बालस्तावत्क्रीडासक्तस्तरुणस्तावत्तरुणीरक्तः (चर्पट पंजरिका स्तोत्रम्) Charpat Panjarika Stotra knowledgepandit

बालस्तावत्क्रीडासक्तस्तरुणस्तावत्तरुणीरक्तः (चर्पट पंजरिका स्तोत्रम्) Charpat Panjarika Stotra knowledgepandit

 संस्कृत सुभाषित रसग्रहण - मराठी श्लोकार्थ

(चर्पट पंजरिका स्तोत्रम्) Charpat Panjarika Stotra  

बालस्तावत्क्रीडासक्तस्तरुणस्तावत्तरुणीरक्तः ।

वृद्धस्तावच्चिंतामग्नः परे ब्रह्मणि कोऽपि न लग्नः ।।

अर्थ :- लहान बालकं खेळण्यात गुंग असतात, तरुण, युवा तरुण मुलींमधे अनुरक्त असतात, वृद्ध, म्हातारे (वयाप्रमाणे येणार्‍या शारीरिक, मानसिक, प्रापंचिक) चिंतांमधे व्यग्र असतात पण परब्रह्माच्या भगवंताच्या चिंतनात मात्र कोणीही नसतो!

चिंतन...

बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले ।

वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर ।।

बालपणा रमण्यात गमविला, ।

यौवनात धनलौकिक सारे ।।

लडकपन खेलमें खोया, जवानी नींदभर सोया ।

बुढापा देखकर रोया, यही किस्सा पुराना है ।।

आचार्यांनी या श्लोकात अधोरेखित केलेली जीवनाची वास्तविकता वेगवेगळ्या संदर्भात वरील प्रमाणे अनेक कवींनी रूपांतरित, भाषांतरित केली आहे! निसर्गतःच. मूलभूत प्रेरणेनुसारच लहान मूल, बालक खेळात, खेळण्यात रमतं!

एका खेळाचा वा खेळण्याचा कंटाळा आला की दुसर्‍या खेळाखेळण्याकडे वळतो. तारुण्यात खेळखेळणी बदलतात. आपल्या देहामनातले बदल जाणवतात व माणूस गुलाबी स्वप्नात मग्न होतो. ती खरी होण्याची वाट पाहतो. वास्तवात आणण्याची खटपट, धडपड करतो व संसारगाड्यात नकळतच अडकतो! घी देखा लेकिन बडगा नहीं देखा अशा स्वतःच्या झालेल्या फसगतीलाही अगतिकपणे स्वीकारतो व दुःखात सुखाचे क्षणकण शोधायचा प्रयत्न करतो!

कालांतरानं स्वतःच असोशीनं मांडलेल्या काडी काडी करून जमवलेल्या, उभारलेल्या संसारातून कधी आपणहून  तर कधी नाईलाजानं, अपरिहार्यपणे, अनिवार्यपणे बाहेर पडतो वा तिथेच बाहेर पडल्यासारखा राहतो! देहाची मनाची काळाच्या ओघात झालेली पडझड निमूटपणे किंवा कुरकुरत सहन करतो! भूतकाळात जमा झालेल्या घटनांच्या भुतांना घाबरत वा वर्तमानात घडत असलेल्या गोष्टींच्या भविष्यकालीन संभाव्य परिणामांची चिंता करत, त्यांना भीत भीत कालक्रमणा करतो!

पण या सार्‍या जीवनव्यापारात भगवंताचा विचार,त्याची भक्ति इत्यादींना त्याच्या ठिकाणी काहीच किंमत नसते! जेव्हा अघटित अकल्पित काही घडून जीवनमरणाचा प्रसंग येतो तेव्हा मात्र तो खडबडून जागा होतो! पण तेव्हा उशीरही झालेला असू शकतो व पश्चात्तापाची वेळ येते! मग त्याच्या जीवनात देवळांचे उंबरठे झिजवणं, साधू बाबा महंतांची मनधरणी करणं, जप जाप्य, प्रदक्षिणा, दानधर्म इत्यादींना ऊत येतो.

पण तोपर्यंत वेळ टळून गेलेली असते! म्हणून आचार्य वेळीच सावध करतायत. अर्ध्या गोवर्‍या स्मशानात पोहोचल्या तरी भगवत्स्मरणाकडे का वळत नाहीस? एक फटका या निमित्तानं आठवला..

प्राण्या कृष्ण भजावा रे मूर्खा गर्व नसावा रे ।।

नेसुन साडी, उंच माडी, कानीं बाळीबुगडी

यमराजाचे येता बोलावणे स्मशानी काया उघडी ।।

दौलत झेंडा तपतो हंडा खाशी ऊन ऊन मांडा

यमराजाचे येता बोलावणे रडती पोरे रांडा ।।

अनंत कवि म्हणे समजा उमजा वाया करिता गमजा

यमराजाच्या येतिल फौजा करतिल पुरता खुर्दा ।।

तेव्हा यमराजाच्या बोलावण्याची वाट पहायच्या आधी  "भज गोविंदम् " ला स्वीकारणं हेच शहाणपणाचं ठरेल!

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post