संस्कृत सुभाषित रसग्रहण sunskrit Subhashit knowledgepandit
एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतः समाधीयतां
पूर्णात्मा सुसमीक्ष्यतां जगदिदं तद्बाधितं दृश्यताम्।
प्राक्कर्म प्रविलाप्यतां चितिबलान्नाप्युत्तरैः
श्लिष्यतां
प्रारब्धं त्विह भुज्यतामथ परब्रह्मात्मना स्थीयताम्
॥
अर्थ :-
१) एकान्तात सुखानं रहा..
२) परब्रह्माचे ठिकाणी चित्त स्थिर करा, एकाग्र
करा..
३) पूर्णब्रह्माचं, परब्रह्माचं नीट चिंतन करा, ध्यान धरा
४) त्या सच्चिदानंदस्वरूप परब्रह्माच्या साक्षात्कारानं सत्य भासणार्या पण सत्य
नसणार्या दृश्य विश्वाच्या सत्यतेचा बाध करा
५) त्या ब्रह्मज्ञानानंच प्राक्कर्म, संचितकर्म
जाळून टाका
६) त्या ब्रह्मज्ञानातच स्थित राहून क्रियमाण असंच करा की ते तुम्हाला चिकटणार
नाही वा त्यातून पुढील संचितही तयार होणार
नाही
७) प्रारब्धकर्म जे उरलं असेल ते इथेच भोगून संपवा
८) मी परब्रह्मच आहे या विचारानेच रहा, या भावनेतच रहा..
आणि निर्विषय निर्मळ निरुपम अद्वैतानंदसागरावर मजेत तरंगत रहा..
१) एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतः समाधीयताम्
अर्थ..
१) एकान्तात सुखानं रहा..
२) परब्रह्माचे ठिकाणी चित्त स्थिर करा..एकाग्र करा..
चिंतन......
Man is a social
animal. मनुष्य हाही प्राणीच असला तरीही तो समाजप्रिय कळपात राहणारा प्राणी आहे असं म्हटलं जातं. समाज हा कुळपरिवारांनी बनतो व कुळपरिवाराची सुरवात कुटुंबापासूनच
होतो.
एकाकी न रमते असं त्या परब्रह्माविषयी विश्वोत्पत्तीची
कारणमीमांसा सांगताना वचन सांगितलं जातं.
एकाकीपणाचा कंटाळा आला म्हणून एकोऽहं बहु स्याम्
प्रजायेय असा प्रथम संकल्प उठला आणि
विश्वाची उत्पत्ति झाली. हे जसं त्या परब्रह्माबद्दल सांगतात तसंच व्यक्तीबद्दलही सांगितलं
जातं.
स्त्री असो वा पुरुष. प्रत्येकालाच सामान्यतः एकटेपण त्रासदायक, कंटाळवाणं, छळणारं वाटतं. जीवनसंघर्षात स्वतःच एकट्यानं लढण्यापेक्षा कुणी जोडीदार असेल
तर बरं.
तेवढाच धीर मिळेल,
लढण्यासाठी जोर मिळेल अशी भावनाही जन्माला येते. निसर्गतःच भिन्नलिंगी व्यक्तीचं आकर्षण असल्यानं स्त्रीपुरुष
एकत्र येतात.
त्या आकर्षणाला त्या दोन्ही व्यक्ति मनुष्यप्राणी,
माणसं असल्यानं प्रेम, विश्वास, धर्मकर्तव्य, नातेसंबंध अशा
चौकटीतून काही नाव मिळतं. प्रपंचाला सुरवात होते. दोनाचे चार, चाराचे सहा होत होत पिढ्यापिढ्यातून परंपरा तयार होतात आणि कुळाचा
विचार सुरू होतो.
अनेक कुळांचा समाज अशा पायर्यांनी चढत चढत जाती / ज्ञातीनिहाय, देशप्रांतनिहाय, राष्ट्रनिहाय विविध
समाज तयार होतात..
त्यातल्या प्रत्येक समाजाला व समाजातल्या प्रत्येकाला सत्तेचं
आकर्षण असतं..
आपलं, आपल्या कुटुंबपरिवाराचं, समाजाचं, प्रांताचं राष्ट्राचं
अधिपत्य असावं अशी इच्छा,
वासना, हाव आग्रह, हट्ट निर्माण होऊन त्या दिशेनं प्रयत्न सुरू होतात.. विविध सुष्टदुष्ट
कर्मांकडे प्रवृत्ति होते आणि नवीन प्रकारचे संघर्ष जन्माला येतात.
