२३-६-२०२२
निंदा करणे हीच या संसारातील मानवाचा सर्वनाश करणारी एक महान शत्रू !!
समाजात वावरत असतांना "निंदा" हा शब्द बहुतांशी लोकांच्या मुखातून सतत ऐकत असतो. "निंदा "शब्दाचा अर्थ आहे. विनाकारण कोणा विषयी भलेबूरे बोलणे. किंवा वाईटसाईट बोलणे. निंदकांच्या संदर्भातील विचार" संत साहित्यात देखील पाहावयास मिळतात. त्याचे दुष्परिणाम यावर अल्पसा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. निंदकांची हि "पिलावळ" फार प्राचिन काळापासून चालत आलेली पाहाण्याला मिळते. निंदकाचं एकच काम असते, तुम्ही किती चांगले काम करा, मग ते सामाजिक असो की, धार्मिक, असो किंवा कौटुंबिक असो, त्यात काहीतरी खाम्या काढणे, किंवा दोष काढणे, त्या कामाची ऊंची कमी करणे एवढेच धोरण त्यांचे असते.
तसे पाहिले. प्रत्येक व्यक्तिच्या जीवनात एक तरी निंदक असावा लागतो. ज्या प्रमाणे सात वारात एक रविवार सुट्टीचा असतो. त्याच प्रमाणे! चित्रपटात जसा एक "खलनायक"असतोच त्या प्रमाणे ! संतांची... निंदकाच्या संदर्भात बरेच प्रमाण पाहाण्याला मिळतात. त्यांना कितीही आपण बदलण्याचा विचार मनात आणला, तरी ते बदलू शकत नाही. या संदर्भात संतांनी काही प्रमाणे प्रस्तुत केली आहे...
रासभ धुतला । महातिर्थामाजी । नव्हे तेजी । शामकर्ण ।१।
तेवी खळा काय । केल्या ऊपदेश । नव्हेचि मानस । शुध्द त्याचे ।२।
सर्पासी पाजीले । शुर्करापियुष । अंतरीचे विष । जावो नेणे ।३।
तुका म्हणे श्वाना । खीरीचे भोजन । सवेची वमन । जेवी तया ।४।
गाढवाच्या अंगी । चंदनाची ऊटी। राखेसवे भेटी । केली तेणे ।१।
सहज गुण । जयाचे देही । पालट ते काही । नव्हे तया ।२।
माकडाच्या गळा । मोलाचा तो मणी । घातला चावूनी । टाकी थुंकोणी ।३।
तुका म्हणे खळा । नावडे हित । अविद्या वाढवी । आपुले मते ।४।
गाढव शृंगारिले कोडे । काही केल्या नव्हे घोडे ।१।
त्याचें भुंगणें न राहे । स्वभावासी करील काये ।२।
श्वान शिबिके बैसविले । भुंकतां न राहे ऊगले ।३।
तुका म्हणे स्वभाव कर्म। कांही केल्या न सुटे धर्म ।४।
कावळ्याच्या गळां । मुक्ताफळ माळा। तरी काय त्याला । भूषण शोभे ।१।
गजालागी केला । कस्तूरीचा लेप । तिचे स्वरुप । काय जाणे ।२।
बकापुढे सांगे । भावार्थवचन। वाऊगाचि सींण । होय त्यासी ।।३।।
तुका म्हणे तैसे । अभाविक जन । त्यांसी वाया । सीण करु नये ।।४।।
निंदक तो पर उपकारी । काय वर्णू त्याची थोरी ।
जो रजाकाहुनि भला । परि सर्व गुणे आगळा ।।१।।
ने घे मोल धुतो फुका । पाप वरच्यावरि देखा ।
करितसे साधका । शुध्द सरिते तेही लोकी ।।२।।
मुख संवदनी सांगाते । अवघे साटविले तेथे ।
जिंव्हा साबण निरुते । दोष काढी जन्माचे ।।३।।
तया ठाव यमपुरी । वास करणे अघोरी ।
त्यासी दंडण करी । तुका म्हणे न्हाणी ते ।।४।।
संत निंदा ज्याचिये घरी । घर नव्हे यमपुरी।।
संस्कृत साहित्यात देखील बरेच ऊदाहरण पाहाण्याला मिळतात.
