४ प्रकारचे भक्त - महानुभाव तत्त्वज्ञान char prakarache bhakt - mahanubhav panth
भक्त म्हणजे काय तर जो परमेश्वरापासून विभक्त नाही. 'विभक्त' म्हणजे वेगळा अर्थात 'भक्त' याचा अर्थ परमेश्वराशी एकरुप झालेला असा होतो आणि भक्ती म्हणजे एकरुप होण्याची प्रक्रिया. एकरुप होण्याकरिता भक्ताला परमेश्वराजवळ येण्याची गरज असते म्हणून जवळ येणं ही एकरुप होण्याची पहिली पायरी आहे. अर्थात हे 'जवळ येणं' म्हणजे काय? तर अंतर नाहीसं करणं. विरघळून जाणं आहे. मीपणा टाकल्याशिवाय विरघळता येत नाही. मला काय हवंय हे सांगण्यापेक्षा तुला काय हवंय याचा विचार म्हणजे विरघळून जाणं! यात मी, माझं, मला रहातच नाही. इथेच प्रेम आणि भक्ती एक होते.
'मीराबाई श्रीकृष्णमय होऊन गेली. मीरेचं अस्तित्वच राहिलं नाही. ते मीरेच श्रीकृष्णाप्रती समर्पण होतं,म्हणून आज मीराबाई म्हणून डोळे मिटले तर श्रीकृष्णाचं रुप डोळ्यासमोर येतं. भक्तीच अंतिम रुप म्हणजे एकरुप होणं !
प्रेमातही तेच असतं. दोन शरीरं एकत्र येतात तो "शृंगार' असतो पण दोन मनं एकत्र येतात ते 'मीलन' असतं. पण तरीही दोन्हीमधला 'मी' शिल्लक असतोच. ज्याक्षणी हे दोन 'मी' एक होतात, तो क्षण म्हणजे 'संगम'! एक विचार, एक तत्व झालं की एकरुपता येते. मंदिरा समोर उभ्या असलेल्या रांगेतल्याचं तत्व आहे 'मागणे', आणि गाभा-यातल्या परमेश्वराचे तत्व आहे 'देणे'. दोन वेगळी तत्व, एकरुपता कशी येईल ? परमेश्वर तत्वाचा स्वीकार केल्याशिवाय परमेश्वराची भक्ती कशी साध्य होईल ?
परमेश्वर देण्यात विश्वास ठेवतो. दीनदुबळ्यांचा, रांजल्यागांजल्यांचा आधार होतो, हाकेला धावतो. आधार मागत नाही, आधार देतो. त्या तत्वांचा स्वीकार करणं ही पहिली पायरी भक्तीत असायला हवी. तत्व एक झालं, विचार एक झाला की 'मी' विरघळू लागेल, आणि भक्त होण्याच्या क्रियेला सुरुवात होईल.
कुरुक्षेत्राच्या रणांगणावर युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली 'श्रीमद्भगवद्गीता' ही श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद आहे, त्यामधे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केलेले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार देत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदान्त याबद्दल मार्गदर्शन केले. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी 'श्रीमद्भगवद्गीता' या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे 'श्रीमद्भगवद्गीतेला' दीपस्तंभाचे स्थान दिले.
भारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला 'योगोपनिषद' किंवा 'गीतोपनिषद असेही म्हणतात. 'भगवद्गीता' उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला 'उपनिषदांचे उपनिषद' असेही म्हटले जाते. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान, जीवन जगण्याचा मार्ग आणि आनंद मिळतो. त्याचप्रमाणे मोक्ष मार्गाच्या वाटचालीस मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हटले गेले आहे. मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रव्यूहातून कायमस्वरूपी मुक्ती मिळणे व परमेश्वराच्या नित्यानंदास प्राप्त होणे.
भगवान श्रीकृष्ण हे परब्रम्ह परमेश्वराचे अवतार आणि सर्व कारणांचे मूळ आहेत. श्रीकृष्ण हे योगीयांचे योगी आहेत. सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम आहेत. कोणतीच देवता त्यांच्याहून श्रेष्ठ नाहीये. सर्व देवता ह्या परमेश्वराचा कार्यभार सांभाळतात. ज्या देवतांवर आपण श्रद्धा ठेवतो त्या आपल्या इच्छा पूर्ण करतात पण आपल्याला मोक्ष देऊ शकत नाहीत. त्यासाठी परब्रह्म परमेश्वराची अर्थात श्रीकृष्णाची भक्तीच आपल्याला तारक आहे.
