि
सत्यं परमं विभूषणम्
मृगेक्षणायाः
कृशता कटेश्च ।
द्विजस्य
विद्यैव पुनस्तथा क्षमा
शीलं हि
सर्वस्य जनस्य भूषणम् ॥
वाणीचे (वाचेचे) सर्वश्रेष्ठ भूषण म्हणजे
सत्य; बारीक (सडपातळ) कंबर (कृश कटी) असणे हाच मृगाक्षीचे (हरीणासारखे
डोळे असणार्या सुंदरीचा) अलंकार असतो;
ब्राह्मणाचे
भूषण विद्यासंपन्न असणे; तर क्षमाशीलता हे
विद्यावंताचे भूषण; (आणि) समस्त मानवजातीचे
सर्वात मोठे भूषण म्हणजे शील (सच्छीलता) होय.
'शीलं परं भूषणम्' हे चरण वापरलेला अजून एक संस्कृत श्लोक असा,
शीलं नाम
नृणां कुलोन्नतिकरं शीलं परं भूषणम्
शीलं चाशुकरोति
पावकजलं शीलं सुगत्यावहम्।
शीलं दुर्गतिनाशनं
च विपुलं शीलं यशः पावनम्
शीलं निर्वृतिरेव
परमं शीलं तु कल्पद्रुमः॥
शील हा मनुष्यकुळाचं नाव उज्ज्वल करणारा गुण आहे; शील हेच मनुष्याचे सर्वश्रेष्ठ भूषण आहे; शील अग्नीलाही त्वरीत पाण्यात बदलतं; शीलामुळे मनुष्य जीवनास सुगती (चांगली गती, अवस्था) लाभते; शील दुर्गतीचा नाश करते; शील हेच पवित्र असे यश आहे; शील मनुष्याला वृत्तीविरहीत अवस्थेप्रत नेते (वैराग्य प्राप्त करून देते); शील हा जणू साक्षात कल्पवृक्षच होय. अनेक शाळा व शैक्षणिक संस्थांनी 'शीलं परं भूषणम्' हे सुवचन आपले ध्येयवाक्य, ब्रीदवाक्य, घोषवाक्य म्हणून निवडलेले दिसून येते.