हे सर्व चालू असताना ज्या एका बिंदूतून हा विश्वप्रपंच उभा राहिला, ज्या परब्रह्माचे आपण अंश आहोत तो विश्वशक्तीचा बिंदु,ते परब्रह्म विस्मरणात जाऊ लागतं.. दुःखभोग वाट्याला येऊ लागतात. मग त्यातून सुटका होण्यासाठी
त्यातल्या त्यात विचारी माणसांच्या मनात त्या शक्तीचं, परब्रह्माचं चिंतन सुरू होतं! त्या शक्तीच्या, परब्रह्माच्या स्वरूपा विषयी जिज्ञासा निर्माण होते. त्यांचा शोध घेण्याची इच्छा निर्माण होऊन प्रयत्न, साधना, तप यांना प्रारंभ होतो.
त्या साधनेत,
तपात मनुष्यस्वभावगत देहदोषांमुळे, मनोदोषांमुळे विकारांमुळे अडथळे निर्माण होऊ लागले
आणि अपेक्षित फळ न मिळाल्याने निराशाही जाणवू लागली की मग कुणाच्या तरी अनुभवी, जाणत्या, नी माणसाच्या मार्गदर्शनाची
आवश्यकता भासू लागते! अशा साधकांना मार्गदर्शन
करताना आचार्य सांगतात..
एकान्ते सुखमास्यताम् एकान्तात सुखानं रहा.. एकान्ताचं सुख अनुभवत रहा! द्वितीयाद्वै भयं भवति। दुसरा आला की भयभीति निर्माण होते. त्याचं मूळ अज्ञानजन्य अहंकारात आहे. मीच असावं. दुसरं कोणीही असू नये या
इच्छेचं आकांक्षा...
महत्त्वाकांक्षा ईर्षा द्वेष मत्सर यात
रूपांतर होतं.
एकटेपण कंटाळवाणं असलं तरी सर्व प्रकारच्या विविधतेत एकच एक
भरून उरलंय हा अनुभव सुखद असतो.. त्या एकाकडे लक्ष
केंद्रित झालं की अनेकत्व लटकं पडतं व अनेकत्वजन्य भयभीति नाहीशी होते. म्हणून एकान्ते सुखमास्यताम् असं म्हटलंय. लोकांतात रमणारा साधक जेव्हा एकान्ताची वाटचाल करतो, एकान्त साधतो, त्या एकाच्या अनुभूतीतून एकच
होतो, तेव्हां तो सिद्ध होतो.
असा साधक बुडती हे जन न देखवे डोळां अशा कळवळ्यातून जगाच्या कल्याणा संतांच्या
विभूती या न्यायानं जीवन जगतो. तरीही त्याचं एकत्व भंगत नाही.. आपल्या अस्तित्वानं.. संगानं तो अनेकांना एकाचा अनुभव घ्यायला प्रवृत्त करतो! एकाचा निश्चय. एकत्वानुभूतीचा
संकल्प..
एकत्वसिद्धि ही जीवनाची अंतिमता ठरणं/ होणं हेच एकान्ते सुखमास्यताम्
ते साधताना कितीही कष्ट पडले. दुःख, त्रास वाट्याला
आले तरी ते सुखानं
सहजपणे सोसणं, त्यातच सुखआनंद
वाटणं हे सुखमास्यताम् तेच साधकासाठी अत्यावश्यक
आहे!
ते एकीं एक असलेलं सर्वांच्या पार व सर्वांहून पर म्हणजे श्रेष्ठ, परतर, श्रेष्ठतर, परतम, श्रेष्ठतम आहे व तेच
हस्तगत व्हायला हवं अशी बुद्धीमधे ठाम धारणा झाली. बुद्धीचा निश्चय झाला की मग तिथे चेतः समाधीयताम्
याकडे प्रवृत्ति होते. मग अन्य कशाकडे लक्ष लागत
नाही.
लक्ष गेलं तरी चित्त तिथे स्थिर होत नाही, रमत नाही!
चिंतनात् चित्तम् या न्यायानं त्या परतर परब्रह्माचं
चिंतन सुरू झालं की हळुहळु सविकल्प व पुढे निर्विकल्प समाधीकडे वाटचाल सुरू होते! निर्विकल्प समाधि म्हणजे केवळ आनंदावस्था जी प्राप्त झाली की
अर्थ्य,
प्राप्तव्य, साध्य असं काही
उरतच नाही.
म्हणून आचार्य सांगतात.. एकान्तामधेच सुखानं रहा, एकान्ताचं सुख
अनुभवा आणि श्रेष्ठतर, श्रेष्ठतम परब्रह्माचे ठिकाणी चित्ताचा लय साधून
समाधिसुख भोगा!
----------