आनंद हे परमेश्वराचं स्वरूप आहे. आनंद हा कशावरही अवलंबून नसतो. म्हणजेच तो निरालंब असतो. स्वयंभू असतो. आनंद प्रत्येकाच्या अंतरंगात असतो. पशुपक्षी वनस्पती यांना या आनंदाची जाणीव नसते. परिचय नसतो. पण मानवाच्या बाबतीत आनंद मिळवणं, आनंदात राहणं, आनंदी असणं, आनंदात जगणं हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. त्यासाठी बाहेरचे प्रयत्न नकोत. आतूनच सागरांच्या लाटांसारखा सर्वकाळ हेलावणारा आनंद ज्यान त्यानं आतच उपभोगायचा असतो. मन:शांतीचा मार्ग मनाकडून मनातून शांतीकडे जातो. निस्वार्थपणे आणि श्रद्धेने केलेले परमेश्वराचे नामस्मरण आपल्याला आयुष्याचा हा भवसागर तरून जाण्यास साह्य करते.
आयुष्य म्हटले की चढउतार हे आलेच. कधी हा चढउतारांचा हिंदोळा झोका गगणाच्या उंचीवर नेऊन सोडतो, तर कधी-कधी अगदी मनुष्याला स्वत:च्याही नजरेतून पार उतरवतो. या यशापयशाला, मानापमानांना सामोरे जाण्याची क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. सुखात असो वा दु:खात आपण आपल्या श्रद्धा असलेल्या देवतेच्या अधीन होतो, आणि सर्वकाही त्याला अर्पण करतो. ही श्रद्धा, ही भक्ती व्यक्तीला अधिक उन्नत होण्यास नक्कीच मदत करत असते. कुणी जीवनातील बदलांना धीराने समोरे जातात, तर कोणी एखाद्या छोट्याशा धक्क्यानेदेखील कोसळतात.
म्हणून मनुष्यजन्माचे सार्थक करण्यासाठी हा संहारसागर पार करण्यासाठी शरीराच्या सोबत मनाची खंबीरता आणि सशक्तीकरण खुप आवश्यक आहे. ते साधण्यासाठी आपल्याकडे परमेश्वर भक्ती व त्याचे नामस्मरण हेच एक तारक साधन आहे. परमेश्वरप्राप्तीचे श्रेष्ठ साधन ध्यान, त्याबद्दल 'श्रीमद्भगवद्गीतेतील' सहाव्या अध्यायात श्रीकृष्ण भगवंत म्हणतात,
“योगीनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना ।
श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मतः ।। गीता ६-४७
सर्व योग्यांमध्ये ज्या पुरुषाचे अंतःकरण मज परमेश्वराशी एकरूप झाले आहे आणि जो मोठ्या श्रद्धेने, भावाने माझी अनन्य भक्ती करतो तो योगी मला सर्वात युक्त आणि योग्य वाटतो. पण असे भक्त क्वचित असतात म्हणून श्रीकृष्ण भगवंत पुढे म्हणतात.
“मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः ।। गीता ७-३
'हजारो माणसात एखादाच माझ्यासाठी प्रयत्न करतो, पण त्यांच्यातला सुद्धा एखादाच मला नीटपणे जाणतो.” असे का होते ? ज्या परमेश्वराने हे सारे जग निर्माण केले, ज्याच्या आधारावर हे सारे जग उभे आहे , त्या परमात्म्याकडे हजारो लोक वळून सुद्धा पहात नाहीत, असं का?
तर डोळ्यांनी दिसणारे व पंच ज्ञानेंद्रियांना कळणारे हे त्रिगुणात्मक जगच फक्त खरे आहे, अशी त्यांची खात्री असते. त्यामागे दडलेल्या सर्वश्रेष्ठ अव्यय, अव्यक्त असलेल्या परमेश्वराला त्या लोकांची ज्ञानेंद्रिये जाणत नाहीत आणि म्हणून असे काही असेल हे त्यांच्या मनातच येत नाही. तलावातल्या पाण्यावर जेव्हा दाट शेवाळ येते ना तेव्हा ते शेवाळ हाताने बाजुला सारल्याशिवाय खालचे नितळ पाणी डोळ्याने दिसतच नाही ! आकाशात जेव्हा दाट ढग येतात. तेव्हा एवढे अपार आकाश पण ते सुद्धा दिसे नाहीसे होते.