दुर्जनस्य च सर्पस्य वरं सर्पो न दुर्जनः।
सर्प दंशति कालेन दुर्जनस्तु पदे पदे।।
दुष्ट एवं निंदक, आणी सर्प या दोन्ही पैकी कोणाला निवडायचे ठरले. तर विचरवंत सर्पाला पंसती देतात. सर्प वेळ आल्यावर डंस करतो. निंदक मात्र पावलोपावली हानी पोहचवत राहातो. म्हणून दुर्जन सापा" पेक्षा दृष्ट आहे.
तक्षकस्य विषं दंशे मक्षिकायाश्च मस्तके ।
वृश्चिकस्य विषं पुच्छे सर्वांगे दुर्जनस्य तत् ।।
सापाचे विष दातात असते. माशीचे विष मस्तकात असते. विंचवाचे विषं नांगीत असते. दुर्जानाच्या सर्व अंगात मात्र विष भरलेले असते. निंदक एवं दृष्ट यांना किती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तरी त्यांच्यात बदल होऊ शकत नाही. या भारत वर्षातील महान चिंतक भर्तृहरी वर्णन करतांना म्हणतात.
प्रसह्य मणिमुध्दरेन्मकर वक्त्रदंष्ट्र्न्तरात् ।
समुद्रमपि सन्तरेत्प्रचलदूर्मिमालाकुलम् ।
भुजङ्गमपि कोपितं शिरसि पुष्पवद् धारयेत् ।
न तु प्रतिनिवाष्टमूर्खजन चित्तमाराधयेत् ।।
एक वेळ मनुष्य आपल्या पुरुषार्थाच्या सामर्थ्यावर पाण्यातील मगराच्या मुखातील मणी काढू शकतो. एकवेळ अतिशय खवळलेल्या समुद्राच्या लाटा पार करुन जाणे शक्य आहे. अंत्यत क्रोधी सर्पाच्या गळ्यात पुष्पहारा घालने शक्य आहे.पण मुर्खाला समजविणे कठिण आहे. या संदर्भात अधीक वर्णन करतांना म्हणतात ! एकवेळ जमीनीत वाळू पेरुण तेल काढणे शक्य एवं संभव आहे कदाचित तान्हेला हरिण मृगजळ पिऊन तहान भागवणे शक्य आहे. कदाचित एखाद्या सशाचे शिंग मिळू शकेल, पण मूर्खाला समजविणे शक्य नाही. हे वर्णन पुढील पद्यात आलेले आहे.
लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन्।
पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः।
कदाचिदपि पर्यटञ्छाशविषाणमासादयेत्
न तु प्रतिनिविष्टमूर्खजन चित्तमाराधयेत्
अग्निला पाण्याने शांत केल्या जाऊ शकते, सूर्याची तिव्र किरणे छत्रीने रोखल्या जाऊ शकतात. दंड्याने बैलाला तथा गढ्याला सरळ केल्या जाऊ शकतात. व्याधीने ग्रासलेल्या माणसाला विवीध औषधीने ठिक करता येते. या सर्व प्रकाराची औषधी शास्रात आहे. पण मूर्खाला कोणतेच औषधी लागू पडत नाही. म्हणून म्हटलेले आहे.
शक्यो वारयितुं जलेन हुतभुक् छत्रेण सूर्यातपो।
नागेन्र्दो निशातांकुशेन समदो दण्डेन गोगर्दभौ।
व्याधिर्भेषजसङ्ग्रहैश्च विविधैर्मन्त्रैः प्रयोगैर्विषं।
सर्वस्यौषधमस्तिशास्त्र विहितं मूर्खस्य नास्त्यौषधम् ।।
"दुर्जन व्यक्ती पुढील व्यक्तीचे चांगले गुण न पहाता. त्यांच्या उत्तम गुणांना नाव ठेवण्यात पटाईत असतो. एखादा लज्जाशील व्यक्ती आहे. त्याला म्हणतो, काय जड "एवं मूर्ख माणुस आहे. व्रत आचरणारा असेल. तर हा म्हणेल, पहा कसा पाखंडी एवं ढोंगी आहे. पवित्र चरित्र असेल तर म्हणतो, कसा कपटी आहे. वीरांना निर्दियी म्हणेल. मुनी लोंकांना पागल, तर मधुर भाषण करणाऱ्याला नेंभळट, एखादा चांगला वक्ता असेल, तर त्याला बडबड्या म्हणेल, गंभीर पुरुषाला याच्यात काहीच पाणीच दिसत नाही. एवं पुरुषार्थ दिसत नाही. म्हणून दुर्जन एवं निंदक व्यक्ती कोण्या गुणाला चागले म्हणणारच नाही. कोण्या ऊत्तम गुणाला नाव ठेवले नाही. असे झालेच नाही. सर्वच ऊत्तम गुणांना नावे तथा दोषारोपीत करण्याचा प्रयत्न निंदक सतत करत असतात. म्हणून पूढिल पद्यात वर्णन करतांना म्हटलेले आहे.
