संस्कृत सुभाषित रसग्रहण sunskrit Subhashit knowledgepandit
दुर्जन
दुर्जनः परिहर्तव्यो विद्ययाऽलङ्कृतोऽपि सन्
।
मणिना भूषितः सर्पः किमसौ न भयङ्कर: ॥४५॥
- 'नीतीशतक', राजा भर्तृहरी.
छंद : अनुष्टुप {राजा भर्तृहरी कृत नीतीशतक दुर्जनपद्धति विषयविभाग (उ) - नीच,
दुष्ट, खाष्ट, दुर्जन.}
श्लोकाचा अर्थ - दुर्जन
हा कितीही विद्याविभुषित असला, तरी त्याची संगत टाळावी. ज्याचा मस्तकी रत्न असते असाही सर्पही
भयंकर नव्हे काय?
अर्थात आहेच. तसं दुर्जन मनुष्य कितीही शिकलेला असला, कितीही पंडित विद्वान असला तरी
त्याच्याशी कामापुरताच व्यवहार ठेवावा. कारण त्याच्या विद्येमुळे त्याच्याठिकाणी असलेला
दुर्जनपणा, इतरांना त्रास देण्याची वृत्ती, इतरांचे अनहित पाहून असुरी आनंद भोगण्याची
वृत्ती जात नाही. रावण खुप विद्वान होता पण असुरी प्रवृत्तीमुळे परस्त्रीहरणाचे महापाप
करायला त्याला काहीच लज्जा वाटली नाही.
कंसही महादेवाचा भक्त होता,
पण देवकी मातेच्या ६ बाळकांची हत्या करताना त्याला किंचितही भय वाटले नाही. दुर्योधन, जरासंद, शिशुपाल, अश्वत्थामा, द्रोणाचार्य
ही सर्व मंडळी विद्या विभुषित होती. पण वाईट संगामुळे, असुरी वृत्तीमुळे अधर्म आचरून
नरकगामी झाली.
टीप-
हा श्लोक चाणक्यनीतीमधेही समाविष्ट आहे.
पञ्चतन्त्रामधे लिहिले आहे की,
न धर्मशास्त्र पठतीति कारण
न चापि वेदाध्ययनं दुरात्मनः।
स्वभाव एवात्र तथातिरिच्यते
यथा प्रकृत्या मधुर गवां पयः॥
धर्मशास्त्राचे शिक्षण घेणे तसेच वेदाध्ययन
केल्याने दुरात्म्याचा स्वभाव सज्जनासमान होत नाही. ज्याचा जो स्वाभाव आहे,
तो तसाच रहातो. गायीचं दूध स्वभावतःच मधुर असते.
रावण काही कमी विद्वान नव्हता, पण त्याच्या विद्वत्तेने त्याची दुष्टता निघून गेली काय?
त्याचा स्वभाव बदलला काय?
वृन्द कवी लिहितो,
खाल विद्या-भूपति तउ, नहीं भरोस
को मूल ।
जो मणि भूषित भुजग जग, नीच मीच
सम तूल ।।
नहीं इलाज देख्यौ सुन्यौ, जासों
मिटत स्वभाव ।
मधुपुत कोटिक देत तउ, विष न
तजत विष-भाव ।।
कोणाचाही जन्मजात स्वभाव बदलू शकत नाही. विद्या उत्तम गोष्ट आहे पण स्वभाव बदलण्याची
शक्ति तिच्यात नाही. विद्येच्या प्राप्तीने मनुष्याला नवीन ज्ञान प्राप्त होते पण मूर्खाची
मूर्खता अधिकच वाढत जाते. विद्येमुळे दुष्टांना एक प्रकारे बळच मिळते. विद्याबळाने
दुष्टांची दुष्टता अधिक भीषणरूप धारण करते.
स्वाती पावसाचा थेंब शिंपल्यात पडला
तर त्याचा मोती होतो तर सापाच्या मुखात पडला तर तोच थेंब भयंकर विष बनतं. पाणी कितीही गरम केले तरी थोड्यावेळाने ते थंड होऊन
आपल्या स्वभावधर्मास जागते. लसुन अथवा हींगावर
कस्तूरीचे हजारो पुट चढवले तरी ते आपला मूळ
गंध सोडत नाहीत. कडुनिंबाच्या मुळांना कितीही गुळ-तूपाचं सींचन केलं तरी तो
गोड होईल काय? मूळ
स्वभाव जसा आहे, तसाच
रहातो.
वरील श्लोक 'अनुष्टुप' या छन्दामध्ये
रचला गेला आहे. छंद - छंदोबद्ध रचनेमधे पदाच्या
चरणांतील विशिष्ट अक्षरसंख्या व त्यातील विशिष्ट क्रमाकांचे अक्षर लघु अथवा गुरू असणे
याला महत्त्व असते. अनुष्टुप छन्दातील रचनेचे प्रत्येक चरण आठ अक्षरांचे असते.
१. प्रत्येक चरणातील (ओळीतले) पाचवे अक्षर लघु (र्हस्व) हवे.
२. प्रत्येक चरणातील सहावे अक्षर गुरू (दीर्घ) हवे.
३. दुसर्या आणि चौथ्या चरणातील सातवे अक्षर लघु (र्हस्व) हवे.
४. पहिल्या आणि तिसर्या चरणातील सातवे अक्षर गुरू (दीर्घ) हवे.
या छंदाचे लक्षण पुढील श्लोकात सांगितले
आहे -
श्लोके षष्ठं गुरुज्ञेयम् सर्वत्र लघुपञ्चमम्।
द्विश्चतुष्पादयोः ऱ्हस्वम् सप्तमं दीर्घमन्ययोः।
संकलन व टीप : अभिजीत काळे,
---------