आणि अशावेळी फक्त डोळ्यांनी दिसतं तेवढच खर अस मानणा-यांना आकाश आहे, ह्यावर सुध्दा विश्वास ठेवणे जड जात असेल. असल्या विचारांनी दिसणारा हा देहच केवळ सत्य आहे आणि मी तेवढाच आहे असे मानून सर्वजण त्या देहाशीच एकरूप होतात. त्या देहाच्या गरजा, त्याच्या आवडी निवडी, त्याच्या इच्छा, हेच काय ते महत्वाचे ठरते आणि मग त्याच्या इच्छा पूर्ण करणे, हेच इति कर्तव्य ठरते. त्यासाठी उपयुक्त असेल ते त्याला मिळाल की ते त्याच सुख, त्याबद्दल आसक्ती. आणि या नश्वर शरीराच्या चंचल मनाचा वासना, आकांक्षा, इच्छा पूर्ण करण्याच्या आड येणाऱ्या सर्व गोष्टींबद्दल, सर्व माणसांबद्दल मनात राग, द्वेष निर्माण होतो. आणि मग सुख–दुःख, मान–अपमान, चांगलं-वाईट, अशी कितीतरी द्वंद्व आपल्या इच्छांच्या संदर्भात निर्माण होतात. मग सुरू होते अखंड धडपड. भल्याबुऱ्या मार्गानेही, कशासाठी? तर हवे ते मिळवण्यासाठी, टिकवण्यासाठी आणि नको ते टाळण्यासाठी! मग असंख्य वासना आणि पुनरपि जननं पुनरपि मरणं । इंद्रियांचे कौतुक, मी आणि माझे हेच ध्येय या विचार सरणीतून जमा होतात. त्याचा परिणाम-
“न मां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः ।
माययापहृतज्ञाना आसूरं भावमाश्रिताः ।। गीता ७-१५।।
वरवर दिसणाऱ्या मायेवरच विश्वास ठेवल्यामुळे ज्यांना सत्य काय ते कळतच नाही असे हे कुकर्मी लोक काम क्रोध वगैरे विकार असल्यामुळे वासनापूर्तीचे ध्येय गाठण्यासाठी दुराचार व पाप ह्या मार्गाने जातात आणि आसूरी वृत्तीचे होतात, मग ते कधीही परमेश्वर जाणून घेणे, त्याची प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करणे ह्या रस्त्याला वळतच नाहीत. इंद्रिय रूपी घोडे, विवेक रूपी सारथ्याच्या ताब्यात हवेत. नाहीतर असेच होणार. परमेश्वर स्वतःच म्हणतात,
‘‘दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया।’’
“माझी ही त्रिगुणात्मक माया ओलांडणे सोपे नाही. जे कोणी प्रयत्न करतात, त्यात सुद्धा भक्तांचे चार प्रकार होतात. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, आणि ज्ञानी.
१. आर्त भक्त :- आपले दुःख निवारण करण्यासाठी परमेश्वराकडे वळतात. महाभारतातील द्रौपदी हे त्याचे ठळक उदाहरण. वस्त्रहरणाच्या वेळी त्या सभेतील कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही हे पाहिल्यावर द्रौपदी अगतिक झाली. देवाशिवाय आता आपल्याला कोणीच सोडवू शकणार नाही हे ध्यानात आल्यावर तिने श्रीकृष्णाला हाक मारली.
२. अर्थार्थी भक्त :- या प्रकारातील भक्तजन परमेश्वराची भक्ती करतात, पण स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. मला हे हवं आहे, ते हवे आहे. अशा त्यांच्या मागण्या सारख्या चालू असतात.
३. जिज्ञासू भक्त :- जिज्ञासू भक्ताचा दुःख निवारण किंवा काही मिळवण हा उद्देश नसतो. पण विश्वातल्या अनेक गोष्टी पाहून त्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण होते. अजुबाजूचा निसर्ग, प्रत्येक झाडापानाची रचना, त्यातली विविधता, त्याचं रचनाकौशल्य, अमर्याद आकाश, त्यातले असंख्य तारका समूह. त्यांचे भ्रमण, त्यांची उत्पत्ति, लय, आपले शरीर, त्यातील गुंतागुंतीची पण विस्मयकारक रचना, अगदी छोट्याशा अणुची रचना, अशा सर्वच गोष्टींतून उघडपणे जाणवणारी, अफाट बुद्धीमत्ता, अमर्याद कल्पकता, प्रचंड नियोजन त्याला स्वस्थ बसू देत नाही. ह्या सर्वांचा मूलस्त्रोत कोठे आहे हे समजलेच पाहिजे असे त्याला वाटत असते. त्यासाठी तो परमेश्वराकडे वळतो. तो आपल्यापरीने माहिती मिळवतोही. पण त्यानंतर त्या परमेश्वराशी समरस होण्यासाठी जी साधना करावी लागते, त्यासाठी जी जिद्द लागते, त्यात तो कमी पडतो. तेवढी उत्कटता त्याच्याजवळ नसते. त्यामुळे परमेश्वराशी एकरूप होण्याचे अंतीम ध्येय तो गाठू शकत नाही.