जाड्यं ह्रीमति गण्यते व्रतरुचौ दम्भः शुचौ कैतव ।
शुरे निघृर्णता मुनौ विमतितता दैन्यं प्रियालापिनी ।
तेजस्विन्यवलिप्तता मुखरता वक्तुर्यशक्तिः स्थिरे ।
तत्को नाम गुणो भवेत्स गुणिनां यो दुर्जनैर्नाङ्कितः ।।
निंदक .. कितीही चांगले गुण असले.तरी त्याला नावच ठेवणारच, इतिहासात असे किती तरी निंदक पाहाण्याला मिळतात! महानुभाव पंथामधे महान महान आचारवंत साधुसंत होऊन गेले. आजही होत आहे. अशा महान चर्या करणाऱ्या साधुसंताची "निंदा" करणारे लोक त्या काळात होऊन गेले. म्हणून कवीनी महानुभाव पंथीय साहित्यात "मुर्ती प्रकाश नावाचा ग्रंथ आहे. या ग्रंथात देखील "नींदा" शब्द आलेला आहे. त्या संदर्भात पुढिल प्रमाणे...
जे वीखयांते सेवती सदा ।
आणि दमनशीळाची करिती नींदा ।
ते दुःख भोगीतां कैवल्यकंदा । घृणा नुपजे ।।२७४९।।
जे अनिष्ठाते खादले । आणि तापसाते म्हणे ठक आले।
ते आधपात गेले । देखत देखता ।।
जे चर्यावंताते देखूनी दृष्टी । रागद्वेख भरीती पोटी ।
तयासी असावया सृष्टी । ठावो नाही ।।
जे ज्ञानीया भक्ताते देखुनी डोळा । ऊपजे परश्रीसंतापाचा उभाळा,
ते शरण जाती काळा । यमपुरासी ।।
जे वीखयांचे करीति समर्थन ।
ज्ञाने वैराग्य आचरतां म्हणति नव्हे साधन ।
तयाते मुख पाहातां घडे आत्महनन । अनुसरलेयांसी ।।२७५५।।
अशी बरेच वर्णन मुर्ती-प्रकाश ग्रंथात पाहाण्याला मिळतात. निर्वेदस्तोत्रात देखील वर्णन पाहाण्याला मिळते.
शिशुपाळ निंदा करिता । बहुत ऊपसाहिले गोपीनाथा।।
शतभर शिवया देता । शिरोच्छेद केला पै ।।
म्हणौनि संताची निंदा करितां । कवणी नाही झाला जाणता ।
अठरा ब्रम्हहत्या घडलिया सांगता । जन्मेजयासी ।।
म्हणौनि जो तापसाची निंदा करित ।
तयाचिया कुळाक्षय होय त्वरीत ।।
या संसारातील प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात घेतले पाहिजे की, निंदेने किती हानी होते. इहलौकीक देखील, व पारलौकिक देखील हानी होते. मग ती "निंदा" साधुसंताची असो की, परमेश्वर अवतारांची असो, द्वापार युगातील जगमान्य परमेश्वर अवतार श्रीकृष्ण महाराजांची निंदा शिशुपाळाने केली. नव्हेतर गांधारी पुत्र दुर्योधन, दुःशासन, कंस, माम्भळभट, पौंड्रिक आदीं या निंदकानी श्रीकृष्णमहारांजांची निंदा केली त्यांचा शेवटी विनाशच झाला ना! म्हणून आपला जन्म कोण्याही युगात होवो, मानवाच्या जन्माला आल्यावर संतनींदा, परनींदा "टाळण्यात भले आहे. निंदा" या शत्रू पासून दुर राहिले तरच मानवाचे कल्याण आहे. तसे व्यवहारीक जीवनात देखील प्रसन्नता टिकून राहू शकते.
महंत श्री जयराजशास्त्री तळेगावकर !(साळवाडी.)