४. ज्ञानी भक्त:- भगवान म्हणतात, “उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम्। गीता ७-१८ ।। सर्व भक्त चांगलेच आहेत पण ज्ञानी तर माझाच भक्त आहे. कसा असतो हा ज्ञानी भक्त? भगवान म्हणतात,
“येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् ।
ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ।। गीता ७-२८
काही भक्त आत्मत्तत्वाशी संबंधित विचार, भावना आणि कृतीसुद्धा सतत करतात. हे पुण्यकर्म सतत केल्यामुळे त्यांचे पाप नाहीसे होते. म्हणजे त्यांच्या वासनांचा मल धुतला जातो. तीव्र इच्छा नसल्यामुळे त्यांना ध्यान करतांना विक्षेपांचा त्रास होत नाही मन इकडे तिकडे भरकटत नाही. भगवान म्हणतात,
'तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः।।
गीता ७-१७ ज्ञानी भक्त दृढनिश्चयी असतो. सतत ईश्वराशी जोडलेला असतो. परमेश्वराशिवाय दुसरे काहीही त्याला नको असते. “मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो न कोई” अशीच त्याची भावना असते. परमेश्वराबद्दल इतके प्रेम असल्याने त्याला आपोआपच सदा सर्वदा परमेश्वराची आठवण येते. सर्वत्र भरून राहिलेला परमेश्वरच डोळ्यापुढे दिसत रहातो. सर्वत्र वासुदेवच आहे, असे वाटणारे महात्मे फार दुर्मिळ असतात. जन्म न जन्म तपश्चर्या केल्यावर अशी स्थिती प्राप्त होते. असा भक्त परमेश्वरालाही फार प्रिय असतो.तो परमेश्वराशी एकरूप झालेला असतो त्यामुळे “तो आणि मी वेगळे नाहीच” असे भगवान म्हणतात. असा हा ज्ञानी परमेश्वराला समग्रपणे जाणतो. परमेश्वराच्या रूपाबद्दल त्याच्या मनात यत्किंचितही संशय रहात नाही.
परमेश्वराचे रूप इंद्रियातीत आहे. म्हणजे आपल्या कोणत्याही ज्ञानेंद्रियाला त्याच्याबद्दल काहीही कळू शकत नाही. हवासुद्धा आपल्याला दिसत नाही पण हवा तर आहेच आणि आपल्या जगण्यासाठी आवश्यकच आहे. तसेच परब्रह्मसुद्धा ज्ञानेंद्रियांना समजला नाही तरी पण परमेश्वराचे अस्तित्व हे असतेच. परमेश्वराला जन्म नाही, कधीही विनाश नाही. तसेच परमेश्वर स्वरूप हे अगदी सर्वत्र पसरलेले आहे पण योगमायेने झाकलेले आहे. माया ही परब्रह्माची एक शक्ती आहे. तिला प्रकृती असेही म्हणतात. प्रकृतीचे दोन प्रकार असतात. एक अपरा प्रकृती आणि दुसरी परा प्रकृती.. पृथ्वी, पाणी, तेज, वायु, आकाश, आणि मन, बुद्धी, अहंकार ह्या आठ गोष्टी मिळून अपरा प्रकृती बनते. सगळ्या जड वस्तु ह्यापासूनच बनतात. परमेश्वराची परा प्रकृती म्हणजे जाणीवतत्व, चैतन्य. तिच्यामुळेच आपली सर्व इंद्रिये कार्य करू शकतात. ह्या दोन्ही प्रकृती मिळून हे सारे जग निर्माण होते. म्हणजे ह्या सर्व जगाचे उत्पत्तिलयकारण ते परब्रह्म परमेश्वरच असतात. म्हणून भगवान म्हणतात,
मत्तः परतरं नान्यत्किंचिदस्ति धनंजय ॥
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ।।गीता ७-७ ।।
परमेश्वराहून श्रेष्ठ कोणी नाही. एखाद्या सुत्र म्ह. धाग्यात मणी ओवून माळ तयार केलेली असते, तेव्हा त्या माळेत ओवलेले मणी सर्वांनाच दिसतात, पण त्या मण्यांमधला धागा, जो त्याच सोन्याचा बनलेला असतो पण तो कोणालाच दिसत नाही. पण खरे तर त्यानेच सर्व मण्यांना धारण केलेले असते. तसा परमेश्वरच जगदाधार आहे. शरीर, मन, बुद्धी ह्यांचे कार्य म्हणजे विक्षेप,ते काही काळासाठी थांबले की दृष्य, भावना, आणि विचार ह्यांनी निर्माण झालेले जग लुप्त होते आणि सर्वत्र भरलेले ब्रह्म जाणवते.